नवीन लेखन...

अंगारकी आणि गणपती..

आज अंगारकी चतुर्थी. मंगळवारी येणाऱ्या ‘संकष्टी’ला अंगारकी म्हणतात कारण ‘अंगारक’ हे मंगळाचे नांव आहे. ‘अंगार’ म्हणजे आग..! अग्नीप्रमाणे तेजस्वी आणि दाहक असलेल्या मंगळाला म्हणूनच ‘अंगारक’ म्हणतात.

मंगळ अग्नीप्रमाणे तांबडालाल दिसतो. इंग्रजीत मंगळाला Military Planet म्हणतात. ज्योतीषशास्त्रानुसार तो उग्र व विनाशक प्रवृत्तीचा पापग्रह मानला जातो, मग गणपती सारख्या शुभ देवतेचा मंगळासारख्या पापग्रहाशी आजच्या दिवशी येणारा संबंध येवढा महत्वाचा का मानला गेलाय ? कधीही उपवास न करणारे काही महाभाग आजचा दिवस मात्र आवर्जून उपवास करतात ते का?

मंगळाचा आणि गणपतीचा संबंध समजून घ्यायचा असल्यास आपल्याला गणपतीचं मुळ रूप समजून घ्यावं लागेल. आपण सध्या समजतो तसे आपल्या परमप्रिय ‘गणपतीबाप्पा’चे पुरातन कालातील रुप ‘विघ्नहर्ता’ असे नसून ‘विघ्नकर्ता’ असे होते. ‘संकष्टी’ या ‘संकट’समान शब्दाचा जन्म इथलाच असावा. गणपतीचे ‘विघ्नेश्वर’ नांव प्रसिद्धच आहे. अशा या ‘विघ्नकर्त्या’ देवतेने आपण हाती घेतलेल्या शुभकार्यात अडथळे आणू नयेत यासाठी तीची पुजा करून तीला प्रसन्न करून घेण्याची प्रथा पुर्वी अस्तीत्वात होती. ‘पहिले नमन गणरायाला’ याचा उगम या प्रथेत दडलाय. आपण नाही का Nusance Power असलेल्या गल्लीतल्या दादा-टाईप असलेल्या किंवा ओळखीच्या पोलिसनाल्याला किंवा नेत्याला त्याच्याकडे आपलं काही काम नसलं तरी आणि आपल्या मनात नसलं तरी आवर्जून नमस्कार करतो, तसं..! आपण काही कार्य हाती घेतलं असता त्यात या लोकांनी विघ्न आणू नयेत हा असा नमस्कार करण्यामागचा आपला सुप्त हेतू असतो. हाती घेतवेल्या यज्ञादी शुभ कार्यात गणपतीने विघ्न आणू नयेत या साठी सर्वात प्रथम गणेशाला वंदन करण्याची प्रथा पडली, ती आजतागायत सुरू आहे..

मंगळ हा ग्रह पूर्वापार पापग्रह मानला गेलाय. मंगळवार व गणपती यांची युती होणं म्हणजे, सध्याच्या वातावरणात उदाहारण द्यायचं तर समादवादी पार्टी व ओवेसींची अम.आय.एम. यांची अभद्र युती होण्यासारखंच होतं. अशी युती काही चांगलं करेल अशी अपेक्षाच ठेवणं चुकीचं आहे व किती वाईट हेऊ शकतं याचाच विचार आपल्या मनात येतो, तसंच मंगळ आणि गणपती यांची युती अती-विध्वंसक माणण्याची (अनुभवाअंती पडलेली) प्रथा पुर्वी होती व या दोघांनाही प्रसन्न करून घेणे हे ‘अंगारकी चतुर्थी’ पाळण्यामागचे कारण आहे.

आपण बोलताना मारे गणपती ही बुद्धीची देवता मानतो परंतू उपवास व गणपतीचं दर्शनमात्र कायम तलवार हाती घेऊन बसलेल्या ‘मंगळ’वारी करतो..खरं तर बुद्धीचा ग्रह ‘बुध’ व मंगळवार नंतरचा ‘बुध’वार हा त्याचा वार. मग गणपतीचा वार बुधवार असला पाहीजे. मग आपण बुधवारी गणपतीचं दर्शन न घेता मंगळवारी का घेतो याचं कारण आपल्या महाराष्ट्राच्या प्रकृतीत दडलंय..आपला महाराष्ट्र हा देशातील एक अव्वल प्रतीचा व कडवा लढवय्या प्रांत मानला जातो व तो तसा आहेही..चीनच्या भारतावरील आक्रमणात तत्कालीन पंतप्रधान नेहरूंनी महाराष्ट्राच्या यशवंतराव चव्हाणांना संरक्षणमंत्रीपद सांभाळायची गळ घातली होती ती या महाराष्ट्राच्या लढवय्येपणाची खात्री होती म्हणूनच. ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला’ हे वाक्य तेंव्हापासून प्रसिद्ध पावलं व ते आजतागायत खरं ठरलंय..
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले..
मराठय़ांविना राष्ट्रगाडा न चले..।
खरा वीर वैरी पराधीनतेचा..
महाराष्ट्र आधार या भारताचा..।।
मराठी लोकांना दिल्ली अजून बिचकून असते हे वारंवार सिद्ध झालंय व पुढेही होत राहील. तर अशा या ‘नडणाऱ्या’ वृत्तीच्या लढावू महाराष्ट्राला गणपतीचं ‘नडणारा योद्धा’ हे स्वरुपाचं आकर्षण वाटलं तर त्यात नवल काय?

पुढे पुढे मात्र गणपतीचं लढावू रूप लोप पावत बुद्धीदाता हे रूप लोकांना आवडू लागलं..त्याच्या पुजनाचा वार मंगळवारच असला तरी पूज्य रूप मात्र बुद्धीचं होण्याची प्रथा जनमाणसात रूळली..देशातील अनेक प्रांतात ‘बुधवार’ हा गणपतीचा वार मानला व पाळलाही जातो. प्रभादेवीच्या श्री सिद्धीनिनायकाच्या मंदीरात नीट लक्ष देऊन पाहाल तर मंगळवारप्रमाणे बुधवारीही गर्दी दिसेल. मंगळवारी मराठीजनांची संख्या जास्त दिसेल तर बुधवारी ‘नाॅर्थ’ इंडीयनांची..(पंजाबात व उत्तरेत मारुतीचा वार म्हणून गुरुवारही पाळला जातो व गुरूवारचे त्यांच्या बोलीतले नांव ‘बीरवार’ असं आहे..’वीर’ म्हणजे मोठा भाऊ) तरीही गणपती ही मुळची युद्ध देवता असल्याची प्राचीन खुण मॅगळवार व अंगारकीच्या रुपाने अद्याप शिल्लक आहे…

अंगारकी चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा..!! (येवढं बिनडोक वाक्य दुसरं कोणतही नसेल.)

-नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..