आपल्यापैकी प्रत्येकालाच सुखाची आकांक्षा असते. सुख-साधने सर्वांनाच हवी. असतात, परंतु सर्व सुखसाधने सर्वांनाच कुठे ‘मिळतात? याचे कारण एकच असते ते म्हणजे आनंदाचा उगम कुठे आहे, हेच आपणास ठाऊक नसते. एखादी वस्तू कुठे मिळेल हेच माहीत नसेल तर ती मिळणार तरी कशी? आनंदाच्या शोधात आपण इकडे-तिकडे भटकतो. वस्तू आणि साधनांमध्ये आनंद शोधतो, परंतु जड व चेतनरहित वस्तू आणि पदार्थामध्ये आनंद कसा मिळणार? पत्नी, मुले, पैसा, वैभव, वासना, अहंकार, अधिकार यांचे सुख दीर्घकाळ टिकणारे नसते.
अतिशय सुंदर आणि प्रिय वाटणाऱ्या व्यक्तीचे शरीरसुध्दा मेल्यानंतर स्मशानात नेऊन जाळावे किंवा गाडावे लागते. यावरून हेच सिध्द होते की रूप यौवनाचे आकर्षण तात्पुरते असते. खरे सुख अंतःकरणात राहत असते. आपले नातलग कितीही कुरूप असले तरी ते आपणास आवडतात. कारण ते आपणास प्रिय वाटतात.
यावरून हेच सिध्द होते की प्रेम आणि जिव्हाळ्यानुसारच आवड ही आनंददायक ठरते.
संपत्तीचे आकर्षणसुध्दा अंतःकरणातच असते. जोपर्यंत संपत्तीवर आपला अधिकार
असतो. तोपर्यंतच ती प्रिय वाटत असते. जे दागिने सोने, चांदी, घर, मोटार जमीन इत्यादी आपले आहेत ते प्राणप्रिय वाटतात आणि ते जर विकण्यात आले तर त्यांच्याबद्दल असलेली आपुलकी संपते. आकर्षण वस्तूंमध्ये राहात नसून ते भावनेमध्ये असते, हेच खरे.
देवसुध्दा भावनेच्या आधारावरच फळ देत असतो. ज्यांच्या मनात श्रध्दा नसते, त्यांना देवळे, देवाची मूर्ती हे सर्व निर्जीव वस्तू वाटतात. उपरोक्त विवेचनावरून हाच निष्कर्ष निघतो की पदार्थामध्ये आकर्षण नसते, ते बघणाऱ्यांच्या दृष्टिकोनात असते.
भावनेच्या आधारावरच जर पदार्थाचे आकर्षण वाटत असेल, तर उपयोगी, आवश्यक आणि उपलब्ध असलेल्या वस्तूंवरच आपली भावना केन्द्रित करून त्यांच्यावर प्रेम का करू नये? त्यांना आपलेसे का करू नये? हाच संतोष व समाधान मिळविण्याचा राजमार्ग आहे. जे आपल्याजवळ आहे, त्यातच संतोष व समाधान मानणारे अभावग्रस्त लोकसुध्दा फार सुखी आणि संतुष्ट असतात.
– पं. श्रीराम शर्मा, आचार्य
Leave a Reply