नवीन लेखन...

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ९ – शिवप्रिय वृक्ष : रुद्राक्ष

शिवप्रिय वृक्ष रुद्राक्ष :

रुद्राक्षाचे शास्त्रीय नाव Elaeocarpus ganitrus (syn: Elaeocarpus sphaericus; Elaeocarpaceae) आहे.

ही भारत, नेपाळ, इंडोनेशिया ( बाली) आणि हिमालयाच्या परिसरातील अन्य प्रदेशात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. रुद्राक्ष हा मिश्र असा संस्कृत शब्द आहे, ज्यात रुद्र (शंकर) आणि अक्ष (“डोळ्यातील अश्रुचे थेंब”) हे सामील आहेत. याला रुधिरवृक्ष असेही म्हणतात.

इलोकार्पस जेनिट्रस हे हिमालयाच्या पायथ्याशी गंगेच्या खोऱ्याच्या क्षेत्रात वाढते. तसेच ते दक्षिण पूर्व आशिया, नेपाळ, इंडोनेशिया, न्यू गिनी ते ऑस्ट्रेलिया, आणि हवाईमध्ये सुद्धा आढळते. रुद्राक्षाची बी पूर्णपणे पिकल्यावर निळ्या रंगाच्या बाहेरील कवचाने झाकलेले असते आणि त्यामुळे त्याला ब्ल्यूबेरी बीड्स असे देखील म्हटले जाते. निळा रंग पिग्मेंटमधून आलेला नसतो, तर त्याच्या संरचनेमुळे असतो. हे सदाहरित झाड आहे आणि पटकन वाढते. रुद्राक्षाचे खोड गोल पांढरट राखी रंगाचे असते. पानांचा घेर पिरॅमिड्च्या आकाराचा असतो. याची पाने आंब्याच्या पाना सारखी असतात. ती १०-१५ से. मी. रुंद व ३-५ से. मी. रुंद असतात. याच्या जगामद्धे ३६० जाती आहेत. त्यापैकी २५ जाती भारतात सापडतात. बियांच्या आतल्या भागास रुद्राक्ष म्हणतात. फुलांची रचना वरील भागात मोठी खालील भागात लहान फुले अशी असते (रेसिम). फुले पांढरी व पिवळी असतात व ती गळून पडलेल्या पानांच्या बेचक्यात येतात. पाकळ्या व पुंकेसर सरळ असतात व एप्रिल व मे महिन्यात येतात. फळे गोलाकृती, अंडाकृती, लहान नारिंगी किंवा निळी असतात. त्यातील आतील भाग कठीण, गोल, ५-१४ उभ्या रेघांनी बनलेला असतो व त्याचा रंग लालसर गडद असतो. एका वृक्षापासून वर्षामध्ये साधारणपणे १-२ हजार बिया मिळतात. त्यातील ९०-९५ टक्के बिया ह्या पंचमुखी असतात. भारतामध्ये हे वृक्ष श्री शंकराच्या मंदिराच्या परिसरात लावण्यात येतात. याची लागवड बियापासून करतात.

पांढऱ्या रंगाचा रुद्राक्ष सर्वांत चांगला आणि अत्यंत शुभ मानला जातो. त्यापेक्षा कनिष्ठ रुद्राक्ष अनुक्रमे तांबडा, पिवळा आणि काळा रंग असलेले असतात. पांढरे आणि पिवळे रुद्राक्ष सहसा आढळत नाहीत. तांबडे आणि काळे रुद्राक्ष सर्वत्र आढळतात.

रुद्राक्षाचा रंग तांबूस असतो आणि तो पक्का असतो. अध्यात्मात रुद्राक्षाला विशेष महत्त्व आहे. हिंदू, बौद्ध, शीख व मुस्लिम धर्मामध्येही रुद्राक्ष पवित्र मानतात. कोणत्याही देवतेचा जप करण्यासाठी रुद्राक्ष माळ वापरतात.

रुद्राक्षाबद्दल काही समजुती :

रुद्राक्षाचे फळ हे शिवाच्या अश्रूपासून निर्माण झाले आहे असे मानले जाते. हे फळ एक दिव्य मणी असून त्याची पूजा केल्याने साक्षात शिवपूजेचे फळ मिळते. शिवलीलामृताच्या अकराव्या अध्यायात असे सांगितले आहे की सहस्र रुद्राक्षे धारण करणारा साक्षात शिव आहे. त्याचप्रमाणे १६ रुद्राक्षे दंडाभोवती बांधावीत, कपाळाला १ बांधावा, मनगटाभोवती १२, कंठाभोवती ३२, कानामध्ये ६, व अन्यत्र ७ अशा प्रकारे एकूण १०८ रुद्राक्षे धारण करावीत. रुद्राक्षाच्या मण्यांचा वापर करीत ओम नमः शिवाय चा जप केला जातो. रुद्राक्षाचे मणी एकमेकात ओवून माला बनविली जाते आणि ख्रिश्चन लोकांमध्ये ज्या रीतीने जपमाळा वापरतात, त्याच रीतीने एखादे मंत्र किंवा प्रार्थना करताना मोजण्यासाठी वापरले जाते. बहुतेक माळांमध्ये १०८ मणी अधिक एक असतो, जिथे १०८ ला पवित्र आणि एखाद्या लहान मंत्राचा पाठ करण्यासाठी योग्य मानले जाते. अतिरिक्त मणीला “मेरू”, “बिंदू” किंवा “गुरु मणी” असे म्हटले जाते, जे १०८ च्या चक्राच्या आरंभाचे आणि अंताचे चिन्ह असते आणि तसेच, एक “मुख्य” मणी म्हणून त्याचे प्रतीकात्मक मूल्य असते. असे मानले जाते की रुद्राक्ष मणी हा पवित्र पदार्थ उच्चारीत मंत्रातील उर्जा पकडून ठेवतो आणि प्रार्थना करणाऱ्याच्या एकाग्रतेत आणि अध्यात्मिक विकासात मदत करतो.

यांचा आकार नेहमी मिलीमीटर्समध्ये मोजला जातो. ते मटारच्या बीजाइतक्या लहान आकारापासून काही अक्रोडच्या आकाराएवढे असतात. भारतात मिळणाऱ्या रुद्राक्षास हिमालयन रुद्राक्ष किंवा हरद्वार रुद्राक्ष असे म्हणतात. याचा रंग तांबूस व पक्का असतो. याउलट नेपाळी रुद्राक्ष चकचकीत तांबूस रंगाचे असते. तांबूस रंग हा लाभदायक मानला जातो त्यामुळे त्याची किंमत बाजारात जास्त असते. एकमुखी तांबडा रुद्राक्ष हा त्याच्या आकारमानाप्रमाणे १०-१५ लाख रुपयास असतो तसेच चौदा मुखी हा आकारमानाप्रमाणे २-५ लाखास मिळतो. हरद्वार हे रुद्राक्षांची प्रमुख बाजारपेठ आहे.

मुखाची व्याख्या :

संस्कृतमध्ये मुखी याचा अर्थ (“मुख”) म्हणजे (“चेहरा”) असा आहे. त्यामुळे मुखी याचा अर्थ रुद्राक्षावरील छिद्र, जसे एकमुखी रुद्राक्ष म्हणजे एक मुख किंवा छिद्र असलेले रुद्राक्ष, 4 मुखी रुद्राक्ष म्हणजे चार मुख किंवा छिद्रे असलेले रुद्राक्ष इ.

चेहऱ्याचे स्वरूप/मुखाचे स्वरूप

सर्व ठिकाणांवरील अविकसित, नैसर्गिकरीत्या जुडलेल्या, अर्धवट बनलेल्या किंवा मुखे न बनलेल्या रुद्राक्षांची अनेक उदाहरणे आढळतात. पूर्णपणे विकसित मुख मोजण्यासाठी सर्वात सोपे असतात आणि त्यांच्या सामान्य बाजारपेठेच्या प्रमाणापेक्षा त्यांना जास्त मूल्य मिळते. अविकसित मुख, जुडलेले मुखे, अर्धवट बनलेली मुखे किंवा मुखे न बनलेले रुद्राक्ष व्यापाऱ्यांदरम्यान गोंधळ निर्माण करते आणि त्यामुळे रुद्राक्षाची किंमत मोठ्या प्रमाणावर बदलू शकते. रुद्राक्षाच्या मुखांना मोजण्याच्या पद्धतीचे वर्णन करण्यासाठी व्यापाऱ्यांकडे कोणतेही एक परिमाण नाही..

रुद्राक्ष सर्व जाती, जमाती, स्त्रीपुरुष, मुले धारण करू शकतात. रुद्राक्षाची माला एकशेआठ रुद्राक्षांची असते. सत्तावीस मण्यांचीही माला गळ्यात घालतात. रुद्राक्ष धारण करणार्‍यांनी शुद्ध व पवित्र राहावे हे सांगायला नकोच. वळ्याएवढा, वजनदार, मजबूत व काटेदार रुद्राक्ष सतेज व उत्तम असतो. रुद्राक्षाला मुखे असतात. मुख म्हणजे रुद्राक्षाच्या वरच्या भोकापासून खाल पर्यंत गेलेली तरळ रेषा. रुद्राक्षावर काटे असतात. त्यामधून ही सरळ स्पष्टपणे खाली गेलेली असते. या सरळ खालपर्यंत गेलेल्या रेषेस मुख म्हणतात. रुद्राक्षावर अशा जितक्या रेषा असतील तितक्या मुखी तो रुद्राक्ष आहे असे समजतात. नदी समुद्राला मिळते तीही अशाच अनेक प्रवाहाने समुद्राला मिळते, त्याला नदीची मुखे म्हणतात. तशीच ही रूद्राक्षांची मुखे होत. सध्या मिळणारे रुद्राक्ष एक ते चौदा मुखांचे असतात. काही ग्रंथकारांच्या मते 1,3,5,9 व 13 मुखांचे रुद्राक्ष उत्तम समजले जातात. रुद्राक्षाच्या मुखावर अस्पष्ट असा शिवलिंगासारखा आकार असतो, तो अत्यंत उत्तम रुद्राक्ष होय.

रुद्राक्षाचा पृष्ठभाग कठीण असावा आणि त्याच्यावरील खाचांच्या उंची आणि खोली व्यवस्थित असाव्यात, जे बहुतेक नेपाळी रुद्राक्षांमध्ये आढळते. इंडोनेशियाच्या रुद्राक्षाचे स्वरूप भिन्न असते. भारतातील रुद्राक्ष नैसर्गिक पर्वत आणि दऱ्यांप्रमाणे अतिशय उंचवटे आणि खोली दर्शवितात.

रूद्राक्ष मुख व त्यांची वैशिष्ठे :

एकमुखी रुद्राक्ष भक्तिमुक्ती देणारा आहे. तो साक्षात् शिवरूप असून त्याच्या दर्शनानेच पापे नाहीशी होतात. जेथे त्याचे पूजन होत असेल तेथून लक्ष्मी दूर जात नाही व तेथे कोठलाही उपद्रव होत नाही.
दोन मुखी रुद्राक्षाला शंकर पार्वतीचे स्वरूप मानतात. हा सर्व कामना पूर्ण करणारा आहे.
तीन मुखी रुद्राक्षाला अग्निरूप मानतात. यामुळे सर्व विद्यांची प्राप्ती होते व रोग निवारण होऊन धनाची प्राप्ती होते.
चार मुखी रुद्राक्ष ब्रह्मरूप आहे यामुळे धनदौलतीची वाढ होते
पाचमुखी रुद्राक्ष खुद्द रुद्ररूप आहे आणि तो सर्व कामना पूर्ण करणारा आहे. याच्यामुळे पापवृद्धी नाहीशी होऊन मनुष्य भक्तिमार्गाकडे वळतो.
सहा मुखी रुद्राक्ष कार्तिकेय स्वरूप आहे तो उजव्या हातात धारण केला असता विशेष फल देतो. काहींच्या मते हा गणेशस्वरूपही आहे व तो उजव्या हाता बांधला असता धन, विद्या व आरोग्य देतो.
सात मुखी रुद्राक्षाला अनंग म्हणतात आणि तो धारण करणार्‍याला कधीही दारिद्र्य येत नाही. याचे पूजनाने सहा मातृक, सात अश्व व सात ऋषी प्रसन्न होतात. हा यश व कीर्ती देतो.
आठ मुखी रुद्राक्ष वसुमूर्ती भैरवरूप आहे. हा धारण करणार्‍याला भरपूर आयुष्य लाभते
नऊ मुखी रुद्राक्ष कपिलमुनी आहे आणि त्याची अधिष्ठाची देवता दुर्गा माहेश्वरी आहे, हा रुद्राक्ष भक्तिपूर्वक डाव्या हातात धारण केला असता विशेष फल देतो.
दशमुख रुद्राक्ष स्वत: जनार्दन देव आहे आणि तो धारण केला असता सर्व इच्छा सफल होतात. हा अंगावर धारण केल्याने पिशाच्य, ब्रह्मराक्षस, सर्प इत्यादींचे भय नाहीसे होते. सर्व ग्रह अनुकूल होतात. वाईट ग्रहदशा असेल तर याचा चांगला उपयोग होतो.
अकरामुखी रुद्राक्ष धारण करणारा रुद्ररूपी आहे आणि तो सर्वत्र विजयी होतो. याची मुख्य देवता इंद्र आहे. याचे पूजनाने अश्वमेघ यज्ञाचे पुण्य मिळते.
बारामुखाचा रुद्राक्ष धारण करणारा आदित्यासमान आहे. हा विष्णूरूप आहे. यामुळे आरोग्य प्राप्त होऊन अग्नीचे व हिंसक पशूंचे भय नाहीसे होते.
तेरामुखी रुद्राक्ष धारण करणारा विश्वेदेवासमान आहे. आणि त्याच्यामुळे सकल इच्छा पूर्ण होतात. याचे पूजन व धारण केल्याने कामदेव संतुष्ट होतो.
चौदामुखी रुद्राक्ष परम शिवरूप आहे व तो मस्तकावर धारण केल्याने सर्व पाप नष्ट होते. यास हनुमानाचे स्वरूप ही मानतात.
गौरीशंकर रुद्राक्षात एकाच देठावर दोन मणी काही वेळा आढळतात किंवा एकाच देठावर तीन रुद्राक्ष येतात. त्यांना ब्रम्हा, विष्णू, महेश किंवा दत्तस्वरूप समजले जाते.

रुद्रवृक्ष निर्माण होण्याचे पौराणिक विवेचन :

शिवपुराणात रुद्राक्षाची कथा सांगितली आहे, ती अशी :- पूर्वी एक हजार दिव्य वर्षे तप केल्यामुळे श्री शंकराचे मन क्षुधित झाले होते. त्याने सहज लीलेने डोळे मिटून घेतले होते. त्यावेळी त्याच्या डोळ्यातून अश्रुबिंदू गळाले. त्या अश्रुबिंदूचेच रुद्राक्षाचे वृक्ष झाले. प्रथम ते गौड देशात उत्पन्न झाले. नंतर ते दुसरीकडे पसरले म्हणून परम पावन रुद्राक्ष श्रीशंकरला अतिशय प्रिय आहे.

तारकापुत्र अधर्माचरण करू लागल्याने विषादाने शंकराच्या नेत्रांतून पडलेल्या अश्रूंचे ‘रुद्राक्षवृक्ष’ होणे आणि शिवाने तारकापुत्रांचा नाश करणे. अक्ष म्हणजे डोळा. रुद्र ±अक्ष म्हणजे जो सर्व पाहू आणि करू शकतो तो रुद्राक्ष. अक्ष म्हणजे आस. डोळा एकाच अक्षाभोवती फिरतो, म्हणून त्यालाही अक्ष म्हणतात. रुद्र म्हणजे रडका. ‘अ’ म्हणजे घेणे आणि ‘क्ष’ म्हणजे देणे, म्हणून अक्ष म्हणजे घेण्याची किंवा देण्याची क्षमता. याचाच दुसरा अर्थ म्हणजे रडणार्‍याकडून त्याचे दुःख घेण्याची आणि त्याला सुख देण्याची क्षमता असलेला ‘रुद्र ±अक्ष’ या दोन शब्दांपासून रुद्राक्ष हा शब्द बनला आहे. देवीभागवत, शिवलीलामृत, शिवपुराण, स्कंदपुराण, पूरश्चरण-चंद्रिका, उमामहेश्वर तंत्र, श्रीगुरुचरित्र इत्यादी ग्रंथातून रुद्राक्षाचे विस्तृत वर्णन आढळते.

श्रावण महिना शिवपूजनासाठी अत्यंत शुभ मानला जातो. शिवपूजनात प्रामुख्याने वाहिले जाणारे बेल पान अत्यंत गुणकारी आहे. त्याचप्रमाणे शिवनाथाच्या अश्रुतून निर्माण झालेल्या रुद्राक्षाची महतीही थोर आहे. रुद्राक्षाचे आध्यात्मिक महत्त्व अद्भूत आहे, श्रावण, महाशिवरात्रीला रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले गेले आहे. मात्र, रुद्राक्ष खरा आहे की नाही, याची खात्री करून मगच तो धारण करावा, असा सल्ला प्रामुख्याने दिला जातो. रुद्राक्ष खरा नसेल, तर तो धारण करून त्याचे लाभ मिळत नाहीत. त्यामुळे खात्री केल्याशिवाय रुद्राक्ष धारण करू नये.

खरा रुद्राक्ष कसा ओळखावा? :

खरा रुद्राक्ष ओळखण्याची पद्धत तुलनेने सोपी आणि सरळ आहे. पूर्णपणे पिकलेले रुद्राक्ष कुठल्याही आकाराचे असले तरी पाण्यात टाकल्यावर बुडते. पाण्यामध्ये पटकन बुडणारे रुद्राक्ष हे अस्सल आहे, याची खात्री बाळगायला हरकत नाही. जे पाण्यात हळुवारपणे बुडेल ते खोटे, अथवा हलक्या दर्जाचे समजावे. रुद्राक्ष हे पाच-दहा मिनिटे तळहातात घट्ट दाबून धरले आणि नंतर हलवले तर त्यातून मंजुळ ध्वनी प्रतीत होतो, असे सांगितले जाते. तांब्याच्या २ भांड्यामध्ये रुद्राक्ष ठेवले असता अस्सल रुद्राक्ष लगेचच हालचाल दर्शवतो. खरा रुद्राक्ष जसा तरंगत नाही, तसा उकळत्या पाण्यात जर ६-८ तास ठेवला, तरी त्याचे विघटन होत नाही. रुद्राक्ष हे कुठल्याच बाजूने मोडत किंवा वाकत नाही. अस्सल रुद्राक्ष बराच वेळ दुधात ठेवला तर दूध नासत नाही. रुद्राक्ष हा प्रामुख्याने गोल असतो. तो दिसायला काटेरी असला तरी ते काटे बोथट, खडबडीत, त्याचे काठिण्य भरपूर असते. खऱ्या रुद्राक्षाला कीड लागत नाही, असे सांगितले जाते. अस्सल रुद्राक्ष जड (वजनदार) आणि सतेज असतो. त्याची मुखे स्पष्ट असतात. ॐ, शिवलिंग, स्वस्तिक, अशी शुभचिन्हे असलेला रुद्राक्ष अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो. हिमालयातील यती केवळ रुद्राक्षफळ खातात. याला अमृतफळ असेही म्हणतात. ते खाल्ल्यास तहान लागत नाही, असे सांगितले जाते.

मेष, कर्क, तूळ, मकर कुंभ लग्नावर रुद्राक्ष धारण करणे अधिक श्रेयस्कर ठरते. याशिवाय मेष राशीच्या व्यक्तींनी त्रिमुखी, वृषभ राशीच्या व्यक्तींनी षण्मुखी, मिथुन राशीच्या व्यक्तींनी चारमुखी, कर्क राशीच्या व्यक्तींनी दोनमुखी, सिंह राशीच्या व्यक्तींनी एकमुखी, बारामुखी, कन्या राशीच्या व्यक्तींनी चारमुखी, तुळ राशीच्या व्यक्तींनी षण्मुखी, वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी त्रिमुखी, धनु राशीच्या व्यक्तींनी पाचमुखी, मकर राशीच्या व्यक्तींनी सातमुखी, कुंभ राशीच्या व्यक्तींनी सातमुखी आणि मीन राशीच्या व्यक्तींनी पाचमुखी रुद्राक्ष धारण करावे. मात्र, यापूर्वी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला अवश्य घ्यावा, असे सांगितले जाते.

