नवीन लेखन...

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग १३

भाग तेरा

निशा रोहनला म्हणाली, “रोहन, हे लोकं असं सहजासहजी माझं ऐकतील, असं मला वाटत नाही.  चल, आपण जबरदस्ती त्यांच्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये जाऊया.” असं म्हणून निशाने रोहनचा हात पकडला आणि ती जोरात ऍम्ब्युलन्सच्या दाराजवळ गेली. आत बसायला जागा कुठे आहे हे पाहण्यासाठी तिनं आत नजर टाकली आणि तिनं जोरात किंकाळी फोडली…..  आणि ती दचकून मागं सरकली….. मागं उभ्या असलेल्या रोहनच्या अंगावर ती पडता पडता रोहननं तिला सावरलं…….तो झटक्यात पुढं झाला आणि त्याचं आत लक्ष गेलं……. क्षणभर त्याचाही त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसेना……..

आतमध्ये….  आतमध्ये दुसर्‍या सीटवरच्या स्ट्रेचरवर निशाचं कलेवर ठेवलेलं होतं….

निशाचा प्राणप्रिय लेमन कलरच स्टोल…. तिच्या गळ्याभोवती घट्ट गुंडाळला गेला होता…… तिचा चेहेरा काळानिळा पडला होता…. संपूर्ण शरीरावर खरचटल्याच्या अनंत खुणा होत्या….. निशाचे दोन्ही हात… गळ्याभोवती अडकलेली स्टोल सोडवायच्या स्थितीत, तसेच फ्रिज झाले होते. जागोजागी खरचटलेल्या ठिकाणांवर वाहिलेलं रक्त जमा झालं होतं.  तिच्या अंगावरचा ड्रेस अनेक ठिकाणी फाटला होता…. त्याला ते दृष्य पहावेना…. त्यानं झटकन् आपली मान वळवली आणि त्याचं निशाकडे लक्ष गेलं….. निशा अजूनही दिगमूढ अवस्थेत तशीच उभी होती…. त्यानं निशाला हाताला धरून परत बाकावर बसवलं…. तो इन्स्पेक्टर साहेबांकडं जावू लागला…. त्याला त्यांना विचारायचं होतं हे कसं झालं म्हणून……

तेवढ्यात रोहनचं लक्ष पोलिसांच्या गाडीला टेकून उभ्या असलेल्या गाडीच्या ड्रायव्हर आणि एका पोलीस शिपायाच्या बोलण्याकडे गेलं.  ते निशाच्या मृत्यूबद्दल बोलत होते.

ड्रायव्हर म्हणला,”इतक्या कोवळ्या वयातली ही पोरं, किती बेजबाबदारीनं वागतात बघीतलं.  त्यांचे आईबाप त्यांना गाड्या चालवायला देतात तोच एक मूर्खपणा आहे…… आणि गाडी मिळाली तर आपल्या जिवला जपून गाडी चालवावी याची जाणीव या पोरांना अजिब्बात नसते.  बाहेर कुठं गेलं की तासंतास चकाट्या पिटत बसतात.  वेळेचं भान तर त्यांना कधी नसतंच…. आणि मग घरच्यांनी लवकर घरी या म्हणून फोन केले की मग सुसाट गाडी हाकत आलोच पाच मिनीटांत म्हणत घराकडं सुटायचं…. मग दुसरं काय होणार????   पण आपण जे करतो त्याचे किती वाईट परिणाम होणार आहेत…. आपल्या जीवाला धोका होईल…. याची जाणीवच नसते या पोरांना…. दरवेळी यांचा स्वतःचाच जीव जाईल असं नाही पण यांनी दुसर्‍याला ठोकरलं, किंवा यांना वाचवायच्या नादात दुसर्‍या कुणाचा तोल गेला तर दुसर्‍या लोकांचेपण जीव जावू शकतात ना? याचा विचार कुणी करायचा?”

शिपाई म्हणाला, “नायतर काय….. आईबाप कष्ट करून हजारो रूपये खर्च करून पोरांना महागाचं शिक्षण देत्यात…. त्यांचे सगळे शौक पुरे करत्यात… पण जबाबदारीनं वागायची शिकवण द्यायला विसरतात…. तरूणपणी आपण असं मेलो तर आपल्या माघारी आपल्या आईबापाचं काय होईल याची जरासुद्धा जाणीव या पोरांना नसते…..  इतके दिवस मी फक्त पोरंच अ‍ॅक्सीटेंटमध्ये मरताना पहात होतो…. पण आता पोरीपण काय कमी राह्यला नाहीत….. त्या पण भुंगाट गाड्या हाणत असतात…. ह्या तरूण पिढीला भिती म्हणून काय राहिलीच नाय…. इतक्या रातीचं एकट्या पोरीनं या असल्या भयानक जंगलातून सुसाट गाडी मारत यायची काय गरज होती का? …… तु बघितलंस ना पोरीची काय अवस्था झाली होती ते….. अंगात शर्ट पॅन्ट घातली पण गळ्यात दोन मिटरची ओढणी का स्टोल काय म्हणतात ते अडकवलं होती तिनंं…. डोक्याला रितसर हेल्मेट घातलं सुरक्षेसाठी आणि ही येवढी मोठ्ठी ओढणी गळ्यात मोकळी टांगलेली….. ही भुंगाट गाडी चालवत होती…. वार्‍याच्या आणि गाडीच्या वेगानं ओढणी आडकली मागच्या चाकात….दोन तीन फर्लांगभर अंतर तरी पोरगी गाडीबरोबर फरपटत गेली रस्त्यावरून आन् ओढणीचा फास गळ्याला बसून जाग्यावर खलास झाली बग.  सगळ्या आंगभर जखमा झाल्यात.  एका चारचाकीवाल्यानं हा अपघात पाहून फोन करून सांगितलं मगाशी म्हणून तातडीनं अ‍ॅम्ब्युलन्सला फोन केला आणि आलो इकडं….. पण पोरीचा जीव गेला होता…. चार पाच तास तरी झालं असतील बघ…. आता कुठल्या तोंडानं यांच्या आईबापांना बोलवायचं पोरांची प्रेतं बघायला, हा प्रश्न पडलाय आम्हाला…. तसं हल्ली हे सारखंच व्हाया लागलंय…  दर महिन्याला इथं अपघात आहेतच.  रोज पोरं पेपरातनं बातम्या वाचतात आणि सोडून देतात….. उद्या हीच वेळ आपल्यावर पण येईल असं वाटतंच नाही त्यांना….पण इथं धोका हे माहित असूनबी पोरं गाडी चालवताना काळजी म्हणून घेत न्हाईत, आन् यांचे आईबाप यांना गाड्यांवरून पाठवायचं थांबत नाहीत…. अजून किती जणांचं असं जीव जाणार आहेत कुणाला ठाव…..”

हे ऐकून रोहनच्या अंगावर काटा आला.  बापरे इतक्या वाईट पद्धतीनं जीव गेलाय माझ्या निशाचा….. तो परत निशाकडं वळला….. निशा बाकावर विमनस्क अवस्थेत बसली होती….तिची नजर रोहनवर होती… पण त्या नजरेत कोणतेच भाव त्याला दिसत नव्हते…. तो हलकेच निशाच्या शेजारी जाऊन बसला… तिचा हात हातात घेवून तो म्हणाला….. “निशा…. आपण दोघंही अ‍ॅम्ब्युलन्स बरोबर जाऊया हॉस्पीटलमध्ये….. कुणास ठाऊक खरंच काही मिरॅकल झालं आणि आपल्याला आपल्या शरीरात परत प्रवेश करता आला तर….. आपलं आयुष्य आपल्याला परत मिळेल… चल मी तयार आहे त्यासाठी…..प्रयत्न करायला काय हरकत आहे?….”

रोहनचे हे शब्द ऐकून निशा एकदम त्याच्या कुशीत शिरली आणि हमसाहमशी रडू लागली….. रोहन हलकेच तिला थोपटत राहिला…. तो आता तिची काय समजूत घालणार होता……? त्याच्या हातात काय होतं?…… स्वतःचं प्रेत पाहिल्यावर त्याला जेवढ्या तिव्रतेनं दुःख झालं होतं त्याच्या शतपटीने अधिक त्याला निशाचं कलेवर पाहून दुःख आणि प्रचंड मानसिक यातना झाल्या होत्या.  आपलं मरण त्यानं स्विकारलं होतं….पण आपल्या प्रिय निशाचं मरण तो पचवू शकत नव्हता…..  किमान तिनं तरी जिवंत रहायला हवं होतं…. असं त्याला वाटू लागलं….. त्याचे डोळेही पाण्यानं भरून आले…… समोरचं सगळं धुसर दिसू लागलं….. आपण आता निशाशी काय आणि कसं बोलायचं ते त्याला सुचत नव्हतं……

इकडे अ‍ॅम्ब्युलन्सची दारं बंद करून ती माणसं पुढं जाऊन बसली.  इन्स्पेक्टर आणि इतर लोकं पोलीसांच्या गाडीत बसली आणि दोन्ही गाड्या सारयन वाजवत सुसाट हायवेच्या दिशेने जावू लागल्या……

रोहन पटकन् उठून त्या गाड्यांच्या दिशेने पळत निघाला….. तोपर्यंत त्या बर्‍याच दूर निघून गेल्या…. तो परत येवून निशाच्या शेजारी बसला आणि त्यानं परत निशाचा हात आपल्या हातात घेतला… तो तिला समजावणीच्या सुरात सांगू लागला…..

“निशा….. एकदा बघ माझ्याकडं…. मी आहे ना तुझ्या सोबत…..? मी तुला एकदा साथ दिली ती कधीही न सोडण्यासाठी….हे माहित आहे ना तुला….. हां….. फक्त अशा पद्धतीने आपण एकत्र येवू याची मात्र मी कधीच कल्पना केली नव्हती……पण आता काहीही झालं तरी आपण कायम एकत्र राहणार आहोत….. येतंय का तुझ्या लक्षात????”

निशा रडायची थांबली….”रोहन, खरंच की…. ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही…..मघाशी तू मेलायस असं समजून, मी तू परत जिवंत व्हावास म्हणून एवढा आटापिटा करत होते…… त्या अ‍ॅम्ब्युलन्स वाल्याला, इन्स्पेक्टरना एवढ्या विनवण्या करत होते….. पण त्यांना माझं बोलणं ऐकूच येत नव्हतं…..मी त्यांना दिसतच नव्हते….. माझ्या ते लक्षातच येत नव्हतं….. पण मी सुद्धा मेलेय ही गोष्ट पचवणं मला जरा अवघड जातंय…. खरं तर माझंही चुकलंच……मला उशीर झाला तर माझे आईवडील काळजी करतील या विचारानं मी गाडी जोरात चालवत होते…….. माझा स्टोल मी नेहमी चेहेर्‍याभोवती नीट बांधते… कधीच मोकळा सोडत नाही…. पण मी हेल्मेट घातलं होतं ना…. आणि उशीर झाल्याच्या नादात तो स्टोल गुंडाळून सॅकमध्ये ठेवायचं माझ्या लक्षातच आलं नाही…. नाहीतर… हा अनर्थ झाला नसता…. आता मला दुसरीच काळजी वाटायला लागलीय…रोहन…. ज्या आईवडीलांना माझी वाट बघून,  मला उशीर झाला तर काळजी वाटू नये, म्हणून मी इतक्या वेगात जाण्याच्या निर्णय घेतला… त्या माझ्या आईवडिलांना, एव्हाना मी मेलेय हे कळलं असेल….. आई, बाबा आणि शेखरवर दुःखाचा डोंगर कोसळला असेल….. ते सगळे यातून स्वतःला कसे सावरतील याची मला काळजी वाटतीय…..आई या सगळ्याचा स्वतःला दोष देत असेल….. मी निशाला लवकर ये म्हणून फोन केला नसता तर हे घडलं नसतं, असं तिला आयुष्यभर वाटत राहील….. पण हे जे घडलं ती आपली नियती होती रोहन…. कदाचित हे घडायचंच होतं….. म्हणून घडलं… नाही का?”

“हो निशा, खरं आहे तुझं…. हे घडणारच होतं….. मी ही रोज कामानिमित्त भरपूर किलोमिटर प्रवास करायचो, पण कधीच स्पीडचा लिमीट ओलांडला नाही….. हा रस्ता मला नवीन होता…. त्यातून अंधारामुळे मला वळणाचा अंदाज नाही आला…… अनोळखी रस्ता,,,,,, सगळीकडे सामसूम….. रस्त्याने वर्दळही नव्हती….. पुढं किती रस्ता शिल्लक आहे माहिती नव्हतं…. म्हणून मी जोरात जात होतो…… मी सुद्धा सुरक्षेसाठी हेल्मेट घातलंच होतं की…. पण वेगावर माझं नियंत्रण राहिलं नाही…… समोरून अचानक फोरव्हीलरचे लाईटस् माझ्या डोळ्यांवर पडले आणि मला पुढचं काहीच दिसलं नाही आणि मी गाडी बाजूला घ्यायला गेलो आणि या बाकड्यावर आदळून फेकला गेलो….जे व्हायचं ते शेवटी झालंच…. पण मला आता त्या फोरव्हीलरवाल्याचं आश्चर्य वाटतंय…. की आपल्यामुळे कुणाचातरी अपघात घालाय… हे लक्षात येवूनही तो न थांबता निघून गेला….. कदाचित…. त्यानं थांबून माझी मदत केली असती तर….. मी वाचलोही असतो…. कदाचित….. असो…. आता यावर बोलून जे घडलंय त्यात तर काहीच फरक पडणार नाहीये म्हणा….”

“रोहन, मग आता आपण काय करायचं…? ना आपण आपल्या भावना आपल्या आईवडिलांपर्यंत पोहोचवू शकतोय…. ना आता आपल्याला काही भविष्य उरलंय… काळाबरोबर आपण आता या वयातच अडकलोय…… आता काहीच बदल नाही…. काही टार्गेट नाही…. काही आशा नाही…. निराशा नाही…. कुणाचा राग नाही…. लोभ नाही…. असुया नाही…. भांडण नाही… नथिंग…..एकदम न्यूट्रल…. ही सगळी नाटकं आपण जिवंत असताना करतो नाही का?  आता काळानंच त्यावर पडदा टाकलाय म्हटल्यावर ही नाटकं करून दाखवायची कुणाला आणि ती बघणार तरी कोण?” निशा खूपच निराशेनं आणि खचलेच्या आवाजात बोलत होती.

“ए निशा,  अग तू वेडी का खुळी म्हणायची?   तुझ्या एक गोष्ट लक्षात येतेय का?  आपण मेलोय हे आत्ता कळालंय आपल्याला… पण तू तुझ्या गाडीपासून निघालीस तिथंपासून….तुला वाटलेली भीती…इथून बाहेर पडायची तुझी जिद्द…. त्यासाठी तुझं चालत राहणं…तुझं मला भेटणं…मग आपण दोघं बोलत इथेपर्यंत आलो….ते आत्तापर्यंत….आपल्याबाबतीत सर्व भावभावना आपण जगलो…. भीती, काळजी, राग, रुसवा, प्रेम, माया, बालपणीच्या आठवणी, तू घेतलेला फुलांच्या सुगंधाचा आनंद, आपण एकमेकांचा जीव वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न, लिफ्ट मिळावी म्हणून केलेला आटापिटा, हे सगळं बघायला कोण होतं?  पण हे सगळं घडलं….आणि ते खरं होतं… ते भास नव्हते…आपल्याला एकमेकांवर जडलेल्या प्रेमाची झालेली जाणीव….हे सगळं आपण गेले चार पाच तास जगलोय…. याचा अर्थ आपण जिवंत असताना जशा भावभावना आपल्याला होत्या त्या आपण मेल्यानंतरही आपल्यात जीवंत आहेत.  आपल्याला एकमेकांचं अस्तित्व जाणवतंय, स्पर्श जाणवतंय, आपण बोलतोय एकमेकांशी…. हे चांगलं नाहीये का?…. म्हणजे आपण जसं होतो तसंच यापुढंही वागू बोलू शकणार आहोत… फक्त आपल्याला कसली प्रोजेक्ट करायची नाहीत…. कसली टार्गेट्स नाहीत… आपल्याला जे हवं ते आपण करू शकतो..”

“खरंच रोहन….. मी हा विचारच केला नव्हता….. या अगदी शेवटच्या वळणावर आल्यावर मला वाटलं होतं की तुझी साथ मला जन्मभर मिळावी…. आपण कायम सोबत रहावं…. चला ही एक इच्छा तरी आपली पूर्ण झाली म्हणायची….” असं म्हणून दोघांनीही एकमेकांचे हात हातात घेतले आणि ते हसू लागले….

तेवढ्यात त्यांचे रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या बाकड्यांकडे लक्ष गेले…. त्या बाकड्यावर वेगवेगळ्या वयोगटातील अनेक स्त्री पुरूष त्यांच्याकडे पहात बोलत असलेले दिसले…. त्यांना खूप आश्चर्य वाटले…. इतका वेळ ते या रस्त्यावर होते तेव्हा त्यांना कोणही दिसले नव्हते …. मग अचानक हे इतके लोक कुठून आले….ते दोघं रस्ता क्रॉस करून त्या लोकांच्या दिशेनं चालू लागले… त्यात चार वर्षाच्या बाळापासून ते 75 वर्षाच्या आजोबांपर्यंतचे लोक दिसत होते.  त्यांच्याजवळ गेल्यावर रोहनने त्यांना विचारले, “तुम्ही लोकं कोण आहात, आणि इतक्या रात्री इथं काय करताय?” त्यातील एक जण म्हणाला, “आम्हीही तुमच्या सारखेच या वळणांवर मृत्यू पावलेली लोकं आहोत.  आम्हाला मुक्ती मिळाली नाही.  आम्ही मरताना ज्या वयात होतो त्या अवस्थेतच गेली अनेक वर्षे इथे रहात आहोत.”
“काय? म्हणजे तुम्ही पण आत्मे आहात? आमचा अपघात झाला तेव्हा तुम्ही इथं होतात?”

“हो, आम्ही सगळे इथं होतो, पण इतरांचे जीव जाताना बघण्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही.  आम्हालाही दुसर्‍या लोकांचे जीव जाताना पाहून वाईट वाटते, पण आम्ही बघत राहतो  आणि दरवेळी अजून एकाची आमच्यात भर पडते.”

“रोहन, मला वाटतंय हे फारच भयानक आणि चुकीचं आहे.  जर माझ्या अंगावर गाडी येत असताना पाहून तू मला ओढून दुसर्‍या बाजूला नेवू शकलास, किंवा इतरही बर्‍याच गोष्टी आपल्या बाबतीत झाल्या, त्याचप्रमाणे आपण खरोखरच्या जीवंत माणसांना वाचवण्यासाठी काय करू शकतो याचा आपण सगळे मिळून विचार करूया.  मला वाटतंय आपण प्रयत्न केले तर नवीन अपघात होवून अजून कोणी मरण्याची आपण वाट बघता कामा नये.”

“बरोबर आहे निशा तुझं.  मघासपर्यंत आपण दोघेच होतो.  आता हे एक कुटुंब आपल्याला मिळालंय.  पण आता या आपल्या कुटुंबात कोणीही नवीन सदस्य सामील होणार नाही यासाठी आपण निश्चितच काहीना काही प्रयत्न करूया. थोडे प्रयत्न केले तर होणारे अपघात रोखण्यासाठी आपण काय काय करू शकू यावर सगळे मिळून विचार करू आणि त्याची अंमलबजावणी करू”

“बघ रोहन,  आपल्या आयुष्याला काही टार्गेट नाही असं आपल्याला वाटत होतं ना? पण आता नाही… आपण सगळी मिळून जिवंत लोकांचे प्राण वाचवण्याचं टार्गेट ठेवून उपाय करूया. कोण म्हणतं सगळी भुतं वाईट असतात म्हणून?”

शेवटी काय?

यूँही कट जायेगा सफर साथ चलनेसे
के मंझील आयेगी नजर साथ चलनेसे ….

त्यांच्या आवाजात आवाज मिसळत सगळेच गावू लागले….

यूँही कट जायेगा सफर साथ चलनेसे
के मंझील आयेगी नजर साथ चलनेसे ….

आणि मग या वळणावर…..निशा आणि रोहनच्या आयुष्याला एक नवीन वळण लागलं….

(कथा समाप्त…. मात्र पुढील एक भाग नक्की वाचा !)

©✍️संध्या प्रकाश बापट

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 50 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

4 Comments on आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग १३

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..