
भरत नाट्य मंदिर म्हटले, की डोळ्यांपुढे येतो पुण्यातल्या रंगकर्मी तरुणाईचा राबता. संस्था आणि नाट्यगृह वयस्कर असूनही दिवसरात्र तालमी, एकांकिकांचे प्रयोग, तांत्रिक तालमींमध्ये रंगून गेलेली असते.
भरत नाट्य मंदिर हे पुणे शहरातील सर्वात जुने नाट्यगृह. हे नाट्यगृह म्हणजे भरत नाट्य संशोधन मंडळाचा एक हिस्सा आहे. ज्या काळी ज्याला काही अभ्यासात गती नाही, हातात कसब नाही, दैवदत्त आविष्कार अंगी नाही, अशा मठ्ठ किंवा उडाणटप्पू मुलांना नाटक कंपन्यांमध्ये आणून सोडत. थोडक्यात, वाया गेलेल्या मुलांचे क्षेत्र म्हणजे नाटक, असे सामाजिक समीकरण होते, त्या काळात म्हणजे १८९४ साली दसर्याच्या दिवशी, दत्तात्रेय फाटक, गोपाळ वाड, वामन काशीकर, दत्तात्रय परांजपे, दातार या १६ वर्षे वयाच्या हुशार अभ्यासू तरुणांनी ‘स्टुडंटस् सोशल क्लब’ या नाट्य मंडळाची स्थापना केली. संस्थेत पालकांचा विरोध जुमानून तरुण मंडळी हळूहळू जमा होऊ लागली.
ही सगळी मुलेही ग्रॅज्युएट, वकील, शिक्षक वगैरे झाल्यावर, समाजाने १९०० सालानंतर, नाटक हे हुशार मुलांचे क्षेत्र आहे हे मान्य करायला सुरुवात केली, आणि या पहिल्या हौशी नाट्य संस्थेला समाजमान्यता मिळू लागली. पुढे तर सोशल क्लब नाट्य मंडळांचे सदस्य असणे प्रतिष्ठेचे झाले. अनेक शिक्षकही सभासद होऊन नाटकात काम करू लागले. अनेक तरुण स्त्रिया बॅकस्टेजला मदत करू लागल्या. ‘नाटक्या’ या तिरस्करणीय शब्दाला हळूहळू लोक विसरू लागले.
महाराष्ट्रात १९०५ सालापासून नाट्य संमेलने सुरू झाली. त्या वेळी कोणतीच व्यावसायिक संघटना अस्तित्वात नसल्याने संमेलनांच्या छोट्या-मोठ्या जबाबदार्या उचलून पहिल्या. १० पैकी ६ ते ७ नाट्य संमेलनांच्या यशात सोशल क्लबचा सिंहाचा वाटा होता. हे कार्य विधायक वाटल्यामुळे या संस्थेला लोकमान्य टिळकांचा पाठिंबा मिळाला. हे सरकारच्या लक्षात येतात सावधगिरी म्हणून ब्रिटिश शासकांनी या संस्थेवर आपले लोक नेमले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भरत मुनींना आदरांजली म्हणून ‘स्टुडंटस् सोशल क्लब’चे नाव बदलून ते ‘भरत नाट्य संशोधन मंदिर’ असे करण्यात आले. एकांकिका ही अविष्कार पद्धती आजच्या तरुणांनी जवळची मानली आहे. ‘भरत नाट्य मंदिर’ या सर्वांची पंढरी आहे. पुरुषोत्तम, फिरोदिया करंडकपासून ते राज्य नाट्य स्पर्धेपर्यंत विविध स्पर्धा याच ठिकाणी होतात. त्यात आंतर बँक एकांकिका स्पर्धा, रोटरी क्लब एकांकिका स्पर्धा, भरत करंडक, आयटी करंडक, कामगार कल्याण स्पर्धा, संस्कृत नाट्यस्पर्धा, एकपात्री बहुरूपी अभिनय स्पर्धा, मौनांतर (मूकनाट्य) स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा असे अनेक प्रयोग भरतमध्ये होतात. कुणी मानो अथवा न मानो, या मंचावर वावरलेल्या गतपिढ्यांची पुण्याईदेखील आहे. म्हणूनच पु.ल. देशपांडे, राजा परांजपे, राजाभाऊ नातू, राजा गोसावी, शरद तळवलकर, चित्तरंजन कोल्हटकर, भक्ती बर्वे या साऱ्यांनी आणि अशा अनेकांनी भरतवर अपेक्षा विरहित प्रेम केले आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply