(माजी) प्राचार्य, (माजी) प्राध्यापक, आजीव प्रशिक्षक आणि त्याहीपेक्षा आजीव शिक्षक असे अनिल काळेले सर रायपूरच्या वास्तव्यात मला भेटणे हे आम्हां उभयतांचे भागधेय ! मराठी माणूस अमराठी मुलुखात भेटणे या अपूर्वाईपेक्षा दोन गोष्टींमुळे आम्ही अधिक जवळ आलो – शिकवणे आणि रंगभूमी ! पाटया टाकणारे शिक्षक पावलोपावली भेटणे हे सध्याचे अपरिहार्य चित्र बघत आणि भोगत असताना अंतर्बाह्य शिक्षक भेटणे हे पूर्वसंचित मानावे लागेल. पेशा किंवा व्यवसाय यापेक्षा शिक्षकी “वृत्ती “अंगी बाणविलेले सर आज पंचाहत्तरी ओलांडली तरी त्याच दुर्दम्य उत्साहाने नव्या पिढया घडवीत आहेत. महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावरून निवृत्त झालेल्या सरांचा ठसा आजही तेथे आहे.
“अर्थशास्त्र ” आणि “इंग्रजी ” ( पुढे याचे व्यवस्थापन क्षेत्रात ” कम्युनिकेशन स्किल्स “असे बारसे झाले) हे सरांचे पीच ! आजही त्यांचे विदयार्थी सरांची व्याख्याने विसरु शकत नाही. सर “एच आर ” या विषयाचेही तज्ञ आहेत असे माझ्या तत्कालीन सहकारी (आणि सरांच्या विद्यार्थिनी) मला आवर्जून सांगत. ते काही मला अनुभवता आले नाही. पण सरांच्या काही वर्गांना मी बसलोय.त्यांचा विषय ते जगतात. विषयाच्या ज्ञानाला ते अंगीभूत अभिनयाची, आवाजाच्या फेकीची जोड देतात. प्रत्येक शिक्षक हा “परफॉर्मिंग आर्टीस्ट “असतो या सत्याच्या फार जवळ ते कायम असतात. रायपूर शहर त्यांच्या विदयार्थ्यांनी खचाखच भरलेले आहे. त्यांच्या विषयी अपार आदर आणि श्रद्धा विदयार्थी बाळगून आहेत. टिपिकल मराठी असल्याने सर “गरम डोक्याचे “आहेत. शिस्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे.
रायपूरच्या नाटयक्षेत्राची कायिक /वाचिक अभिनयाची कमान सरांनी खंबीरपणे पेलली आहे. याही वयात ते दरवर्षी नाटकाचे /एकांकिकेचे दिग्दर्शन करीत असतात. मराठीपणाची ज्योत पाजळत ठेवतात. राज्य नाटय स्पर्धेत रायपूरचे नाव गाजवत असतात. रायपूरच्या मराठी मंडळाचे ते अनभिषिक्त आधारस्तंभ आहेत. छत्तीसगढ आणि मध्यप्रदेशात सिटकॉनतर्फे सर प्रशिक्षण वर्ग घेत असतात.
रायपूर २०१२ मध्ये सुटले तरीही आम्ही फोनवर संपर्कात असतो. काहीवेळा पुण्यातही भेटलोय. त्यांचे रायपूरचे निमंत्रण अजूनही माझ्याकडून पेंडिंग आहे. सरांची (आणि काही काळ माझीही) कर्मभूमी असलेले रायपूर मला आजही खुणावत आहे. बघू या !!
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply