नवीन लेखन...

अनंत हे अनंतात विलीन झाले

समस्त जीवांस अक्कलकोट मध्ये प्रत्यक्ष दिसणारी परब्रह्म मूर्ती चैत्र वद्य त्रयोदशी, सहवद्य चतुर्दशी, शके १८००, सन १८७८ ला समाधी लीलेचे निमित्त करून पृथ्वीतला वरून गुप्त झाली.

प्रसंग असा आहे की त्या दिवशी सकाळ च्या दोन प्रहरापर्यंत एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटात घडणार आहे, याची जराही कल्पना कुणास नव्हती. मागील पंधरा दिवसांत काहीतरी विचित्र लक्षणे श्री दाखवित होते खरे! बारा दिवस त्यांनी अन्नही घेतले नव्हते. पण त्या दिवशी काकुबाई व इतर भक्तांच्या विनवणीवरून थोडी पेज घेतली. मग त्यांना निजविले. तेव्हा बाळप्पांनी सुपारी दिली, ती घेतली.

राणीसाहेबही तिथे होत्या. त्यांना अत्यानंद झाला. ‘आता माझ्या महाराजांस भय नाही,” असे म्हणून त्या वाड्यात परत गेल्या.

..पण त्या दिवशी समर्थकृपेने साधुत्वाला पोचलेल्या असंख्य साधकांचा हृदयाचा ठोका चुकला होता हे खरे!

समर्थसेवेकरी बाळप्पा यांना बराच अदमास असावा. कारण अक्कलकोटात त्वरेने हजर होण्याच्या तारा त्यांनी काही स्वामीभक्तांस केल्या होत्या. त्यानुसार मुंबईचे केशव नाईक अक्कलकोटात पुत्र रामचंद्र यांच्यासमवेत दाखल झाले. पुढे, २५ जुलै १९२५ला साईलीला मासिकाच्या संपादकांना रामचंद्र नाईकांनी हे वृत्त कळविले होते. ते म्हणतात,- आम्ही अक्कलकोटात पोचलो तेव्हा ती दिव्य भूमी स्तब्ध भासली. त्या नगराची हालचालच थांबली होती जणू!

महाराज पेठेतल्या चोळप्पांच्या मठात असतील म्हणून तिथे गेलो, तर तिथे सामसुम होती. काही कळेना. मठाजवळ महाराजांची गाय व वासरू होते. तिथे गडबड दिसली म्हणून पाहिले तर भागीरथी गंगा आकाशाकडे पाहत हंबरडा फोडत होती. वासरूही हंबरत होते. काहीतरी भयंकर घडले आहे हे ओळखून आम्ही तसेच वटवृक्षाकडील स्थानावर धावत निघालो.

इकडे आधीपासून वडाखाली काय चालले होते, ते पहा- दुपारी १ वाजण्या च्या सुमारास श्रीस्वामी गुरूंनी आपल्या सर्व जनावरांस समोर आणण्याचे फर्मावले. हे ऐकताच सेवेकरी अस्वस्थ झाले. लागलीच त्या प्राण्यांना श्रींसमोर आणण्यात आले. त्या दिवशीचे नैवेद्य त्यांना देण्याची स्वामीआज्ञा झाली. इतकेच काय, आपली वस्त्रेही श्रींनी त्या इमानी मुक्या प्राण्यां च्या अंगावर घालण्यास सांगितले. त्या प्राण्यांनाही प्रसंगाचे गांभिर्य लक्षात आले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. नित्य सेवेत अंतर पडणार म्हणून सेवेक-यांचे हृदय पिळवटून निघाले होते. कसेतरी आवंढा गिळत, नजर चुकवित ते स्वत:शीच प्रार्थना करीत होते.

ब्रह्मांडनियंता स्वेच्छेने लीला दर्शवित होता. त्यांच्या त्या वैचित्र्यपूर्ण लीलेने उपस्थित हजारो भक्त कोलमडून जात होते. श्रींनी स्वत: उठून जनावरांच्या अंगावर हात फिरविला नि पलंगावर येवून बसले. त्या हालचालींत नित्याचा आवेश नव्हता इतकेच. एरवी समर्थ दर्शनाने आनंदाने सळसळणारा वटवृक्षही मौन धारण करून होता.

महाराजांनी टेकून बसण्याकरीता तक्क्या च्या दिशेने खूण करताच सेवेक-यांनी तो दिला. श्रीपाद भटजींनी त्यांना बसविले. महाराज स्वस्तिकासनात स्थानापन्न झाले. ते तसेच किंचित मागे टेकले नि त्यांनी लगेचच नेत्र मिटले. आसपास वैदु मंडळी होतीच. कुणाच्या च जीवात जीव नव्हता. पुढे होवून एकाने नाडी पाहिली, तेव्हा तो गडबडला. नाडी मुळीच लागेना. त्याच्या व्यथित हालचालींना ओळखून वडाखाली एकच आकांत उडाला.

भुजंगा सेवेकरी व अन्य नि:सीम भक्त मिळेल तिथे डोके आपटीत होते. कुणी जमिनीवर लोळण घेतली. स्त्रीवर्गाने आकांत मांडला. कोणी आपलेच केस उपटत होता. स्थिरचित्त साधुवर्य आपल्या नेत्रावाटे भावनांना वाट मोकळी करून देत होते. धक्क्यातून न सावरलेले कित्येकजण श्रींची काही हालचाल होते आहे का, हे निरखत स्तब्ध झाले होते.

“हे गुरुमाय, अरे देवा, समर्थ सद्गुरु, श्रीस्वामी समर्थ देवा, भगवंता, आम्ही आता कोठे पाहावे, सांगा’’, अशा विविध शब्दांत समस्त जन आक्रंदन करीत होते. कुणीच कुणाला सावरू शकत नव्हता. अशा हल कल्लोळात थरथरणा-या अक्कलकोटास अचानक एक क्षणैक सुखद धक्का बसला. श्रींनी आपले नयन सहजच उघडले. प्रेमभावाने सर्वांस न्याहाळू लागले. सर्व गलबला थांबला. सारी लेकरे मायबाप सद्गुरुंच्या पलंगासभोवती सरकली.

श्रींच्या वचनांना ग्रहण करण्यास ते एकवटले. तेव्हा समर्थमुखातून श्रीकृष्णावतारा वेळी त्यांनी सांगितलेले अद्भूत वचन परत पुन्हा उच्चारले गेले.-

अनन्याश्चिन्तयंतो मां ये जना: पर्युपासते ।। तेषांनित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ।।

जो अनन्य भावे शरण मजसी, पाहील मुक्तीचा सोहळा।। जिंकील जीवन कला। जो मजवरी विसंबला ।।

समर्थ वचनाने भारावून गेलेले भक्तगण अनन्य शरण भावाने प्राण एकवटून श्रीस्वामी कृती कडे पाहत होते. श्रींनी आशीर्वाद संकेत दर्शविण्यासाठी हस्त कमल उंचावले. पुढच्याच क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला. समर्थ निजानंदी निमग्न जाहले. अंतकाळी त्यांच्या मुखातून खसखशीएवढे तीन पांढरे दाणे बाहेर पडले.

नंतर, श्रीस्वामीदेह दरबार मंडळींच्या आग्रहामुळे, पेठेतील मठाच्या ध्यानगुंफेत ठेवण्यात आला. वाजतगाजत मिरवणुकीने, ढोलताशांच्या गजरात, आतषबाजीत त्यांच्या या समाधीलीलेस अंतिम स्वरूप देण्यात आले! तीन दिवस बाळप्पा समाधीत उतरून पूजा करीत होते. मग दगड लावून समाधी बंद करण्यात आली.

वडाखाली कर्जाळकरांच्या घरालगत छप्परवजा विश्रांत स्थळी मंगळवार, ३० एप्रिल १८७८, शके १८००, दुपारी २ वाजता चैत्र वद्य त्रयोदशी संपून चतुर्दशी सुरु झाल्यावर सायंकाळी ४.३० वाजता ही घटना घडली! पुढे तेथे भंडारखान्यातील दत्त मंदिरात असलेली एक शिवपिंडी वडाखालच्या समाधी प्रसंग स्थळी स्थापन झाली! हेच स्थळ आज अक्कलकोटात वटवृक्ष देवस्थान नामे सुप्रसिद्ध आहे.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..