वागण्यातुनि जरी, नित भासलो मी छंदीफंदी ।
जोपासुनि छंद अवघे, बहरलो जंगी मुक्तछंदी ।।
तसा, बहरलो जगीं मुक्तछंदी ।।धृ।।
चालतांना मार्गी, नाही बाळगले शल्य कसले ।
क्षमतेतुनि आगळ्या, धारणाच होती तशी मनाची ।।
वाटचालींतुनि निर्भय भय मानसीचे सारे पळाले ।
घेऊनि कौल अंतरीचा, धरिली कांस निश्चयाची ।।
मनोबलांतुनि आहे मी, माझ्याच विचारांचा बंदी ।
जोपासुनि छंद अवघे, बहरलो जगीं मुक्तछंदी।।
तसा, बहरलो जगीं मुक्तछंदी।।१।।
भोगूनि सोशिले, क्षण लीलया, सारेच झेलले ।
पकड होती, अंतरीं पक्की, सार्या सदभावनांची ।।
लाभले मजसीजे, सारेचिते, मधु-गोड मानिले ।
न लाभले जे, खंत नव्हती, ते सारे निसटण्याची ।।
बेफिकीरीतुनि नि:संकोच, विहरलो स्वच्छंदी ।
जोपासुनि छंद अवघे, बहरलो जगीं मुक्तछंदी ।।
तसा हरलो जगीं मुक्तछंदी ।।२।।
नव्हती कधी, मनांस रुखरुख रुढी बंधनांची ।
विचार शीलतेतुनि, तयां लीलया दिली दिली तिलांजली ।।
अकारण, कदाऽपि न केली, चिंता भविष्याची ।
साकारले जीवन, जाणूनि शक्ती, मनगटांतली ।।
न राहिलो कधी, चाकोरी बद्ध, जीवनाचा बंदी ।
जोपासुनि छंद अवघे, बहरलो जगीं मुक्त छंदी ।।
तसा, बहरलो जगीं मुक्तछंदी ।।३।।
दर्दभर्या जीवनास, दिली सदा सुखाची सावली ।
होऊनि नतमस्तक, मजवरी झाली कृपा ईशाची ।।
दु:खास सार्या, झालर संतोषाची, नित लावली ।
निरंतर लाभली मज, मोहरलो मी, आनंदी कंदी ।
जोपासुनि छंद अवघे, बहरलो जगीं मुक्त छंदी ।।
तसा बहरलो जगीं मुक्त छंदी ।।४।।
-गुरुदास / सुरेश नाईक
१५ डिसेंबर २०११, गुरुवारपुणे – ३०
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply