जेंव्हा जेंव्हा प्रवासाने
आम्ही दोघे दमलेलो असतो ……..
थकून, कंटाळून घरी येतो,
झोमॅटो तिला नको असतं,
म्हणून पिठलं भाताचा साधा बेत ठरवते !
माझी आवड सांभाळून ती
सांडगे पापड़ हि तळते …..
त्यासोबत न विसरता
लोणच्याची फोड वाढते
कारण आम्ही दोघे दमलेले असतो
तेंव्हा खरंच पिठलं भात
असा साधाच बेत असतो !
कैरी लिम्बाचे लोणचे ….
नेहमीच जेवणात असते.
म्हणून ती मिक्स भाज्यांचे
खमंग लोणचे सुद्धा बनवते
ती कंटाळली की नेहमी असेच होते…..
पिठल भात असा साधाच बेत ठरवते !
भात शिजे पर्यन्त रिकामा वेळ आणि ……
प्रवासातील थकव्याचा सुंदर मेळ मी घालतो..
दोनच ग्लास बियर घेऊन घसा ओला करतो..
कारण पिठलं भात असा साधाच मेनू असतो !
बियर सोबत,मला आवडतात म्हणून …
चार कांदा भजी ती तळते …
साध्या मेनूत हि रंगत आणते
कारण जेंव्हा जेंव्हा ती कंटाळलेली असते,
तेंव्हा तेंव्हा पिठल भात असा साधाच मेनू रांधते !
घरी आहेत म्हणून चार थेपले गरम ती करते
तुपाची धार सोडून त्यांना ओले करते ….
शेंगदाण्याच्या चटणी सोबत ..
टोमेटो काकडीची कोशिंबीर असते….
कारण पिठलं भात असा साधाच बेत ती करते !
जेवण खुप साधे झाले …..
हे तिलाही जाणवत असते….
फ्रिजमधल्या आइसक्रीमचे
फ्रूट सलाड ती बनवते
कारण ….
पिठल भात असा साधाच मेनू असतो !
साधाच मेनू असल्याने तिला, मी थोडासा नाराज वाटतो
उद्या नाश्त्याला मिसळीचे वचन देऊनच ती झोपी जाते ….
आमच्याकडे नेहमी असेच असते
ती कंटाळली की पिठल भाताला पर्याय नसतो !
संसार म्हणजे तडजोड आणि समझोता
मी नेहमीच करत असतो
ती दमली की पिठलं भात असा साधाच बेत नेहमी असतो !
ती माझी गृहलक्ष्मी,
कंटाळली तरी,अन्नपूर्णा असते.
चेहऱ्यावर स्मित बाळगून
माझी रसना तृप्त करते !
— अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
Leave a Reply