नवीन लेखन...

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ६ – कदंब

कदंब हा रुबिएसी कुलातील एक उपयुक्त व मोठा पानझडी वृक्ष आहे. या वृक्षाचे शास्त्रीय नाव निओलॅमार्किया कदंब असून अनेक ठिकाणी याची लागवड मुद्दाम करतात. नेपाळ, श्रीलंका, इंडोनेशिया, म्यानमार व भारत या देशांत हा आढळतो. भारतात बंगाल, ओरिसा व आंध्र प्रदेश, कोकण, कर्नाटक, आसाम आणि हिमालयाच्या पायथ्याशी हे वृक्ष मोठ्या संख्येने आढळून येतात. कदंब महाराष्ट्रात कोकण व मावळ भागात आढळून येतो. महाराष्ट्रातील ठाणे व पुणे शहरातही कदंबाची खूप झाडे आहेत.

निसर्गप्रेमींना भुरळ पाडणारा कदंब वृक्ष अत्यंत राजस दिसतो. हिरवाकंच डेरेदार पसारा आणि त्यात मधेमधे डोकावणारी पिवळी गोल फळं. कदंबाला दृष्ट लागेल असा डोळ्यांना सुखावणारा वृक्ष. कदंबाचा पसारा आणि दैवी गुण यामुळे त्याला देव वृक्ष असे संबोधतात. निसर्गात पूर्ण वाढलेल्या वृक्षाची उंची ३० मीटर पर्यंत जाते. रोप लावल्यापासून पहिले सहा ते आठ वर्षापर्यंत वाढ भर-भर होते, मग स्थिरावते आणि २० वर्षांपर्यंत पूर्ण होते. वृक्ष दीर्घायुषी असून, शंभर वर्षं जगू शकतो. कदंबाच्या ताठ राखाडी रंगाच्या बुंध्यावर काटकोनात पसरलेल्या फांद्यांमुळे वृक्षाचा आकार छत्रीसारखा दिसतो. याच्या फांद्या जमिनीला समांतर वाढतात. पानगळीचा वृक्ष असूनही संपूर्ण निष्पर्ण वृक्ष आढळत नाही, कारण याची पाने एकदम गळत नाहीत. ही पाने आंब्याच्या आकाराची पण जरा रुंद असतात. पुढून हिरवीगार व तुकतुकीत असतात अन् मागच्या बाजूने काहीशी फिकट लवयुक्त असतात. पानांवरच्या शिरा उठून दिसतात. पानगळ मार्चमधे थोड्या काळासाठी होते, व पावसाळ्यात जुलै ऑगस्टमधे कदंबाला फुले येऊ लागतात. पण वृक्षाची खरी मजा त्याच्या फुलांमध्ये आहे.

कदंबाचे एक फूल म्हणजे फुलांचा गोळाच असतो. जणू एखाद्या चेंडूवर बारीक-बारीक फुले सर्व बाजूंनी टोचली तर तो कसा दिसेल, तसेच कदंबाचे फूल दिसते. आजच्या परिस्थितींमद्धे बघायचे झाले तर हा फुलांचा गोळा कोरोनाच्या विषाणु सारखे दिसतो. अगदी सोनेरी-केशरी रंगाचे गुबगुबीत गेंदेदार पिंजलेल्या कदंबवृक्षाच्या खाली उभे राहिले की मधमाश्यांचे गुंजन अगदी स्पष्ट ऐकू येते. पावसाळ्यात इतर फुलांचे दुर्भिक्ष्य असल्याने मधमाश्या हमखास कदंबाच्या शोधात येतात.

कदंबाच्या फुलांसारखीच फळं देखील लाडवासारखी गोल असतात. कदंबाचे फळ हे तांत्रिक भाषेत छद्मफळ असते. फळे पावसाच्या शेवटच्या टप्प्यात पिकतात, त्यांना किंचित आंबट चवही असते. ग्रामीण भागातील मुले ही फळे आनंदाने खातात. मनुष्यांसारखेच अनेक पशु-पक्षीदेखील यांचा फडशा पाडतात, पण या फळांची सर्वात जास्त मजा लुटतात ती वटवाघळे. बदल्यात या फळांचा बीजप्रसार वटवाघळांमार्फतच होतो.

ओसाड जागी सर्वात आधी मूळ धरणाऱ्या झाडात कदंबाचा समावेश होतो. त्यामुळे पूर किंवा वणव्यानं उध्वस्त झालेल्या जागी करायच्या वृक्षलागवडीत कदंबाला प्राधान्य मिळतं. जोराचा वारा आणि उन्हापासून इतर झाडांचं, पिकांचं रक्षण करण्याची जबाबदारीही कदंबावर सोपवली जाते.

कदंब हा वृक्ष दीर्घायुषी आहे. यामुळे याची फुले व पाने निसर्गप्रेमींना मोहित करतात. संस्कृत काव्यात कदंब फुलण्याचा संबंध पावसाशी जोडला आहे. ढगांचा गडगडाट ऐकल्यावरच कदंब फुलतो, असे म्हणतात. कदंब दिसायला डेरेदार असून त्याची सावली घनदाट असते. कदंबाचा वारा अगदी थंडगार असतो. कदंब वनातून वाहणाऱ्या सुवासिक वाऱ्याला “कदंब-नीला” म्हणतात. तर फुललेल्या कदंबाच्या खाली गोळा होणाऱ्या पाण्याला “कदंबरा”, तर कदंबाच्या फुलांपासून बनवलेल्या मद्दाला किंवा सुगंधित द्रव्याला “कादंबरी ” म्हणतात. कदंबवृक्ष हा शततारका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे. कादंबिनी हा शास्त्रीय गायनातील मेघ रागाचा एक उपप्रकार (रागिणी) आहे.

साहित्यातील कदंब वृक्ष :

भवानीशंकर पंडितांच्या एका कवितेत “कदंब तरूला बांधून दोला, उंच खालती झोल’ असा उल्लेख आला आहे. हिंदी कवयित्री सुभद्रा कुमारी चव्हाण यांच्या, “यह कदंब का पेड’ कवितेतल्या “यह कदंब का पेड अगर मॉं होता यमुना तीरे, मैं भी उस पर बैठ कन्हैया बनता धीरे धीरे’ काल्पनिक कदंब वृक्षावर बसून मुलींनी आईशी केलेल्या अत्यंत निरागस आणि मार्मिक संवादाने हिंदी वाचकांच्या मनात कदंब वृक्षाचे स्थान कायम ठेवले. शंकराचार्यानी “त्रिपुरसुंदरीस्तोत्रम्‌’मध्ये “ललितामहात्रिपुरसुंदरी’च्या सगुण स्वरूपाचे सुंदर वर्णन केले आहे, त्यात अनेक वेळा कदंब वृक्षाचा उल्लेख आढळतो.

मराठी साहित्यात सुद्धा या वृक्षाचा उल्लेख आहे. “तोच चंद्रमा नभात’ हे अतुल्य काव्य प्रतिभेने रचलेले व लोकप्रिय झालेले गाणे, शांता शेळके यांना “काव्य प्रकाश या ग्रंथातील एका श्‍लोकावरून स्फुरले. संस्कृत कवी मम्मटाचार्य यांनी बाराव्या शतकात लिहिलेला हा ग्रंथ काव्य क्षेत्रात युगप्रवर्तक ग्रंथ मानला जातो. या ग्रंथात अस्फुट अलंकाराचे उदाहरण देण्यासाठी शिलाभट्टारिका यांचा एक श्‍लोक घेतला आहे. त्याचा मराठी अर्थ असा होऊ शकेल, “चैत्रातल्या रात्री त्याच आहेत, रेवा नदीचा काठ तोच आहे, कदंब वृक्षावरून येणारे वारे, मधुमालतीचा कुंज सारे तेच आहे, मीही तीच आहे. मात्र तरीही आज काहीतरी कमी वाटतेय, अनामिक हुरहूर लागली आहे”.

