समुद्रावरचे आल्हाददायक वारे अंगावर घेत तेनाली रामचा मित्र स्वत:शीच विचार करीत झोपाळ्यावर पहुडला होता. तेनालीरामने त्याला विचारले, “मित्रा कसला विचार करतोस?” तेव्हा तेनालीरामच्या मित्राबरोबर त्याचा संवाद सुरू झाला.
मित्र म्हणाला, “मी खरोखरच आनंदी कधी असेन याचा विचार करतोय.”
त्यावर तेनालीराम म्हणाला, “मग तो दिवस कधी उगवणार आहे?”
मित्राने तेनालीरामकडे आपले मन मोकळे केले. तो म्हणाला, “ जेव्हा सागरकिनारी माझा एखादा बंगला असेल, स्वत:ची गाडी असेल, चार चार मुले असतील, त्यांना चांगले शिकवता येईल, मग ते छानशी नोकरी मिळून भरपूर पैसे मिळवतील, आणि …
तेनालीरामने मध्येच त्याला थांबवून म्हटले, “ मला कल्पना आली तुला काय म्हणायचे आहे ते; परंतु त्यानंतर काय?
मित्राने तत्काळ आपला मनोदय व्यक्त केला व म्हणाला की, “मग मी मस्तपैकी पायावर पाय टाकून असा हवा खात आराम करीन.”.
तेनाली त्यावर म्हणाला, “परंतु माझ्या मित्रा, तू आत्ता पण कोणत्याही कष्टाशिवाय तेच करतो आहेस ना? मग भविष्याची चिंता करीत आपला आनंद कशाला पुढे ढकलतोस?”
तात्पर्य, भविष्याची चिंता करण्यात वेळ घालवण्यापेक्षा वर्तमानातला आनंद वेचायला शिका.
Leave a Reply