भाग सात
ती दोघं आता त्या चढाच्या वळणावर पोहोचली होती…. तेवढ्यात त्यांना परत एका चारचाकी गाडीचा उजेड दिसला….. आता मात्र दोघंही त्यांचे हात हलवत मोठमोठ्यांदा हेल्प, हेल्प म्हणत रस्त्याच्या थोडे पुढे आले….. गाडी वेगातच येत होती……. पण तिचा वेग जराही कमी झाला नाही…… त्यांच्या तोंडासमोरून गाडी जशी वेगात आली तशीच भुऽऽर्रकन निघूनही गेली…. मदतीची एक आशा मावळली होती….. दोघांनीही निराश होवून एकमेकांकडे पाहिलं……
आणि दुसऱ्याच क्षणी दोघांनाही एकाच वेळी हसू आलं…… इतका वेळ गाड्या थांबत नव्हत्या त्याचा त्यांना राग येत होता…. आणि आता ही गाडीही थांबली नाही त्याचा राग यायच्याऐवजी त्यांना हसू आलं…. कारण एकाच वेळी दोघांच्या मनात आलं…. आत्ता तर कुठे आपले सूर जुळायला लागलेत…. आणि तेवढ्यात रस्ता संपला तर????…. पुढं काय?????…… त्यापेक्षा हा रस्ताच संपू नये……
हे विचार मनात आल्याचे बहुतेक दोघांना एकमेकांच्या नजरेतूनच उमगले होते…… म्हणून त्यांना मनापासून हसू येत होतं….
“निशा….. तुला काय वाटतंय?? ….. हे गाडी चालवणारे लोक….. रात्रीच्या वेळी अशा सुनसान रस्त्यावर मदत मागणार्या …. आपल्या सारख्या सभ्य माणसांसाठी गाडी का थांबवत नसावेत……???”
“मलाची तोच प्रश्न पडलाय…… मघाशी मी एकटी होते ना…. तेव्हा तर एक गाडी स्लो होत माझ्यापर्यंत आलीही…. मला वाटलं तो गाडी थांबवतोय…. तेवढ्यात त्याच्या चेहेर्यावर मला भितीदायक भाव दिसले…. आणि दुसर्याच क्षणी तो गाडीचा वेग वाढवून माझ्यासमोरून पसार झाला…”
“लेट मी गेस…….” रोहन म्हणाला.
“पहिलं कारण….. म्हणजे इतक्या रात्री…. या रस्त्यावर चालत कुणी जात असेल ……यावर त्या गाडी चालवणार्यांचा विश्वास बसत नसेल…..”
“दुसरं कारण…. आपण एखाद्या खतरनाक लुटारू टोळीचे सभासद असू… आणि एखादी गाडी मदतीसाठी थांबली… की जंगलात दडून बसलेले आपले साथीदार येवून गाडीवाल्यांना लुटणार… असा त्यांचा अंदाज असावा….. मग रिस्क घेण्यापेक्षा पळून गेलेलं बरं……”
“आणि तिसरं कारण……” असं म्हणून रोहन थांबला…
“बोल, बोल…. बघू तरी तुमची कल्पनाशक्ती कुठंपर्यंत पोहोचते ते??”
“आणि तिसरं कारण…… म्हणजे या रस्त्यावर आपण दोघं ……. माणसं नसून भुतं असावी असं त्या लोकांना वाटत असेल….. आणि घाबरून ते पळून जात असतील… हँऽऽऽ हँऽऽऽ हँऽऽऽ”
असं म्हणून रोहन जोरजोरात हसायला लागला….
निशा शांतपणानं त्याचं बोलणं आणि हावभाव पहात होती……. मग घाबरल्याचं नाटक करत ती त्याला म्हणाली….
“अरे बाऽऽऽप रेऽऽऽऽ, हे असं आहे होय….. मी घाबरले बरंका रोहन….. म्हणजे पहिली दोन कारणं लॉजीकली बरोबर आहेत….. तिसरंही नाकारण्यासारखं नाहीये…… म्हणजे या रस्त्यावर भुतं असू शकतील…. ही कल्पना प्रत्येकाच्याच मनात येत असेल….. पण …..आपल्याला ते भुतं समजतील ही कल्पना मात्र एकदम भऽऽऽन्नाऽऽऽट. एकदम आवडली आपल्याला……” असं म्हणून आता निशापण जोरजोरात हसायला लागली….
निशाचं हसणं पाहून रोहन मात्र खरोखरचं घाबरला…..
“ए बाई…… अशी हसूं नकोस रात्रीच्या वेळी….. मी आपली माझी कल्पना मांडली….. तर मला नुसतं कल्पनेनंच भिती वाटायला लागलीय….. आणि तुला हसूं येतंय….. कमाल आहे तुझी….. म्हणजे इतका वेळ मी बाकी सगळ्या शक्यतांनी घाबरलो होतो….. पण भूऽऽऽऽताच्या अस्तित्वाची कल्पना माझ्या मनात आली नव्हती…. आता मात्र मला खरंच भिती वाटायला लागलीय…. निशा…. मला खरं सांग….इथं असलं काही नाहीये ना ?????”
“खरं तर या जागेबद्दल आणि या रस्त्याबद्दल लहानपणापासून मी भरपूर भुतांच्या स्टोर्या ऐकल्या आहेत…… पण आम्ही दिवसाच जायचो ना या रस्त्यानं…. स्वच्छ सूर्यप्रकाशात….. त्यामुळं एकदा सुद्धा ऐकलेल्या स्टोरीबद्दल भितीचा फील कधी आलाच नाही माझ्या मनात…. म्हणजे त्यासाठी वातावरण सुद्धा तसं असायला लागतं ना….. आता एकदम परफेक्ट वातावरण आहे…… तसंही आपल्याला अजून थोडं अंतर चालत जायचंच आहे…. तर जाता जाता एक दोन स्टोर्या सांगतेच तुला…..”
“निशा प्लीज…. मला आत्ता…. या वेळी आणि या ठिकाणी असलं काही सांगून घाबरवू नकोस….. मला सुद्धा लहानपणापासून अशा भुताखेतांच्या गोष्टी ऐकायची आणि वाचायची भारी आवड होती. पण केव्हा????? जेव्हा आपण आपल्या घराच्या चौकटीत, आपल्या माणसांबरोबर सुरक्षित असतो तेव्हा….”
“तुला सांगतो….. नागपूरला असताना लहानपणी आमच्या घरी…. उन्हाळ्याच्या सुट्टीत आमची आत्ये मामे भावडं सगळी एकत्र जमायची…. दिवसभर आम्ही हुंदडत असायचो….. खेळायचो…. पण दिवेलागण झाली की सगळी घरात…… तसा आमच्या आजीचा दंडकच होता…. तिन्हीसाजेंच्या वेळी ती कोणालाच बाहेर जाऊ द्यायची नाही…. मग आम्ही आंगणातल्या तुळशीपुढे दिवा लावून पर्वचा म्हणायचो… रामरक्षा… भीमरूपी….पाढे पाठांतर सगळं एकासुरात म्हणायचो…. खूप छान वाटायचं तेव्हा….. अजूनही नुसतं आठवलं तरी तुळशी वृंदावनातला तो दिव्याचा मंद उजेड आणि माझ्या आज्जीचा मायाळू चेहरा आठवला की…. खूप आनंदी व्हायला होतं मला…..”
“मग आम्ही सगळे जेवणं करून माजघरात अंथरूणं पसरून आजीच्या भोवती गोळा व्हायचो….. मग बाबा, काका, मामा, आत्या, आई, मामी सगळे गप्पा मारत बसायचो….. आम्हा सगळ्या बच्चेकंपनीला आजीनं सांगितलेल्या गोष्टी खूप आवडायच्या….. एक दोन रामदास स्वामी, शिवाजी महाराज यांच्या गोष्टी, एखादी पंचतंत्र मधील गोष्ट झाली….. की गाडी भुताच्या गोष्टींवर वळायची….. आजीकडं तर अशा गोष्टींचा खजिनाच होता….”
“आम्हाला गोष्ट ऐकायची उत्सुकता तर असायची…. आणि मनातून खूप भितीही वाटत असायची…. मग काय आपापल्या वडिलधार्यांपैंकी कुणाच्या तरी अंगाला चिकटून बसून नाहीतर आईच्या पदराआड लपून आम्ही त्या गोष्टी ऐकत असू……”
“पण अशा प्रत्येकी गोष्टीची सुरवात….. रात्रीची वेळ होती….. अमावस्येच्या रातीचा काळा कुट्ट अंधार होता….. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते….. रातकिडे किरकिरत होते….. अशी होत असे….”
चालता चालता आणि बोलता बोलता जुन्या आठवणी सांगण्यात रमून गेलेल्या रोहनचा चेहरा निशा अखंड निरखत होती…. रोहनचं तिच्याकडे लक्षच नव्हतं….. तो आपल्याच तंद्रीत ते सांगत होता… आणि बोलता बोलता थांबून तो एकदम म्हणाला…
“आत्ता अगदी तसेच वातावरण आहे नाही????”
त्या बरोबर निशा एकदम दचकली…….
“ए निशा, अगं दचकायला काय झालं तुला????”
“काही नाही….. तू गोष्ट सांगता सांगता अचानक प्रश्न विचारलास म्हणून दचकले मी…..सॉरी.. यू मे कंटीन्यू…..”
“अग पण मला आत्ता त्यातली एकही गोष्ट आठवत नाहीये….. त्यापेक्षा तुला इथल्या गोष्टी जास्त माहिती आहेत तर तूच सांग……”
“ए रोहन….. काय वेडबीड लागलंय की काय तुला??? आधीच इथं आपल्यावर काय वेळ आलीय आणि तुला गोष्टी ऐकायच्यात…. मी आपलं मघाशी गमतीनं म्हणाले….”
“ते काही नाही…निशा…. मला गोष्ट ऐकायचीच आहे….. त्यातल्या त्यात कमी भितीदायक असेल अशी गोष्ट सांग ना प्लीज….”
“ठीक आहे…. तू आता म्हणतोच आहेस… तर ऐक….”
“ही गोष्ट मला माझ्या बाबांनी सांगितली आहे बरं का…..”
“तर एकदा काय झालं……”
(क्रमशः)
©✍ संध्या प्रकाश बापट
Leave a Reply