नवीन लेखन...

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग १२

भाग बारा

“जे झालं ते झालं. आता रडत बसण्यात काहीच अर्थ नाही. आपण दोघे मिळून यातून मार्ग काढुया, चल..”

तिथून जाण्यासाठी ते दोघेही उठतच होते तेवढ्यात जोरजोरात सायरनचा आवाज करत एक ऍम्ब्युलन्स आणि एक पोलिस गाडी तिथं येऊन थांबली.

दोन्ही गाड्या थांबलेल्या पाहून निशा आणि रोहन बाकावरून उठून तिकडे जावू लागले.  ऍम्ब्युलन्स मधून दोन माणसं उतरली. त्यांनी ऍम्ब्युलन्सचे मागचे दार उघडून त्यातून एक स्ट्रेचर बाहेर ओढून काढला आणि ते रस्त्याच्या कडेला झाडीत शोधू लागले. तोपर्यंत एक डॉक्टरही  खाली  उतरले.  त्या दोन लोकांच्या मागोमाग तेहि झाडीत खाली उतरू लागले.

पोलिसांच्या व्हॅन मधून एक इन्स्पेक्टर आणि दोन शिपाई उतरले. मागच्या बाजूला एक फोटोग्राफर आणि अजून दोन माणसं होती, तेहि खाली उतरले.

ह्या सगळ्यांना पाहून निशाला खूप आनंद झाला.”रोहन अरे ते बघ, तुला आता या लोकांची मदत होणार आहे.  ते तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातील.  तू पटकन तुझ्या शरीरात प्रवेश कर. ते निश्चितच तुझ्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करतील.  असाही तू  इथं आहेसच, जर तू तुझ्या शरीरात परत प्रवेश केलास, तर तुला तुझं आयुष्य परत मिळेल.  जा पटकन. अजूनही वेळ गेलेलं नाहीये.”

रोहन नुसता निशाकडे पाहत उभा राहिला.

इन्स्पेक्टर साहेबांनी आधी रोहनच्या गाडीचे फोटो काढायला सांगितले. गाडी ज्या बाकड्याला धडकली होती तिथेही बराच भाग डॅमेज झालेला दिसत होता. त्यांनी एका शिपायाला अपघाताच्या जागेवर खुणा करायला सांगितल्या. ते रोहन जिथे पडला होता त्या बाजूला जाऊ लागले.  त्यांची नजर तिथे पडलेल्या मोठया दगडाकडे गेली.  शेजारीच रोहनचे फुटलेले हेल्मेट पडले होते.   इन्स्पेक्टर म्हणाले, “गाडीचे ज्या पद्धतीने नुकसान झालेले दिसतेय, त्यानुसार गाडी खूप वेगात जात असणार आहे.  ती इतक्या जोरात त्या बाकड्यावर आदळली असेल कि, त्या धक्क्याने हा मुलगा लांब फेकला गेला असणार.  त्यानं डोक्यावर हेल्मेट घातलं होतं,  तरीही स्पीडमध्ये असल्यामुळे तो गाडीवरून फेकल्या गेला असावा आणि जोरात या दगडावर आदळला असावा, त्यामुळे  त्याचे हेल्मेटही फुटले असावे आणि त्याच्या डोक्याला जबरदस्त मार बसला असावा.  अति रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असावा.  डॉक्टर तुम्हाला काय वाटतंय?”

डॉक्टर म्हणाले, “तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे.  माझ्याही मते अति रक्तस्राव झाल्यामुळेच त्याचा जागीच मृत्यू झाला. याला जावून तीन ते चार तास झाले असावेत.  अपघात झाला त्यावेळी जर त्याला लगेच मदत मिळाली असती तर कदाचित तो वाचला असता.  पण या रस्त्याला सहसा कुणी थांबत नाही  आणि हा आतल्या बाजूला पडला असल्यामुळे, रात्रीचा अंधार असल्यामुळे हे पटकन कुणाच्या लक्षात आलं नसावं. Very  Sad, अशी तरुण मुलं अपघातात गेलेली पाहिलं कि फार वाईट वाटतं.”

“हो ना डॉक्टर, आम्हालाही अशा मुलांच्या नातेवाईकांना हि बातमी सांगावी लागते तेव्हा फार दुःख होतं.  तसं या भागात वारंवार अपघात होणं आणि मृताच्या नातेवाईकांना बोलवावं लागणं हे आमच्यासाठी नित्याचंच काम झालंय, तरीही या मुलांच्या आई वडिलांचा आक्रोश पाहणं आम्हाला खरंच सहन होत नाही.”

“या वळणांवर अपघात होवू नये म्हणून काहीतरी ठोस उपाय करायलाच हवेत.  नाहीतर असे अजून किती बळी  जणारेत कोण जाणे?”

तोपर्यंत ऍम्ब्युलन्स मधील लोक रोहनची डेड बॉडी स्ट्रेचरवर ठेवून वर घेऊन येऊ लागले.

निशाकडे बघत उभ्या असलेल्या रोहनला तिनं परत गदागदा  हलवलं.  “रोहन, ऐक ना रे माझं!!, जा तू परत तुझ्या शरीरात. यापूर्वी अशी अनेकवेळा मिरॅकल्स झाली आहेत.  एखाद्याला डॉक्टरांनी मृत घोषीत केल्यावर काही वेळाने तो परत जिवंत झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.  रोहन माझं  तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तू परत हवा आहेस.  please तू तुझ्या शरीरात परत प्रवेश कर.”

“निशा, ते शक्य नाहीये. माझ्या शरीरातून मी बाहेर कसा आलो ते मला माहित नाही.  त्यामुळे परत आत कसा जावू  हेही मला माहित नाही.”

“अरे पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?  एकदा का ते तुझी बॉडी गाडीतून घेऊन गेले तर आपण कसं जाणार त्यांच्या बरोबर? थांब, मीच त्यांना सांगते कि तू इथं माझ्या बरोबर आहेस.”

“अगं वेडी आहेस का तू निशा?  मी तुला दिसतोय म्हणजे त्यांनाही दिसेनच असं नाही ना?  ते उगाच तुला वेड्यात काढतील.”

निशा एकदम धावत डॉकटरांच्याजवळ गेली आणि घाईघाईने त्यांना सांगू लागली.

“डॉक्टर, हा मुलगा, रोहन, याला मी ओळखते.  तो आत्ता माझ्या बरोबर आहे.  तो जरी मेलाय असं तुम्हाला वाटत असलं तरी त्याचा आत्मा इतका वेळ माझ्या बरोबर आहे.  तुम्ही please काहीतरी करून त्याला जिवंत करायचा प्रयत्न करा. मी पाहिजे तर त्याला माझ्यासोबत घेऊन तुमच्या बरोबर हॉस्पिटलमध्ये येते.  आपण त्याच्यावर उपचार करू.  तो परत त्याच्या शरीरात प्रवेश करेल आणि जिवंत होऊ शकेल असं काहीतरी तुम्ही करा.  डॉक्टर please माझ्यावर विश्वास ठेवा.  रोहन माझ्या सोबत आहे.  गेले  तीन चार तास आम्ही एकमेकांच्या सोबत आहोत. काहीतरी करा ना डॉक्टर, माझ्या रोहनला वाचावा.”

असं म्हणत निशा रडू लागली.  पण डॉक्टर किंवा स्ट्रेचर उचलणारे यांनीं तिच्याकडे साधे वळूनही पहिले नाही.

“डॉक्टर, तुम्ही मला वेडी समजताय का?  थांबा हा घ्या पुरावा.”

असं म्हणून निशा परत रोहनजवळ आली. तिनं त्याचा हात पकडला आणि ओढत त्याला डॉक्टरांच्या समोर घेवून गेली.

“डॉक्टर बघा, हा रोहन, हा तोच मुलगा आहे ज्याची बॉडी घेवून तुम्ही चालला आहात.  तो जिवंत आहे.  हा त्याचा आत्मा आहे. तो बोलू शकतो.  तुम्ही पहा त्याच्याकडे…. त्यानंही तेच कपडे घातले आहेत जे या बॉडीवर आहेत.  आता पटली का तुमची खात्री??  तुम्ही पाहिजे तर बोला त्याच्या सोबत.  तो दिसतो, तो सगळ्यांशी बोलू शकतो. मी गेले चार तास त्याच्याबरोबर बोलत या रस्त्याने चालत आलेय.  तुम्हाला काय विचारायचं असेल ते विचारा त्याला.  डॉक्टर तुम्ही please आम्हाला दोघांना तुमच्या सोबत हॉस्पिटल मध्ये घेऊन चला.  मला खात्री आहे, तुम्ही माझ्या रोहनला परत जिवंत करू शकाल.  आम्ही दोघंही बसतो गाडीत.”

तरीही  डॉक्टरांनी काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.  आता मात्र निशाला डॉक्टरांचा राग आला.  ती जोरात त्यांच्यावर ओरडली.  “कसले दुष्ट डॉक्टर आहात तुम्ही??….. मी एवढी जीव तोडून तुम्हाला विनवण्या करतेय…. तर मला मदत करायची सोडून तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करताय…….हे तुमच्या व्यवसायाला शोभत नाही……माणुसकी म्हणून आम्हाला मदत करणं  तुमचं कर्तव्य आहे……….मला काहीतरी उत्तर द्या डॉक्टर….. मी तुमच्या पाया पडते, हात जोडते … पण माझ्या रोहनला वाचावा डॉक्टर…. माझ्या रोहनला वाचावा…. please”

असं म्हणून निशा ओक्सबोक्शी रडू लागली.  डॉक्टरनी तिच्याकडे दुर्लक्ष करत रोहनची बॉडी ऍम्ब्युलन्समध्ये ठेवण्यास सांगितली आणि ते पुढच्या दाराने ऍम्ब्युलन्समध्ये बसण्यासाठी गेले.

त्या लोकांनी रोहनची बॉडी ठेवण्यासाठी ऍम्ब्युलन्सची दोनही दारं परत उघडली.

निशा रोहनला म्हणाली, “रोहन, हे लोकं असं सहजासहजी माझं ऐकतील, असं मला वाटत नाही.  चल, आपण जबरदस्ती त्यांच्या गाडीतून हॉस्पिटल मध्ये जाऊया.” असं म्हणून निशाने रोहनचा हात पकडला आणि ती जोरात ऍम्ब्युलन्सच्या दाराजवळ गेली. आत बसायला जागा कुठे आहे हे पाहण्यासाठी तिनं आत नजर टाकली आणि तिनं जोरात किंकाळी फोडली…..

(क्रमशः)

©✍️संध्या प्रकाश बापट

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 50 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..