एक राजा होता. तो खूपच पराक्रमी होता. जेवढा पराक्रमी तेवढाच प्रजाहितदक्ष. प्रजेच्या फायद्यासाठी त्याचे सारखे प्रयत्न चालू असायचे. त्यामुळे प्रजाही राजावर खूश होती. असा राजा जन्मोजन्मी मिळो अशीच प्रार्थना प्रजा करीत होती. राजा पराक्रमी असल्यामुळे त्याने अनेक राजांना आपले मांडलिक बनवले होते. त्या मांडलिक राजांकडून राजाला वेळोवेळी धन व संपत्तीचा पुरवठा होत असे. त्यामुळे राजाचा खजिना नेहमीच भरलेला असे. राजाची आर्थिक बाजू भरभराटीला असल्यामुळे राज्यात सुबत्ता होती. दुष्काळातही प्रजेचे फारसे हाल होत नसत. राजाच्या राज्यात एकूणच सर्वत्र आबादीआबाद होते. राजाला याच गोष्टीचा फार अभिमान होता. या अभिमानाचे रूपांतर हळूहळू अहंकारात व नंतर गर्वात झाले. पुढे पुढे हा गर्व राजाच्या आचरणातही दिसू लागला. एकदा राजधानीत एक मोठे साधूमहाराज कोठून तरी आले. साधूमहाराज अतिशय निरिच्छ वृत्तीचे होते.दर्शनासाठी वा भेटायला आलेल्या लोकांकडून ते काहीही घेत नव्हते.
राजधानीत त्यांची प्रसिद्धी वाहू लागली व त्यांचे दर्शन घेण्यासाठी लोकांची रांगही वाढू लागली. या साधूमहाराजांची महती राजाच्याही कानावर गेली. त्यामुळे एकदा राजाही त्या साधूला भेटायला गेला व म्हणाला, ‘तुम्ही मागाल ते मी द्यायला तयार आहे; मात्र तुम्ही ते स्वीकारले पाहिजे. माझा सारा खजिना, सारे राजवैभव इतकेच काय माझे शरीरही तुम्हाला द्यायला तयार आहे. यापैकी तुम्ही काहीही स्वीकारू शकता ?’ त्यावर साधूमहाराज राजाला म्हणाले, ‘ राज्याचा खजिना तर
प्रजेच्या मालकीचा आहे. त्याचा तू केवळ राखणदार आहेस. तुझ्या शरीरावर तुझ्या पत्नीचा तसेच तुझ्या मुलाबाळांचा हक्क आहे. ‘ साधूच्या या उत्तरामुळे राजा गोंधळला व म्हणाला, ‘ ‘मग माझी स्वतःची अशी कोणती भेटवस्तू तुम्हाला देऊ हे तुम्हीच मला सांगा. ‘ त्यावर साधूमहाराज राजाला म्हणाले, ‘ ‘तुझ्या मनातील अहंकार हा सर्वस्वी तुझाच आहे. त्याचे दान तू मला करू शकतोस. ” साधुमहाराजांच्या या
उत्तराचे मर्म राजाला समजले व त्याने अहंकार सोडून देण्याचा निश्चय केला.
Leave a Reply