रुद्राक्ष धारण विधी :

रुद्राक्षाचा प्रकार कोणताही असला, तरी ते धारण करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी ते अभिमंत्रित करणे आवश्यक असते. रुद्राक्ष अभिमंत्रित करून विधीवत धारण केले नाही, तर त्याचा लाभ मिळत नाही, अशी मान्यता आहे. रुद्राक्ष अभिमंत्रित केल्याने मानवी शरीरातील प्राण तत्त्व आणि विद्युत शक्ती नियंत्रित होते. अभिमंत्रित केलेले रुद्राक्ष अत्यंत गुणकारी असतो, असे सांगितले जाते. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी सात दिवस ते मोहरीच्या तेलात ठेवावे यानंतर लाल धागा, चांदीची माळ या माध्यमातून तो धारण करावा. रुद्राक्ष परिधान करण्यापूर्वी गंगाजलमिश्रित पंचामृत, पंचगव्य यांनी रुद्राक्षाला अभिषेक करावा. ते स्वच्छ करून घ्यावे. यानंतर ‘ॐ नमः शिवाय’ आणि ‘ॐ तत्पुरुषाय विदमहे, महादेवाय धीमहि तन्नो रुद्र: प्रचोदयात्’ या दोन्ही मंत्रांचा १०८ वेळा जप करावा आणि रुद्राक्ष धारण करावे, असे सांगितले जाते. ज्या रुद्राक्ष माळेचा जपासाठी वापर केला जातो, ती माळ धारण करू नये. तसेच धारण केलेल्या माळेचा जपासाठी, नामस्मरणासाठी वापर करू नये, असे सांगितले जाते.

रुद्राक्ष महिमा व इतिहास :

रुद्राक्ष-महिमा आपल्या अनेक शास्त्रांतून सांगितला आहे. ‘देवी भागवतात सांगितले आहे की स्नानादीने निवृत्त होऊन, शुध्द वस्त्र परिधान करावे व भस्म लावून रुद्राक्षमाला धारण करावी. नंतर विधिसहित मंत्र जप करावा. जर बत्तीस रुद्राक्ष गळ्यात, चाळीस मस्तकाभोवती, सहा सहा दोन्ही कानात, बारा बारा दोन्ही हातात, सोळा सोळा दोन्ही भुजात, एक शेंडीत, तसेच एकशे आठ रुद्राक्ष वक्षस्थळी धारण केल्यास, धारण करणारा स्वतः नीलकंठ शिव बनतो . रुद्राक्षास सोने किंवा चांदीच्या तारेत ओवून शेंडीत व कानात धारण करावे. यज्ञोपवीत, हात, कंठ व पोटावर रुद्राक्ष धारण करुन पंचाक्षर मंत्र ‘नमः शिवाय’ चा जप करावा.विद्वान पुरुषाने प्रसन्न मन व निर्मल बुध्दीने रुद्राक्ष धारण करावेत. कारण तोच शिव ज्ञानाचे प्रत्यक्ष साधन आहे. जो पुरुष रुद्राक्ष शेंडीत धारण करतो त्याच्यासाठी रुद्राक्ष तारक तत्त्वा (ओंकार) प्रमाणे महान आहे. दोन्ही कानात धारण केलेले रुद्राक्ष साक्षात शिव स्वरुप आहेत.यज्ञोपवीतामध्ये धारण केल्यास रुद्राक्ष वेदांप्रमाणे असतात. हातांत धारण केल्यास दिशाप्रमाणे, तसेच कंठात धारण केल्याने सरस्वती व अग्निदेवतेप्रमाणे महिमावान असतात .रुद्राक्ष धारणाचा निर्देश चारी आश्रमांत व चारी वर्णांत केलेला आहे. रुद्राक्ष धारण करतात ते साक्षात रुद्राक्ष बनतात. रुद्राक्ष धारण करणार्यांना निषिध्द दर्शन, निषिध्द श्रवण, निषिध स्मरण, निषिध्द वस्तूपासून दोष लागत नाही. जरी तो निषिध्द वस्तू हुंगेल, निषिध्द पदार्थ खाईल किंवा निषिध्द मार्गक्रमण करील तरी तो पापमुक्त रहातो. जरी रुद्राक्ष धारण केलेला मनुष्य कोणाकडे जेवला तर साक्षात रुद्राने जेवण केले असे मानावे. जो मनुष्य रुद्राक्ष धारण करणाऱ्यास श्राध्दाचे वेळी जेवण घालतो त्यास पितरलोकाची प्राप्ती होते असे मानतात. जे लोक रुद्राक्षधारीचे चरण धुवून ते जल पितात ते सर्व पापांपासून मुक्त होऊन शिवलोकात जातात. जे मनुष्य भक्तिसहित रुद्राक्षयुक्त स्वर्ण भूषण धारण करतात, ते रुद्रत्व प्राप्त करतात.

आजकाल खोटे रुद्राक्षही विकले जातात. भद्राक्ष व विकृताक्ष नावाची झाडे असतात. त्यांच्या बिया रुद्राक्षाच्या झाडांसारख्याच असतात. पण या बियांना भोक नसते. ते सुईने पाडले जाते. तसेच यांना काताच्या पाण्यात ठेवून त्यांना तांबूस रंग दिला जातो. त्यांमुळे असे खोटे रुद्राक्ष पाण्यात ठेवले तर त्याचा रंग धुतला जातो. हे खोटे रुद्राक्ष पाण्यावर तरंगतात. आणि त्यामध्ये चुंबकीय गुणधर्म नसतात. तेंव्हा रुद्राक्ष विकत घ्यायचा झाल्यास वरील गुणधर्म पाहूनच विकत घ्यावा. विशिष्ट रोग निवारण्यास रुद्राक्षाच्या माळा गळ्यात, दंडात, मनगटात, कमरेभोवती घालतात. रुद्राक्षावर पाणी ओतून ते पाणी पितात. काही वेळा आजार्‍याच्या उशी खालीही ठेवतात.

शास्त्रात उल्लेख :

देवीभागवत, शिवलीलामृत, शिवपुराण, स्कंदपुराण, पूरश्र्चरण- चंद्रिका, उमाम्हेश्र्वर तंत्र श्रीगुरुचारीत्र इत्यादी ग्रंथातून रुद्रक्षाचे विस्तुत वर्णन आढळते. याशिवाय रुद्राक्षजाबालोपनिषद नावाचे उपनिषद केवळ रुद्राक्षाच्या विविध पैलूवर प्रकाशझोत टाकते, परंतु या सर्व ग्रंथांतून त्याची उत्पत्ती, गुणधर्म, धारणविधी, उपचार पद्धती वैगेरे बाबतीत एकवाक्यता आढळत नाही आणि म्हणून नेमका कोणता ग्रंथ प्रमाणभूत मानावा असा अभ्यासकाच्या मनात संभ्रम निर्माण होतो.

श्रीगुरू चरित्र उल्लेख (आ. 33 वा) :

श्रद्धेने किंवा श्रद्धा नसतानाही जो कोणी रुद्राक्ष धारण करतो. त्याला कोणतेही पाप लागत नाही. रुद्राक्ष धारण केल्याने मिळणारे पुण्य केवळ असीम आहे. त्या पुण्याला दुसरी उपमाच नाही. जो मनुष्य एक हजार रुद्राक्षांची माळ धारण करतो तो साक्षात रुद्र होतो. अशा माणसाला सर्व देव वंदन करतात. एक हजार रुद्राक्ष मिळू शकले नाहीत, तर एकशेआठ रुद्राक्षांची माळ गळ्यात धारण करावी. त्या माळेत नवरत्ने गुंफावीत. रुद्राक्ष हे सर्वपापनाशक आहेत. ते हातांवर, दंडावर, मस्तकावर धारण करावेत. रुद्राक्षावर केलेला अभिषेक पूजेसमान फळ देणारा आहे. अस्सल रुद्राक्ष भक्तिभावाने धारण करावेत. त्यामुळे चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती होते.

रुद्राक्ष वृक्षाचे औषधी उपयोग :

शरीर आणि मनासाठी फायदेशीर

रुद्राक्षामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते, जी रोगांशी लढते, त्यामुळे आरोग्य सुधारते. आयुर्वेदानुसार रुद्राक्ष शरीराला बळ देतो. याने रक्तातील अशुद्धता दूर होते. हे मानवी शरीराच्या आतून तसेच बाहेरील बॅक्टेरिया काढून टाकते. रुद्राक्ष डोकेदुखी, खोकला, पक्षाघात, रक्तदाब आणि हृदयविकाराशी संबंधित समस्या दूर करतो.

