नवीन लेखन...

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ४ – शमी

शमी : (शास्त्रीय नाव : Prosopis spicigera याच्या प्रॉसोपिस ह्या प्रजातीत एकूण ४० जाती असून त्यांपैकी फक्त तीन भारतात आढळतात. याला हिंदीत हिंदी – खेजडा, खेजडी, असेही म्हणतात. याचा प्रसार भारतातील उष्ण व रूक्ष प्रदेशांत सर्वत्र आहे. जमिनीत आत ओलावा आणि वर वाळू असली तरी हा वृक्ष चांगला वाढतो. हा वृक्ष काटेरी आहे. पानांच्या विरुद्ध बाजूला अणकुचीदार, बाकदार काटे असतात. जुनी पाने गळण्याच्या वेळेसच नवीन पालवी फुटते. फुले पिवळी, गुलाबी लहान आणि एका दांड्यावर असतात. मार्च ते मेपर्यंत फुले येऊन गेल्यावर जून ते ऑगस्टच्या दरम्यान शेंगा पिकतात. शेंगेत गोड, घट्ट गर असतो. त्यात लांबटगोल पण चपट्या बिया बसविल्यासारख्या असतात. पिकलेल्या शेंगा आपोआप फुटत नाहीत, शेंगेत कप्पे असतात. एका कप्प्यात एकच बी असते. फुलोरे बारीक व त्यांवर लहान पिवळट फुले डिसेंबर ते मार्चमध्ये येतात. शिंबा (शेंग) १०–२५ सेंमी x ५–१० मिमी., लांबट गोलसर (दंड गोलाकृती), काहीशी चपटी व गाठाळ, जाड सालींच्या बिया असतात.

कुंपणाच्या कडेने ही झाडे लावतात. हा बहुतांश सदापर्णी, काटेरी व सु. १२ मी. उंच वाढणारा वृक्ष असून याचा घेर १•२ मी. असतो. याची जास्तीत-जास्त उंची १८ मी. व घेर ५•४ मी. आढळला आहे. याची साल करडी, खरबरीत असून तीवरील पातळ तुकडे सुटून निघून जातात. पाने संयुक्त, दोनदा विभागलेली व पिसासारखी असून दलांच्या दोन जोड्या व प्रत्येक २•५ x ७•५ सेमीं. दलावर ७-१२ दलकांच्या जोड्या असतात. पानांचे देठ व मध्य शिरा यांवर कीटकांच्या दंशामुळे लहान गाठी बनतात. याचे आयुष्य साधारणपणे ८० वर्षे असते.

शमी वृक्षाला भरपूर सूर्यप्रकाश आवडतो परंतु हिमतुषार लहान रोपांना सोसत नाहीत, पूर्ण वाढलेले वृक्ष रुक्षता सहन करतात. निसर्गतः नवीन झाडे ओलसर ठिकाणी बियांपासून फळातील गोडसर पदार्थ खाऊन पक्षी व काही प्राणी यांनी टाकलेल्या बियांनी किंवा पाण्याच्या प्रवाहामुळे वाहत गेलेल्या बियांमुळे वनस्पतीचा प्रसार होतो. बियांची अंकुरक्षमता निदान वर्षभर टिकून असते. लागवडीत सु. २–६ मी. अंतर ठेवून रोपे लावतात. जमिनीवर कधीकधी पुराचे पाणी येऊन जाणे किंवा सिंचनाने उपलब्ध होणे आवश्यक असते.
सिंचनाखालील जमिनीवर इतर पिकांच्या लागवडीबरोबरही शमीची लागवड करता येते. वाढ प्रथम मंद असते, परंतु नंतर ४०–६० वर्षे मध्यम प्रकारे होते. ३० वर्षात त्याचा घेर सु. ८० सेमीं होतो. ह्याचे बाहेरचे लाकूड पांढरे व मध्यकाष्ठापेक्षा सापेक्षतः अधिक नरम असते.

