नवीन लेखन...

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ११

भाग अकरा

निशाने त्याच्या हाताला जोरात हिसडा दिला, “Please रोहन, तू माझ्या अंगाला हात लावू नकोस. आणि माझ्या मागेही येऊ नकोस.  मला तुझं काहीच ऐकायचे नाही. जाऊदे मला. Don’t touch me, Don’t touch me”

रोहनने आता दोन्ही हातांनी तिचे दोन्ही दंड पकडले आणि जबरदस्ती तिला बाकावर बसवले. तिच्या पायाशी बसून, हात जोडून तो तिला विनवणी करू लागला, “निशा, माझ्यावर विश्वास नाहीये का तुझा? या आपल्या प्रवासात मी एकदातरी तुला त्रास होईल असं काही वागलोय का? उलट तुझा जीव वाचवायचा प्रयत्न केला मी.  तुझी इथपर्यंत साथ केली. का? कारण मला तुझी काळजी वाटत होती.  मग मी तुझं नुकसान कसं करेन?  तू बस इथे शांतपणे.  आपण बोलू. तुझ्या मनातला संशय गेला कि मग जा तू. एकदाच, शेवटचं ऐक ना माझं…. please निशा.”

“रोहन आता तूच मला सांग, तू जर जीवंत नाहीयेस तर तू माझ्याशी बोलत कसा होतास? तू मला गाडीसमोरून खेचून बाजूला नेलस, आपण खाली पडलो तेव्हा तुला लागलं कसं? तुझं वागणं, बोलणं, चालणं, हसणं, माझी काळजी घेणं, भुताची गोष्ट सांगताना घाबरणं हे सगळं काय होतं? नाटक होतं कि मलाच भ्रम झाला होता????  काय समजायचं मी???”

“आता मी तुझ्या हाताला चावले तर तुला त्याच्या वेदना कशा झाल्या?  हे सगळं माझ्या बुद्धीच्या आणि कल्पनाशक्तीच्या पलीकडचं आहे.  जर हेच सगळं उलटं तुझ्या बाबतीत झालं असतं तर, तू ठेवला असतास विश्वास माझ्यावर?  तुला आली असती माझी दया??”

“तू जर खरंच आत्मा असशील तर, आतासुद्धा तू माझ्याशी बोलतो आहेस.  मला तुझा स्पर्श कळतोय. मला थांबवण्याची ताकद तुझ्या हातात आहे.  हे कसं घडतंय?? काय आहे हे सगळं?? मी जर जिवंत मुलगी आहे तर तू माझ्याशी कसा बोलू शकतोस????  मला खरंच काही समजेनासं झालय.” असं म्हणून निशा रडायला लागली.

“अगं निशा मलाही हे सगळे प्रश्न पडलेत. मलाही या प्रश्नांची उत्तरं हवीत.  पण हि घटना इतकी अनपेक्षित आणि धक्कादायक पद्धतीनं आपल्या समोर आलीय कि मलाही मी काय करू ते सुचत नाहीये.   आता जे घडलंय ते तर आपण बदलू शकत नाही.  पण मला विचार करायला थोडा तरी वेळ दे.  मी तर माझं मरण माझ्या डोळ्यांनी पाहिलंय.  हि काय माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे का?  जरा माझ्या बाजूनी पण विचार कर.  आत्ता, काही मिनिटांपूर्वी, आपण इथून बाहेर पडायच्या आधी मी तुला माझ्या मनातल्या भावना व्यक्त करणार होतो.  माझं तुझ्यावर प्रेम बसलंय हे मी तुला सांगणार होतो, हे तुला कसं सांगायचं या विचारात मी मागे रेंगाळत होतो, जेणेकरून आपल्याला थोडा वेळ मिळावा. आणि माझ्यासमोर हे काय आलं?  कसा सावरू मी स्वतःला या धक्क्यातून??? आणि तू माझ्यावर विश्वासघाताचे आरोप करतेस??” एवढं बोलून रोहनही रडू लागला.

“निशा, विश्वासघात तर नियतीने केलाय आपला.  जर मी मरण पावलो होतो तर का तिनं मला तुझ्यापर्यंत पोहोचवलं?? का आपण एकमेकांना भेटलो???  का तुझी गाडी नेमकी आजच बंद पडली????  का तुला इतक्या अंधाऱ्या भयाण रात्री या रस्त्याने चालत यावं असं वाटलं ??? का मलाही तुझ्या दिशेनेच चालत यावं असं वाटलं???  मी जर इथेच मेलो होतो तर मला तेव्हाच का नाही माझी डेड बॉडी दिसली???? जर तेव्हाच मला मी मेलोय हे कळालं असतं तर हे सगळं रामायण घडलंच नसतं नाही का? मग यात माझी काय चूक आहे तूच सांग??“

“निशा, मला एवढ्या लवकर मारायचं नव्हतं गं!!!! हे काय होऊन बसलं???? आणि आपल्या सोबतच का???”

रोहन मनापासून कळवळून हे बोलत होता आणि ते ऐकून निशालापण रडू येत होतं.  हे सगळं झालं त्यात खरंच त्या दोघांचीही काही चूक नव्हतीच.   पण त्यांच्या हातात आता काय होतं?  त्यांचं प्रेम फुलायचा आधीच मिटलं गेलं होतं.  नियतीच्या मनात नेमकं होतं तरी काय?

रोहनच्या या कळकळीच्या बोलण्याने निशाला पण मनापासून वाईट वाटले.  तिनं रोहनचे हात हातात घेऊन त्यालाही तिच्या शेजारी बाकड्यावर बसवून घेतलं.  त्याला ती निश्चयी स्वरांत म्हणाली, “Don’t worry भिडू.  जर खरोखरच आपलं एकमेकांवर प्रेम असेल, तर हि नियती, आपलं अजून काही वाईट करू शकत नाही.  ok, आपण काही मिनिटांसाठी हे accept करूया कि तुझा मृत्यू झाला असला, तरी तू सामान्य, जिवंत माणसासारखा सगळं काही करू शकतोस.  आता प्रश्न फक्त माझ्या अस्तित्वाचा आहे. Right?  मग मी हि निर्णय घेतलाय. मी आता तुला एकट्याला इथे टाकून माझ्या घरी परत जाणार नाही. मी इथेच, कायम तुझ्या सोबत थांबेन.  नाहीतर मी असं करते, आता इथं जी कुठली गाडी येईल, त्या गाडीसमोर जाऊन मी ही जीव देते. मग आपण दोघे कायम एकत्र राहू.…”

निशाने असे म्हणताच रोहनने निशाच्या तोंडावर हात ठेवला, “निशा, please असं अभद्र काहीतरी बोलू नकोस” त्याने स्वतःचे डोळे पुसले आणि म्हणाला,
“खरं सांगू निशा?  तू असं म्हणालीस हेच माझ्यासाठी खूप आहे.  पण तू वेडी आहेस का? माझ्या सारख्या आत्म्या बरोबर थांबून तू काय करणार आहेस? आणि तिकडे तुझं आक्ख कुटुंब तुझी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत असेल, त्यांचं काय?? मघाशीच तर म्हणत होतीस ना कि कधी एकदा घरी मी सुखरूप आहे हे कळवते असं झालंय म्हणून. मग आता हे काय खूळ तुझ्या डोक्यात आलं? मी इतकाही स्वार्थी नाहीये गं, कि माझ्यासाठी मी तुला असा काही निर्णय घेऊ देईन.”

“मघाशी मी माझा निष्प्राण देह पहिला ना तेव्हा मला माझ्या मृत्यूचं दुःख झालंच, त्याचा धक्काही बसला. पण मला मनापासून रडू आलं ते माझ्या आई बाबांच्या आठवणीनं.  त्यांना जेंव्हा कळेल कि त्यांचा एकुलता एक लाडका मुलगा, अशा एकाकी जंगलात, अपघात होऊन, इतक्या वाईट पद्धतीनं मेलाय, तेव्हा ते कसं सहन करतील हे सगळं???  असं दुःख किमान तुझ्या आई वडिलांना तरी सहन करावं लागू नये असं मला मनापासून वाटतं.” असं म्हणून रोहन परत रडू लागला.

निशानं पटकन रोहनला आपल्या हृदयाशी कवटाळले.   ती त्याला थोपटून शांत करू लागली.

“रोहन, माझं एक ऐकशील? तू चल माझ्याबरोबर माझ्या घरी. मी आपल्यासोबत जे काही घडलंय ते सगळं खरं खरं माझ्या आईबाबांना सांगेन.  जसा तू मला आत्ता दिसतो आहेस, माझ्याशी बोलतो आहेस, तसा जर तू त्यांनाही दिसलास, तर प्रश्नच नाही. त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि विश्वासही आहे. कदाचित ते हे सगळं समजून घेतील.  जर तू त्यांना दिसलाच नाहीस तर आपण दुसरा विचार करू. पण इथं बसून वेळ घालवण्या पेक्षा आपण आधी इथून बाहेर पडू.  तू चल माझ्यासोबत” असं म्हणून निशाने रोहनचे आणि स्वतःचे डोळे पुसले.

“जे झालं ते झालं. आता रडत बसण्यात काहीच अर्थ नाही. आपण दोघे मिळून यातून मार्ग काढुया, चल..”

तिथून जाण्यासाठी ते दोघेही उठले, तेवढ्यात जोरजोरात सायरनचा आवाज करत एक ambulance आणि एक पोलिस गाडी तिथं येऊन थांबली.

(क्रमशः)

© संध्या प्रकाश बापट

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 50 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..