‘रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी’ म्हणजे कोकणच्या शिक्षण क्षेत्रातील दीपस्तंभ. या संस्थेच्या देदिप्यमान प्रवासाचा हा आढावा…
निसर्गसंपन्न कोकणातील ‘रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी’चा सर्व प्रवास हा एखाद्या वटवृक्षाच्या समृद्ध विस्ताराचा प्रवास आहे. कोकणातील शैक्षणिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन वाटचालीतील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे योगदान हा अभिमानाचा विषय आहे. या संस्थेचे शैक्षणिक चळवळीतील कर्तृत्व दीपस्तंभासारखे आहे.
कै. बाबुराव जोशी आणि मालतीबाई जोशी यांनी लावलेल्या बीजाचा एक महावृक्ष होतानाचा हा प्रवास आहे. १५ नोव्हेंबर १९३३ रोजी स्थापन झालेल्या या संस्थेत आज १४ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर, इस्रोचे वसंतराव गोवारीकर हे ‘गोगटे जोगळेकर महाविद्यालया’त अध्यापन करीत होते. महाविद्यालयाने नॅकचे ‘ए’ दर्जाचे मानांकन मिळवले आहे. या वर्षी संस्थेच्या अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य मुकादम बारावीच्या परीक्षेत, तर शिर्के प्रशालेचा तेजस साखळकर सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आले. पूर्वा किनरे हिने आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत रौप्य पदके मिळवली. सिंहावलोकन, कालानुरुप बदल आणि त्यासाठी सकारात्मक विधायक दृष्टीकोन या त्रिसूत्रीने संस्थेचा प्रवास चालला आहे.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या प्रत्येक घटकाला विशाल मैदाने लाभली असून, ती कधीही रिकामी नसतात. संस्थेने राबविलेल्या क्रीडा धोरणाचा पुरवलेल्या साधनसामग्रीचा यथायोग्य उपयोग संस्थेतील हजारो विद्यार्थी घेत आहेत. ‘सर्वांसाठी खेळ आणि खेळांसाठी सर्व’ या धोरणातून निर्माण झालेली स्पर्धात्मक क्रीडावृत्ती जोपासण्यासाठी संस्थेने एक महत्त्वाचा उपक्रम गेल्या वर्षी केला. लंडन ऑलिम्पिकच्या पूर्वसंध्येला संस्थेतील सर्व खेळाडूंची एक महारॅली काढून आजपर्यंत ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पृहणीय यश मिळविलेले त्या सर्व खेळाडूंचा गौरव केला. या निमित्ताने संस्थेच्या क्रीडाधोरणाचा नावीन्यपूर्ण पुनर्विचार शक्य झाला.
संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी यासाठी संस्थेने सातत्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उपक्रमशीलतेमधून दर्जेदार कार्यक्रम राबविले. शरीराची निरोगि्ता, मनाची शुचिता, आणि बुद्धीची एकाग्रता यांसाठी योगासनांची असलेली गरज लक्षात घेऊन राज्यस्तरीय योग महोत्सवाचं यशस्वी नेटकं आयोजन केलं. विद्यार्थ्यांच्या अंतिम भल्याची जबाबदारी आपल्यावर आहे, ही संस्थेला जाणीव आहे. त्यामुळे संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला निश्चित स्वरूपाची दिशा मिळावी, या हेतूने उद्योगपती श्री. दीपक घैसास यांचे ‘स्वतःच्याच पेशीतून स्वतःलाच जीवदान’ या ‘स्टेम सेल’च्या संकल्पनेचे विज्ञानाच्या दृष्टीतून केलेले मार्गदर्शन हा महत्त्वाचा टप्पा आहे. कष्ट, जिद्द आणि आपल्या मातीशी इमान राखण्याच्या वृत्तीने दीपक घैसास यांनी उभारलेले उद्योगविश्व त्यांचा प्रवास त्यांचे विचार आणि दूरदृष्टी हे भावी नागरिकांना उपयुक्त ठरणारे प्रबोधन होते.
स्थैर्य येण्यासाठी अचूक मार्गदर्शनाची, प्रशिक्षणाची आणि योग्य दिग्दर्शनाची गरज असते. रोजगाराभिमुख नवे अभ्यासक्रम स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन हे तर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे वैशिष्ट्य आहे. संस्थेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्याला इंग्रजीबरोबरच एखाद्या पाश्चात्य भाषेचे ज्ञानही गरजेचे आहे. जर्मन भाषेचा सुरू झालेला वर्ग आज रत्नागिरीतील पहिला आणि एकमेव ठरला आहे. कोकणात बुद्धिमत्ता असूनही स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी अभावानेच आढळतात. या संदर्भातील योग्य मार्गदर्शनासाठी ‘अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमी’ सुरू करून विद्यार्थ्यांना करिअरच्या वेगळ्या वाटा धुंडाळण्यासाठी प्रवृत्त केले.
कोकण प्रज्ञा शोध परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची ओळख व सराव होण्यासाठी कोकणातील तीन जिल्ह्यांत उपक्रम राबविला जातो. आपल्या विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूमार्फत कॉर्पोरेट क्षेत्रात रोजगाराच्या चांगली संधी निर्माण होण्याकरीता प्लेसमेंट सेल सुरू करून अभियान गतिमान करण्याचे नियोजन आश्वासक आहे.
कम्प्युटर, मोबाइल, इंटरनेट आणि विविध टीव्ही वाहिन्यांच्या गदारोळात आजच्या विद्यार्थ्यांचे भावनात्मक खच्चीकरण होते आहे, त्यांच्या संवेदना हरवत आहेत, विविध ताणतणावांना ते सामोरे जात आहेत. अशा विद्यार्थ्यांना अत्यावश्यक जीवनमूल्यांचा परिचय होत नाही. आजकाल वाचन, चिंतन, मनन व ध्यान या प्रक्रिया मंदावत आहेत. यास्तव वाचन संस्कारामधून व्यक्तिमत्व विकास संस्थेला अभिप्रेत आहे. विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रवृत्त करणे, त्याची कृतिशीलता, सर्जनशीलता, चिकित्सक वृत्ती वाढीला लावणे, जीवनविषय जाणीवा समृद्ध करणे या प्रमुख उद्दिष्टांनी प्रेरित होऊन संस्थेचा ‘वाचू आनंदे’ हा संस्थेचा उपक्रम चळवळीच्या मार्गाने विस्तारत आहे.
भविष्यातील अनेक उपक्रम केवळ विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून संस्था सुरू करीत आहे. एका विशिष्ट टप्प्यावरच्या सिंहावलोकनातून हा बदल शक्य झाला आहे. त्यासाठी पोषक वातावरणाची, सर्वसमावेशक प्रवृत्तींची, अंतिम ध्येय निश्चित असणाऱ्या सकारात्मक विधायक व्यवस्थापनाची गरज असते. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या वटवृक्षाचे भरणपोषण या सर्वांतून होत आहे. पालकांचा सार्थ विश्वास, प्रामाणिकपणे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची साथ यातूनच वटवृक्ष अधिकाधिक बहरत जाणार आहे.
–ॲड. विलास पाटणे.
(लेखक रत्नागिरी एज्युकेशन संस्थेचे कार्याध्यक्ष आहेत)
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply