भाग चार
आपल्याच नादात ती काही वेळ चालत राहिली आणि तिच्यापासून काही फर्लांगभर अंतरावर, ओढ्यावर जो पुल होता, त्या पुलाच्या टोकाशी काहीतरी हालचाल होत असल्याचं तिला जाणवलं….. परत निशाच्या मनात चऽऽऽऽर्र झालं. बापरे… आता हे काय नवीन संकट??…..
अचानक तिला हवेत गारवा वाढल्याचं लक्षात आलं. तिनं पट्कन गळ्याभोवती नुसताच गुंडाळलेला तिचा स्टोल सोडवला आणि डोक्यावरून आणि अंगाभोवती घट्ट लपेटून घेतला. तिनं चालण्याचा वेग कमी केला आणि सावधपणानं एक एक पाऊल टाकत ती सावकाश त्या पुलाच्या दिशेनं जावू लागली. पुलाच्या दोन्ही बाजूच्या टोकांवर दोन-दोन बाकडी बसवलेली होती. थोडं पुढं गेल्यावर तिच्या लक्षात आलं की पुलाच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या बाकड्यावर कुणीतरी मानवाकृती, पाय हलवत बसली आहे. अंधारामुळे त्याच्या हातात असलेल्या मोबाईलच्या स्क्रीनचा उजेड त्याच्या चेहेर्यावर पडला होता. लांबून पाहताना बाकी शरिरापेक्षा त्याच्या चेहर्यावर तेवढी नजर जात होती. त्यामुळे तो माणूस निळ्या चेहेर्याचा आहे की काय असेही क्षणभर निशाला वाटून गेले.
निशा मनातून खूप घाबरली. इतक्या रात्री….. सहलीला आल्यासारखा, एखादा माणूस बाकड्यावर बसलेला असू शकतो? तो माणूसच असेल की आणखी काही?…… आधीच आपण या जागेबद्दल नाही नाहीत्या स्टोर्या ऐकल्यात…. नेमक्या त्या खर्या निघायला नकोत…. नाहीतर आपलं काही खरं नाही…… त्याचवेळी तिच्या मनात असाही विचार आला की, कदाचित माझ्यासारखा तो ही संकटात असेल तर? झाली तर आपल्याला त्याची सोबतच होईल. कदाचित तो आपल्याला काहीतरी मदत करू शकेल. जे असेल ते असेल. शेवटी ‘उम्मीद पे दुनिया कायम है।’ या आशेवर तिने त्या माणसापर्यंत चालत जाण्याचा निर्णय घेतला.
त्याचवेळी थोडं अंतर पुढं गेल्यावर, तो माणूसही तिच्याकडे आश्चर्याने आणि भितीने पाहात असल्याचं तिच्या लक्षात आलं. तरीही थोडी सावधगिरी बाळगत निशा हळूहळू त्या माणसापाशी जाऊन पोहोचली. इतकावेळ बाकड्यावर बसून तिचे निरीक्षण करत असलेला तो माणूस निशाला पाहून पट्कन उठून उभा राहिला. त्यानं अचानक केलेली ती हलचाल पाहून निशा एकदम दचकली आणि दोन पावलं मागं सरकली.
तिला घाबरलेलं पाहून तो माणूस एकदम हसत म्हणला, “सॉरी मॅडम, मला तुम्हाला घाबरवायचं नव्हतं….. खरंतरं तुम्हाला या अवेळी इथं पाहून मीच मनातून जाम टरकलो होतो…… त्यात तुम्ही ही ओढणी गुंडाळून हळू हळू संशयास्पद पद्धतीने माझ्या दिशेने चालत येत होतात….. त्यामुळे मी जरा जास्तच घाबरलो…… पण तुमचे हावभाव आणि सावधपणाचं चालणं बघून मला खात्री झाली की, तुम्ही पण माझ्यासारख्याच घाबरलेल्या आहात…..सॉरी…… माझ्यामुळं तुम्ही घाबरला असाल तर…. पण मी तुम्हाला खात्री देतो की मी ही तुमच्यासारखाच एक मानव आहे….. बाय द वे, मी माझी ओळख करून देतो….. मी रोहन. तुम्हाला इथं पाहून मलाही धीर आलाय.” असं म्हणून त्याने आपला हात पुढे केला आणि तो परत हसू लागला.
त्या चांदण्याच्या प्रकाशात निशा रोहनचं निरीक्षण करत होती. छान उंचापुरा, वेल ड्रेस्ड, आकाशी रंगाचा शर्ट, इनशर्ट करून टाय लावलेला, ब्लॅक पॅन्ट, साधारण 25-26 वयाचा रोहन तिच्यासमोर उभा होता. प्रथमदर्शनी तरी तिला तो सभ्य मुलगा असावा असं वाटलं. त्यानं लावलेल्या परफ्युमचा मस्त सुगंध दरवळत होता. इतकावेळ एकटीनं जीव मुठीत धरून चालत आलेल्या निशानं रोहनचं बोलणं ऐकून, तो एक माणूस आहे याची खात्री झाल्यावर, सुटकेचा निश्वास सोडला. या जंगलातून बाहेर पडायला अजूनही अवकाश असला तरी निदान आपला एकटीचा जीवघेणा प्रवास तरी संपला असा विचार करून तिला हायसं वाटलं.
तिला थोडा धीर आल्यावर तिनं आपला हात पुढं केला आणि म्हणाली, “हाय रोहन, मी निशा. तुम्हाला इथं पाहून मीहि आधी घाबरलेच होते, पण आता मलाही खूप धीर आलाय. पण तुम्ही यावेळी इथं काय करताय?”
“मग मिस निशा, तुमचा काय अंदाज आहे? मी यावेळी इथं मस्तपैकी जेवण करून, शतपावली करण्याकरता आलो असेन असं वाटतंय का तुम्हाला?” तो मिश्कीलपणे हसत म्हणाला.
“नाही, नाही, तसं नाही. ही जागा प्रसिद्ध पर्यटन स्थळ असली तरी ती दिवसा….. रात्रीच्या वेळी…. चुकूनही कुणी इथे फिरायला वगैरे येत नाही……त्यामुळे इतक्या रात्रीचं तुम्ही एकटेच रस्त्यावर कसे आणि तेही चालत, असा मला प्रश्न पडलाय.”
“मी अॅक्च्युअली, या परिसरात नवीन आहे. मी एका मोठ्या औषधं बनविणार्या कंपनीचा मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह म्हणजे एमआर आहे.”
“अच्छा. म्हणजे कंपनीच्या कामानिमित्त इकडे आला होतात तर.”
“हो ना. हायवेच्या पलीकडे एक मोठ्ठं हॉस्पीटल आहे. तिथल्या डॉक्टरांची आज अपॉईटमेंट होती, दुपारी चार वाजताची. मी माझ्या गाडीवरून हायवेने तीन वाजताच तिथं पोहोचलो. पण हॉस्पिटलमध्ये एक अॅक्सिडेंटची सिरीअस केस आल्यामुळे डॉक्टर ऑपरेशनमध्ये अडकले आणि मला तीन तास जास्त वाट पहात थांबावं लागलं. त्यानंतर त्यांनी वेटिंगमध्ये थांबलेले पेशंट्स आधी तपासले आणि मग मला वेळ दिला. या डॉक्टरांची मोठ्या मुश्किलीने अपॉईंटमेंट मिळते, त्यामुळे कितीही वेळ लागला तरी त्यांना भेटल्याशिवाय मी परत जाऊच शकत नव्हतो.”
“मग या रस्त्याने कसे काय आलात?”
“शेवटी एकदाचे ते भेटले. बाहेर पडेपर्यंत साडेसहा वाजले. हायवेने निम्मा रस्ता गेलो आणि कळलं की पुढं अपघात झाला असल्यानं वाहतूक पूर्ण बंद झालीय. मग एकदोन लोकांना विचारलं की सिटीत जायला अजून कुठून मार्ग आहे का? त्यांनी मागे फिरून, या टेकडीमधल्या रस्त्यानं जा असं सांगितलं. मग परत निम्मा रस्ता उलटं येवून या रस्त्याला लागलो. तोपर्यंत पावणेआठ वाजले.”
“तुम्ही तुमची गाडी घेवून आला होतात ना? मग तुमची गाडी कुठंय?”
“विचारत विचारत या रस्त्याला लागलो. पाहतो तर या रस्त्याला ट्रॅफिक नव्हतं, आणि पूर्वी कधी मी इकडे आलो नसल्यामुळे रस्ता कसा आहे याचा मला काहीच अंदाज नव्हता. उशीर झाला म्हणून थोडा वेगात निघालो होतो, तेवढ्यात एका वळणावर समोरून एका फोरव्हिलरचे हेडलाईटस् अचानक माझ्या डोळ्यासमोर आले आणि मी गाडी बाजूला घ्यायला गेलो तर ती कशाला तरी धडकली आणि बंद पडली आणि मी खाली पडलो. ती मोठी गाडी निघून गेल्यावर मी पाहिलं तर रस्त्याच्या कडेला असलेल्या बाकड्यांना धडकून गाडीचे हेडलाईट फुटले होते. गाडी खाली पडून थोडी घासली गेली त्यामुळे साईड मिरर, इंडिकेटर्स फुटले, हॅन्डल थोडं वाकडं झालं होतं.”
“बापरेऽऽऽ, मग तुम्हाला कुठं लागलं तर नाही ना?”
“छे हो, मला नाही लागलं. बाकड्याच्या शेजारी बहुतेक दाट गवत आणि झुडपं होती बर्यापैकी, त्यामुळं मला फारसं लागलं नाही, किंचित खरचटलं, पण गाडीचं नुकसान झालं ना!…. मी गाडी परत रस्त्यावर आणून ती चालू करायचा प्रयत्न केला पण गाडी काही चालू होईना. अनोळखी रस्त्यात गाडी बंद पडल्यामुळं मला काही सुचेना. मोबाईलवरून जवळपास एखादं गॅरेज आहे का हुडकण्याचा प्रयत्न करत होतो, ते सापडलं असतं तर कुणालातरी इथंपर्यंत बोलावून घेतलं असतं. पण इथे रेंज नसल्यामुळं मोबाईलचा काहीच उपयोग झाला नाही.”
“मग मी रस्त्यात थांबून, येणार्या जाणार्या बर्याच गाड्यांना हात करून, मदत मिळविण्यासाठी गाड्या थांबवण्याचा प्रयत्न केला, पण एकही गाडी माझ्या मदतीसाठी थांबली नाही. या रस्त्याला लागताना एक जण म्हणाला होता की 15-20 मिनीटांचा रस्ता आहे. म्हटलं वाट बघत उभं राहून वेळ घालवण्यापेक्षा, जमेल तेवढं चालत जावून वाटेत कोणाची मदत मिळाली तर पहावं. कुणी लिफ्ट दिली असती तर किमान सिटीत जाऊन एखादा मॅकेनिक बरोबर घेवून आलो असतो किंवा एखादा टेम्पो किंवा ट्रक मिळाला असता तर त्यातून गाडीच घेवून गेलो असतो. पण गेला अर्धा तास मी चालतोय. ना हा रस्ता संपतोय, ना कुणाची लिफ्ट मिळतेय. चालून चालून कंटाळलो म्हणून जरा बाकावर बसलो होतो. मोबाईलला रेंज येतीय का ते पहात होतो, तेवढ्यात तुम्ही दिसलात.”
“पण तुम्ही एकट्या या रत्यानं कशा काय? तेही चालत?”
“सेम पिंच. माझंही तेच झालं. माझीही गाडी बंद पडलीय. कोणाची मदत मिळेना म्हणून मीही चालत येण्याचा निर्णय घेतला. पण मला असं वाटतंय की, तुम्ही मी ज्या बाजूने आले त्या दिशेने जाण्याच्या ऐवजी परत उलट्या दिशेने जायला पाहिजे होतं, कारण हे अंतर कमी आहे. तुम्हाला वाटेत फॉरेस्टची चौकी लागली का?”
“नाही. येताना वाटेत चौकी पाहिल्याचं काही माझ्या लक्षात आलं नाही.”
“वाटेत आपल्याला फॉरेस्टची चौकी लागेल. कदाचित तिथं आपल्याला मदत मिळू शकेल. मला असं वाटतंय की आपण याच बाजूने गेलो तर बरं होईल.”
“ठीक आहे. तसं तर तसं. आता तुम्ही सोबत आहात आणि या रस्त्याच्या माहितगारही आहात, तर चला आपण त्याच दिशेनं जाऊया.” असं म्हणून दोघांनीही परत हायवेच्या दिशेने चालायला सुरूवात केली.
निशाचं रोहनच्या हातातल्या मोबाईलवर लक्ष गेलं. निशाचा मोबाईल आता पूर्ण बंद पडला होता. तिनं थोडं संकोचानं त्याला विचारलं,
“मि. रोहन, तुमचा मोबाईल चालू आहे का? माझ्या मोबाईलची बॅटरी संपल्यामुळे तो बंद पडलाय. किती वाजलेत ते ही पहायचं होतं आणि घरी कॉल करून मी सुखरूप आहे हे पण कळवायला पाहिजे होतं.”
“मिस निशा माझा मोबाईल चालू आहे. म्हणजे त्याची बॅटरी फुल्ल आहे पण इथे रेंजच नाहीये. त्यामुळे बाहेर कॉल नाही करता येणार. माझ्या मोबाईलमध्ये साडे नऊ वाजलेत.”
“बाऽऽपरे, म्हणजे मला गाडीपासून इथंपर्यंत चालत यायला दीड तासापेक्षा जास्त वेळ लागला? आश्चर्य आहे! गाडीनं मी 15 ते 20 मिनीटांत हा रस्ता रोज पार करते. चालत जास्तीत जास्त पाऊण तास लागला असता. पण मी तर आत्ताशी निम्मा रस्ता पार केलाय. घरी सगळ्यांची काय हालत झाली असेल देव जाणे.”
“म्हणजे, तुम्ही इथं अडकला आहात हे तुमच्या घरी माहिती नाहीये का?”
“नाही नाऽऽऽ. आईचा फोन आला तेव्हा मी नुकतीच निघाले होते, तरी मी तिला”वाटेतच आहे” असं खोटं सांगितलं. पण त्यानंतर माझी गाडी बंद पडली आणि मोबाईलपण बंद पडला. आता कसं होणार?…… ठीक आहे…. आपण जमेल तेवढं लवकर इथून चौकीपर्यंत आणि मग हायवेला पोचायचा प्रयत्न करूया. चला….”
साडेनऊ वाजलेत म्हटल्यावर निशाला जास्तच टेंशन यायला लागलं. पण आता रोहनसारखा एक चांगला मुलगा तिच्या सोबत होता. आता चंद्र बर्यापैकी वर आला होता. त्यामुळे आजूबाजूला दाट झाडी असूनही रत्यावर सुंदर चांदणं पसरलं होतं. चंद्राच्या उजेडात चालण्याइतक्या रस्ता साफ दिसत होता. हवेतला गारठा वाढला होता. रातकिड्यांची किरकिर वाढली होती. हे खरंतर भितीदायकच होतं. पण आता मात्र अंधाराची, जंगलाची आणि एकटेपणाची भीती तिच्या मनातून एकदम हद्दपार झाली होती. रोहनच्या अस्तित्वानं तिला खूप धीर आला होता. एक सुरक्षितपणाची भावना निर्माण झाली होती. आता येणार्या कोणत्याही संकटाला तोंड द्यायची तिची तयारी झाली होती. काहीही करून लौकरात लवकर आपण चौकीपर्यंत पोहोचायलाच हवंय. कधी एकदा आपण तिथं पोहोचतो आणि आधी आपण सुखरूप आहोत हे घरी कळवतो असं तिला झालं होतं.
“मिस निशा, कसल्या तंद्रीत गेलात एकदम?” तिची तंद्री भंग करत रोहन म्हणला.
“मी विचार करत होते की, आपण थोडं भरभर चौकीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे मला घरी कळवता येईल मी सुखरूप असल्याचं. तिकडं सगळ्यांची काय अवस्था झाली असेल या विचारानं मला खूप काळजी वाटत होती.”
“डोन्ट वरी बेबी. सगळं ठीक होईल. आता मी आहे ना तुझ्या सोबत? चल आपण पटपट जाऊया चौकीपर्यंत. मीनव्हाईल जर माझ्या मोबाईलला रेंज आलीच तर आपण यावरून कॉल करू… ओके?”
दोघंही गप्पा मारत चौकीच्या दिशेनं चालू लागले….
(क्रमशः)
©✍ संध्या प्रकाश बापट
Leave a Reply