भाग दोन
तिची गाडी गचके खात, थोडी वेडीवाकडी होत थांबली. त्या थंडीतसुद्धा निशाला चांगलाच घाम फुटला.
‘आधीच उल्हास नी त्यात फाल्गुन मास’ अशी अवस्था झाली. तिनं गाडी थोडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि मोबाईलच्या उजेडात ती गाडीला काय झालं ते पाहू लागली. गाडीचे टायर तर ठीक होते….. चाकात हवा बरोबर होती…. पंक्चरही नव्हतं…….पेट्रोलही भरपूर होतं गाडीत…. मग काय झालं? तिनं गाडी परत चालू करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी चालू होईना. थंडीमुळं गाडी बंद पडली की काय? गाडीला कीक मारून चालू करण्याचा प्रयत्न केला… तरीही गाडी चालू होईना. छे… आपण इतक्या वेगात गाडी चालवायलाच नको होती.
आता ती अशा ठिकाणी होती की उलट परत जाणंही अवघड होतं. रात्रीच्यावेळी गाडी तिथं टाकून जाण्याचं धैर्यही तिला होत नव्हतं. तिनं मोबाईलमध्ये पाहिलं, 8 वाजले होते आणि बॅटरी 20 टक्के शिल्लक होती.
बापरेऽऽऽऽ, आज दिवसभर प्रोजेक्टच्या नादान मोबाईल चार्जिंगला लावायलाच विसरलो आपण. आता ऐनवेळी कुणाला मदतीला बोलवायचं झालं तर काय करायचं? मघाशी चेतन चांगला सोडायला येतो म्हणाला तर, मला कुठून दुर्बुद्धी झाली नको म्हणायची देव जाणे…. तिकडं आई, बाबा, शेखर सगळेच माझी वाट बघत असतील…. शेखरला फोन केला असता तर तो लगेच दुसरी गाडी घेवून आपल्याला न्यायला आला असता…. पण त्याच्या वाढदिवसासाठी घरात त्याची मित्रमंडळी जमली असताना आपण त्यालाच इकडं बोलवणं बरोबर नाही…… काय करू?… काय करू???
नीशाने डोक्याचे हेल्मेट काढून गाडीला लावलं. गाडीपासून थोडी पुढं येवून ती कुणा येणार्या जाणार्याची मदत मिळते का हे पाहू लागली. तीन चार गाड्या पास झाल्या, तिनं हात केला, पण कोणीच थांबलं नाही. तिनं चेतनला कॉल करून बघितलं पण त्याचा नंबर लागत नव्हता. बॅटरी लो होत चाललेली. तिनं गाडी रस्त्याच्या थोड्या आतल्या बाजूला ओढून लावली.
5-10 मिनीटं वाट बघून निशाने सरळ घराच्या दिशेनं चालत जाण्याच्या निर्णय घेतला. एक जागी उभी राहून वेळ वाया घालवण्यापेक्षा चालायला सुरूवात करू….. गाडी तिथंच सोडणं तिला जरा धोकादायक वाटत होतं…. पण पर्यायही नव्हता…. घराकडे जाणारी एखादी गाडी मिळाली तर, लिफ्ट घेवून पुढे जाऊ… आपल्या गाडीचं काय ते उद्या बघू….. असा विचार करून, जीव मुठीत घेवून निशा चालू लागली….
आता तिच्या मोबाईलची बॅटरी 10 टक्केच शिल्लक राहिली होती. रेंजही गेली होती. त्यातल्या त्यात एक बरं होतं… आज पोर्णिमेचा दिवस होता. नुकताच चंद्रोदय झाला असल्यानं रस्त्यावर थोडा थोडा चांदण्याचा उजेड पडायला लागला होता. तिनं झपाझप चालायला सुरूवात केली.
पंधरा मिनिटं सलग चालल्यावर तिला मागून येणार्या एका गाडीचा उजेड दिसला. ती थांबली आणि दोन्ही हात हलवून गाडी थांबवण्याचा प्रयत्न करू लागली….. ती चारचाकी गाडी बरीच वेगात होती…. ती जवळ येत होती तरी निशाला वाटेत उभी राहिलेली पाहूनही त्या गाडीचा वेग अजिबातच कमी झाला नव्हता….. निशाच्या अगदी जवळून ती गाडी वेगात निघून गेली… जणू गाडी चालवणार्याने तिला पाहिलेच नव्हते…. ती थोडी आतल्या बाजूला उभी होती म्हणून…. नाहीतर कदाचित त्या गाडीने निशाला उडवलेच असते. या कल्पनेनेच एवढ्या थंडीतसुद्धा निशाला परत दरदरून घाम फुटला. तिला वाटलं… गाडी चालवणारा बहुतेक नशेत असावा, त्यामुळं त्याला मी वाटेत उभी असलेली दिसली नसावी….. बरं झालं त्यानं गाडी थांबवली नाही ते….. नाहीतर मलाही कुठंतरी दुसरीकडंच घेवून गेला असता.
आजकाल टीव्हीवर आणि वर्तमानपत्रात कसल्या कसल्या बातम्या वाचत असतो आपण, आणि पटकन म्हणतोही,”इतक्या रात्री काय गरज होती हिला अशा रस्त्यानं एकटं जायला? कुणाच्याही गाडीतून कशी काय लिफ्ट घेवून गेली?” बाहेर राहून बरं असतंय नाही काहीही बोलायला…. ज्याच्यावर प्रसंग येतो त्यालाच माहिती खरोखर काय परिस्थिती झालेली असते ते….. पण सगळेच लोक काही वाईट नसतात…. एखाद्या दुसर्याच्या बाबतीत असं घडत असेल….. पण जर कोणी थांबलंच मदतीला ….तर आपण आधी खात्री करून घेवूया….. ती माणसं बरी वाटतात की नाही, आणि मगच त्यांच्या गाडीतून जायचं की नाही ते ठरवू…… निशा स्वतःच्या मनाची समजूत घालत होती…. पण काय माणसं असतात एकेक….. साधं स्त्रीदाक्षिण्य म्हणूनसुद्धा थांबून विचारलं नाही… काही मदत हवी का…. जाऊदे…. होतं ते बर्याकरताच होतं बहुतेक…… तो माणूसच चांगला नसेल कदाचित….. हम्म्….
एक दीर्घ सुस्कारा टाकून ती पुन्हा झपाझप चालू लागली. निशा कॉलेज कॅम्पसमध्ये मैत्रिणींबरोबर भरपूर चालत असे, त्यामुळे आज भराभर चालण्याचा तिला अजिबातच त्रास होत नव्हता. अजून 15-20 मिनिटं चालल्यावर लागणारे दोन ओढ्यांवरचे पूल आणि तीन वळणं पार केली की, ती हायवेच्या जवळपास पोहोचणार होती. कारण हायवेच्या थोडं अलिकडे, दोन किलोमिटरवर, फॉरेस्टचं बुकिंग ऑफिस होतं. तिथून ते हायवेपर्यंत थोड्या थोड्या अंतरावर पथदिवेही होते. कदाचित बुकिंग ऑफिसवर कोणी ड्युटीवर असेल तर तिला मदत मिळाली असती. ही कल्पना मनात येताच तिला जरा हुशारी वाटू लागली. परत नव्या जोमानं ती चालायला लागली.
निशा 4-5 मिनिटं चालली असेल आणि तेवढ्यात तिला झाडीतून एकदम पालापाचोळ्यातून आवाज ऐकू येवू लागले. इतका वेळ चालत असताना विचारांच्या नादात खरंतर तिच्या मनाला एकटेपणाची भिती स्पर्शली नव्हती…. पण ते आवाज ऐकताच ती एका जागी स्थिर उभी राहिली आणि आवाजाचा कानोसा घेवू लागली…. आधी पाचोळ्यांवर थांबून थांबून सावधपणानं पावलं टाकल्याचे आवाज येवू लागले….. एका वेळी अनेक लोकं हळू हळू पुढं येत आहेत असं तिला वाटलं…. काही सेकंद आवाज थांबत होते आणि परत थबकत थबकत हळू हळू जंगलातून रस्त्याच्या दिशेने ते आवाज जवळ जवळ ऐकू यायला लागले. त्यात रस्त्याच्या दुतर्फा झाडीमध्ये रातकिडे किऽऽऽऽर्र किऽऽऽऽर्र असे कर्कश्य आवाज करत होते. वाराही बर्यापैकी जोरात वहात होता, त्यामुळे झाडांच्या फांद्यांतून वारा वाहताना त्याचाही सूंऽऽ सूंऽऽ असा आवाज येत होता. इतका वेळ हे आवाज आपल्या लक्षात कसे आले नाहीत?
आपण एकटं चालत येण्याचा निर्णय घेवून चूक तर केली नाही ना? रानात जर चोर किंवा डाकू लपून बसले असतील आणि त्यांनी आपल्याला एकटं पाहून आपल्यावर हल्ला केला तर?….. या कल्पनेने निशाचा मघासचा चालण्याचा उत्साह क्षणात मावळला आणि तिचं मन भितीनं गोठून गेलं…. आता आपण मागच्या बाजूला उलट दिशेने पळत सुटावं की समोरच्या बाजूला पळत जावं हेच तिला सूचेना…. मनात वेगानं वेगवेगळे विचार गर्दी करत होते ….एक मन म्हणत होतं तुला भास होताहेत….. काही नसेल अजुबाजूला….. दुसरं मन म्हणत होतं याक्षणी तू या जागेपासून जेवढ्या लांब जाता येईल तेवढ्या लांब पळून जा……पण पाय …. तिचे पाय मात्र जागच्याजागी गारठले होते. कुणीतरी अनेक मणांच्या बेड्या आपल्या पायात घातल्यात असं तिला वाटलं.
ते आवाज आता वजनदार आणि जास्त जोरात येवू लागले…. पालापाचोळ्यावरील त्या आवाजांचा वेग तिला जाणवू लागला…. सगळं बळ एकवटून, मनाचा हिय्या करून ती येणार्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी, येणार्या आवाजांचा कानोसा घेत सावधपणे त्या दिशेने पाहू लागली आणि …..
(क्रमशः)
©✍ संध्या प्रकाश बापट
Leave a Reply