५० ते ६० च्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक बदल झाले. सिनेमा रंगीत बनू लागले, कौटुबिंक रडारड मर्यादित झाली, प्रत्येक चित्रपटातला नायकाने थोडी तरी फायटींग करायला हवी असा आग्रह वाढू लागला. दिग्दर्शका बरोबर कॅमेऱ्याचे कसब लोकानां आवडायला लागले. याच काळात जागतिक पटलांवर जेम्स बॉन्ड या काल्पनीक पात्राने पुस्तक आणि कार्टूनच्या रूपाने प्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरूवात केली होती.. इयान फ्लेमिंग या कादंबरीकराने १९५२ मध्ये सर्व प्रथम जेम्स बॉन्ड हा गुप्तहेर नायक कादंबरीत आणला. त्याने जेम्स बॉन्डला जन्म दिला तेव्हा त्यालाही असे वाटले नसेल की भविष्यात या काल्पनीक पात्रावर जवळपास २६ चित्रपट तयार होतील.
खरं तर गुप्तहेर हे जगातील सर्वच देशात प्रत्यक्षात असतात व आहेत. मात्र जेम्स बॉन्ड या ब्रिटीश गुप्तहेरा इतकी प्रसिद्धी खऱ्या गुप्हेरानां देखिल मिळाली नसेल. तर असा जेम्स बॉन्ड रूपेरी पडद्यावर सर्व प्रथम आला तो १९६२ मध्ये. ‘’ डॉ. नो’’ हा पहिला बॉन्डपट. डॉ. नो हा कमालीचा निर्दय आणि मनोविकृत इसम. जमैका येथील ब्रिटीश सिक्रेट सर्व्हिसच्या गुप्त ठाण्यातील दोन अधिकारी रहस्यमयरित्या नाहिशी होतात. मग त्यांचा शोध घेण्यासाठी जेम्स बॉन्डला पाठविले जाते.. असे कथानक असलेल्या या बॉण्डपटात मग तुफान रोमांचकारी प्रसंगाची रेलचेल आहे.
अशा प्रकारच्या चित्रपटात उत्कंठापूर्ण प्रसंग महत्वाचे असतात. अक्शन हा चित्रपटाचा आत्मा असतो. अभिनयाला तसे खूप काही महत्व असेलच असे नाही…मात्र तो नट किंवा नटी अत्यंत वेगवान शारीरीक हलचाली करणाऱ्या असाव्या लागतात. नायकाचे एकूण व्यक्तीमत्व खूप महत्वाचे असते. सर थॉमस शॉन कॉनरी या स्कॉटीश अभिनेत्याने पहिला बॉन्ड साकारला आणि अख्ख्या जगाला काल्पनिक पात्र जेम्स बॉन्डला जीवंत करणारा खरा नायक मिळाला. आणि नंतर सुरू झाली बॉन्ड पटाची एक प्रदीर्घ मालिका..
आता हे एवढे पूराण सांगण्याचे कारण तुम्हाला जेम्स बॉन्ड माहित नाही म्हणून नाही. कारण तुम्हा सर्वानाच जेम्स बॉन्ड साकारणारे सर्वच अभिनेते माहित आहेत. मात्र “शॉन टेरेन्स यंग‘’ हे नाव कदाचित आठवणार नाही. यंग हा सुरूवातीच्या तिनही बॉन्डपटाचा दिग्दर्शक होता. डॉ. नो(१९६२), फ्राम रशिया विथ लव्ह (१९६३ ) आणि थडंर बॉल(१९६५) हे तिनही बॉन्डपट तुफान गाजले. टेरेन्स यंग मुलत: पटकथाकार. जेम्स बॉन्ड पहाण्यापूर्वी मी शाळेत असताना “वेट अन्टील डार्क” हा अन्ड्रे हेपबर्नचा थ्रीलर पाहिल्याचे आठवते. त्यातला एक प्रसंग सोडता आज फारसे काही आठवत नाही. पण या चित्रपटाचा दिग्दर्शक यंग होता हे खूपच नंतर समजले.
शांघाय म्युनिसपल पोलिसचे कमिशनर हे यंगचे वडील. त्यामुळे कदाचित जन्मताच त्याच्यात अशा प्रकारच्या चित्रपट दिग्दर्शनासाठी लागणारे गूण आले असावेत. शिवाय दुसऱ्या महायुद्धात तो स्वत: टँक कमाडंर होता. म्हणजे थ्रील, धाडस, वेग असा स्वत:चा त्याला अनुभव होताच. शॉन कॉनरीला बान्डचे सर्व बारकावे यंग ने शिकवले. त्यामुळे शॉन कॉनरी सुपरस्टार होण्यात यंगचा महत्वाचा वाटा आहे.
‘’फ्राम रशिया विथ लव्ह’’ या चित्रपटातील एक महत्वाचा प्रसंग समुद्रात शूट करण्यात येत होता. फोटोग्राफर आणि यंग ज्या हेलिकॉप्टरमध्ये बसून चित्रण करत होते ते समुद्रात कोसळले. अर्थात त्यांना या जिवघेण्या प्रसंगातून सूखरूप वाचविण्यात आले. ६० च्या दशकातील मध्यानंतर मात्र टेरंन्स यंग ने फारसे चित्रपट केले नाही. चार्ल्स ब्रान्सन बरोबरचे रेड सन, कोल्ड स्विट व व्हॅलाची पेपर्स या त्याच्या चित्रपटांनी बऱ्यापैकी यश मिळवले. पूढे “फॉर युवर आईज ओन्ली’’ (१९८१) व ‘’नेव्हर से नेव्हर अगेन’’(१९८३) या बॉन्डपटाच्या दिग्दर्शनासाठी त्याला आमंत्रित केले होते पण यंगने नकार दिला. मायकेल केन, लॉरेन्स ऑलिव्हीअर (यंगचा अतिशय जवळच्या मित्रापैकी एक) आणि रॉबर्ट पॉवेल या तिन ब्रिटीश दिग्गज नटानां घेऊन यंगने १९८३ मध्ये ‘जिगसा मॅन’ तयार केला. वयाच्या ७९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने टेरेन्स यंगला शेवटचा क्लॅप दिला……. तो दिवस होता ७ सप्टेंबर १९९४. पडद्यावरील जेम्स बॉण्डची भूरळ आजही तशीच कायम आहे मात्र प्रेक्षकांनी कदाचित टेरेन्स यंगला विस्मृतीत टाकले असावे……
— दासू भगत
Leave a Reply