नवीन लेखन...

मी श्रीमंत झालो

महाराष्ट्रातले ज्येष्ठ आणि प्रख्यात व्यंगचित्रकार श्री. प्रभाकर वाईरकर यांचा अतिशय p-46219-cartoonमोलाचा आशीर्वाद आज अवचितच माझ्या नशिबी आला.. प्रभाकरपंतांनी आज माझं व्यंगचित्र काढून मला आशीर्वाद दिला.. कोणत्याही कलावंताला मी देवाचा पृथ्वीवरचा अंश (अवतार नव्हे, अवतार भ्रष्ट असू शकतो) मानतो आणि म्हणून प्रभाकरपंतानी काढलेलं माझं व्यंगचित्र मला साक्षात देवाचा आशीर्वादच वाटतो.. देवाचा आशिर्वाद असाच अचानक मिळत असतो, तो ओळखता आला पाहिजे मात्र..!!

..ज्या कुंचल्याने बाळासाहेब ठाकरेंसारख्या श्रेष्ठ व्यंगचित्रकार आणि लोकनेत्याच्या असंख्य व्यंगचित्रांना जन्म दिला, ज्या कुंचल्यातून देश-विदेशातल्या सर्वमान्य विभुतींची व्यंगचित्र कागदावर उतरली, ज्या कुंचल्याने त्या त्या वेळच्या वर्तमानातील परिस्थितीवर चिमटे काढले, ते ही कुणाचं रक्त न काढता आणि समाजाला अंतर्मुख केलं, त्या कुंचल्यातून माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचं व्यंगचित्रही उतरावं, ते ही गळ्यातल्या शब्दशेल्यासहीत हे माझं पूर्वसंचितच असावं. पूर्वसंचित एवढ्याचसाठी, की या जन्मात माझ्याकडून अद्याप लक्षणीय असं कोणतंही काम किंवा कार्य झाल्याचं माझ्या
स्मरणात नाही..

पु.ल., जयवंत दळवी, बाबा कदम, अशोक राणे, तेंडुलकर आदी लेखकांनी मी कळता झाल्यापासूनच माझ्यावर मोहीनी घातली होती. तशीच ती चांदोबातला अज्ञात चित्रकार, दिवाळी अंकांतून दिसणारा राजा रविवर्मा, ‘मार्मिक’मधले बाळासाहेब-श्रीकांतजी, चंपक किंवा ‘जत्रे’तले खलील खान या चित्र-व्यंगचित्रकारांनीही. यात प्रभाकर वाईरकरही होते. मला या लोकांचं प्रचंड आकर्षण होतं. मलाही यांच्यासारखं काहीतरी करता यायला हवं असंही वाटायचं, प्रयत्नही करायचो पण ते नाहीच जमलं..त्यांच्यासारखं नाही करु शकलो, तरी किमान आपली यांच्याशी ओळख तर असावी असं वाटू लागलं. ही माझी इच्छा मात्र बऱ्याच अंशी पूर्ण झाली.

पु.ल., दळवींची ओळख जाऊ द्या, साधी भेटही होऊ शकली नाही. तेंडुलकरांना एकदा पार्ल्याच्या त्यांच्या घरी भेटलो होतो. राजा रविवर्माना खुप अगोदरच देव-देवी व रंभा-अप्सरांनी वर त्यांची सुरेख चित्र काढायला बोलावून घेतलं होतं. खलिल खानांनाही नाही भेटू शकलो. बाळासाहेबांना मात्र भेटलो. त्यांनी राज ठाकरेंनी तयार केलेली त्यांची‘फोटोबयोग्राफी’ भेटंही दिली होती. (बाळासाहेब ‘फोटोबयोग्राफी‘ असा शुद्ध शब्द उच्चारत, आपल्यासारखं ‘फोटोबायोग्राफी’ असा अशुद्ध नाही. हे बाळासाहेबांनी त्या भेटीत मुद्दाम सांगीतलं होतं). पण चित्रपट विषयात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेली आणि मान्यता पावलेली श्री. अशोक राणे आणि व्यंगचित्रकार श्री. प्रभाकर वाईरकर ही दोन व्यक्तीमत्व मात्र ओळखीचीच नव्हे, तर यांच्याशी माझं चक्क जवळचं मैत्र झालं..मी पूर्वजन्माचं पुण्य मानतो, ते याचसाठी..

p-46219-salunkhe-and-wairkarश्री. प्रभाकर वाईरकर मला पहिल्यापासून माहित होते, ते प्रख्यात व्यंगचित्रकार म्हणून. परंतू ते उत्तम चित्रकारही आहेत हे मात्र खुप नंतर समजलं. व्यंगचित्रातही ‘चित्र’ असलं, तरी या दोन्ही खुप वेगळ्या कला आहेत. पाच-सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या चित्राचं प्रदर्शन ’नेहरू सेंटर’ला भरलं होतं, तेंव्हा मी तेथे गेलो असता त्यांची आणि माझी पहिली भेट झाली. मला चित्रकलेतलं फारसं काही कळत नाही, म्हणून त्यांच्या चित्रांवर मी बोलणार नाही, परंतू ते काहीतरी अफाट होतं हे नक्की. सामान्य माणसाच्या अंतर्मनाला साद घालते ती कला, मग ती कोणतीही असो, ही माझी कलेची व्याख्या आणि त्या व्याख्येत वाईरकरसाहेबांची चित्र आणि व्यंगचित्रही फिट्ट बसतात येवढं खातरीने सांगेन.

श्री. वाईरकरांची आणि माझी रुबरू भेट व्हायची ती पहिलीच वेळ. त्यांची व्यंगचित्र पाहात मोठा झाल्याने मी त्यांचा असाही चाहता होतोच, त्यांना प्रत्यक्ष भेटून ते चाहतेपण अधिक गडद झालं. मी त्यांना पहिलांदाच भेटतोय हे मला अजिबात जाणवलं नाही, किंबहूना त्यांनी ते जाणवू दिलं नाही..मोठी व्यक्ती नेहेमी जमिनीवर पाय रोवून उभी असते याचं हे उदाहरण..माझा हात धरून माझ्याशी बोलताना त्यांच्या शब्दांपेक्षा स्पर्शच अधिक बोलत होता.

एकंदर माझे आकाशस्थ ग्रह गत १५ दिवसांत फारच उच्चीचे असावेत किंवा आपापल्या स्वगृही आराम फर्मावत असावेत. गेल्या आठवड्यात सुशांत विश्वासरावांना माझं स्केच काढवसं वाटावं आणि काल वाईरकरांना माझं व्यंगचित्र..यात काहीतरी योगायोग असावा नक्की..

वांईरकरसाहेब, आपले आभार मानणं खुपच कृत्रीम होईल आणि आपल्या संस्कृतीत मिळालेल्या आशीर्वादाचे आभार मानण्याची प्रथा नाही..देवाचा आशीर्वाद मिळतो तेंव्हा श्रीमंत झाल्यासारखं वाटतं, मलाही वाटलं..!!

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..