रुद्राक्ष धारण केल्याने चेहऱ्यावर चमक येते, ज्यामुळे व्यक्तिमत्व शांत आणि आकर्षक बनते. जपासाठी रुद्राक्षाचे मणी वापरतात. नामजपाच्या प्रक्रियेमुळे जीवनात पुढे जाण्यासाठी आध्यात्मिक शक्ती आणि आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे रुद्राक्षाच्या बिया आरोग्य आणि आध्यात्मिक लाभ देण्यासाठी उपयुक्त आहेत.

रुद्राक्ष धारण केल्याने मागील जन्मातील पापांचा नाश होतो ज्यामुळे वर्तमान जीवनात अडचणी येतात त्यांचा नाश होतो. रुद्राक्ष धारण केल्याने मनुष्य रुद्राचे रूप प्राप्त करू शकतो. हे सर्व पापांपासून मुक्त होण्यास मदत करते आणि एखाद्याच्या जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करण्यास मदत करते.

रुद्राक्ष वाईट आणि नकारात्मक प्रभाव दूर करतो. रुद्राक्ष हा आध्यात्मिक मणी मानला जातो. प्राचीन काळापासून याचा उपयोग आध्यात्मिक शक्ती, आत्मविश्वास, धैर्य वाढवण्यासाठी आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी केला जात आहे. वैज्ञानिकांनुसार रूद्राक्षात इलेक्ट्रोमॅग्नेटिक गुणांमुळे अद्भुत शक्ती असते. विद्युत चुंबकीय प्रभावामुळे यातील औषधी क्षमता निर्माण होते.

आंतरराष्ट्रीय विद्यापीठ फ्लोरिडाचे वैज्ञानिक डॉ.डेव्हिड ली, आणी स्वाती हरदेनियन यांनी संशोधनानंतर सांगितले की, रुद्राक्ष विद्युत ऊर्जेला संचित करून ठेवते. यामुळे चुंबकीय गुण विकसित होतात. हे मेंदूतील काही रसायनांना उत्तेजित करते. अशाप्रकारे शरीराचा चिकित्सकीय उपचार होतो. बहुतेक याच कारणामुळे रुद्राक्षाचा शरीराला स्पर्श होताच लोकांना चांगले वाटते.

रुद्राक्ष बौद्धिक क्षमता आणि स्मरण शक्ती उत्तम करण्यासाठी प्रभावी असल्याचे मानले जाते. रूद्राक्ष धारण केल्यामुळे चिंता आणि तणावासंबधी अडचणींमध्ये कमतरता येते. उत्साह आणि ऊर्जेत वाढ होते. रक्त परिसंचरण आणि हृदयाची धडधड शरीराच्या चहुबाजूने एक चुंबकीय क्षेत्र निर्माण करते. रूद्राक्ष हृदयरोग, रक्तदाब तसेच कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रण करण्यासाठी प्रभावशाली मानले जाते.

– डॉ. दिलीप केशव कुलकर्णी

संदर्भ:

Swati Hardainiyan, Bankim Chandra Nandy , Krishan Kumar : Int. J. Pharm. Sci. Rev. Res., 34(1), September – October 2015; Article No.10, Pages: 55-64
देवेश फडके- महाराष्ट्र टाइम्स , १७ जुलै, २०२०.
संपूर्ण चातुर्मास, लेखक- श्री.काशिनाथ अनंत जोशी , धार्मिक प्रकाशन संस्था, मुंबई, २००८ ची आवृत्ती. पान नंबर ६१-७६
व आंतरजालावरील अनेक लेख.
सर्व फोटो गुगल इमेजेस वरून साभार.

रुद्राक्षावरील कांही महत्वाची पुस्तके
रुद्राक्ष महात्म्य : लेखक दौडियाल गुप्त, गजानन बुक डेपो, मुंबई.
चमत्कारी रुद्राक्ष : महिमा और प्रयोग लेखक : बाबा औंढरनाथ तपस्वी, रणधीर प्रकाशन,हरद्वार
आयुष्यमान वाढविणारी दिव्यशक्ती रुद्राक्ष :संयम पब्लिकेशन

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 78 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

1 Comment on हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ९ – शिवप्रिय वृक्ष : रुद्राक्ष

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..