या बासऱ्यांचा शोध जिथे लागला ती एयनान-मल्लाह ही जागा, १९५०-६०च्या दशकापासून पुरातत्त्वतज्ज्ञांकडून अभ्यासली जात आहे. सन १९९६ ते २००५ या काळातील इथल्या उत्खननात, पुरातत्त्वतज्ज्ञांना इथे, बदकांसारख्या काही पाणपक्ष्यांची हाडं सापडली. खरं तर, हा पाणपक्ष्यांच्या हाडांचा विखुरलेल्या स्वरूपातला एक साठाच होता. इथे सापडलेल्या हाडांची एकूण संख्या सुमारे अकराशे इतकी होती. लॉरेन्ट डेव्हिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अलीकडेच या हाडांवरचं संशोधन हाती घेतलं. या सर्व अकराशे हाडांत त्यांना, सात वैशिष्ट्यपूर्ण हाडं सापडली. या हाडांवर छिद्रं होती, तसंच त्यावर विशिष्ट प्रकारच्या खुणा होत्या. लॉरेन्ट डेव्हिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या हाडांवर, सूक्ष्मदर्शक आणि तत्सम साधनं वापरून तपशीलवार संशोधन केलं. या संशोधनावरून, ही हाडं म्हणजे निव्वळ हाडं नसून, हाडांपासून तयार केलेली सुषिर वाद्यं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ही हाडं बरीच जुनी असल्यानं, या हाडांवर काही नैसर्गिक पदार्थांचे थर जमा झाले आहेत. त्यामुळे या थरांखालची, हाडाच्या पृष्ठभागाची रचना अभ्यासण्यासाठी, या सशोधकांनी या हाडांचं सीटी स्कॅनही केलं. या हाडांवर काही ठिकाणी दिसणाऱ्या लालसर-नारिंगी रंगाचं रासायनिक विश्लेषण केल्यानंतर, हा रंग म्हणजे लोहाचा ऑक्साइड आणि चिकणमाती यांचं मिश्रण असल्याचं दिसून आलं. त्यावरून ही हाडं मुद्दाम रंगवली असल्याचं स्पष्ट झालं.
लॉरेन्ट डेव्हिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यासलेली, हाडांपासून बनवलेली ही सुषिर वाद्यं आकारानं फक्त काही सेंटिमीटर लांबीची आहेत. ही वाद्यं तयार करण्यासाठी, पाणपक्ष्यांच्या पंखांतल्या विविध प्रकारच्या हाडांचा वापर केला गेला आहे. या सात वाद्यांपैकी सहा वाद्यं मोडक्या स्वरूपात असून, त्यांचे फक्त काही तुकडेच सापडले आहेत. एक वाद्य मात्र संपूर्ण स्थितीत सापडलं आहे. या सुस्थितीतल्या वाद्याची लांबी सुमारे साडेसहा सेंटिमीटर इतकी आहे आणि जाडी चार मिलिमीटर इतकी आहे. या सर्व वाद्यांवर बासरीवर असतात तशी छिद्रं आहेत. सुस्थितीतल्या वाद्याच्या मधल्या मुख्य भागावर अशा प्रकारची चार छिद्रं आहेत. ही छिद्रं विविध प्रकारचे ध्वनी निर्माण करण्यासाठी मुद्दाम पाडली असल्याचा निष्कर्ष, या छिद्रांच्या स्वरूपावरून व रचनेवरून काढता येतो.
वाद्यावरची ही छिद्रं गारगोटीच्या तीक्ष्ण तुकड्यानं हाडं कोरून निर्माण केली असावीत. ही वाद्यं वाजवताना ती ओठात सुलभरीत्या पकडता येण्याच्या दृष्टीनं, त्यांच्या टोकाला विशिष्ट आकारही दिला आहे; तसंच बोटं योग्यरीत्या ठेवता यावीत या दृष्टीनं या वाद्यांवर खाचाही केल्या आहेत. या वाद्यांवरील छिद्रांभोवतीच्या भागाची (बोटांमुळे झालेली) झीज पाहता, ही सर्व वाद्यं कमी-अधिक प्रमाणात प्रत्यक्ष वापरली गेली असल्याचं दिसून येतं. छोट्या आकाराची अशी वाद्यं वाजवणं कठीण असतं. कारण छोट्या वाद्यांची छिद्रं एकमेकांपासून अगदी कमी अंतरावर असतात. त्यामुळे अशी वाद्यं वाजवताना, बोटांची हालचाल सहजपणे करणं, शक्य होत नाही. असं असतानाही, ही वाद्यं वाजवण्यासाठी लागणारं कौशल्य या नॅटुफिअन लोकांनी आत्मसात केलं होतं, ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे.