खालील प्रमाणे आणखी हि उल्लेख मराठी धार्मिक ग्रंथात आहेत.

‘तूंचि मूळ प्राणरंभा । विश्वकदंबा जीवन तूं ।।’ -एरुस्व ६.९४. ‘हरी देखिला वक्र- दृष्टी कदंबीं ।’ ‘जाळवे न तरू तोचि कदंब ।’ -वामन, हरि- विजय १.४२. फणस पेरू आणि लिंबतरुंच्या भरलें तीर कदंबीं ।’ -नरहरि ‘जेथ तो श्रीवल्लभु । जेथ भक्तकदंबु ।’ – ज्ञानेश्वरी १८.१६५७.

कदंब वृक्षाचे धार्मिक व पौराणिक महत्व:

पुराणकाळात यमुनेच्या काठी कदंबवने होती. आजही आहेत. श्रीकृष्णचे बालपणचे सवंगडी असलेल्या गोपाळांच्या गाई वृंदावनात चरत, तर श्रीकृष्ण कदंब वृक्षावर बसूनच बासरी वाजवे, असे संदर्भ जुन्या ग्रंथांत आहेत. या वृक्षावर बहरणारी सोनेरी-केशरी रंगाची थोडी टणक असणारी चेंडूप्रमाणे गोल फुले, गोपाळ जणू चेंडू म्हणून खेळण्यास वापरत. स्वर्गलोकात अमृत प्राशन करून गरुड पृथ्वीवर परतत असताना या वृक्षावर बसला होता आणि तेव्हा चोचीतले काही अमृताचे थेंब या वृक्षावर पडले, अशी लोकश्रद्धा आहे
कदंबाचे नाव ऐकल्याबरोबर आठवतो तो श्रीकृष्ण. कदंब हा ऐतिहासिक व्रुक्ष आहे. श्रीकृष्णाच्या आयुष्यात कदंबाचे विशिष्ट स्थान आहे. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात कदंब वृक्षाखालीच कृष्णाने अध्ययन केले. आपण वड पुजतो तसे तिकडे मनोभावे कदंब पुजला जातो. यमुनेच्या काठावर वनच आहे कदंबाचे. वृंदावनात यमुना घाटावर गोपी आपल्या मैत्रिणींसोबत स्नानाला येत असे त्यावेळी कदंबावर कृष्णाने गोपींचे वस्त्र लपवून ठेवले होते अशी आख्यायिका आहे. हा वृक्ष पाच हजार वर्षे जुना असून यमुनेकाठी ब्रज येथे आहे. कालिया नागाच्या फण्यावर उभे राहून कृष्णाने या कदंबा जवळच नृत्य केले असे ऐकिवात आहे. वृंदावनात कदंब वृक्ष जास्त प्रमाणात आढळतात, पण हा कृष्णाचा कदंब मात्र एक आगळावेगळाच आहे. कदंबातील उच्चतम रासायनिक गुणधर्मामुळे तो देवश्रेणीत येतो. वृंदावनाला कदंबांच्या वेगवेगळ्या जाती आहेत श्वेतकदंब, पिवळा कदंब आणि द्रोण कदंब. कुमूदवनाच्या कदंबखंडित लाल रंगाचे फूल असणारे कदंब आढळतात. द्रोण कदंब हे कदंबाची पाने द्रोणा सारखी दुमडल्याप्रमाणे असलेले वृक्ष आहेत. हे श्याम, ढाक इत्यादी भागात हे वृक्ष आढळतात.

वृंदावनात राधा कृष्णाच्या लीला रचल्या गेल्या आहेत. लोकसंगीत, लोक वाङ्मय, लोकगीते यातून या लीला आज पर्यंत मौखिक आणि लिखित स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. काही रचना तर अमर आहेत. कदंबाचे आणि कृष्णाचे नाते अजरामर आहे. कृष्ण म्हटला की राधा आणि राधा म्हटली की कदंब. असे ऐकिवात आहे की कृष्ण सावळा होता आणि कृष्णाची आठवण म्हणून राधा काळ्या कदंबाला मिठी घालत असे. श्रीकृष्णाचा हा आवडता वृक्ष होता. कदंब हा मूळचा भारतीय वृक्ष आहे. दक्षिण भारतात कदंब वृक्षात मुरुगदेवाचे वस्ती स्थान आहे असे मानतात. संस्कृत साहित्यात कदंबाचा उल्लेख निरनिराळ्या प्रकारे केलेला आढळतो. पवित्र स्मृतीस्थानांवर कदंबाची फुले अर्पण करतात. हिंदू व बौद्ध धर्मीय या वृक्षाला पवित्र मानतात म्हणून मंदिर परिसरात व विहार परिसरात वृक्ष लावतात. कदंबावर केलेले साहित्य आणि काव्य रचना यांची भरपूर उपलब्धता आहे. बाणभट्ट यांचे प्रसिद्ध काव्य कादंबरीची नायिका कादंबरीचे नाव कदंबा वरुन ठेवले आहे. भारवी, माद्य आणि भवभूती यांनी सुद्धा आपल्या काव्यात कदंबाचे वर्णन केले आहे.

पश्चिम बंगालमध्ये भाद्रपदातील एकादशीला शेतकरी, कदंब उत्सव साजरा करतात. या दिवशी कदंबाचे रोप लावून त्याची पूजा केल्यावर नृत्य गाणी गात हा दिवस साजरा केला जातो. म्हणूनच कदंबाचे संस्कृत नाव “शिशुपाल’ आणि “हलीप्रिय’ असेही नाव आहे. कदंबाच्या पूजेने सुख समृद्धी प्राप्त होते हि त्या मागील भावना असते. संस्कृत वाड्मयात कदंबाचे साहचर्य मोसमी पावसाळ्याच्या ऋतूशी जोडलेले आढळते.

पूर्ण बहरलेल्या कदंबवृक्षाच्या ठायीठायी जमून राहिलेले पावसाचे पाणी मधाने भरलेल्या पाण्यासारखे गोड लागते, म्हणून त्याला कदंबरी म्हणतात. पुराणानुसार वटवृक्ष मोक्ष दायक असतो, आंब्याचं झाड कामनाप्रदायक असतं, जांभळाचं झाड धनदायक असतं, आवळ्याचं झाड आरोग्यदायक असतं त्याप्रमाणे कदंब लक्ष्मीप्रदायक असतो.

पुराणकाळात यमुनेच्या काठी कदंबवने होती. मथुरा वृंदावनाप्रमाणे मदुरेलाही कदंबवने होती. श्रीकृष्ण कदंबाच्या झाडावर व झाडाखाली बसून बासरी वाजवायचा. श्रीकृष्णाच्या बऱ्याच भजनांमध्ये कदंब वृक्षाचा उल्लेख आहे. त्यातील एक हिंदी भजनाचं कडवं असं आहे.

पकडो पकडो, दौडो दौडो कान्हा भागा जाये
कभी कुंज में, कभी कदंब में हाथ नही ये आये
गोकुल की गलीयो मे मच गया शोर,
माखन खा गयो माखन चोर

अतिविषारी कालिया नाग, कालिया डोहात राहू लागला. त्याच्या फुत्कारामुळे त्याच्यापासून काही मैलांच्या अंतरावर असलेले प्राणी, वृक्ष-वनस्पती जळून गेले. फक्त त्या डोहाच्या मध्यभागी असलेल्या एका छोट्या भूप्रदेशावर एक कदंबवृक्ष मात्र जिवंत राहू शकला. त्याचे कारण स्वर्गलोकात अमृत प्राशन करून गरुड पृथ्वीवर परतत असतांना या वृक्षावर बसला होता आणि त्याने आपली चोच फांदीला घासली. तेव्हा चोचीतले काही अमृताचे थेंब या वृक्षावर पडले आणि त्याला अमरत्व प्राप्त झाले असे वर्णन स्कंदपुराणात आहे. चरक, सुश्रुत इत्यादी प्राचीन ग्रंथांमध्ये सुद्धा कदंबाचं वर्णन पाहायला मिळतं.

