
२७ मे १९५१ रोजी मुंबईतील तारापोरवाला मत्स्यालयाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते उदघाटन झाले होते. सर्व बाजूने सागराने वेढलेल्या मुंबईला सागरी मत्स्यसंशोधन केंद्र असावे अशी संकल्पना प्रथम १९२३ साली बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेचे कार्यवाहक श्री.मिलार्ड यांनी शासनापुढे मांडली. याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने मत्स्यव्यवसाय संचालक यांच्या नेतृत्वाखाली १९२६ साली तज्ञसमिती नेमली. दुसऱ्या महायुध्दानंतर मत्स्यालय उभारणीला चालना मिळाली.
मुंबईतलं अतिशय जुनं आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळाचं अगदी सुरुवातीला म्हणजे २७ मे १९५१ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या मत्सालयाच्या बांधकामासाठी डी. बी. तारापोरवाला या निसर्गप्रेमी दाम्पत्याने दोन लाख रुपये देणगी दिली होती. केवळ निसर्ग प्रेमी श्री. डी. बी. तारापोरवाला यांनी १९४५ साली दिलेले दोन लाखाच्या रुपयांच्या देणगीमुळे आणि शासनाने दिलेल्या समुद्र तटावरील मोठ्या भूखंडामुळे तारापोरवाला मत्स्यालय उभारणे शक्य झाले. त्यावेळी हे मत्सालय उभारायला ८,९०,९०४ रुपये इतका खर्च आला होता.
तारापोरवाला मत्स्यालयाचे एकूण क्षेत्रफळ ४३६९ चौरस मीटर असून त्यापैकी १३६९ चौरस मीटरवर मत्स्यालयाची विद्यमान इमारत उभी आहे. काळाची गरज ओळखून सुमारे २१ कोटी रुपये खर्चून त्याचं नूतनीकरण करण्यात आलं आहे. सिंगापूमधील जॉर्जिया मत्स्यालयाप्रमाणे तारापोरवाला मत्स्यालयही अंडरग्राऊंड करण्याचा विचार पुढे आला होता. पण, मरीन ड्राईव्हचा उथळ समुद्र या प्रकारच्या मत्स्यालयासाठी योग्य नसल्याने हा प्रस्ताव बारगळला. मग, आहे त्याच जागेत आधुनिक पद्धतीने मत्स्यालयाची उभारणी करण्याचा निर्णय झाला. १८० अंशांमध्ये खाऱ्या पाण्यातील मासे ठेवण्यात आले आहेत. ही काच ॲक्रेलिकची असून, अशा प्रकारे मत्सालय असलेलं हे भारतातलं एकमेव मत्सालय असल्याचं तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे मत्सालयाच्या प्रवेशद्वारापाशीच लोकांची उत्कंठा शिगेला पोहोचते.
प्रवेशद्वारापाशीच आपल्याला भव्य भुयारी मत्सालय ठेवण्यात आलं आहे. प्रवेशद्वाराच्या समोरच पांढऱ्या रंगांतलं माशाच्या आकारातलं कारंज पाहायला मिळतं. त्या कारंज्याच्या बाजूने मुख्य प्रदर्शनी हॉलमध्ये जाता येतं. दर्शनी भागात प्रवेशद्वाराजवळ ओशनेरियम सदृश्य पाण्याचा टँक उभारण्यात आल्यानं आपल्याला समुद्रातून चालत जात असल्याचा नि भोवताली मासे असल्याचा सही फिल मिळतो. आतल्या भागात जुन्या साध्या काचांऐवजी पारदर्शक फ्लेक्सी काचा बसवण्यात आल्यानं टँकमधले मासे नि जलजीव अगदी जवळून पाहता येतात. या मत्सालयात विविध प्रकारच्या माशांच्या सुमारे ४०० जाती ठेवण्यात आल्या आहेत. या मुख्य हॉलमध्ये खाऱ्या पाण्यातील आणि गोडया पाण्यातील मासे असे दोन मुख्य गट तयार करण्यात आले आहेत. खाऱ्या पाण्यात आढळणाऱ्या माशांच्या २०० तर गोडय़ा पाण्यात आढळणाऱ्या २०० जाती ठेवण्यात आल्या आहेत. खाऱ्या आणि गोडया पाण्याचे सतरा ते अठरा टँक आहेत. पैकी गोडया पाण्याचा विभाग हा मध्यभागी करण्यात आला आहे. खाऱ्या पाण्याचा विभाग सागरी कासवाचा टँक सुरू होतो. आणि त्याच्या बाजूला डॅम्सेल, बटरफ्लाय, एंजल, ट्रिगर, कावळा मासा, किळीस, वाम, स्क्विरल, पोम्पॅनो, ग्रुपर, टँग, कोंबडा, व्हिम्पल, मुरीश, सी ॲनिमल आदी प्रकारचे आणि त्यांच्या प्रजातींचे शोभिवंत माशांचे टँक पाहायला मिळतात.
याचं आणखी एक आकर्षण म्हणजे या ठिकाणी जेली फिश नावाची नवीन टाकी मध्यभागी ठेवण्यात आली आहे. अगदी जेलीसारखा दिसणारा हा मासा अतिशय दुर्मीळ आणि छोटा असून तो पाहण्यासाठी आणि त्याला कॅमेऱ्यात टिपण्यासाठी लोकांची झुंबड उडते. मधल्या गोडया पाण्याच्या विभागातही देश-विदेशातील मासे पाहायला मिळतात.यातील विशेष आकर्षण म्हणजे लक्षद्वीप बेटामधून आणलेले सात प्रकारचे प्रवाळ व मासे. तसेच ‘स्टिंग रे’, ‘शार्क’ किवा ‘काळा मासा’, ‘कासवे’ असे डिस्कव्हरीवर पाहायला मिळणारे समुद्री जीव समोर पाहताना मनाला फार आनंद मिळतो. खरं म्हणजे प्रत्येकालाच प्रत्येक माशांची माहिती असेलचं असं नाही. म्हणून या टाक्यांच्या वर त्या माशांचं नाव, त्यांच्या प्रजातीविषयीची माहिती सांगणारे एलईडी टीव्ही प्रत्येक टाकीवर लावण्यात आले आहेत. एलईडी असल्यामुळे स्पष्ट वाचता येतं. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये ही माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे बाहेर पडताना तुमच्या ज्ञानात भरच पडेल यात काही शंका नाही. मुंबईतलं जुनं आणि पर्यटकांच्या नेहमीच आकर्षणाचा विषय असलेलं हे मत्सालय भारतातील महत्त्वाचं पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जातं.
अशा या समुद्री सफर घडवणाऱ्या मत्स्याल्याला भेट देण्याकरिता तुम्ही वेस्टर्न रेल्वेच्या चर्नी रोड स्थानकावरून चालत किंवा टॅक्सीने जाऊ शकता.(सध्या करोना मुळे बंद आहे.)
वेळ:- मंगळवार ते शनिवार- सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत
रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी- सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत.
When it is open now