नवीन लेखन...

आणि अचानक त्या वळणावर (रोमांचक भयकथा) – भाग ९

भाग नऊ

बोलता बोलता रोहन आणि निशाने चढाचे वळण पार केले.  आता ते उताराच्या रस्त्याला लागले.  हे ठिकाण थोडं उंचीवर असल्याने या ठिकाणावरून झाडांमधूनही पुढचा बराच परिसर नजरेत पडत होता. आत्तापर्यंत चंद्र अगदी माथ्यावर आला होता, त्यामुळे लख्ख चांदणं पडलं होतं.  तेव्हड्यात निशाचं समोर लक्ष गेलं…. आणि तिनं  आनंदानं उड्या मारायला सुरुवात केली. …….

“अगं निशा, तुला एकदम काय झालं उड्या मारायला?”

“अरे रोहन, ते बघ, तुला तिथं दिव्यांचा एक समुह दिसतोय का? ते फॉरेस्टच्या चौकीचे लाईटस आहेत.  आता आपण हा उतार उतरलो कि सगळा प्लेन रस्ता आहे. मग एकच शेवटचं वळण….. ते पार केलं कि, ती फॉरेस्टची चौकी…….तिथं आपल्याला निश्चितच लॅन्डलाईन फोन किंवा कुणाचा तरी मोबाईल उपलब्ध होईल आणि आपल्याला घरी कॉल करून सांगता येईल…..आम्ही इथे सुखरूप आहोत……….काळजी करू नका म्हणून…… गाडी बंद पडल्याचंपण त्यांना सांगु, म्हणजे ते आपल्याला न्यायला येतील आणि येताना आपल्या गाड्या घेऊन जाण्याची पण काहीतरी व्यवस्था करतील….. ही आनंदाची गोष्ट नाहीये का आपल्यासाठी?  शिवाय चौकीवर वाहन उपलब्ध असेल तर तेच आपली व्यवस्था करतील. कसं? …. किती किती पर्याय उपलब्ध होतील या विचाराने मला आनंद झाला.  ए तू असं करतोस का?  …..  तू आता माझ्या बरोबर आमच्या घरी चल……आजची रात्र आमच्या घरीच थांब……  सकाळी गाडी दुरुस्त झाली कि मग जा….. कशी आहे माझी आयडियाची कल्पना?”

हे सगळं बोलताना निशाच्या चेहेऱ्यावरून आनंद नुसता ओसंडून वाहत होता.

“अगं निशा, पण आपली आत्ताच तर ओळख झाली आणि मी डायरेक्ट तुमच्या घरी राहायला वगैरे यायचं म्हणजे जरा ऑक्वर्ड वाटतंय मला, आणि तुमच्या घरचे मला ठेवून घेतील?”

“न ठेवून घ्यायला काय झालं…?  उलट आज त्यांच्या दृष्टीनं तू देवदूत आहेस…. ह्या भयाण रात्री…… हे भीतीदायक जंगल पार करायला…… तू मला मदत केलीस…… हे मी त्यांना सांगितल्यावर ते तुझं किती नि केवढं कौतुक करतील I Can’t imagine.”

“निशा, माझं तुझ्यासोबत असणं हे खरंच इतकं important आहे?”

“मग? इतरवेळी दिवसासुद्धा मी या रस्त्याने कधी एकटं जाण्याची हिम्मत केली नसती …. तो रस्ता मी रात्रीचा पार केला हेच त्यांच्यासाठी आश्चर्याचं आहे….. आणि तो मी तुझ्या मदतीनं पार केला हे हि तेवढंच महत्त्वाचं आहे.”

“बरं बाई ठीक आहे.  आता आमचा कौतुक सोहळा होईल तेव्हा होईल…. पण त्यासाठी आपल्याला चौकीपर्यंत तरी जायला पाहिजे ना? का इथंच गप्पा मारत उभं राहायचा विचार आहे?….आता खरंचच *मंजिल सामने नज़र आ राही हैं*….. पण मला कळत नाहीये की, हि आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे कि दुःखाची??”

“का बरं?”

“जंगलाच्या मध्यात असताना वाटत होतं की कधी एकदा हा रस्ता संपेल आणि आपण या जंगलातून बाहेर पडू…. पण तू भेटलीस आणि मला खरंच असं वाटायला लागलं कि हा रस्ता कधी संपूच नये….आपण आयुष्यभर असंच गप्पा मारत……..एकमेकांसोबत चालत राहावं …..”

“Really???? मला पण असंच वाटायला लागलंय बहुतेक… पण असू दे….. आपण सुखरूप इथून बाहेर पडतोय हे हि नसे थोडके…. जान बचाई लाखों पाये…… इथून बाहेर पडल्यावर पुढं काय करायचं ते नंतर बघू …. आता फक्त बाहेर पडायचं बघायचं …. बाssssस …..”

“निशा, पण तू मला एक वचन देशील????”

“कसलं वचन ???”

“या नंतरही तू मला भेटत राहशील???”

“ऑफ कोर्स रोहन… हे काय विचारणं झालं ??? आत्ता माझा मोबाइलला बंद आहे म्हणून…  पण तू तुझ्या मोबाईल वर माझा नंबर आत्ताच save करून ठेव ना. म्हणजे तुला मला कॉल करता येईल…”

रोहनने त्याच्या मोबाईल मध्ये निशा चा नंबर save केला.

बोलता बोलता त्यांनी उतार पार केला. आता ते शेवटच्या वळणाजवळ आले होते. चालता चालता रोहन मागे रेंगाळू लागला… घरी जायला मिळणार या उत्साहात निशा भराभर पुढे जायला लागली. हे वळण तसं खूप मोठ्ठ आणि जास्त वळणदार होतं.  दाट झाडीतून पुढचा रस्ता सहजी दिसत नव्हता….

निशा थोडी वळणावर पुढे झाली आणि तिचे समोर लक्ष गेले…

या वळणाच्या दोन्ही बाजूंना दोन दोन सिमेंटची बाकडी बसवलेली होती.  इतका वेळ चालून ती खरं तर दमली होती.  थोडा वेळ तरी इथे बाकड्यावर टेकावे आणि मग पुढे चालत जावे … असे क्षणभर तिच्या मनातही आले…. पण जे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी चालायचे एवढे कष्ट आपण घेतले …. ते असं नजरेसमोर असताना …. तिला तेवढे क्षणही वाया घालवावे असे वाटेना….. म्हणून ती नाईलाजाने पुढे चालायला लागली….

ती दोन बाकडी पार केली आणि तिची नजर रस्त्याच्या कडेला गेली…… चंद्राच्या प्रकाशात काहीतरी चकाकत होतं….. ती आणखी थोडी पुढे गेली आणि तिला तिथं एक मोटार सायकल पडलेली दिसली…. रोहन अजून मागेच रेंगाळत चालत होता.   तिने मागे वळून रोहनला आवाज दिला …

“रोहन, अरे इकडे ये पट्कन …. इथे बघ काय आहे??”

(क्रमशः)

©✍️संध्या प्रकाश बापट

सौ. संध्या प्रकाश बापट
About सौ. संध्या प्रकाश बापट 50 Articles
नमस्कार वाचकहो, मी, सौ. संध्या प्रकाश बापट (माहेरची पद्मश्री विष्णू फाटक), सातारा. मी, सातार्‍यातील विविध कंपन्यांमध्ये/ऑफिसमध्ये अनेक वर्षे विविध पदांवर काम केले. तसेच काही वर्षे स्वतःचा व्यवसायही केला. 2018 मध्ये मी, नोकरी आणि व्यवसायातून स्वेच्छा निवृत्ती घेतली. या सगळ्या वर्षांत, इच्छा असूनही मनासारखे लिहिण्यास वेळ उपलब्ध होत नव्हता. मला लहानपणापासून संगीत, नाटक, सिनेमा, अभिनय आाणि वाचन या सगळ्याची प्रचंड आवड आहे. मी हौशी नाटकांत, एकांकिका, पथनाट्य यांत अभिनय करत होते. युट्यूब वरील वेब सिरीजमध्ये अभिनय करत आहे. नुकतेच झी टीव्ही वरील 'लागीर झालं जी' आणि 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मी भूमिका केल्या आहेत. मी लघुकथा, कविता, प्रासंगिक लेख, वेब सिरीजसाठी मराठी आणि हिंदीतून कथा-पटकथा लिहीत आहे. काही लघुकथा ई-दिवाळीअंकात प्रसिद्ध झाल्या आहेत. माझ्यातील सुप्तगुणांना प्रेरणा आणि वाव देण्यामध्ये फेसबुक आणि व्हाटस्अ‍ॅप या सोशल मिडीयाचा आणि मला कायम प्रोत्साहन देण्यार्‍या तुम्हा सर्व वाचकांचा फार मोठा वाटा आहे.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..