एक दिवस एक व्यक्ती स्वर-मंचच्या ऑफिसमध्ये आली. त्यांचे नाव संजय पवार. रूबाबदार व्यक्तिमत्त्व आणि खर्जामधील लक्षात राहण्यासारखा आवाज. एका निराळ्या कामासाठी ते भेटायला आले होते. पण समोर हार्मोनियम पाहून त्यांनी चक्क गाणे ऐकवण्याची विनंती केली. हा माणूस गझलचा निस्सीम चाहता होता. त्यांचे काम काही झाले नाही. पण आमची मैत्री झाली. लवकरच त्यांनी ‘प्रेशिया फार्मा’ नावाची स्वतःची कंपनी काढली. या कंपनीसाठी लोणावळा येथे माझा गझलचा कार्यक्रम आयोजित केला. तेव्हापासून त्यांचा असा एकही समारंभ नाही की ज्यासाठी मी उपस्थित नाही. स्वर-मंचचाही असा एकही कार्यक्रम नाही ज्याला ते उपस्थित नाहीत. गाण्यामुळे असे अनेक चाहते आणि मित्र मला मिळाले.
माझ्या पुढील गझलच्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध क्रिकेट समालोचक सुरेश सरैय्या यांची उपस्थिती लाभली. काही कार्यक्रम महाराष्ट्राबाहेर केल्यानंतर आषाढी एकादशीनिमित्त ‘विठ्ठल विठ्ठल’ हा अभंगांचा कार्यक्रम अरविंद खेर यांच्या स्वबोध परिवारासाठी गडकरी रंगायतनमध्ये सादर केला. यावेळी ‘हरिपाठ जसा समजला तसा’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. नंतर ‘गाणी आवडणारी’ हा मराठी व हिंदी लोकप्रिय गाण्यांचा कार्यक्रम आम्ही स्वर – मंचतर्फे केला.
याच वेळी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन माझ्या नकळत सुरू झाले होते. माझ्या नातलगांनी, मित्रमंडळींनी, पत्नी प्रियांका आणि मुलींनी माझ्या पन्नासाव्या वाढदिवसाचा मोठा कार्यक्रम करायचे ठरवले होते माझे मित्र हेमंत रणदिवे यांनी माझा आवडता सेरेमोनियल हॉल बुक केला होता. कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था केली होती. आमच्या स्वर – मंच अॅकॅडमीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी गाण्याचा कार्यक्रम बसवला होता. मला याची कोणतीही कल्पना नव्हती. ‘वाढदिवसाच्या दिवशी कुठेही कार्यक्रम घेऊ नका हं बाबा!’ एवढेच शर्वरी आणि केतकी मला म्हणाल्या होत्या. माझी आईदेखील त्यांनाच सामील होती. १४ ऑक्टोबर २०१२ रोजी सकाळी देवदर्शनाला जाऊ या म्हणून मला या मंडळींनी सरळ हॉलवर नेले. तिथे माझी वादक कलाकार मंडळी आणि गाण्याच्या कार्यक्रमाची तयारी पाहून मी काय ते समजलो. हे एक मात्र छान केले. माझा पन्नासावा वाढदिवस गाण्याशिवाय कसा होणार? आणि माझ्या विद्यार्थ्यांनी खरोखरच अतिशय प्रेमाने गाण्याचा छोटा कार्यक्रम सादर केला. माझ्या दोन्ही मुली शर्वरी आणि केतकी या कार्यक्रमात गायल्या. गाण्यावरील प्रेमाचा प्रवाह पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला होता. मला तरी अजून काय हवे होते? मला पन्नास दिव्यांनी ओवाळण्यात आले. माझ्या सर्व नातेवाईकांनी आणि मित्रांनी अभिष्टचिंतन केले. गाण्यासाठी मला सांगण्यात आले. कोणतीही पूर्वतयारी न करता स्टेजवर होणारा हा माझा पहिलाच कार्यक्रम होता. तसेच कोणतीही मेहनत न घेता आयोजित होणाराही हा माझा पहिलाच कार्यक्रम होता. या सर्व जिवलगांनी एक अलोट समाधान मला दिले. छोट्या केतकीने ‘हॅप्पी बर्थडे बाबा’ असे स्वतः रंगवलेले ग्रिटींग कार्ड मला दिले. आत्तापर्यंत मला मिळालेली ही वाढदिवसाची सर्वात मोठी गिफ्ट होती.
-अनिरुद्ध जोशी
Leave a Reply