‘अंधानुकरण’ म्हटलं की, मला खूप वर्षांपूर्वी वसंत सरवटे यांचं दिवाळी अंकांत पाहिलेलं व्यंगचित्र आठवतं.. रस्त्यावरुन चाललेल्या मोर्चामधील एकजण रस्त्याच्या कडेला असलेल्या मुतारीत लघुशंकेला जातो, तेव्हा त्याच्याच मागे असलेले सर्वजण रांगेने त्या मुतारीत जाऊन पुढच्या बाजूने पुन्हा रस्त्यावर येऊन मोर्चात सामील होतात..
अलीकडच्या वीस पंचवीस वर्षांत भारतातील बहुसंख्य जनता खाण्याच्या बाबतीत अमेरिकेचे अंधानुकरण करीत आहे..
अमेरिकेसारख्या सधन देशातील गरीब लोकं मॅक्डोनल्ड, केएफसी आणि पिझ्झा हट मधील पिझ्झा, बर्गर व चिकन खातात. त्याच्या उलट तेथील श्रीमंत, करोडपती उकडलेल्या ताज्या भाज्या खातात. ताजी गरम भाकरी किंवा ताज्या कणकेपासून केलेली रोटी व ताजी फळे, सॅलड खायला मिळणे हे तिकडे श्रीमंतीचं रक्षण मानल जातं.
अमेरिकेतील गरीब जनता, पॅक केलेले अन्न खाणे. ते आठवड्याचे, महिन्याचे पॅकींग पदार्थ फ्रिजमध्ये साठवून, पाहिजे तेव्हा ते ओव्हनमध्ये गरम करुन खातात..
याच गोष्टींचं अंधानुकरण भारतीय शहरातील श्रीमंत उत्साहाने करतात. आपल्या मुलाचा वाढदिवस मॅक्डोनल्ड किंवा पिझ्झा हटमध्ये जाऊन साजरा करतात. उलट अमेरिकेन मध्यमवर्गीय माणूस मॅक्डोनल्ड मध्ये गेल्यावर आपल्याला लोकं, इतकी परिस्थिती वाईट झाली आहे का? असं म्हणून नावं ठेवतील.. असा विचार करतो..
भारतातील सर्वात गरीब माणूसही आज उकडलेल्या ताज्या भाज्या, डाळी व गरमागरम रोटी खातो. तो फ्रिजमधलं अन्न खाण्याचा कधी विचारही करत नाही..
म्हणजेच आपण जे सहज शक्य आहे ते ताजे न खाता, जे शिळं.. बेचव.. आरोग्यासाठी धोकादायक आणि महागडे आहे असे अन्न आवडीने खातो.. व त्यांच्या श्रीमंतांचं अनुकरण न करता गरीबांचं बोट धरुन चालतो…
ताज्या भाज्यांचे, फळांचे दर सीझन नुसार कमी जास्त होत रहातात. उलट पॅकबंद पदार्थांचे दर हे एकच रहातात.. जसजशी त्यांची एक्सपायरी जवळ येत जाते, त्यांची किंमत कमी होत जाते.. एक्सपायरी नंतर असे पॅकबंद पदार्थ फुकट घेऊन जाण्यासाठी दुकानाबाहेर ठेवले जातात.. शेकडो लोक रात्री अकरा वाजता असे पदार्थ घेऊन जातात..
भारतातील सर्वसामान्य जनता नशीबवान आहे, त्यांना ताज्या पालेभाज्या, डाळी सहज उपलब्ध होत असतात. ताजं अन्न खाऊन ते इपलं आरोग्य अबाधित राखू शकतात… श्रीमंत मात्र पॅकबंद, शिळं खाण्यात धन्यता मानतात.. लठ्ठ होतात.. बीपी, शुगरने त्रस्त होतात..
आपण ताज्या पदार्थांच्या समृद्धीपासून पॅकेज पदार्थांच्या गरीबीकडे वेगाने जात आहोत.. हे कुठेतरी थांबायला पाहिजे.. आपली भारतीय खाद्य संस्कृती विसरुन चालणार नाही.. अन्यथा पुढची पिढी ही अंधानुकरणामुळे सुदृढ रहाणार नाही..
अजूनही वेळ गेलेली नाही, जे खाल ते सकस, पौष्टिक व ताजेच खा.. पॅकबंद व फास्टफूडकडे फिरकूही नका..
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१५-१०-२१.
Leave a Reply