पौराणिक महत्व :

पुराणात या शमी वृक्षाला पूजनीय मानले जाते. याच कारणामुळे लंका विजयानंतर श्रीरामांनी या झाडाची पूजा केली होती. आणखी एका मान्यतेनुसार, अभिजात संस्कृत साहित्यात, महाभारतात शमीला महत्त्वाचे स्थान आहे. महाभारतातील विराट पर्वाच्या पाचव्या अध्यायात, अज्ञातवासात पांडवांनी, मत्स्यदेशात विराट राजाकडे जाण्यापूर्वी आपली शस्त्रास्त्रे शमी वृक्षावर लपविल्याचे वर्णन आहे. या शमीचे वर्णन करताना अर्जुन युधिष्ठिराला म्हणतो, ‘ही शमी मोठी, दाट पानांची, विस्तृत फांद्या असलेली, चढून जाण्यास कठीण आणि निर्मनुष्य स्मशानाच्या समीप असल्याने, शस्त्रास्त्रे लपविण्यास योग्य होती.’ या कारणामुळे शमीचे जास्त महत्त्व आहे.

पौराणिक मान्यतेनुसार घरामध्ये काही झाडे-झाडे लावून त्यांची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते, घरात लक्ष्मीचा वास सदैव राहतो. शनी हा ग्रह शमीच्या स्थानी आहे. शमीच्या झाडाची पूजा केल्याने घरातील शनिदेवाचा प्रकोप कमी होतो अशी धारणा आहे. घरामध्ये शमीचे रोप लावून पूजा केल्याने तुमच्या कामातील अडथळे दूर होतील. यज्ञवेदीसाठी शमी वृक्षाचे लाकूड पवित्र मानले जाते.

शनिवारी होणाऱ्या यज्ञात शमीच्या लाकडापासून बनवलेल्या वेदीला विशेष महत्त्व असते. शमी हे गणेशाचे आवडते झाड मानले जाते. म्हणून श्रीगणेशाच्या पूजेमध्ये शमीच्या झाडाची पाने अर्पण केली जातात. सकाळी उठल्यावर शमीच्या झाडाचे दर्शन घेणे शुभ मानले जाते. शमीच्या झाडावर अनेक देवता वास करतात. दसऱ्याला शमीच्या झाडाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.

सर्व यज्ञांमध्ये शमी वृक्षाच्या समिधाचा वापर शुभ मानला जातो. शमीच्या काट्यांचा उपयोग गूढ आणि नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी केला जातो. वास्तुशास्त्रानुसार शमीच्या झाडाची नियमित पूजा करून त्याखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास शनिदोषाचे दुष्परिणाम टळतात असा समज आहे. उत्तर भारतात शमीचे झाड बहुतेक घरांच्या दाराबाहेर आढळते. कोणत्याही कामाला जाण्यापूर्वी लोक ते पाहून कपाळावर लावतात, असे केल्याने त्यांना त्या कार्यात यश मिळते. श्रुतिस्मृतिपुराणोक्त वैदिक धर्मात महत्त्व प्राप्त झालेल्या या शमीकडे, आज मात्र एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहावेसे वाटते. ‘शमीर’ या पुल्लिंगी वृक्षापेक्षाही ‘शमी’ या स्त्रीलिंगी वृक्षाला महत्त्व आहे. पुराणांत आणि अभिजात संस्कृत साहित्यात शमी वृक्षाचे उल्लेख आहेतच.

विक्रमादित्य च्या काळात सुप्रसिद्ध ज्योतिषाचार्य वराहमिहिर यांनी आपले ‘बृहतसंहिता’ नामक ग्रंथात ‘कुसुमलता’ नावाच्या प्रकरणात वनस्पति शास्त्र आणि कृषी संवर्धनाच्या संदर्भामध्ये शमीवृक्षचा उल्लेख आहे.

यानंतर शमी आली आहे, ती कविकुलगुरू कालिदासाच्या काव्यकृतींमध्ये. ‘उपमा कालिदासस्य’ म्हणून ज्याच्या उपमांचा गौरव केला जातो, त्या कालिदासाने ‘अग्निगर्भा शमी’ आपल्या उपमांमध्ये अगदी सहजतेने आणि यथार्थपणे योजिली आहे.

ज्याच्यामुळे श्रीरामाच्या वंशाला रघुवंश हे नाव मिळाले, तो रघु सुदक्षिणेच्या गर्भात असताना, त्याचे अग्नीप्रमाणे असणारे दाहक तेज, सुदक्षिणेला अग्निगर्भा शमीची उपमा देऊन कालिदासाने सूचित केले आहे. यानंतर रघूच्या दिग्विजयाने ते तेज प्रकट झाले. ’शमीच्या अंगी जसा अग्नी असतो, तसा राणीच्या पोटात गर्भ राहिला आहे असे राजाच्या ध्यानात आले’ असे कालिदासाने रघुवंशात म्हटले आहे.

शमीमिवाभ्यंतरलीनपावकां नृप: ससत्त्वां महिषीं अमन्यत । .. रघुवंश(३.९) संस्कृत साहित्यापेक्षाही संस्कृत शास्त्रीय ग्रंथांमध्ये शमीला विशेष महत्त्व मिळालेले दिसून येते.

कालिदासाच्या साहित्याचा मुकुटमणी असणाऱ्या ‘अभिज्ञानशाकुन्तलम्’ या नाटकातही कालिदासाने शकुंतलेला अग्निगर्भा शमीची उपमा दिली आहे. कालिदासाच्या काव्यानंतर मात्र संस्कृत साहित्यात शमीचा खास असा स्वतंत्र उल्लेख आलेला नाही.

उपयोग :

शमीच्या लाकडाचा उपयोग बाभळीसारखाच इंधनासाठी करतात. लाकूड कणखर असते, पण कीड लवकर लागते. शमीची लाकडे एकमेकांवर घासून अग्नी निर्माण करता येतो. म्हणून, यज्ञकर्मात शमीच्या समिधा असतात, बाभळीच्या नसतात.

दुष्काळात शमीची पाने गुरांसाठी चारा म्हणून देतात. शेंगाही उत्तम खाद्य आहे. पूर नियंत्रणासाठी शमी हा उत्तम वृक्ष आहे. झाडाच्या सालीपासून विहिरीतल्या पाणी काढण्याच्या मोटेकरता “नाडा’ तयार करतात. पाने, झाडावर, पानांवर येणार्‍या गाठी, शेंगा औषधी आहेत.

वराहमिहिर मतानुसार ज्या वर्षी शमी वृक्ष ज्यास्त फुलतो त्यावर्षी दुष्काळ पडण्याचे तो संकेत देतो. त्याप्रमाणे शेतकरी संकटाला सामोरे जाण्यास सज्ज होतात.
ह्याचे बाहेरचे लाकूड पांढरे व मध्यकाष्ठापेक्षा सापेक्षतः अधिक नरम असते. इमारतींच्या आतील बाजूस वापरण्यास व अनेक बाबतींत ते उपयुक्त असल्याचे आढळले आहे. पाळीव जनावरांना शेंगांचा व पानांचा चारा घालतात. पानांपासून हिरवे खत बनवितात. शमीच्या प्रजातीतील प्रॉ. जुलिफ्लोरा व प्रॉ. ग्लँडुलोजा या दोन अमेरिकी जाती भारतात आणून रुक्ष प्रदेशात लावल्या आहेत. ह्या दोन्हीपासून ‘मेस्काइट’ डिंक मिळतो.विजयादशमीच्या दिवशी शमीपूजन करण्याचा प्रघात आहे. त्याचे लाकूड मजबूत आहे, जे जाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी फर्निचर बनवण्यासाठी वापरले जाते. त्याच्या मुळापासून द्रावण तयार केले जाते. दुष्काळाच्या काळात वाळवंटातील माणसांचा आणि प्राण्यांचा हा एकमेव आधार आहे. 1899 साली एक दुष्काळ पडला होता, ज्याला छपनिया दुष्काळ म्हणतात, त्यावेळी वाळवंटातील लोक या झाडाच्या खोडाची साल खाऊन जगत होते. त्याचे लाकूड मजबूत आहे, जे जाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी फर्निचर बनवण्यासाठी वापरले जाते. त्याच्या मुळापासून द्रावण तयार केले जाते. दुष्काळाच्या काळात वाळवंटातील माणसांचा आणि प्राण्यांचा हा एकमेव आधार आहे. १८९९ साली एक दुष्काळ पडला होता, ज्याला छपनिया दुष्काळ म्हणतात, त्यावेळी वाळवंटातील लोक या झाडाच्या खोडाची साल खाऊन जगत होते. पाळीव जनावरांना शेंगांचा व पानांचा चारा घालतात

शमीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, तिच्याजवळ जलसंचय असतो. इसवी सनाच्या पाचव्या शतकात होऊन गेलेल्या आचार्य वराहमिहिर यांच्या ‘बृहत्संहिता’ या ग्रंथातील जलप्राप्तिविषयक ‘दगार्गलम्’ (जमिनीतील पाणी पाहण्याचे शास्त्र) या अध्यायात, शमीच्या जवळ असणाऱ्या जलसंचयाविषयी पुढीलप्रमाणे श्लोक आला आहे,

‘ग्रन्थिप्रचुरा यास्मिन शमी भवेत् उत्तरेण वल्मीकः। पश्चात् पञ्चकरान्ते शता संख्यैः नरैः सलिलम्।।’ (बृहत्संहिता – दगार्गलम्, अध्याय ५४, श्लोक क्र. ८१)

अर्थ : बहुत ग्रंथियुक्त शमीवृक्ष जेथे असेल, त्याचे उत्तरेस वल्मीक (वारुळ) असेल, तर त्या वृक्षाच्या पश्चिमेकडे पाच हातांपुढे पन्नास पुरुष खाली उदक आहे.
भूपृष्ठालगतचे भूमिजल शोधण्यासाठी या वृक्षाचा उपयोग होऊ शकेल, असे मत आहे.

शमीला भारतातील राजस्थान राज्यात खेजडी म्हणतात. हा राजस्थानचा राज्यवृक्ष आहे.तसेच तेलंगणा राज्याचा राज्य वृक्ष पण आहे.

औषधी उपयोग :

दुर्वांप्रमाणेच शमी शरीरातील कडकीचा नाश करतो. शरीरातील उष्णता घालविण्यासाठी शमीच्या फुलांचा किंवा पाल्याचा रस, जिरे व खडीसाखर एकत्र करून १५ दिवस द्यावे. उष्णतेमुळे आगपेण होते. या विकारावर शमीचा पाला गाईच्या दुधापासून केलेल्या दह्यात वाटून लेप करतात.

आयुर्वेदाच्या दृष्टीने शमी हे अत्यंत गुणकारी औषध मानले जाते. या झाडाचे भाग अनेक रोगांवर उपयुक्त आहेत. आयुर्वेद मानसिक विकार, स्किझोफ्रेनिया, श्वसनमार्गाचे संक्रमण, अति उष्मा, दाद, लूज मोशन, ल्युकोरिया यांसारख्या असंख्य रोगांवर उपचार करण्याची शिफारस करतो. शमीचे पंचांग म्हणजेच फुले, पाने, मुळे, डहाळ्या आणि रस यांचा वापर केल्यास शनिशी संबंधित दोष लवकर दूर होतात.

शमीच्या फळाची राख किंवा भस्म आणि इतर भाग शनीचा प्रभाव नियंत्रित करण्यासाठी वापरतात. शमीची साल जखमा, ब्रोन्कियल अस्थमा आणि स्टोमायटिसवर उपचार करते. साल पावडर घसा खवखवणे आणि दातदुखी आणि बाह्य व्रण बरे करण्यासाठी प्रभावी आहे. शमीच्या बिया रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत.
त्याची साल कडू, तुरट आणि कृमिनाशक आहे. ताप, चर्मरोग, प्रमेह, उच्च रक्तदाब, कृमी, वात-पित्त या आजारांवर याचा उपयोग होतो. शमीची पाने गोमूत्र किंवा तुपात बारीक करून प्रभावित ठिकाणी बाहेरून लावतात. हे 3-4 दिवस सतत केले जाते.

हिरवी फळे सुकवून किंवा उकळून खातात. ती स्तंभक (आकुंचन करणारी), सूज उतरविणारी व श्वसनासंबंधीच्या तक्रारी दूर करणारी असतात. कातडी कमाविण्यास याची साल व पानांवरील गाठी वापरतात. पानांपासून हिरवे खत बनवितात. फुले साखरेबरोबरच खाल्ल्यास गर्भपात टाळण्यास मदत होते. फांद्यांच्या जखमांतून एक प्रकारचा डिंक स्रवतो.

— डॉ. दिलीप केशव कुलकर्णी

संदर्भ

१. विकिपीडिया
२. प्रा. निला कोरडे, म. टा डिसेंबर,२०
३. इंटरनेट वरील इतर लेख

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 78 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

1 Comment on हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ४ – शमी

  1. नमस्कार खुप छान माहिती आहे धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..