कुणाचा विश्वास असो वा नसो. माझ्या अनुभवानुसार माझा विश्वास आहे. माणूस गेला की सगळे संबंध संपतात असे म्हटले जाते. पण त्यांचा जीव कुणात तरी गुंतलेला असतो. माझी काकू शेवटच्या काळात बरीच वर्षे माझ्या कडे रहात होती. मूलबाळ नव्हते म्हणून आम्हालाच तिने आईच्या मायेने वाढवले होते. खूप कष्ट घेतले होते आमच्या साठी. शेवटी तिचे सोवळे ओवळे शहरात नीट सांभाळले जात नाही आणि माझ्या मोठ्या मुलीला सांभाळायला म्हणून आली ती इकडेच राहिली. किती वेळा सांगूनही ऐकायची नाही. कामं करत असायची. माझ्या लहानबहिणीचे पूर्ण कुंटुब अपघातात गेले. हा धक्का सहन झाला नाही. ती खचून गेली आणि तिला बसलेली उठताच आले नाही. तशा अवस्थेतही सरकत सरकत काम करत होती. आणि एकदा रागाने तिला म्हटले की तुला कामे करावेसे वाटतात ना मग या कोपर्यात बसून माझी कामं बघून समाधान मानत जा. आपण दोघी गप्पा मारत जाऊ. आणि तशीच बसून ती माझ्या सगळ्या हालचाली बघून समाधानी होती. ती गेली त्याच दिवशी एक कुत्र्याचे पिल्लू मला गटारात वहात असलेले दिसले म्हणून त्याला बाहेर काढले. मुलांनी ते पाळायचे ठरवले. ती जिमी मोठी झाली. ती स्वयंपाक घरात आलेली मला आवडत नसायची. त्यामुळे मी एकदा तिला रागावून सांगितले या कोपर्यात बसून रहा. आणि एक पोत्याचा तुकडा दिला बसायला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खरच ती तिथे बसून माझ्या हालचाली कडे इकडे तिकडे मान वळवून बघत असताना मला वाटायचे की काकूच बघत आहे. म्हणून मी तिच्या बरोबर बोलत रहायची. खूप वेळ झाला तरी उठायची नाही. माझे काम संपले की बाहेर जायची…
असाच अनुभव माझ्या मुलीचे सासरे फेब्रुवारी महिन्यात गेले. पण त्यांचा जीव नातवावर होता. तो खोडकर होता म्हणून लेक सारखी त्याला रागवायची अभ्यासावरून ओरडायची. या वर्षी तो दहावीला गेला. म्हणून जास्तच सूचना मिळायच्या. एकदा आई ओरडली म्हणून तो गॅलरीत उभा होता. एक पोपट आला. हा जवळ गेला तरी उडाले नाही म्हणून तो आत गेला व गहू आणून हातात धरून खाऊ घातले. बहिण जवळ आली तरीही ते तिथेच खात राहिले. हे पाहण्यासाठी आई व आज्जी आल्यावर ते त्यांच्या कडे पाहून उडून गेले. मुलींनी हे सांगितल्यावर मी सहजच बोलून गेले होते की त्याच्या आजोबांना याची काळजी वाटत असेल म्हणून ते आले असतील. सगळ्यांना पटले की नाही माहित नाही पण मला मनापासून वाटते ते असे अचानक तोंडून बोलून जाते मी…. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. विश्वास ठेवायचा की नाही तो.पण इतरांच्या भावना दुखावल्या जातील असे मत व्यक्त करु नये कृपया.
धन्यवाद.
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply