नवीन लेखन...

आनंदी ज्येष्ठत्त्वाची सप्तपदी

भौतिक सुखे असे साध्या शब्दात म्हणता येईल मिळवण्यासाठी आपली सारी उर्जा खर्च करतो. आता आपण आपले श्रेयस, म्हणजे भौतिक सुखापलीकडचे असे काही तरी, जे आपल्या आत्म्याला परमानंद देईल, खर्या अर्थाने जगण्याचे सार्थक करेल, ते शोधून त्याचा उत्साह, उमेद आणि उर्जेने पाठपुरावा करायला हवा. हे सर्वात महत्त्वाचे आहे कारण त्यातच आपल्या जगण्याचे प्रयोजन असते.ज्येष्ठ होऊनही वृद्धत्त्व टाळायचे तर मनाने आणि शरीराने समर्थ असणे अगत्याचे असते.


महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या ‘जावे त्यांच्या देशा’ या पुस्तकात ‘एक बेपत्ता देश’ हा अमेरिकन जगण्याचे मर्म उलगडणारा एक सुरेख लेख आहे बघा. त्यात एका विसंगतीवर पुलंनी नेमके बोट ठेवले आहे. व्हिएतनाम  युद्धावरून परत आलेल्या सैनिकांना तिकडे ‘व्हेटरन’ म्हणायचे खरे, पण त्यातले अनेक सैनिक मिसरूड फुटून काही वर्षच झालेले तरुणच होते. जगायला सुरुवात केलेल्या या पोरांना असे ‘व्हेटरन’ म्हणणे म्हणजे विनोदच. सांगायचा मुद्दा ‘व्हेटरन’ म्हणजेच ‘ज्येष्ठ’ या शब्दात अनुभव, परिपक्वता आणि साफल्याच्या भावनेचा अंश असतो. आपल्याला विचार करायचा आहे तो अशा ज्येष्ठ लोकांचे वर्तमान आनंदी कसे करता येईल त्याचा.

आता सुरुवातीलाच याबाबतीत माझा अनुभव सांगतो. बाविसाव्या वर्षी मी नोकरीला लागलो आणि बरोब्बर त्रेचाळीसाव्या वर्षी, म्हणजे एकवीस वर्षे भरपूर काम करून मी कॉर्पोरेट क्षेत्रातील कामातून निवृत्ती घेतली आणि माझ्या आवडीच्या लेखन, वाचन या क्षेत्रात आलो. प्रश्न असा आहे की मी तेव्हा ज्येष्ठ होतो का? रूढार्थाने वृद्ध तर नव्हतोच. पण एका क्षेत्रात भरपूर काम करून, वेळोवेळी पदोन्नती घेऊन ज्येष्ठ तर झालो होतो. मग अशा प्रकारे नोकरी सोडून पुढे दहा वर्षे भरपूर लेखन केले आणि अनेक ठिकाणी माझा उल्लेख ‘ज्येष्ठ लेखक’ असा करायला लागले. तेव्हाही मी वृद्ध नव्हतो पण ज्येष्ठ होतो का? आणि आता गेली सहा वर्षे पुस्तकाचे एक यशस्वी दुकान चालवतो आहे तर मला ‘ज्येष्ठ ग्रंथ विक्रेता’ म्हणतात. आणि आजही साठीच्या उंबरठ्यावर असताना मला मी वृद्ध आहे असे मात्र वाटत नाही, कारण पस्तीस चाळीस वर्षाचा होतो तेवढेच काम मी आज करतो. तेव्हा ज्येष्ठ आणि वृद्ध यात आपण गल्लत करता कामा नये. वृद्धत्त्व ही बर्याच अंशी एक मानसिक अवस्था असते. आपण सातत्याने वृद्ध न होता ज्येष्ठ व्हायचा प्रयत्न करत राहिले पाहिजे असे माझे म्हणणे आहे. आता, हे कसे जमवता येईल? त्यासाठीच माझी ही आनंदी ज्येष्ठत्त्वाची सप्तपदी!

सर्वात पहिले म्हणजे लहानपणापासून जपलेले आणि करिअरच्या नादात काही काळ बाजूला सारावे लागलेले वाचन, लेखन, संगीत, चित्रकला, बागकाम, पर्यटन वगैरे आपले छंद आपण पुन्हा एकदा अगदी उमेदीने हाती घ्यायला हवे. जोमाने आणि उत्साहाने.

आनंदी ज्येष्ठ होण्यासाठी सतत आपण नव्या तंत्रज्ञानाशी मैत्री करणे फार महत्त्वाचे आहे. सफाईने मोबाईल, कॉम्पुटर वगैरे साधने वापरणे, ईमेल किंवा Whtasapp वगैरे नवनवी तंत्रे शिकून तरुणांच्या बरोबर संवाद ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी अनेक वेळा आपले ज्येष्ठपण बाजूला ठेवून तरुणांचे शिष्यत्व पत्करणे गरजेचे असते. यातून नवे तंत्रज्ञान तर शिकायला मिळतेच, शिवाय अनेक तरुण आपले दोस्त बनतात आणि ‘हा बाबा मित्र म्हणूनही छान आहे बरे का’ असे मत आपल्याविषयी आपल्या मागे देखील व्यक्त करायला लागतात हा एक अधिकचा फायदा यात असतो बरे का. आमचे अण्णा उर्फ अनंतराव भावे किंवा सर्वांचा लाडका बाबा उर्फ अनिल अवचट ही अशा वृत्तीची सुरेख उदाहरणे.

मुख्य म्हणजे अगदी रूढ अर्थाने आध्यात्मिक न होता देखील आपण आपल्या जगण्याचे प्रेयस आणि श्रेयस ओळखायला हवे. मधली अनेक वर्षे आपले प्रेयस (म्हणजे इंद्रियगम्य भौतिक सुखे असे साध्या शब्दात म्हणता येईल) मिळवण्यासाठी आपली सारी उर्जा खर्च करतो. आता आपण आपले श्रेयस, म्हणजे भौतिक सुखापलीकडचे असे काही तरी, जे आपल्या आत्म्याला परमानंद देईल, खर्या अर्थाने जगण्याचे सार्थक करेल, ते शोधून त्याचा उत्साह, उमेद आणि उर्जेने पाठपुरावा करायला हवा. हे सर्वात महत्त्वाचे आहे कारण त्यातच आपल्या जगण्याचे प्रयोजन असते.

ज्येष्ठ होऊनही वृद्धत्त्व टाळायचे तर मनाने आणि शरीराने समर्थ असणे अगत्याचे असते. त्यासाठी नियमित व्यायाम आणि वर म्हटल्याप्रमाणे छंद जोपासणे कामी येते. शरीर सलामत तो परमानंद पचास हे ओळखायला हवे.

त्याचबरोबर वयाला मान देऊन आपण अनेक गोष्टींचे नवे अर्थ, नवे आयाम ओळखायला हवे. उदाहरणच घ्यायचे तर जोमदार आणि रांगड्या संभोगाच्या पलीकडे देखील शृंगार असतो, किंबहुना तोच सर्जनशील शृंगार हेही आपण समजून घ्यायला हवे. शृंगारातले अनेक पैलू, हळवे आणि हळुवार कोपरे शोधत शोधत जोडीदाराला खुलवत आपले romantic आयुष्य सतत हिरवेगार ठेवण्याची कला साधता यायला हवी. किंबहुना काही सिद्ध करणे हा हेतू नसणारा, काहीही प्राप्त करणे हा हेतू नसलेला निखळ आनंददायी शृंगार हे या वयातले एक सुरेल गाणे व्हायला हवे.

घेण्यातला आणि मिळवण्यातला आनंद हा ‘अॅचिव्हमेंट’च्या अर्थाने सुखद आणि अभिमानास्पद असतोच, पण देण्यातला आणि इतरांना वाटण्यातला आनंद अधिक दीर्घकाळ गुणकारी आणि सुखद असतो याचेही भान यायला हवे. सफल होणे, यश प्राप्त करणे हे तर छान असतेच पण एखाद्याला यशस्वी होण्यासाठी हात देऊ करण्यात वेगळेच साफल्य असते. अशा संधी आपण आवर्जून शोधून त्यासाठी आवर्जून प्रयत्न करायला हवे. थोडे सकारात्मक आणि सर्जनशील नजरेने अवतीभवती पाहिले तर असे अनेक जण तुमच्या मदतीसाठी उत्सुकच नव्हे तर आतुर झालेले तुम्हाला आढळतील. त्यासाठी आपली नजर जरा स्वत:कडून इतरांकडे वळवता यायला हवी.

आणि शेवटचे म्हणजे वर जे म्हटले नजर स्वत:कडून इतरांकडे वळवणे, त्याच्या अगदी उलट एका बाबतीत करता यायला हवे. जगण्याच्या यशापयशाची कारणे शोधताना आपण अधिकाधिक स्वत:च्या जवळ यायला हवे. असे आढळेल की आपल्या दु:खाची आणि अपयशाची जी कारणे स्वत:पाशी येऊन ठेपतात त्यांचाच विचार आपल्याला यशाकडे नेणार असतो. हे समजून घेणे जरासे अवघड पण फार मोलाचे आहे. आपल्या दु:खाची कारणे आपण जितकी स्वत:पासून दूर नेऊ तितकी ती ‘अनियंत्रित’ होत जातात, कारण त्यावर आपले काहीच नियंत्रण नसते, कंट्रोल नसतो. तेव्हा सातत्याने आत्मावालोकन करत स्वत:ला रोजच कालच्यापेक्षा अधिक चांगला माणूस करत राहाण्याची खोड आपण लावून घ्यायला हवी.

मित्रहो, ज्येष्ठ होऊनही म्हातारा न होता आणि वृद्धत्वाचे तथाकथित आणि कथाकथित रडगाणे न गाता मस्त मजेत जगत राहून काळजात झगमगते झुंबर पेटवून आयुष्याचा बारमाही श्रावण करण्यासाठी ही आहे माझी आनंदी सप्तपदी. तेव्हा आनंदाने जगत राहा आणि आनंदी जगात राहा.

–संजय भास्कर जोशी

(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा  दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..