आनंद अभ्यंकर यांचे शालेय शिक्षण नागपूरच्या सरस्वती हायस्कूलमध्ये झाले. शाळा, महाविद्यालयात किंवा गणेशोत्सवात नाटक बसवून त्या माध्यमातून अभ्यंकर यांनी छोट्या-छोट्या नाटकांमधून मराठी रंगभूमीवर प्रवेश केला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात आले. त्यांचा जन्म २ जून १९६३ रोजी झाला. त्यांची रंगभूमीच्या क्षेत्रातील खरी कारकीर्द पुण्याला सुरू झाली. गरवारे महाविद्यालयात त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी व्यवस्थापन शास्त्राचेही शिक्षण घेतले. बजाज ऑटोमध्ये काही काळ त्यांनी नोकरी केली. मुंबईत आल्यावर उमेदवारीच्या काळात मोहन जोशी यांच्या साथीने त्यांनी कामासाठी संघर्ष केला.
शिक्षण आणि नोकरीच्या काळात त्यांनी काही नाट्य संस्थांसाठी काम करण्यास सुरुवात केली. ‘कुर्यात सदा टिंगलम्’द्वारे त्यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर भक्ती बर्वे यांच्याबरोबर ‘आई रिटायर होतेय’, आनंद म्हसवेकर लिखित-दिग्दर्शित ‘चॉइस इज युवर्स’ अशा नाटकांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या. ‘वादळवाट’, ‘असंभव’, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘फू बाई फू’, ‘मला सासू हवी’, ‘शुभंकरोती’, ‘या गोजिरवाण्या घरात’ आणि सह्याद्री वाहिनीवरील गोंदवलेकर महाराजांच्या मालिकेच्या माध्यमातून अभ्यंकर घराघरात पोहोचले. तर ‘वास्तव’, ‘जिस देश में गंगा रहता हैं’, ‘अकलेचे कांदे’, तेरा मेरा साथ रहें, ‘मातीच्या चुली’, ‘चेकमेट’, ‘कुंकू लावते माहेरचं’, ‘ही पोरगी कोणाची’, ‘पप्पू कांट डान्स साला’, ‘आनंदाचे झाड’, ‘आयडियाची कल्पना’, ‘जन्म’, ‘बालगंधर्व’ ,‘स्पंदन’ अशा चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या. आनंद अभ्यंकर यांचे २३ डिसेंबर २०१२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply