नक्षत्रांचे देणे नंतर कार्यक्रम आयोजकांना हे एकदम पटले की फक्त हिंदी मी चांगला गाऊ शकतो. मग मराठी भावगीते, हिंदी चित्रपटगीते यांचे अनेक कार्यक्रम माझ्याकडे आले. हिंदी गझल बरोबरच अनेक कार्यक्रम माझ्याकडे आले. “हिंदी गझल बरोबरच अनेक कार्यक्रमात तुला गाताना पाहून खूप आनंद होतो.” माझे गुरू श्रीकांत ठाकरे म्हणाले, “तू एक हजार कार्यक्रमांचे स्वप्न पहातो आहेस हे मला ठाऊक आहे. पण कधी कधी थोडी शंका वाटायची. आता मात्र तुझे स्वप्न नक्की पूर्ण करशील अशी खात्री वाटते.” श्रीकांतजींच्या या शब्दांनी मला जे समाधान लाभले ते शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य आहे. मी चटकन त्यांना वाकून नमस्कार केला.
“तुमचा आशीर्वाद असू द्या, मग मी प्रयत्नात कसूर करणार नाही.” त्यावर श्रीकांतजी म्हणाले,
“अरे गुरुचा आशीर्वाद शिष्याबरोबर कायमच असतो. शिष्याने त्यावर अढळ विश्वास ठेवायचा असतो आणि तो सार्थ करायचा असतो.
श्रीकांतजींची तब्येत अलीकडे ठीक नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष गाणे शिकणे थांबले होते. पण वेळोवेळी भेटून त्यांचे मार्गदर्शन मात्र मी घेत होतो. त्यांच्या शब्दांनी नवा हुरूप आला. क्लॅरिअंट इंडिया लिमिटेडसाठी प्रीतमजी घनश्यामानी यांनी माझा गज़लचा कार्यक्रम फरियाज़ हॉटेल, लोणावळा येथील लॉनवर आयोजित केला. ही माझी अत्यंत आवडती जागा आहे. या लॉनवर कार्यक्रम करतांना समोर एक मोठी दरी दिसते आणि पलीकडे चमचम करणारे लोणावळ्याचे अनेक दिवे तर आकाशात तितकेच तारे दिसतात. प्रख्यात निवेदिका मंगला खाडिलकर यांच्यासाठी शिवसेना शाखा बोरीवलीसाठी एक कार्यक्रम केला. माझ्याबरोबर मृदुला दाढे-जोशी, रवींद्र बिजूर आणि सोनाली कर्णिक असे कलाकार होते. कार्यक्रमानंतर खूप उशिरा घरी परतल्यामुळे दुसऱ्या दिवशी बराच उशिरापर्यंत झोपलो होतो. फोन खणखणला आणि मला जाग आली. पलीकडून कोणीतरी सांगत होते. “संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे निधन झाले. लगेच दादरला ये.” माझा विश्वासच बसेना. केवळ आठ दिवसांपूर्वीच त्यांना भेटलो होतो आणि आज? ताबडतोब दादरला पोहोचलो. माझे मेहुणे विद्याधर यांच्याबरोबर घरी गेलो. वहिनी, जयू, राज सगळे दुःखात बुडाले होते. अनेक मान्यवर मंडळी अंतिम दर्शनासाठी येत होती. भाजपचे केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन माझ्याबरोबरच प्रवेशले. “फारच धक्कादायक आहे हे,” ते म्हणाले. शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अगणित शिवसैनिक आणि असंख्य संगीतप्रेमी यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.
महाराष्ट्राने एक मोठा संगीतकार गमावला. माझे तर अपरिमित नुकसान झाले होते. श्रीकांतजींबरोबरचा बावीस वर्षांचा सहवास संपुष्टात आला होता. एका वर्षामध्ये माझे दोन्ही गुरू काळाच्या पडद्याआड निघून गेले. घरी परतताना श्रीकांतजींचे शब्द कानात घुमत होते. ‘अरे, गुरुचा आशीर्वाद शिष्याबरोबर कायमच असतो. शिष्याने त्यावर अढळ विश्वास ठेवायचा असतो आणि तो सार्थ करायचा असतो.’ संगीतकार श्रीकांत ठाकरे यांना सांगितीक श्रद्धांजली वाहणारे दोन कार्यक्रम आम्ही आयोजित केले. एक प्रबोधनकार ठाकरे सभागृह बोरिवली येथे तर दुसरा गडकरी रंगायतन ठाणे येथे. या कार्यक्रमांमुळे हे जाणवले की आता श्रीकांतजी नाहीत, पण त्यांनी निर्माण केलेले संगीत मात्र कायम जिवंत असणार आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी रसिकांना कायम आनंद देणार आहेत. नाही तरी कलाकार त्याच्या कलाकृतीत कायम जिवंत रहातो हेच खरे. आजही श्रीकांतजींनी स्वरबद्ध केलेल्या गझल गाताना श्रीकांतजी पुन्हा भेटतात. प्रत्येक गझलबरोबर असंख्य आठवणी जाग्या होतात आणि श्रीकांतजींबरोबरचा संवाद पुन्हा सुरू होतो.
– अनिरुद्ध जोशी
Leave a Reply