आजची कथा : अनपेक्षित
पूर्व प्रसिद्धी : प्रपंच
दीपावली २०११
जी कथा लिहिताना , लिहिल्यानंतर आणि आजही वाचताना मी खूप अस्वस्थ होतो ती कथा म्हणजे अनपेक्षित.
काही वर्षांपूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्रात एक बातमी छापून आली होती. दिल्लीत रस्त्यावर काही तरुणींनी स्लट वॉक काढला होता. म्हणजे अर्धनग्न होऊन बेशरमी मोर्चा काढला होता. पण पोलिसांनी वेळीच धावपळ करून तो थांबवल्यामुळे पुढचा अनर्थ टळला होता.
हे असले मोर्चे हे परदेशातील फॅड . अमेरिका , स्वीडन , साऊथ आफ्रिका , कॅनडा येथे असले मोर्चे निघाल्याची नोंद आहे. पण भारतात निघालेला तो एकमेव मोर्चा होता आणि त्याला कारण काय होतं तर , टोरांटो मध्ये कुठलातरी एक पोलीस अधिकारी म्हणाला होता , ‘ बायका उत्तान कपडे घालतात म्हणून त्या बलात्काराच्या शिकार होतात . ‘
त्याला तिथल्या जनतेनं उत्तर दिलं होतं . पण त्याचा भारतातल्या परिस्थितीशी काही संबंध नव्हता किंवा इथे मोर्चा काढण्याचा संबंध नव्हता. पण फेमिनिझम च्या चुकीच्या कल्पनांनी भारलेली काही मंडळी भारतात आहेत , त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्याच्या अनावर , अगोचर कल्पना राबवण्यात त्यांना जास्तच रस असतो. त्याचा इथल्या तरुण पिढीवर काय परिणाम होईल याची त्यांना फिकीर नसते किंवा भारतीय कुटुंब संस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो , याची जाणीव नसते. मोबाईलच्या आहारी गेलेली , व्यसनाधिनतेत गुंतलेली आणि त्यामुळे सारासार विचारशक्ती गमावून बसलेली तरुण पिढी कुठे जाणार आहे , याचा विचार कुटुंब संस्थेनं करायला हवा असं मला ती बातमी वाचून वाटू लागलं आणि आकाराला आली अनपेक्षित ही कथा.परिणाम तीव्र व्हायला हवा म्हणून मी थोडं अधिक लेखन स्वातंत्र्य घेतलं आणि कथा लिहिली .
कथेमध्ये असा मोर्चा निघतो . त्यात अगदी अल्प वस्त्र घालून , तरुणी सहभागी होतात . मीडिया लाईव्ह सगळं दाखवू लागतो . टीआरपी वाढण्यासाठी क्लोजप शॉट चा भडिमार सुरू होतो .अखेर मोर्चा पोलीस अडवतात . सगळ्यांना अटक होते आणि सगळ्या तरुणींना माणुसकीच्या नात्यातून गुन्हा दाखल न करता, त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन केले जाते .
कथा इतकीच आहे. पण त्यात कंगोरे अनेक आहेत .
अनन्या हे नायिकेचं नाव. घरात आणि घराबाहेर प्रचंड स्वातंत्र्य मिळाल्याने शेफारून गेलेली , मोबाईलवर सतत पडीक असलेली , सनसनाटी प्रसिद्धीसाठी हपापलेली , घरातल्यांना धुत्कारून लावणारी , मित्रमैत्रिणी , पार्ट्या , डिस्कोथेक , रेव्ह पार्टी , क्लब्ज मध्येच रमणारी. फॅशनचा जबरदस्त मोह असलेली आणि त्यापायी काय काय गमावतो आहोत याचं भान नसलेली .साहजिकच ती या बेशरमी अर्धनग्न मोर्चात अग्रभागी झळकणारी.
भार्गवी ही तिची आई. अनिकेत हे तिचे वडील आणि अपूर्व हा तिचा लहान भाऊ. मोर्चातल्या तिच्या अर्धनग्न दिसण्याने , क्लोजअपच्या अतिरेकाने या तिघांचे भावविश्व हादरून गेले आहे. तिच्या बेधुंद वागण्याला आपण जबाबदार आहोत या जाणिवेनं शरमून गेलेले आईवडील अस्वस्थ होऊन मान खाली घालून ऑफिसातून , शाळेतून परत येत आहेत. येता येता ऐकाव्या लागणाऱ्या अश्लील कॉमेंट्स मुळे त्यांना मेल्याहून मेल्यासारखे झाले आहे. लहानग्या अपूर्वला काहीतरी भयंकर वाटत आहे. तो अबोल होऊन बसला आहे.शेवटी पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर तिथला इन्स्पेक्टर त्यांना बरंच काही सुनवतो आणि एक प्रश्न विचारतो.
‘ अनिकेतजी , हा मोर्चा , त्याची क्लिपिंग हे सगळं मीडियावर , फेसबुकवर आणि कुठे कुठे गेलं आहे नक्की , मग आता तिचं लग्न कसं ठरवणार ? तिच्या भविष्याचा काही विचार केलाय ? ‘
असं काही आपल्या आयुष्यात घडेल अशी कल्पनासुद्धा अनिकेतनं केलेली नसल्यानं तो केवळ परिणामांच्या कल्पनेनं हादरतो आणि घरी येतो. पोलिसांनी डोक्यात सोडलेल्या भुंग्यानं तो कोलमडतो , भार्गवी कोलमडते. पुढे काय या चिंतेत असताना फोन वाजतो. फोन अनन्याचा असतो. फोनवरच ती सांगते;
‘ मघाशी पोलिसांनी तुम्हाला विचारलेला प्रश्न मी ऐकलाय . पण तुम्ही दोघांनी कसलीही काळजी करू नका . मी लग्न ठरवलंय . ज्या मैत्रिणीच्या फ्लॅटवर मी आलेय , तिच्याबरोबर मी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणार आहे . कदाचित आम्ही दोघी नंतर लग्नसुद्धा करू . डोन्टवरी ! ‘
अनन्याचं फोनवरचं बोलणं ऐकून दोघांची शुद्ध हरपते आणि अनपेक्षित वळणावर कथा संपते .
ही माझीच कथा वाचताना मी आजही अस्वस्थ होतो .समाजातील अशा प्रकारच्या वृत्ती असणाऱ्यांच्या भविष्यकाळाच्या जाणिवेनं मन सुन्न होतं.
आणि ते स्वाभाविकच आहे , नाही का ?
तुम्हाला काय वाटत ?
कळवा मला .
प्रतिसाद अपेक्षित आहे .
आणि हो ,
या कथेतील घटना वास्तवातील असली तरी पात्रं , प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहेत .
— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
९४२३८७५८०६
Leave a Reply