भाग आठ
“तर एकदा काय झालं ……
ही पंधरा एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे बरं का ….
एक नवीन लग्न झालेलं जोडपं होतं. नवरा एका कंपनीत नोकरीला होता. बायको गावाकडची होती. पण शिकलेली होती. ती जरा इथे शहरात रुळली, की तो तिच्यासाठीही नोकरी बघणार होता.
एकदा नवऱ्याच्या ऑफिसमधील एका सहकाऱ्याच्या लग्नाच्या रिसेप्शनला या दोघांना जायचं होतं.
नवऱ्याकडं स्कुटर होती, पण तो कामावर लोकलने जात असे. सुट्टीच्या दिवशी किंवा बाहेरची कामे करण्यासाठीच तो गाडीचा वापर करत असे.
त्या दिवशी रिसेप्शन वरून परतायला उशीर होईल म्हणून ते गाडीवरूनच गेले होते. येताना त्यांच्या अंदाजापेक्षा जरा जास्तच उशीर झाला. रात्री घरी उशिरा पोहोचलो तर झोपायला उशीर होईल आणि सकाळी उठायला उशीर झाला तर कामावर जायला उशीर होतील या विचाराने रात्रीचे ११ वाजलेले असताना देखील त्यांनी या रस्त्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला.
त्यावेळी सुद्धा रात्रीच्या वेळी या रस्त्याला वर्दळ नसायचीच. या रस्त्याला लागताना, १५ ते २० मिनिटाचा रस्ता आपण पटकन पार करू असं त्यांना वाटलं होतं. पण प्रत्यक्ष रस्त्यावरून जाताना त्याला स्वतःलाच खूप भीती वाटायला लागली. त्यात सोबत आपली नवीन लग्न झालेली बायको आहे या विचाराने त्याला जास्त काळजी वाटू लागली. रिसेप्शनला जायचं असल्यामुळे दोघांनीही चांगले कपडे आणि स्वतःचा लग्नातले सगळे दागिने घातले होते, त्यामुळे चोरांचीही भीती वाटत होती. शिवाय बायकोच्या सुरक्षेचीही त्याला काळजी वाटू लागली.
लवकरात लवकर या भीतीदायक जंगलातल्या रस्त्यावरून बाहेर पडावे या विचाराने त्याने गाडीचा वेग वाढवला आणि तो जोरात जावू लागला. त्यावेळी रस्ते पण इतके चांगले नव्हते. रस्त्यावर दिवेही नव्हते. स्कुटरच्या दिव्याचा तेवढा उजेड पडत होता. वेगाने बाहेर पडण्याच्या विचाराच्या नादात आपण गाडी चालवण्याचा वेग किती वाढवला आहे याकडे त्याचे लक्षच नव्हते. आणि अचानक ……एका वळणावर वळत असताना गाडीखाली काहीतरी आले आणि त्याचा गाडीवरचा कंट्रोल गेला आणि दोघंही गाडीवरून रस्त्यावर जोरात आपटले. दोघांनाही खूप मार लागला. भरपूर रक्तस्त्राव झाला. कोणतीही मदत न मिळाल्यामुळे दोघेही जागीच गतप्राण झाले. दुसरे दिवशी इथे वर्दळ सुरु झाल्यावर हे दोघे लोकांना रस्त्यावर पडलेले दिसले. मग पुढचे सोपस्कार पार पडले.
त्यानंतर काही दिवसांनी दोन मित्र, आपल्या चारचाकी गाडीतून रात्रीच्या वेळेस या रस्त्याने जात होते. तेव्हा त्यांना एक जोडपं रस्त्याचा कडेला हातात पाण्याची रिकामी बाटली घेऊन उभे असलेले दिसले. त्यांनी हात करून गाडी थांबवली आणि गाडीतून लिफ्ट द्याल का म्हणून विचारले. यांनी त्या दोघांना गाडीत घेतले. गाडीत बसल्यावर त्यांनी सांगितले कि, आमची गाडी पेट्रोल संपल्यामुळे वाटेत बंद पडली आहे. आम्हाला जवळपासच्या पेट्रोल पंपापर्यंत सोडा. आम्ही पेट्रोल घेऊन, इकडे परत येणाऱ्या दुसऱ्या एखाद्या गाडीतून लिफ्ट घेऊन इथे परत येवू आणि मग आमची गाडी घेऊन पुढे जावू.
थोडावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना त्यांनी गाडीतल्या माणसांना सांगितले की, ही जोडी रिसेप्शनला जाऊन आली, येताना गाडीतलं पेट्रोल संपलं, त्यामुळे गाडी बंद पडली. सोबत पाण्याची बाटली होती, ती रिकामी केली. आता पंपावरून पेट्रोल आणले की पुढे जाता येईल. थोडावेळ असे जुजबी बोलणे झाल्यावर दोघे मित्र गप्प बसले. एक जण गाडी चालवत होता. मागच्या सीटवर हे दोघे डोकं मागं टेकून डुलकी काढत होते.
थोड्या वेळात रास्ता संपला. यांनी गाडी पेट्रोल पंपासमोर थांबवली. त्यांना हाक मारण्यासाठी मागे वळून पहिले तर… मागच्या सीटवर कुणीही नव्हते. फक्त एक पाण्याची रिकामी बाटली होती.
त्यांच्यातला एकजण तिथंच बेशुद्ध पडला तर दुसऱ्याला घरी गेल्यावर ताप भरला. तो आठ दिवस दवाखान्यात होता. हळु हळू ही गोष्ट वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली.
या सारख्या अनेक प्रसंगाचे, खूप वेगवेगळे अनुभव वेगवेगळ्या लोकांना आलेत. या सगळ्या कथा कहाण्यांचा लोकांच्या मनावर इतका पगडा आहे कि. त्यामुळे सहसा रात्री कुणी या रस्त्याने जातच नाही. तरी मी आत्ता त्यातल्या त्यात कमी भीतीदायक गोष्ट तुला सांगितली.”
रोहन म्हणाला, “पण निशा आता तूच मला सांग, या गोष्टीतल्या त्या दोन भुतांनी, गाडीतल्या लोकांना भीती वाटेल असे काही तरी वर्तन केले का? मग त्यांनी घाबरायचं किंवा आजारी पडायचं काय कारण होतं? हे नॅचरल आहे की, त्यांना अचानक गायब झालेलं बघून ते घाबरले. पण संपूर्ण प्रवासात त्यांनी गाडीतल्या लोकांना काहीच त्रास दिला नव्हता. नाही का?”
“रोहन, आम्ही जेव्हा घरी अशा गोष्टी करायचो तेव्हा मला आणि शेखरलाही असेच प्रश्न पडायचे. माझे बाबा म्हणतात, आपण लहानपणापासून जे ऐकतो, वाचतो त्याचा आपल्या मनावर पगडा बसलेला असतो. भुतांचं आणि भितीचंही तसंच आहे. म्हणजे हे सगळं मानसिक असतं. आपल्या मनात या गोष्टी पक्क्या बसलेल्या असतात, त्यामुळे आपल्याला भीती वाटते. बऱ्याचदा त्या बिचाऱ्या भुतांना आपल्यामुळे कुणीतरी घाबरतंय किंवा हार्ट अटॅकनं मरतंय याची कल्पनाही येत नसेल.”
“निशा, मी सुद्धा या संदर्भात बरीच पुस्तकं वाचली होती. बहुतेक तज्ज्ञांच्या मते ज्या व्यक्ती अपघाताने अचानक मरतात किंवा मारल्या जातात अशा व्यक्तींच्या मनात, शेवटच्या क्षणी जी तीव्र स्वरूपातील इच्छा किंवा भावना असते, ती पूर्ण होईपर्यंत ते मरणाच्यावेळी ज्या स्वरूपात होते त्या स्वरूपात भूत होऊन फिरत राहतात. काही वेळा त्यांची ती इच्छा पूर्ण झाली कि त्यांना मुक्ती मिळते. ही अशी भूतं सहसा दुसऱ्याला त्रास देत नाहीत. त्यांना मुक्ती मिळावी म्हणून दुसऱ्याची मदत मागून त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. पण जी लोकं मूलतः दुष्ट प्रवृत्तीची असतात, जिवंतपणी सगळ्यांना त्रास देत आलेली असतात आणि आपल्या दुष्ट इच्छा पूर्ण न होता मारतात, ती लोक मेल्यावरही सगळ्यांना त्रास देत राहतात.”
“बरोबर आहे तुझं रोहन. तू तो डिम्पल कपाडिया आणि विनोद खन्नाचा ‘लेकिन’ सिनेमा पाहिलास का? त्यांची पण कथा अशीच काहीशी होती. पण मला एक गोष्ट कळली नाही कि, जर ती भूतं अस्तित्वात असतात तर मग काही लोकांनाच का दिसतात? सगळ्यांनाच का दिसत नाहीत?”
“सांगतो. तुम्हा महिलांना जसा एक सिक्स्थ सेन्स असतो ना, म्हणजे एखाद्या व्यक्तीशी बोलताना किंवा त्याच्या नजरेवरून त्याचा मनात काही काळं-बेरं चाललं असेल, किंवा तुम्हाला धोका उत्पन्न होईल असं काही घडण्याची शक्यता असेल, तर त्याचा तुम्हाला लगेच सुगावा लागतो. तसंच काही व्यक्ती जास्त संवेदनशील मनाच्या असतात किंवा विशिष्ट राशीच्या किंवा गणाच्या व्यक्तींनाच ही भूतं दिसतात किंवा त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते.”
बोलता बोलता रोहन आणि निशाने चढाचे वळण पार केले. आता ते उताराच्या रस्त्याला लागले. हे ठिकाण थोडं उंचीवर असल्याने या ठिकाणावरून झाडांमधूनही पुढचा बराच परिसर नजरेत पडत होता. आत्तापर्यंत चंद्र अगदी माथ्यावर आला होता, त्यामुळे लक्ख चांदणं पडलं होतं. तेव्हड्यात निशाचं समोर लक्ष गेलं…. आणि तिनं आनंदानं उड्या मारायला सुरुवात केली. …….
(क्रमशः)
©✍ संध्या प्रकाश बापट
Leave a Reply