गाण्याची संधी मिळावी म्हणून माझे अनेक प्रयत्न सुरू होते. त्यातलाच एक भाग म्हणून ऑल इंडिया रेडिओच्या मराठी सुगम संगीत आणि हिंदी गीत-भजन अशा दोन ऑडिशन टेस्टस् मी दिल्या होत्या. या दोन्ही परीक्षांमध्ये मी पास झालो आणि मला बी ग्रेड मिळाली. रेडिओच्या ऑफिसला गेल्यावर मला कळले की सुरूवातीला कोणत्याही कलाकाराला ‘बी’ ग्रेडच मिळते. नंतर त्याने अपग्रेडेशनसाठी पुन्हा टेस्ट द्यायची असते. ऑल इंडिया रेडिओने दोन्हींसाठी माझ्याशी पाच वर्षांचा करार केला. या ऑडिशन्स देतांना गाणारा कलाकार आणि परीक्षक यामध्ये पडदा असतो. त्यामुळे कलाकार परीक्षकांना पाहू शकत नाही. मराठी सुगम संगीताची ऑडिशन दिल्यानंतर मला थांबवण्यात आले. परीक्षकांना मला भेटण्याची इच्छा होती. आपण गातांना मला भेटण्याची इच्छा होती. आपण गाताना काही चूक तर नाही ना केली अशा विचारात मी होतो, तोच परीक्षकांच्या खोलीतून संगीतकार सी. रामचंद्र बाहेर पडले. त्यांना पाहून मी तर आश्चर्याने थक्कच झालो. लता मंगेशकर, आशा भोसले, तलत मेहमूद यांनी गायलेली अण्णांची अनेक गाजलेली गाणी मला ऐकू येऊ लागली. या थोर संगीतकाराच्या पाया पडून मी धन्य झालो. संगीतकार सी. रामचंद्र यांना माझा आवाज आवडला होता आणि त्यांनी एक गाणे गाण्यासाठी मला बोलावले होते. आता मात्र मला वेड लागण्याची पाळी आली. या संगीताच्या प्रवासात असे अनेक टप्पे आले की जिथे मला वाटले की याहून तुला अधिक काय हवे आहे? प्रत्येक टप्प्यावर जवळ जवळ पूर्णतेचा आनंद देणारा असा हा आनंददायी प्रवास आहे. पण गंमत ‘या जवळ जवळ पूर्णतेची’ आहे. कारण शंभर टक्के पूर्णता तुम्हाला कधीच मिळत नाही आणि त्या पूर्णतेच्या आशेने तुमचा प्रवास सुरूच राहतो. एक गोष्ट याठिकाणी नक्कीच सांगेन की हा प्रवासच फार मजेशीर आहे. The journey is more joyful than destination. सफर खूबसूरत है मंजिलसे भी। पण हे डेस्टिनेशन काय आहे हे मला अजूनही कळलेले नाही. आनंददायी प्रवास मात्र चालू आहे.
– अनिरुद्ध जोशी
Leave a Reply