कदंबाचे औषधी महत्व

कदंबाच्या झाडाला देवाचं झाड मानतात. हे झाड आयुर्वेदात औषधी गुणांसाठी खूप प्रसिद्ध आहे. कदंबाच्या स्वास्थ्यवर्धक गुणांचा बऱ्याच आजारांवर उपचारासाठी उपयोग केला जातो. आयुर्वेदात कदंब वृक्षाचे पान, फुल, मुळे व सालाच्या काढ्याचा उपयोग करतात.

कदंबाच्या खोडाची साल चवीला कडू, तुरट असून शक्तिवर्धक व ज्वरनाशक असते. याची साल पाण्यात टाकून पाणी उकळवून काढा केला जातो आणि तो काढा सर्दी, खोकला यावर खूप उपयोगी असतो.

कदंबाचं पान आकाराने मोठं असतं व पान तोडल्यावर त्यातून गोंद निघतो. हा गोंद जखमेवर खूप उपयोगी असतो. कदंब कडू असतो तसेच वेदनाविनाशक व शुक्र धातू वाढविण्यास उपयोगी असतो. व्रण (अल्सर), जखमा झाल्यास पानांमधील अर्क काढून वापरतात. कदंबाची पाने गुरांच्या (गायी-म्हशींच्या) गोठ्यात ठेवल्याने गुरांच्या रोगांचा प्रसार होत नाही.

डोळ्यांचा विकारावर याचा ओल्या सालीचा रस डोळ्याबाहेर लावल्यास डोळे दुखणे थांबते..

दाताच्या पायोरिया ह्या विकारावर पानाचा काढ्याच्या गुळण्या करतात. तसेच तोंडात व्रण आल्यास त्वरित गुण येतो. स्तनदा मातांना दूध येत नसेल तर कदंबाचे फळ खाल्ल्यास फायदा होतो. कदंब वाताच्या विकारावर ही उपयुक्त आहे. कदंबाच्या सालाचे चुर्ण जखम लवकर भरून काढते.

सर्पदंशात सालीचा किंवा फळांचा काढा उत्तम लाभदायी ठरतो. मुतखडा, लघवी अडकणे, प्रोस्टेट, विसर्जन संस्थेचे विकार यात कळंबाचा पर्णरस नियमित ४० दिवस सेवन करणे उपयुक्त ठरते.

कदंब फुलांच्या अत्तराचे तेल व्यक्तीची मानसिकता खचली असल्यास ती उंचावण्यासाठी वापरतात. रक्तपित्त (कान व नाकातून रक्त येणे), अतिसार यावर कदंबाची पिकलेली फळे खावीत. फळे खाण्याजोगी असली तरी चवदार नसतात. कच्ची फळे खुप आम्लीय, गरम व कफ वाढवतात, त्यामुळे कच्ची फळे जास्त खाऊ नयेत.

अशी हि श्रीकृष्ण व राधा आणि गोपिकांचा प्रिय वृक्ष असलेल्या कदंब वृक्षाची गाथा.

– डॉ. दिलीप केशव कुलकर्णी

संदर्भ:
१. Patanjali Bulletin : Aacharya Shri Balkrisha, September, 2019. २. रवींद्र मिराशी: डिसेंबर,११, २०२१. सकाळ ३. मराठी विश्वकोश ४. विकिपेडिया
आणि इंटरनेट वरील विविध लेख

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 81 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

4 Comments on हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ६ – कदंब

  1. सुरेख व अभ्यास पुर्ण माहीती अशा औषधी वनस्पतीं चे सर्वधन करणे जरुरीचे आहे आज काल हाताच्या बोटांवर मोजण्या ईतकीच लोक आहेत त्या पैकी तुम्ही एक आहात सर अशिच नव नविन माहीती शेअर करत जा

  2. अतिशय छान आणि बारीक तपशिलासह उपयुक्त माहिती.
    संजीव केरूर्

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..