तसे म्हटले तर जगातील बहुतेक सर्वच स्त्रियांना उपजतच नेमबाजीची कला परमेश्वराने देणगी स्वरुपातच दिलेली आहे. स्त्री सुंदर असो वा नसो, कुणातरी पुरुषाला वा पुरुषांना घायाळ करण्याची शक्ती निसर्गतःच तिच्याजवळ असते. दुष्यंत असो वा विश्वामित्रासारखा ऋषी असो किंवा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असो, स्त्रियांजवळील शस्त्राने वय, हुद्दा, प्रतिष्ठा किंवा ध्येय विसरून तो घायाळ होतो. कुणा पुरुषाची विकेट कुणा स्त्रीच्या कोणत्या शक्तीने पडेल हे सांगता येत नसते!
इ.स. १८६० मध्ये अमेरिकेत जन्मलेली फिबी ॲन मोझे (Phoebe Ann Mosey) ऊर्फ ॲनी ओकली ही जणू काय जन्मतःच कमरेला रायफल घेऊन या जगात आली असावी. रायफल हा जणू तिचा एक अवयवच होता. एखादी व्यक्ती चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्मास येते तशी ॲनी चांदीच्या चमच्याऐवजी रायफल घेऊन आली असावी. रायफल पेलवण्याचे वय प्राप्त होताच ती रायफल चालवू लागली विशेष म्हणजे रायफलमुळे तिला व तिच्या कुटुंबालाच तिच्या अगदी लहान वयात ती पोसू शकली. तिच्या वयाच्या पाचव्या वर्षीच तिचे वडील आपल्या पत्नी-मुलांना भुकेकंगाल ठेवून निधन पावले होते. ॲनीच्या आईपाशी उदरनिर्वाहासाठी पैसे नव्हते. अशा वेळी ॲनीची रायफल त्या कुटुंबाच्या कामी आली. वयाच्या आठव्या वर्षीच अॅनीने आपल्या आयुष्यात सर्वात प्रथम रायफल चालविली तेव्हा तिच्या नाकाला फटका बसून तिला आपले नाक फोडून घ्यावे लागले होते. विशेष म्हणजे त्या पहिल्याच फटक्याचा नेम मात्र तिच्या निशाणाला भेदून गेला होता. आयुष्यातील पहिलीच नेम न चुकणारी जगातील ती एकमेव नेमबाज असावी. अॅनीने बंदूक ज्या क्षणी हाती घेतली त्या क्षणापासून तिच्या कुटुंबाचा अन्नपाण्याचा प्रश्नच सुटला गेला. आकाशात उडणाऱ्या क्केल पक्ष्यांच्या नेमक्या शिरोभागी गोळी मारून ॲनी त्यांना जमीनदोस्त करीत असे. असे मारलेले पक्षी शंभर मैलांच्या परिसरातील हॉटेल मालकांना ती विकत असे. ॲनी हरिणांचीही शिकार करून हॉटेलला हरिणे विकत असे. हॉटेल मालक तिला आनंदाने पैसे देत. कारण ॲनी तिच्या भक्ष्यांच्या डोक्यातच बंदुकीची गोळी मारून हरिणांचे बाकी सारे शरीर जसेच्या तसे ठेवून स्वच्छ मांस विक्रीसाठी हॉटेल मालकांना उपलब्ध करून देत असे. अशा प्रकारे हॉटेल मालकांकडून मिळालेल्या रकमेतून ॲनीच्या कुटुंबाची उत्तमप्रकारे देखभाल होत होती.
अॅनी ओकलीच्या संदर्भातील एक दंतकथा प्रसिद्ध आहे. ती एकवीस वर्षांची असताना तिच्या गावात एक सुप्रसिद्ध नेमबाज आला होता. त्याने अॅनीला नेमबाजीबाबत आव्हान दिले. त्या नेमबाजाचे नाव होते फ्रॅक बटलर. त्याने अॅनीला दिलेल्या आव्हानात्मक खेळात स्वतः प्रथम नेमबाजीचा खेळ केला. समोर ठेवलेल्या २५ पैकी २१ मातीच्या कबुतरांचा आपल्या नेमबाजीने त्याने छेद केला. फ्रँक बटलर आपल्या या कर्तृत्वावर खुश होता. आता अॅनी काय करू शकते हे त्याला जोखायचे होते. आपल्याइतकी नेमबाजी ती दाखवू शकणार नाही, याची खात्री त्याला असावी. परंतु आश्चर्य असे की, अॅनीने आकाशात उडणाऱ्या २५ पैकी २३ पक्ष्यांना नेम मारून जमीनदोस्त केले. फ्रँक बटलर ॲनीचे नेमबाजीतील कौशल्य पाहून स्तंभितच झाला. त्याने तिच्या कौशल्याचे कौतुकच केले. तो नुसते तिचे कौतुक करून थांबला नाही, तर तिच्या तो प्रेमातच पडला. पुढे वर्षभर तिच्या प्रेमाराधनेत राहून तिचे हृदय जिंकून त्याने तिच्याशी लग्नही केले. कोणी कुणाच्या हृदयाचे हरण केले हे त्या वेळी कुणाला समजले नसावे! परंतु काही काळानंतर त्याबाबतची वस्तुस्थिती विशद करताना फ्रँकने म्हटले होते, आखूड कपड्यातील ती छोटीशी सडसडीत अंगयष्टीची मुलगी जेव्हा मी प्रथम पाहिली तेव्हाच माझी विकेट पार पडली होती. त्या छोट्या मुलीपूर्वी कुणीही तशी अशक्यप्राय नेमबाजी केलेली नव्हती!
सिटिंग बूल या योद्ध्याने अॅनी ओकलीस लिटल शुअर शॉट हे नाव दिले. ॲनी ही शंभर पौंड वजनाखालील पाच फूट उंचीची छोटीशी तरुणी होती. मात्र तिचा बंदुकीचा नेम पक्का म्हणजे पक्काच होता. तो कधीही चुकत नसे. हवेत काचेचे चार ग्लास उडवून ते जमिनीवर पडण्यापूर्वी ॲनीच्या रायफलीच्या गोळ्यांनी त्यांचा चक्काचूर होत असे. उधळत्या घोड्याच्या पाठीवर उभे राहून ती आपल्या नेमबाजीच्या करामती प्रेक्षकांना दाखवीत असे. प्रचंड जनसमुदायास ॲनीच्या या नेमबाजीच्या कौशल्याने अपार आनंद मिळत असे.
खेळातील पत्त्यांच्या अगदी पातळ कडा किंवा हवेत उडविलेला छोटासा डाईम अॅनी आपल्या नेमबाजीचे निशाण बनवीत असे. तिच्या नेमबाजीवर अपार विश्वास असलेल्या तिच्या नवऱ्याच्या ओठातील सिगरेटचे टोक ती आपल्या नेमबाजीने पेटवून दाखवीत असे. तसेच चाकावर फिरणाऱ्या प्रज्वलित मेणबत्यांच्या ज्वाळा ती नेमबाजीने विझवून दाखवी.
अॅनीने आपल्या नेमबाजीच्या विविध करामतींनी जगभराच्या प्रेक्षकांना अचंबित केले होते. एखाद्या माणसाच्या हातातील डाईमला निशाण मारतांना त्यांच्या हाताची बोटे सुरक्षित राहत. आपल्या स्वतःच्या खांद्यावर ठेवलेली वस्तू ती समोर ठेवलेल्या चाकूच्या पात्याच्या प्रतिबिंबाकडे पाहून अचूक छेदत असे.
बर्लिनमध्ये क्राऊन प्रिन्स विल्यम (नंतर कैसर विल्यम-दुसरा म्हणून प्रसिद्ध झालेला) याच्या ओठात सिगरेट ठेवून तिच्यावर अचूक नेम मारून दाखविण्याचा खेळ अॅनीने करून दाखवला होता.
युरोपमध्ये बारोनेस दि रोथचाईल्डस (Baroness de Rothchilds) आणि व्हिक्टोरिया राणी यांना अॅनी ओकली हिने आपल्या नेमबाजीचे हुकमी खेळ करून दाखविले होते. जेव्हा पॅरिसमध्ये वाइल्ड वेस्ट शो आपले प्रयोग करू लागला तेव्हा सिनेगलच्या (Senegal) राजाने बुफालो बील (Buffalo Bill) कडून अॅनी ओकलीला विकत घेण्याचा प्रयत्न केला.
अत्यंत सुप्रसिद्ध असलेला सिऑक्स (Sioux) नेता सिटिंव बूल हा ॲनीचा नेमबाजीवर इतका खूश झाला, की त्याने तिला आपली दत्तक मुलगीच मानले.
ॲनी वय वर्षे पन्नाशीत पोहोचली असतानाच पहिले महायुद्ध सुरु झाले होते. तरीही ती तिचे नेमबाजीचे खेळ करीतच होती. त्यावेळी तिने अमेरिकेच्या युद्धविषयक सरकारी खात्यास आपण नेमबाजीबाबत मार्गदर्शक म्हणून आपली सेवा लष्करातील जवानांसाठी देऊ इच्छित असल्याचे कळविले होते. परंतु तिला नकार मिळाला. मग तिने जवानांना रिझविण्यासाठी नेमबाजीचे विविध आकर्षक खेळ करून दाखविले. तिच्या डेव्ह (Dave) नामक कुत्र्याच्या डोक्यावर सफरचंद ठेवून ते नेमबाजीने उडवून दाखविण्यासारख्या चित्ताकर्षक खेळांचा समावेश जवानांना दाखविलेल्या खेळांत होता!
सामाजिक कार्यात ॲनीला रस होता. तिच्या आयुष्यात तिला अनेक चांदीची व सोन्याची पदके मिळाली होती. आयुष्याच्या उत्तरार्धात तिने आपली सर्व पदके वितळविली. जवळ असलेले सोने विकले आणि त्यातून आलेली रक्कम देणगी म्हणून वाटून टाकली.
ॲनी शिक्षण हे मूल्य मानीत होती. शिक्षणावर तिचा गाढ विश्वास होता. म्हणूनच असंख्य मुलींना त्यांच्या शिक्षणार्थ तिने आर्थिक मदत दिली होती. अॅनी ओकलीसारख्या स्त्रिया नेमबाजीच्या कोणत्याही प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत न जाता, एकलव्याप्रमाणे कोणत्याही पुतळ्यास गुरू न करता जागतिक किर्तीच्या अलौकिक नेमबाज कशा होतात आणि शाळा-महाविद्यालयांत जाऊन पुस्तकी शिक्षण न घेता निःस्वार्थीपणे सामाजिक व शैक्षणिक कार्यात रस कसा घेतात हे न उलगडणारे कोडेच वाटते!
(व्यास क्रिएशन्स् च्या ‘जगावेगळ्या’ ह्या पुस्तकातील प्रा. अशोक चिटणीस ह्यांचा हा लेख)
Leave a Reply