आपल्या आयुष्यात धक्का देणारे प्रसंग घडत असतात. एखाद्या घटनेचा आपल्याला धक्का का बसतो? प्रसंगानुरूप आपल्या अपेक्षांना एक वरची व एक खालची मर्यादा असते. हया मर्यादा व्यक्तीसापेक्ष व विषयसापेक्ष असतात. या वरच्या व खालच्या मर्यादांमधील घटना धक्का देत नाहीत, या मर्यादेबाहेरील घटना देतात. वारंवार धक्कादायक घटना घडत गेल्या तर आपण त्या मर्यादा पुन्हा आखतो. मग तशा घटनांचा धक्का बसेनासा होतो. दोन व्यक्तींमधील संभाषण वा व्यवहार दोघांच्या मर्यादां दरम्यान होत असतील तर ते ठीक असते. पण अशी मर्यादा ओलांडली गेली की एकाचे दुसर्याविषयीचे मत बदलते. कारण त्या एकाला धक्का बसलेला असतो. योग्य कारण जाणण्यात जर तो कमी पडला तर गैरसमज वाढतो. धक्का बसल्यानंतर त्यामागचे खरे कारण समजून घेणे म्हणूनच आवश्यक असते. यासाठी मन खुले असावे लागते. मला आलेले हे दोन अनुभव.
प्रसंग 1 – माझ्या नात्यातील एकाचे निधन झाले. पुण्याला 13 वा दिवस झाला. जमलेली मंडळी घरोघरी गेली. राहिलेले अन्नपदार्थ भात, अळूची भाजी व खीर गरजूस द्यावे या हेतूने मी, पत्नी व पुतण्या पिशवीत डबे भरून संध्याकाळी निघालो. मंदिराजवळ काही याचक बसले होते. मी त्यांना प्रसंगाची पूर्ण कल्पना दिली व विचारले, ‘तुम्ही हे अन्न घेणार का?’ त्यांनी नाही म्हटले. यात धक्कादायक काही नव्हते. आम्ही परत फरलो. इतक्यात एकजण सायकल घेऊन आला. त्याने आम्हाला आधीच्या याचकांजवळ पाहिले असावे. त्याने विचारले, ‘काय आहे डब्यात?’ आम्ही सर्व काही सांगितले. त्याने आमच्याकडून द्रोण भरून खीर घेतली व प्यायली. पुन्हा मागून घेतली. तो भात नको म्हणाला पण अळूची भाजी दोन द्रोण प्यायला. आम्ही त्याला नमस्कार केला. आणखी काही विचारण्याआधी तो सायकलवरून निघून गेला. त्याने आम्हाला ‘काय आहे डब्यात’ असे जर विचारले नसते तर आम्ही त्या सायकलस्वाराकडे याचक म्हणून कधीच पाहिले नसते. तशी अनेक माणसे नव्हती का आमच्या आसपास? त्यातलाच तो एक असे समजलो असतो.
हा अनपेक्षित घक्का होता. मनावर कोरणारा प्रसंग घडला होता. समजून उमजून तेराव्याचं अन्न मागून घेणारा धडधाकट मणूस होता तो, गरीब वा वयस्क वा दुबळा नव्हता. कोण कोणाची परिक्षा घेत होते कुणास ठाऊक. ह्या घटनेचा विचार मी त्याच चक्रात अडकून पडल्यासारखा 15 वर्षे करत आहे. बघुया केव्हा वेगळे उत्तर सापडते.
प्रसंग 2 – अन्नदानाचा भाग म्हणून एक नेम ठरविला होता आम्ही. मी, पत्नी व मुलगा यापैकी ज्याला जमेल त्याने दर गुरुवारी भुकेल्याला वा गरजूला जिलबी द्यायची. त्यावेळी मी प्रभादेवीला कामासाठी जात असे. एका गुरुवारी संध्याकाळी ऑफिसचे काम झाल्यावर मी दादर स्टशनकडे निघालो होतो. कबुतरखान्यापाशी जिलबीचा पुडा घेतला व जैन मंदिर, मारुती मंदिराच्या आसपास बसणार्यांपैकी एकाच्या हातात ठेवला. रस्ता क्रॉस करण्यासाठी मी वाट बघत थांबलो होतो. तेवढ्यात त्या माणसाने उघडलेल्या पुड्यातील जिलब्या रस्त्यावर भिरकावल्या व माझ्याकडे बघितले. त्याचवेळी रस्ता मोकळा झाला म्हणून मी तो ओलांडून दुसर्या बाजूस आलो. जिलब्या तुडविल्या जात होत्या पायांखाली व चाकांखाली. मी त्या माणसाच्या चेहर्यावरचे भाव बघितले. धक्का बसण्यासारखी ही घटना होती का?
गाडी पकडून मी घरी आलो. हातपाय धुवून प्रथम मी ही गोष्ट पत्नीस व मुलास सांगितली. या दीड दोन तासात या घटनेविषयीचे माझे मत तयार झाले होते. मी अन्नदान केले. जिलब्या माझ्या हातून त्याच्या हाती दिल्यावर माझा जिलब्यांशी संबंध राहिला नाही. जिलबीचे त्याने काय करावे ही त्याची मर्जी होती. माझा निष्कर्ष असा होता. जिलब्या रस्त्यावर फेकून देण्यामागे यापैकी काही कारण असू शकते.
अ) त्याचे काहीतरी बिनसले असावे.
ब) त्याला जिलबीचा त्रास होत असावा.
क) त्याला जिलबीचा वीट आला असावा.
ड) जिलबीमुळे त्याला एखादी अप्रिय घटना आठवली असावी.
काही असले तरी मला त्याच्या या कृतीचा मुळीसुध्दा राग आला नाही. कदाचित त्याला ‘डायबेटीस’ हा आजार असेल, नाव माहीत नसले तरी. पण हे मला कसे कळणार? मी माझे काम केले तसे त्याने त्याचे केले. म्हणून त्याची ही कृती मला विक्षिप्त वाटली नाही.
अहो, अहेर म्हणून आलेली पॅकेट्स आपण नाही का ‘फॉरवर्ड’ करत? तेही समजून-उमजून. दान नसेल पण भेटवस्तू असते ना ती? किती सहजपणे त्यामागची भावना ठोकरली जात असते (जिलबी तुडविल्यासारखी). पण त्यासाठी आपणच कारण ठरविलेले असते. दुसर्याच्या कृतीमागचे कारण नीट समजून घेतले तर पुश्कळ वेळा धक्का म्हणून काही उरतच नाही. कारण आपले विचारांचे तारू धक्क्याला लागलेले असते.
— रविंद्रनाथ गांगल
Amazing
एकदा आपण एखादी वस्तू, पदार्थ कोणाला दिल्यानंतर त्याचे काय करायचे हा त्या व्यक्तींचा अधिकार आहे हे आपण पटकन मान्य करीत नाही. खरंतर आपण ती वस्तू त्या व्यक्तीवर लादलेली असते, सर्वसाधारणपणे. व्यासास आहेर विचारून करतात ती पध्दती सुयोग्य. अन्यथा गिफ्टकार्ड किंवा आर्थिक भेट सुटसुटीत, आपल्या समाधानासाठी. देउळ किंवा संस्था यांना द्यायच्या भेटीलापण हेच लागू होते.