लॉरेन्ट डेव्हिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या पुढच्या संशोधनात, या वाद्यांतून निघणाऱ्या ध्वनीचा पडताळा घेण्याचं ठरवलं. यासाठी त्यांनी, यांतील तीन वाद्यांची पुनर्निर्मिती केली. ही पुनर्निर्मिती करण्यासाठी त्यांनी मलार्ड या बदकाच्या, त्याच प्रकारच्या आणि त्याच आकाराच्या हाडांचा वापर केला. तसंच, हाडांवरील छिद्रं निर्माण करण्यासाठीही या संशोधकांनी, मूळ वाद्यांवरील छिद्रं निर्माण करण्यासाठी जी पद्धत वापरली गेली होती, तीच पद्धत वापरली. जेव्हा या पुनर्निर्मित वाद्यांची चाचणी घेण्यात आली, तेव्हा या संशोधकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण या छोट्या वाद्यांतून पक्ष्यांच्या आवाजासारखे आवाज आले. स्पॅरोहॉक आणि कॉमन केस्ट्रल हे ससाणे जसा आवाज काढतात, तसेच हे आवाज होते. या विशिष्ट पक्ष्यांचे आवाज निर्माण करण्यासाठीच, या बासऱ्यांचे आकार असे लहान ठेवण्यात आले असावेत! हे आवाज ऐकल्यावर या संशोधकांना, या वाद्यांच्या उपयोगांमागे वेगवेगळ्या शक्यता दिसून आल्या. पहिली शक्यता म्हणजे असे आवाज काढून त्या-त्या पक्ष्यांना आकर्षित करायचं आणि ते जवळ आल्यानंतर त्यांची शिकार करायची. दुसऱ्या शक्यतेनुसार, या पक्ष्यांशी काही कारणानं संपर्क साधण्यासाठी या बासऱ्यांचा वापर केला जात असावा. तिसरी शक्यता म्हणजे, या वाद्यांचा वापर हा या जमातीतील सामाजिक-सांस्कृतिक रूढींचा भाग असावा. अनेक संस्कृतींमध्ये काही पशुपक्ष्यांना विशिष्ट स्थान दिलेलं असतं. अशा जमातींच्या कार्यक्रमांत या पक्ष्यांच्या आवाजाचा मुद्दाम वापर केला जातो.
प्राचीन काळातल्या वाद्यांचा असा शोध नवा नाही. सुमारे चाळीस हजार वर्षांपूर्वी वापरलेल्या सुषिर वाद्यांचे अवशेषही जर्मनीतील स्वाबिअन जुरा या ठिकाणी सापडले आहेत. परंतु लॉरेन्ट डेव्हिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या शोधाचं वैशिष्ट्य हे की, पक्ष्यांचा आवाज काढणारी अशी, इतकी जुनी वाद्यं प्रथमच शोधली गेली आहेत. या जुन्या वाद्यांचा संबंध थेट माणसाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीशी असू शकतो. नॅटुफिअन जमातीचा काळ हा सुमारे पंधरा हजार वर्षांपूर्वीपासून ते बारा हजार वर्षांपूर्वीपर्यंतचा. सुरुवातीला शिकारीवर जगणारे हे लोक नंतरच्या काळात हळूहळू शेतीकडे वळले व त्यांच्या राहण्याच्या पद्धतीत मोठा बदल घडून आला. राहण्याच्या पद्धतीतील या स्थित्यंतराचा परिणाम, त्यांच्या सांस्कृतिक जीवनावरही झाला असणार. त्यामुळे पक्ष्यांचा आवाज काढणाऱ्या या वैशिष्ट्यपूर्ण बासऱ्यांची भूमिकाही कदाचित बदलत गेली असल्याची शक्यता आहे. तेव्हा, या वाद्यांचा वापर कोणकोणत्या कारणांसाठी केला गेला, तसंच त्या कारणांत कालानुरूप बदल होत गेला का, याचा शोध हा नॅटुफिअन संस्कृतीच्या अभ्यासाच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरणार आहे.
(छायाचित्र सौजन्य – Laurent Davin / Laurent Davin, et al)
Leave a Reply