गंभीर गुलजार हास्यविनोदाचे मळे फुलवू शकतो, त्याला जर तोलामोलाची साथ मिळाली तर !
विनोदाची खूप रूपे आहेत. मराठीजनांना “पुलंच्या “रूपाने निखळ विनोद काय असतो याचा प्रदीर्घ अनुभव आहे. ऍक्शन विनोद बऱ्याच जणांना आवडतो. द्वयर्थी विनोदानेही एकेकाळी धुमाकूळ घातला होता. प्रत्येक कलावंताची स्वतंत्र शैली असते. विनोदाचा शिडकावा दैनंदिन जीवनात कोणाला नको असतो? पण काहीतरी अंगविक्षेप करून /चाळे करून तात्कालिक हसू फ़ुटेलही पण गुलजारसारखी व्यक्ती तेथेही आपल्या अभिजाततेचा हात सोडत नाही. “अंगूर ” हा परिस्थितीजन्य विनोदाचा एक उत्तम नमुना आहे. त्यामुळे तो खदाखदा क्वचितच हसवतो पण स्मित सदैव रेखाटतो. त्यातही एकाऐवजी दोन डबल रोल असल्याने होणारी धमाल क्षणभरही पडद्यावरून नजर हटू देत नाही. या चार जणांच्या आठ समर्थ खांद्यांवरील हा चित्रपट मनाला भावून जातो.
बरं त्यात वैविध्यासाठी फार वावही ठेवलेला नाही- म्हणजे चष्मा ,मिशी ,दाढी ,वेशभूषा असले फरक दाखविणारे प्रकारही नाही. सगळीच मंडळी निष्पाप असल्याने सुष्ट -दुष्ट असा नेहेमीचा काळ्या -पांढऱ्या छटांमधील सरळधोप मार्गही बंद. त्यामुळे पात्रातील फरक एस्टॅब्लिश करण्यासाठी गुलजारकडे एकच मार्ग होता – देहबोली (body language ). या शास्त्राचा (आणि शस्त्राचाही ) इतका विहंगम वापर चित्रपटसृष्टीत क्वचितच केला गेला आहे. एकूणच चित्रपट भाषेचे माध्यम असल्याने त्यात अपरिहार्यपणे शब्दबंबाळपण येते. काही नाटकी अनुभवांसाठी ते गरजेचेही असते. पण त्या प्रक्रियेत देहबोली वळचणीला जाते. आपल्याकडे देहबोली कोठल्याही अभ्यासक्रमात शिकविली जात नाही आणि म्हणून त्यातील शक्ती कायम दुर्लक्षित राहते. हिंदीत “पुष्पक ” आणि ” छोटीसी बात ” हे चित्रपट देहबोलीचा नितांतसुंदर आविष्कार तर दाखवितातच पण त्याहीपेक्षा देहबोलीचा परिणाम आणि महत्व सिद्ध करतात. या शास्त्राचा संयत वापर इथे संजीवकुमार आणि देवेन वर्मा सारख्या सिद्धहस्त कलावंतांनी बहारदारपणे केलेला आहे.
अशोक आणि बहादूर हीच नावे अनुक्रमे संजीवकुमार आणि देवेन वर्मांना देण्यात आली आहे ,दोन्ही भूमिकांसाठी. कारण काय तर म्हणे सारखीच दिसताहेत की ती . एका दुर्घटनेत या जोडया दुरावतात आणि कालांतराने नियती त्यांना एकाच गावात आणून ठेवते. पुढचा सगळा सावळा गोंधळ प्रत्यक्ष पडद्यावर अनुभवण्यासारखा आहे. त्यात पोलीस इन्स्पेक्टर ,टॅक्सी ड्रायव्हर आणि जवाहिऱ्या (त्याच्या कारागिरासह ) भरीस भर घालतात . मधेच पद्मा चव्हाण एक संशयाची झालर लावून जाते. खरी बहार येते अरुणा इराणी आणि देवेन वर्माच्या भांग प्रसंगात आणि त्यावेळी पार्श्वभूमीवर वाजवलेल्या “प्रीतम आन मिलो ” गाण्याने ! हा एकमेव master piece अरुणा आणि देवेनची कलावंत म्हणून असलेली उंची दाखवून देतो. विशेषतः अरुणा इराणी विनोदी भूमिकांसाठी तितकीशी प्रसिद्ध नसतानाही गुलजारने तिच्यावर टाकलेला विश्वास ती सार्थ करून दाखविते. देवेनला मोकळे रान मिळाले आहे आणि तो संजीवच्या खांद्याला खांदा लावून उभा ठाकतो. विनोदी आणि काहीशी आक्रस्ताळी भूमिका वठविण्यात मौशुमी मात्र कामी पडली आहे. काहीवेळा ते पात्र हास्यास्पद होऊन जाते. दीप्ती नवलला फारसा वाव नाही. सगळा चित्रपट दोन जोड्यांभोवती फिरतो. नाही म्हणायला तिला एक नितांतसुंदर गाणं “रोज रोज डाली डाली ” मिळाले आहे.
नर्म विनोदाचा असा धागा शेक्सपियरच्या खांद्यावरून तितक्याच समर्थ खांद्यांवर छान पेलला गेला आहे आणि शेक्सपीयरला ते नक्कीच आवडलं असेल. रूपांतर अस्सल आणि आपल्या मातीतील दाखविणे (ज्यामुळे मूळ कलाकृतीचाही विसर पडतो) हे येरागबाळ्याचे काम नाही. तेथे जातीचेच पाहीजे.
अर्थात हृषीकेश मुखर्जीच्या “गोलमाल ” आणि “चुपके चुपके ” या खळाळून हसविणाऱ्या कलाकृतींशी तुलना करण्याचा मोह आवरायला हवा कारण मुळात “अंगूर”ची प्रकृती परिस्थितीजन्य विनोदाची आहे. तेच तिचे बलस्थान आहे आणि (असल्यास ) मर्यादाही. सलाम करायला हवा तो संजीवकुमारला ! डिटेक्टिव्ह कादंबरीच्या वाचनाची आणि सतत संशयात्म्याची विचारसरणी आवाजाच्या ज्या फिरतीतून तो दाखवितो ते फक्त आणि फक्त केवळ ! गुलजारच्या प्रत्येक साच्यात (मौसम, कोशिश ,परिचय आणि अंगूर ) तो अगदी फिट्ट बसतो. खरा अष्टपैलू आणि सिद्धहस्त कलावंत. अशी माणसे दुर्मिळ आणि काहीतरी पूर्वपुण्याईमुळे आपल्या जीवनात आलेली. त्याबाबत कृतज्ञतेने गुलजारचे आभार मानणे एवढेच आपल्या हातात राहते.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply