श्रीभगवान म्हणतात, ‘दुःखाचं मूळ तुमच्यातच आहे आणि आनंदाचा झराही आतूनच उगम पावतो. आनंदाची उधळण करायची की दुःखाचे आवेग वाढवायचे हे जो तो ठरवितो.’ खरं तर या प्रकारचा-उपदेश हा काही नवा नाही. अनेक संत-महंतांनी हेच सांगितलंय; पण त्याची उकल होत नाही अन् मग आनंद-दुःखाची चक्रं सुरुच राहतात. माझाच एक अनुभव. त्यावेळी मी पुण्यातल्या एका मोठ्या वृत्तपत्रात काम करीत होतो. माझ्या समवेत काम करणार्या सहकार्यांसाठी विशेष वेतनवाढ सुचविण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. एक दिवस अनंता माझ्याकडे आला. खूप आनंदात होता. काही वर्षांपूर्वी तो संपादकीय सचिवालयातून संपादक विभागात आलेला होता. तो म्हणाला, ‘मी इतकी वर्षे काम करतोय, प्रामाणिकपणे काम करतोय, वेगळं आणि खूप काम करतोय; पण माझ्या कामाची दखल काही कोणी घेतली नाही. तूच एक असा आहे की ज्यानं मला न्याय दिला. माझ्या कामाचं, निष्ठेचं चीज झालं. मला मनःपूर्वक धन्यवाद देऊन तो बाहेर पडला. त्याला इतक्या आनंदात खरेच मीही कधी पाहिलं नव्हतं. यावर्षीच्या पगारवाढीत त्याला तीन अतिरिक्त वेतनवाढीची शिफारस मी केली होती आणि ती मान्यही झाली होती. तो आनंदात असल्यानं मलाही आनंद झाला. दोन-तीन तासांत तो पुन्हा आला. त्याचा चेहरा पडलेला होता. मनात संताप, अस्वस्थता, नाराजी आणि निराशा दाटून आलेली होती. तो बसला; पण बोलला काही नाही. माझ्याकडे आलेले अभ्यागत काम झाल्यावर निघून गेले. हा क्षणभर स्तब्ध. ताठ बसला. म्हणाला, ‘आजवर सारेच माझा घात करीत आलेले आहेत. तू काहीसा वेगळा आहेत असं वाटलं होतं मला; पण तूही त्यातलाच एक निघालास. आजवर माझ्याकडे कोणी लक्षच दिलं नव्हतं, माझी दखलच घेतली नव्हती; पण तू तर माझा अपमानच केला. तो काय बोलतोय हे माझ्या लक्षात येईना. मी म्हटलं काय झालं? वेतनवाढ तर झालीय ना? तसा तो उसळला.
म्हणाला, याला काय वेतनवाढ म्हणतात? ज्यांना पत् कारिता कशाशी खातात याचा पत्ता नाही, अशांना पाच-पाच वेतनवाढी, बढत्या आणि मला…? मी काय अशा फेकलेल्या वेतनवाढीवर खूष होऊ का? आता मला उलगडा झाला होता. त्यावर्षी एकूण बावीस सहकार्यांना वेतनवाढी होत्या. त्यातल्या काहींना बढत्याही! अनंतानं ही सारी माहिती घेतली होती. आपणच केवळ नाही तर इतरही यात आहेत आणि इतरांना आपल्यापेक्षा भरीव वाढ झाली याचा उलगडा त्याला झाला होता. तुलना सुरु झाली होती. स्पर्धा तर होतीच, द्वेष अन् मत्सर सुरु झाला होता. घटना एकच होती. हजार रुपयांची वेतनवाढ; पण दोन तासांपूर्वीचा आनंद-कृतज्ञता, संताप आणि निराशेत बदलली होती. आनंदाला दुःखात रुपांतरित करण्याची क्षमता माणसात आहे. तुलनेत आहे. काय करायचं, हे प्रत्येकानं ठरवावं.
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply