प्रत्येक माणसाला आनंद हवा असतो, परंतु तो प्रत्येकालाच मिळताना दिसत नाही,कारण तो कशात असतो, कुठे आणि कसा मिळवावा लागतो हे प्रत्येक माणसाला ठाऊक नसते. कधी तो जिथे नाही तिथे तर कधी ज्यामध्ये नाही त्यामध्ये शोधला जातो. आनंदित राहण्यासाठी तशी वृत्ती आपल्या ठायी असावी लागते आणि वृत्ती प्रयत्नाने मिळत नाही, परंतु समजून घेता येते.आनंदामध्ये येणारा अडसर म्हणजे दुःख, दुःख कायम आनंदाचा पाठलाग करत असते,सुखावर मात करु पहाते, अशावेळी दुःख म्हणजे काय आणि ते कसे निर्माण होते हे लक्षात घेतले पाहिजे,तरच आनंदाचा मार्ग सापडतो.
दुःख ही मनाला होणारी गोष्ट आहे, त्यासाठी मन अभ्यासले तरच त्याचे तरंग कळतील आणि ते कळल्यावर आनंद निर्माण होऊ शकतो.आपली वृत्ती, विचारसरणी व दृष्टी आपणास दुःखी बनवत असते, बाहेरून कुणीही आपणास सुखी किंवा दुःखी बनवू शकत नाही,आपण आपल्या सुखदुःखास जवाबदार असतो.दु:खाचा विसर पाडणे म्हणजे सुख असू शकत नाही,सुख म्हणजे दुःख समजून घेणे होय.दु:ख हे अज्ञान आहे.ज्ञानी दुःख समजून घेतो, परंतु तो दुःखी नसतो.अज्ञानी दुःख समजून घेत नाही आणि सुखाची इच्छा करतो, म्हणून त्याचे दुःख नष्ट होत नाही.
आपल्या चिमुकल्या डोळ्यांनी ब्रम्हांड पहाता येते, चिमुकल्या पावलांनी विश्व पादाक्रांत करता येते, आणि न दिसणाऱ्या मनात आनंदाच्या सागराला सामावले येते, परंतु त्यासाठी तसा विचार मनात यावा लागतो,मनाचा थांगपत्ता लागला तरच त्यास गवसणी घालता येते.स्व:तिचे मन उलगडता येणे जीवनाचे ध्येय असले पाहिजे.बाह्य ध्येय आणि महत्वाकांक्षा म्हणजे जीवन नव्हे.जन्माने तुम्ही जिथे पोहचायचे तिथे पोहचलेच आहात, फक्त आपण कुठे पोहचलो आहोत आणि कशासाठी पोहचलो ह्याचा कधीतरी विचार झाला पाहिजे.आनंदाचा स्रोत स्वतःची ओळख आहे. आपण या विश्वातील घटक आहोत, आपल्या अवतीभोवती असंख्य जीवजंतू, वृक्षवल्ली आहेत, त्यांच्याशी आपले नाते आहे,ते आपण जोडतो का,कधी त्यांना आपले समजले का, आणि तसे नसेल केले तर आनंद सापडणार नाही.मृत्युनंतरचा स्वर्ग नको,तर जन्मानंतरचा हा स्वर्ग आहे.उगीच काल्पनिक स्वर्गात जाण्याचे आमीष दाखवण्याऱ्या लोकांपासून सावध रहा.पृथ्वी हाच खरा स्वर्ग आहे, आनंदधाम आहे, इथे आनंदाचा विशाल सागर आहे, उगीच एखाद्या डबक्यात जाऊन आनंद शोधू नका,तिथे फक्त दुःख लाभू शकते.
आनंदाचे सोहळे किंवा उत्सव नसतात,ते दुःख विसरण्याचा खटाटोप असतो.दु:ख विसरण्यासाठी नाही, दुःख समजून घेण्यासाठी असते.तात्पुरता, तकलादू आनंद हा खरा आनंद नसतो,ती आनंदाची फक्त छाया असते,खरा आनंद हा स्थायी असतो,तो स्वभाव बनतो,तो स्थिरावतो.आनंद हा चंचल नसतो,उथळ नसतो,तो लहान सहान गोष्टींवर विचलित होत नसतो. बाहेरुन कितीही संकटे, अडचणी आल्या तरी जो आपली मानसिकता ढळू देत नाही,तो आनंदयात्री असतो. झाडेवेलींशी तो बोलतो, जीवजंतूना जवळ करतो,तो चराचरात भगवंत पहातो,ज्याची अंहकाराची लक्तरे गळून पडली आहेत, महत्वाकांक्षा ज्याला शिवत नाही,कुणाविषयी द्वेष जो बाळगत नाही,जो वैश्विक होऊन राहतो,तो या आनंदास पात्र होतो.
आनंदी माणसाच्या सहवासात आनंद मिळतो, आनंदाच्या लहरी,त्यांचे तरंग सुगंधासारखे पसरतात. पहाटेची चिमण्यांची चिऊचिऊ जो कानावर घेतो, कावळ्याची कावकाव जो आवडीने ऐकतो आणि झाडाच्या बुंध्याशी जी खारुताई खेळते हे जो टक लाऊन बघतो,तो हा आनंद मिळवू शकतो. आकाशाचे बदलते रंग जो न्याहळतो आणि समुद्राच्या लाटांचे संगीत जो ऐकू शकतो,तो या आनंदाचा पाईक बनतो.रात्रीच्या निरव शांततेत जो शांती भग्न करणाऱ्या कीड्यांचा स्वर कानी घेतो, चंद्र आणि असंख्य ताऱ्यांसोबत खेळतो,तो आनंदाचा महामेरू असतो. या जन्मात आणि जगात आनंदाचा तोटा नाही, फक्त तो मिळवण्याची आपली योग्यता आणि तयारी असली पाहिजे, बाह्य लाटा कितीही उसळत असल्या तरी समुद्र जसा आतून स्थिर असतो, तसे जगता आले पाहिजे, दुःख समजून घेतले पाहिजे.आनंदाला स्पेस , मोकळीक ठेवली पाहिजे.
ना.रा.खराद
Leave a Reply