नवीन लेखन...

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग १० – पृथ्वीवरील कल्पवृक्ष : नारळ

‘माड किंवा ‘ श्रीफळ (शास्त्रीय नाव: Cocos nucifera, कोकोसनुसिफेरा ; Coconut, कोकोनट ; अरेकेसी कुळातील आहे.) हा विषुववृत्तीय व उष्णकटिंबंधीय प्रदेशांत मुख्यत्वे आढळून येतो. साधारणतः नारळाचे झाड हे 30 मीटर उंच असते आणि त्याला पाच ते सहा मीटर लांब फांद्या असतात. नारळाचे झाड 70 ते 80 फुटापर्यंत वाढून सुद्धा ते अगदीच वाऱ्याच्या दबावात जराही न डगमगता तसेच उभे असते कारण नारळाची मुळे ही आकाराने लहान असून ती खोलवर अगदी घट्ट रुजलेली असतात.

नारळाचे झाड हे ताड कुळातील आहे. या वॄक्षाला ४-६ मीटर लांबीची झावळ्यांच्या स्वरूपातील पाने फुटतात त्याची दोन्ही पाने एकाच ठिकाणाहून येतात. ती ४-६ मीटर लांब असतात. जुनी पाने अलगतपणे कोणतीही खूण न ठेवता गळून पडतात त्यामुळे त्याचे खोड नेहमी गुळगुळीत राहते. माडाला वर्षातल्या दर महिन्यात फुलांचा एक तुरा लागतो. तुर्‍यातील मादी फुलांना लागलेली फळे अकरा ते बारा महिन्यांत पक्व होतात. म्हणजेच प्रत्येक महिन्यात प्रत्येक झाडावरून एक घड काढायला मिळतो. या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा काही ना काही उपयोग आहे, म्हणून या झाडाला कोकणात कल्पवृक्ष मानतात. त्याचे फळ drupe प्रकारात मोडते. याची मुळे तंतुमय व जमिनीच्या वर असतात. याची फळे (नारळ) समुद्राच्या पाण्याबरोबर दूर वाहत जातात व त्याठिकाणी रुजतात.

समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रदेश नारळ लागवडीसाठी विशेष अनुकूल असल्यामुळे स्वाभाविकपणे कोकणात नारळ लागवड आणि संशोधनावर जास्त भर देण्यात आला आहे. . नारळांच्या झाडांची लागवड दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात केली जाते.

कल्पवृक्ष’ मानले जाणारे नारळाचे झाड, अन्य फळझाडांच्या तुलनेत अजूनही दुर्लक्षितचआहे. अलीकडच्या काळात नारळ लागवडीबाबत कोकणामध्ये जनजागृती आणि लागवडीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दापोलीच्या डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे रत्नागिरीजवळ भाटय़े येथे स्थापन करण्यात आलेल्या नारळ संशोधन केंद्राने त्यासाठी भरीव योगदान दिलं असून लक्षद्वीप ऑर्डिनरी (चंद्रकल्पा), केरा संकरा (टीडी, डब्लू सी टी सी ओ डी), फिलिपिन्स ऑर्डिनरी (केरा चंद्रा), बाणवली, चंद्रसंकरा, फिजी, गोदावरी गंगा या जाती विकसित केल्या आहेत. संकरित फळांचे अधिक उत्पादन, उत्तम प्रतीचे खोबरे, तेल, भरपूर पाणी असलेली शहाळी ही या जातींची वैशिष्टय़े आहेत.

नारळाचे फक्त दोन वेगवेगळे प्रकार आहेत, उंच आणि बटू. वेस्ट कोस्ट टॉल आणि ईस्ट कोस्ट टॉल यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. बटू हा प्रकार उंच पेक्षा तुलनेने लहान असतो आणि उंचीच्या नारळाच्या तुलनेत त्याचे आयुष्य कमी असते. उंच x बटू, बटू x टॉल ही दोन महत्त्वाची संकरीते आहेत. कोलंबस नारळाची अजून एक जात आहे. या कोलंबस जातीच्या नारळाला जवळपास

१०००- १२०० नारळ येतात. इतक्या मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या नारळांमुळे शेतकऱ्यांचा फायदा हा जास्त होतो. पाच वर्षांच्या काळात कोलंबस नारळाला १०००-१२०० नारळ येतात तर तुलनेत इतर नारळाच्या झाडाला २००-३०० नारळ येतात.

सांस्कृतिक महत्व –

हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान, नारळ हे फळ पवित्र मानतात. त्याला धार्मिक कार्यात वापरताना श्रीफळ म्हणतात. नारळचा वापर सगळ्यात जास्त मंदिरांमध्ये केला जातो. दिवाळी, दसरा, गणपती पूजा या दिवशी देवाला मोठ्या प्रमाणात नारळ अर्पण केले जातात. या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हटले जाते, कारण या झाडाच्या सगळ्या अंगाचा उपयोग करता येतो.

दिवाळी आणि कोजागरी पौर्णिमामध्ये लक्ष्मी पुजामध्ये व बंगाली समाजातील लोक लोख्खी पूजामध्ये शहाळी वा ताजे नारळ वापरतात. तांबे कलश किंवा मातीच्या कुंभावर आणि शहाळी नारळावर सिंदूराने बंगाली हिंदु स्वस्तिक चिन्ह जे मध्यमा बोटाने आणि लाल सिंदूर लेपाचा वापर करून काढतात . या दिवशी भक्तीने शंख सहित लक्ष्मीनारायणाची पूजा करतात.

भारतीय संस्कृतीत नारळाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतात कोणत्याही गोष्टीची सुरूवात करण्याआधी नारळ वाहण्याची पद्धत आहे. धार्मिक विधीत अथवा घटस्थापना करण्यासाठी नारळाचा वापर केला जातो. नारळाला लक्ष्मीचं प्रतिक मानलं जातं.याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला मानसन्मान देण्यासाठी त्याला ‘शाल आणि नारळ’ म्हणजेच ‘श्रीफळ’ दिलं जातं. नारळाला भारतात देवाचं फळ मानलं जातं. ज्यामुळे धार्मिक विधी नारळाशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. नारळाला श्रीफळाचा मान का दिला जातो यामागे अनेक आयुर्वेदिक आणि शास्त्रीय कारण दडलेली आहे. नारळाचं पाणी तहान लागलेल्या व्यक्तीसाठी अमृतासमान असतं. शिवाय नारळाची पाने, खोड, मुळं अशा सर्वच गोष्टीचा वापर केला जातो. ज्यामुळे नारळाकडे समृद्धीचं एक प्रतिक म्हणून पाहीलं जातं. नारळाप्रमाणे गुणसंपन्न आणि समृद्ध व्हावं यासाठी भारतात नारळाला श्रीफळ असं म्हटलं जातं.
नारळी पौर्णिमेला करण्यात येणारे वरूणदेवतेचे पूजन

पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो, तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात. नागपंचमी नंतर श्रावणात येणारा हा दुसरा सण आहे. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवते प्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जन शक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. `सागरे सर्व तीर्थानि’ असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा. जहाजांनी मालाची वाहतूक करतांना वरुणदेव प्रसन्न असल्यास तो साहाय्य करतो अशी कोळी बांधवांची श्रद्धा आहे.

नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण का करावा ?

नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपतत्त्वात्मक यमलहरींचे आधिक्य असल्याने व नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व यमलहरींना ताब्यात ठेवत असल्याने जलावर ताबा मिळवणार्‍या सागररूपी वरुणदेवतेला नारळ अर्पण करतात. या दिवशी ब्रह्मांडात आपतत्त्वात्मक यमलहरींचे आधिक्य असते. या लहरी ब्रह्मांडात भोवर्‍याप्रमाणे गतिमान असतात. वरूणदेवता ही जलावर ताबा मिळवणारी व त्याचे संयमन करणारी असल्याने या दिवशी सागररूपी वरुणदेवतेला आवाहन करून तिला नारळ अर्पण करून ब्रह्मांडात कार्यरत असणार्‍या यमलहरींना ताब्यात ठेवण्यासाठी प्रार्थना केली जाते. नारळातील पाण्यात तेजतत्त्वाचे प्रमाण अधिक असते. नारळातील पाणी हे आपतत्त्वाचे प्रमाण जास्त असणार्‍या यमलहरी ग्रहण करण्यात अतिशय संवेदनशील असते. वरुणदेवतेला आवाहन करतांना तिच्या कृपाशीर्वादाने यमलहरी नारळाच्या पाण्याकडे आकृष्ट होतात. नारळाच्या पाण्यातील तेजतत्त्व या यमलहरींना ताब्यात ठेवून त्यांतील रज-तम कणांचे विघटन करून त्यांना सागरात विलीन करते; म्हणून या दिवशी वायुमंडलातील यमलहरींचे नारळाच्या माध्यमातून उच्चाटन करून सागररूपी वरुणदेवतेच्या चरणी त्यांचे समर्पण करण्याला महत्त्व आहे. यामुळे वायुमंडलाची शुद्धी होते. यमलहरींच्या वातावरणातील अधिक्यामुळे शरीरात अधोगामी वहाणारे वायु कार्यरत् झाल्याने पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या त्रासदायक लहरी पटकन जिवाच्या तळपायाकडे आकृष्ट झाल्याने त्याला त्रास होण्याची शक्यता जास्त असते.

नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतांना तो पाण्यात फेकू नका, तर हळुवारपणे सोडा. नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुणदेवतेला आवाहन करून सागराला नारळ अर्पण करतात. ते करतांना काही जण नारळ पाण्यात फेकतात. त्यामुळे नारळ अर्पण करण्यामागील अपेक्षित लाभ मिळत नाही; म्हणून तो भावपूर्णपणे हळुवार पाण्यात सोडावा.

पौराणिक महत्व

नारळाचे पूजा पाठामध्ये किंवा धार्मिक कार्यांमध्ये मोठे महत्व आहे, हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. कोणतेही शुभकार्य असले, तरी त्यासाठी नारळ हवाच. पुराणांमध्ये देखील नारळाचे महत्व सांगितले गेले आहे. देवाला नारळ चढविल्यास धन, समृद्धी प्राप्त होत असून, नारळातील खोबऱ्याचे सेवन प्रसाद म्हणून केल्यास शारीरक दुर्बलता, व्याधी दूर होत असल्याचा उल्लेल्ख पुराणांमध्ये आहे. अशीच आणखी काही रोचक तथ्ये आहेत.

नारळाचा उल्लेख श्रीफल म्हणूनही केला जातो. असे म्हणतात की जेव्हा भगवान विष्णूंनी धरेवर अवतार घेतला, तव्हा त्यांनी आपल्यासमवेत तीन गोष्टी आणल्या. लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनु. नाराळाच्या वृक्षाला कल्पवृक्ष म्हटले गेले आहे. या दिव्य वृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीनही देवतांचा वास असल्याचे म्हटले जाते. श्रीफल भगवान शंकरांचे आवडते आहे. नारळावर असलेल्या तीन डोळयांना शंकरांचे त्रिनेत्र समजले जाते.

पुराणामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे स्त्रियांनी नारळ फोडणे वर्जित मानले जात असे. ह्या संबंधीची मान्यता अशी, की नारळ हा बीजरूप आहे. त्यामुळे नारळाचा संबंध प्रजननक्षमतेशी जोडला गेला आहे. स्त्री ही प्रजननकारक असल्यामुळे स्त्रियांनी बीजरूपी नारळ फोडू नये अशी मान्यता प्राचीन काळामध्ये होती. त्यामुळे देवतांना अर्पण केल्यानंतर नारळ फोडण्याचे काम केवळ पुरुषांनाच करण्याची अनुमती असे. नारळाच्या पाण्याने देवतांना अभिषेक करण्याचा देखील प्रघात असे.
देवतांसमोर नारळ फोडणे म्हणजेच आपल्यामध्ये असलेल्या दुष्ट प्रवृत्ती, अहंकार यांचा नाश करणे अशी मान्यता असल्यामुळे देवाला नारळ फोडूनच अर्पण करण्याची पद्धत असे. तसेच मारुतीच्या मंदिरामध्ये नारळ आपल्या शिराभोवती सात वेळा फिरवून फोडल्याने इतरांची आपल्याला लागलेली नजर किंवा दृष्ट संपुष्टात येते अशी मान्यता आहे.

घरात काही पूजा असो, नवीन घरात प्रवेश असो, वरात घेऊन जात असो, नवीन वाहन घेतले असो किंवा नवे व्यवसाय सुरू करावयाचे असो. प्रत्येक वेळी कार्याच्या शुभारंभ करण्यासाठी नारळ फोडलं जातं. नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ आणि मंगलदायी मानले गेले आहेत. आपल्या हिंदू परंपरेनुसार नारळ सौभाग्यदायी आणि समृद्धीचे प्रतीक आहे.

नारळ गणपतीला अर्पण केलं जातं. नंतर त्याला प्रसाद म्हणून वाटप केलं जातं. हे एक पवित्र फळ आहे त्यामुळे देवाला अर्पण केलं जातं.

कोणतेही कार्य करण्यासाठी नारळच का अर्पण केलं जातं? नारळाचं का फोडलं जातं? तर याचे कारण असे की ऋषी विश्वामित्र नारळाचे निर्माते मानले गेले आहे. ह्याचा वरील कडक भाग हे दर्शवते की कुठल्याही कार्याच्या यशाची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागणारच. नारळ वरून कडक आणि आतून सौम्य कोमल असतं. ह्या मधील पाणी पवित्र मानले गेले आहे. त्यासाठी त्यांना काहीही नवे कार्याच्या शुभारंभाच्या आधी नारळ फोडून त्यामधील पवित्र पाणी सर्वत्र शिंपडले जातं. जेणे करून नकारात्मक शक्तीचा ह्रास होतो.

नारळ स्वतःच्या अहंकाराचे प्रतीक असतं. नारळ शरीराचे प्रतिकात्मक असतं. नारळ फोडणे म्हणजे आपण स्वतःला संपूर्ण विश्वात समरस केले आहे. यावर असलेले तीन डोळे भगवान शंकराचे डोळे मानले जाते. ज्यामुळे आपल्या सर्व इच्छांची पूर्ती होते

संस्कृत मध्ये नारळाला ‘श्रीफळ’ असे म्हटले जाते. श्री चा अर्थ लक्ष्मी असे. पौराणिक मान्यतेनुसार लक्ष्मीशिवाय कुठलेही शुभ कार्ये होत नाही आणि शुभ कार्यात नारळाचा वापर केला जातो. हा कल्पवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करतो. पूजेनंतर नारळ फोडून त्याचा प्रसाद सर्वांना दिला जातो.
प्रत्येक पूजेत नारळाला अनन्य साधारण महत्व आहे. नारळाला श्रीफळ देखील म्हटलं जातं. प्रत्येकवेळेला नारळाला पहिला मान आहे. नारळ हे फक्त फळ नाही. धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्व आहे. काहीजण नारळाला सजीव रूप देखील मानतात. नारळाला मनुष्याप्रमाणे दोन डोळे आहेत. एक तोंड देखील आहे. नारळ फोडल्यावर त्यातून पाणीच येते. ते अमृतासमान मानले जाते. यामुळेच प्रत्येक पूजा कार्यात नारळाला खूप महत्व आहे. नारळ भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो अशी मान्यता आहे.

नारळाच्या वापराने केवळ आपले आरोग्य सुदृढ राहते असे नाही तर आयुष्यातील अनेक समस्या दूर करण्यासाठीही नारळाचे उपाय तुम्हाला लाभदायक ठरू शकतात. श्रीफळ म्हणजेच नारळाशी संबंधित अनेक उपाययोजना वर्षानुवर्षापासून केले जात आहेत. पूजेमध्ये श्रीफळ ठेवण्यापासून ते एकाक्षी म्हणजे एक डोळ्याच्या नारळ यासंबंधी विशीष्ट महत्व आहे. आपल्या गरजेनुसार तुम्ही नारळाचा वापर करून आपल्या समस्या दूर करू शकता. परंतु या उपायांना कोणताही वैज्ञानिक आधार नसून या केवळ मान्यतांवर आधारित आहेत हेही लक्षात ठेवावे.

लक्ष्मी मातेचेच दुसरे नाव म्हणजे ‘श्री’.म्हणजे नारळाचा थेट संबंध लक्ष्मी मातेसोबत आहे. त्यामुळे नारळाचा वापर कित्येक स्वरूपात केला जातो व त्याला अतिशय पवित्र व शुद्ध मानले जाते याच नारळाच्या बहुगुणी गुणधर्मामुळे तो लक्ष्मीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला नारळ फोडण्याची परंपरा आहे. असे केल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो.

नारळाचे फायदे :

नारळाची पानें :
नारळाच्या झावळ्यांपासून झाडू तयार केल जातो. जो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येते. नारळाच्या काथ्यापासून दोरही बनवला जातो. तसेच झोपडी बनवताना झावळ्या वापरतात.

खोबरेल तेल:
अत्यंत कमी खर्चामध्ये व घरात असणारी एक वस्तू वापरून आपण आपल्या त्वचेला तजेलदारपणा आणू शकतो. आपले केस मऊसूत करू शकतो ते म्हणजे खोबरेल तेल. नारळाचे पाणी, ओल्या नारळाचा खवलेला कीस, नारळाचे दूध, सुके खोबरे, नारळाचे तेल, नारळाची करवंटी हे सारं सौंदर्यवृद्धीसाठी महत्त्वाचं आहे. त्याचा उपयोग करून अनेक नामांकित तारकाही त्वचा तजेलदार ठेवतात.

नारळाचे पाणी :
पावसाळ्याच्या दिवसात चेहरा चिकचिकीत तेलकट होणे ही खूप मोठी समस्या तरुणींसमोर उभी राहते, त्यावर उपाय म्हणजे नारळाचे पाणी. ते आपण चेह-याला लावून ठेवले तर त्यामुळे त्वचा निर्मळ आणि नितळ राखण्यासाठीही मदत होईल. ओल्या नारळाच्या गरामध्ये प्रथिने, तेल आणि इतर काही ऑग्रेनिक तत्त्व असतात त्यामुळे त्वचेला त्याचा फायदा होतो. निस्तेज व कोरडी त्वचा असलेल्यांनी नारळाच्या पाण्यामध्ये दुधावरील थोडी साय मिसळून त्याने त्वचेला हळुवार हाताने मसाज करावा, त्वचेला तजेला येतो. नारळाचे पाणी व दूध त्वचा स्वच्छ (क्लिन्सिंग) साठीही उपयुक्त ठरतात. कोरडेपणामुळे जेव्हा त्वचा काळवंडलेली, निस्तेज आणि रखरखीत वाटायला लागते तेव्हा नियमित

नारळाच्या दुधाने चेह-याला मसाज केल्यास त्वचा पुन्हा स्निग्ध तुकतुकीत दिसायला लागते.

नारळाच्या पाण्याविषयी एक अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे गर्भधारणेनंतर आठवडयातून दोन-तीन वेळा नारळाचे पाणी (शहाळ्याचे पाणी) नियमित प्यायल्यास बाळाची कांती सुधारते आणि बाळाचा रंग उजळतो. शिवाय टॉनिक म्हणूनही ते उपयुक्त आहे. परंतु याचा अतिरेक करू नये नाहीतर होणाऱ्या बाळास बाळदमा होऊ शकतो असे वैद्य सांगतात. पावसाळ्यामध्ये केस धुणे म्हणजे एक मोठा प्रश्न असतो. त्या साठी नारळाचे पाणी अतिशय उपयुक्त आहे. केस धुण्यापूर्वी साधारण एक तास आधी नारळाचे पाणी केसांना आणि टाळूला चोळावे. यामुळे केस मुलायम होतातच, शिवाय केसांच्या मुळांचे पोषण होऊन केस गळण्याचे प्रमाण कमी होऊन केसांची वाढ होते.

नारळाचे ओले व सुके खोबरे:
नारळाचे ओले खोबरे हा समुद्र किनाऱ्या वरील लोकांच्या शाकाहारी व मत्स्याहारी स्वयंपाकातील अविभाज्य भाग आहे. या खोबऱ्यापासून विविध प्रकारच्या मिठाया तयार करतात. सुकलेल्या खोबऱ्या पासून तेल काढतात तेच खोबरेल तेल होय. खोबरेल तेल हे स्वयंपाकात हि वापरले जाते.     आयुर्वेदिक तेलात खोबरेल तेल पाया (बेस) म्हणून वापरतात.

 

नारळाचे औषधी गुणधर्म :
नारळ हा थंड, पचण्यास जड व आपले मूत्राशय स्वच्छ ठेवणारा, जुलाबरोधक, बलदायक, रक्तदोष दूर करणारा आहे. हृद्यरोग असणाऱ्यासाठी नारळ आरोग्य कारक आहे. लहान मुलांना खोबरे व साखर रोज खायला घातल्याने त्याच्या शरीरावर चरबी वाढते. नारळाचे घट्ट दुध काढून ते उकळावे व त्याच्या तेलामध्ये मिरीपूड घालून आपल्या शरीराचा जो भाग जखडलेला असेल तेथे त्याने मालीश करावे त्यामुळे जखडलेला अवयव सुटा होतो. ओल्या नारळात लाइसीन व प्रोटीन घटक पुष्कळ प्रमाणात आहेत. तसेच खनिज क्षारही पुष्कळ प्रमाणात आहेत. ओल्या नारळात आपल्या आरोग्यासाठी लागणारी जीवनसत्वे भरपूर आहेत. पण सुक्या खोबऱ्यात त्याचे प्रमाण कमी आढळते. सुके खोबरे उष्णतावर्धक व पित्त कारक आहे त्यामुळे खोकला होतो. त्यामुळे ओला नारळ किती उपयोगी आहे हे समजते.

असा हा पृथ्वीवरील कल्पवृक्ष समुद्रतटीय लोकांचा जणू काही देवदूतच आहे.

— डॉ. दिलीप केशव कुलकर्णी

संदर्भ :
१. विकिपीडिया -नारळाची माहिती. २. साप्ताहिक सुखदा नारळाचे फायदे ऑगस्ट १९,२०१६ ३. इंटरनेट वरील बरेच लेख व माहिती. ४. गूगल इमेजेस

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 78 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

1 Comment on हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग १० – पृथ्वीवरील कल्पवृक्ष : नारळ

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..