अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मध्ये सतिश भावसार यांनी लिहिलेला हा लेख
मुलीचे डोहाळेजेवण संपल्यावर तिच्याशी निवांत बोलत होतो. मला व माझ्या अर्धांगिनीला आजोबा व आजी होणार म्हणून अनेकांच्या शुभेच्छा मिळाल्या होत्या. आम्ही आजी-आजोबा होणार म्हणजे खरंच का आम्ही म्हातारे झालोय हा विचार मनात सारखा घोळत होता. परंतु मन ते मानायलाच तयार नव्हतं, आपण मनाने एवढे तरूण असताना म्हातारे कसले. त्याक्षणी मात्र बालपणीचे ते दिवस नयनचक्षूपुढे चमकू लागले.
वडील आर्मीत नोकरीला होते. त्यामुळे वयाच्या तेराव्या वर्षापर्यंत आमचे कॅम्पच्या शाळेत शिक्षण झाले. त्यांची शिस्त अंगी बाणली. ते जिवनच वेगळे होते. त्यामुळे बाहेरच्या जगाची काहीच कल्पना नव्हती. त्यावेळी माझे मित्र पंजाबी, मुसलमान देखील होते. त्यामुळे पंजाबी मित्राबरोबर मी गुरूद्वारात जात असे तर मुसलमान मित्रांबरोबर मस्जिदमध्ये देखील जात असे. त्यात वावगे असे कधी वाटतच नसे. धर्म, जात हे विचारच त्यावेळी मनाला शिवत नसत आणि आजही माझी तीच विचारधारणा आहे. त्यामुळे मंदीर, मस्जिद अथवा गुरूद्वारात कुणीही जायला काय हरकत आहे अशी माझी ठाम भूमिका आहे. वातावरणातील हवा सर्वांसाठी खुलीच आहे ना तद्वतच सर्वीकडे सर्वांना प्रवेश मुक्त असावा. सर्वजण एकाच प्रकारचे अन्न खातातच ना? आजही मी तळेगावच्या गावाबाहेरील दलित वस्तीत मित्राच्या घरी जेवायला जातो.
आम्ही मूळचे अंमळनेरचे. तात्या म्हणजे माझे वडील साने गुरुजींचे सहाय्यक. पण वडिलांच्या सततच्या बदल्यांमुळे मी, माझी आई व तीन भावंडे भारतभर फिरलो. माझा जन्म बेळगावचा.आई बेळगावला स्थिरावली. बेळगावला एक मोठा तलाव आहे. मित्रमंडळी नेहमी तिथे पोहायला जायची. आई मला परवानगी देईना. परंतु मी एक दिवशी गुपचूप मित्रांबरोबर पोहायला गेलो. हळूहळू पोहायला शिकलो. आजही मी कुठेही पोहू शकतो. तात्या नेहमी निरनिराळ्या ठिकाणी सीमेवर जात होते. त्यामुळे माझ्या शाळाप्रवेशाचा मुहूर्त लागत नव्हता. मी शाळेत प्रवेशासाठी गेलो ते मला पहिलीत प्रवेश देऊ इच्छित होते ते मला मान्य नव्हते. शेवटी सरांनी माझी परीक्षा घेतली व मला थेटरित्या तिसरीत प्रवेश दिला. कारण माझी आई माझा अभ्यास नीट करून घेत होती. तात्यांच्या निवृत्तीनंतर आम्ही देहूच्या कॅम्पमध्ये राहू लागलो. तिथल्या शाळेत जाऊ लागलो. वडिलांचा अट्टाहास असायचा की, शाळेत पहिला नंबर यायला हवा. मी एरवी जेमतेम अभ्यास करून पास होत होतो. थोडा जोर लावला तरी एका विद्यार्थ्याचाच कायम पहिला नंबर. मी खूप अभ्यास करूनही तो नंबर का मिळत नाही हे मला कळेना. म्हणून मी एका परीक्षेत त्याच्या पेपरची कॉपी केली तरी देखील परीक्षेत त्याचाच नंबर पहिला. मला समजेना. एका विद्यार्थ्याने मला समजावून सांगितले की, तो सरांना धान्य व भुईमुगाच्या शेंगा देतो म्हणून त्याचा पहिला नंबर कायम राहातो. आता ही गोष्ट वडिलांना सांगता येत नव्हती. सातवीनंतर शाळा बदलली. मग मात्र मी जेमतेम अभ्यास करूनही पहिला नंबर मिळवायचो व पूर्वीच्या शाळेत ज्याचा कायम पहिला नंबर यायचा तो सर्वसाधारण गटात आला. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मी पहिल्या क्रमांकाची बक्षिसे मिळवली. ११ पैकी ११ बक्षिसे मिळविली. त्यातील एक बक्षीस मुलींसाठी असल्यामुळे एक बक्षीस मुलीला द्यावे लागले. त्या शाळेतून मी एस.एस.सी. चांगल्या गुणांनी पास झालो. वडिलांना मी डॉक्टर व्हावे असे वाटत होते. त्यांच्या एका डॉक्टर मित्राने मला ‘ग्रे’चे मोठे पुस्तक भेट म्हणून दिले. मी ते मनापासून वाचून काढले. वाचल्यावर लक्षात आले की, त्यातील जी औषधांची माहिती दिली आहे ती माहिती आत्मसात केली की, झालो एक्स्पर्ट. यात तुमच्या बुद्धीमत्तेला आव्हान ते काय? चित्रकार झालो तर त्यात तुमच्या कल्पनाशक्तीला आव्हान असते ना!
माझे वडील छान चित्रे काढीत. मला देखील बालपणापासून चित्रे काढावयाची आवड होती. मला त्यात करियर करायची इच्छा होती परंतु त्याला वडीलांचा विरोध होता. शेवटी त्यांचा विरोध पत्करून मी पुण्याला अभिनवमध्ये प्रवेश घेतला. वडिलांना ते आवडले नाही. त्यांनी मला कसलीही आर्थिक मदत देणार नाही असे सांगितले. कारण त्यांची ठाम समजूत होती की, चित्रे काढून मी पोट भरू शकणार नाही. मी अक्षरश: वडापाव खाऊन शिक्षण घेत होतो. त्यावेळी एका मित्राने काही पुस्तकांची कव्हर्स काढण्याचे काम दिले व त्यातून मला बयापैकी पैसे मिळाले आणि मला मुंबईला जाण्यासाठी सोय झाली. मोहन वरीयन या तामीळ चित्रकाराकडे एका मित्राने नेले. त्यांनी मला एका पुस्तकाचे कव्हर काढायला सांगितले. मी तसे काढले. ते बघितल्यावर त्यांनी मला चित्रकलेच्या महाविद्यालयात जायला योग्य आहे असा अभिप्राय तर दिलाच परंतु मी भविष्यात एक उत्कृष्ट चित्रकार होईन असा तोंडभरून आशीर्वाद देखील दिला.
मला वाचनाची प्रचंड आवड होती. गुलशन नंदाच्या सर्व कादंबया मी वाचून काढल्या. एकदा गुलशन नंदा आमच्या कॅम्पमध्ये आले होते. तात्यांनी माझी त्यांच्याशी भेट घडवून आणली. त्यांच्या कादंबरीमधील प्रसंग त्यांना मी सांगितल्यावर त्यांनी एवढ्या लहान वयात माझे एवढे वाचन आहे याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. त्या काळात मी हिंदीतील कादंबऱ्या वाचत होतो. विजय माडगावकर नावाच्या माझ्या मित्राने मला वि. स. खांडेकरांची ‘दोन ध्रुव’ ही कादंबरी मला वाचायला दिली. मग मात्र त्यानंतर वि. स. खांडेकर, बाबूराव अर्नाळकर, जयवंत दळवी, बाबा कदम यांची पुस्तके वाचू लागलो. परंतु आताही कायम लक्षात आहे ती मला गुलशन नंदांनी मारलेली मिठी.
वडील आर्मीतील त्यामुळे त्यांचे शरीर बलदंड. आपण बुक्का मारून कांदा फोडतो तसे ते नारळ बुक्का मारून फोडत. त्यामुळे झालेल्या चुका किंवा परीक्षेत पहिला नंबर न मिळाल्यावर त्यांच्या हातचा प्रसाद हा महाप्रसादच असायचा. त्यामुळे तो कसा चुकवायचा हाच माझ्यापुढे प्रश्न असायचा.
१९६२ च्या युद्धाच्यावेळी तात्या सीमेवर होते. तिथे बॉम्बस्फोट झाला या बातमीने आईने हंबरडाच फोडला. आईच्या सांत्वनासाठी मुस्लीम, पंजाबी स्त्रियादेखील धावून आल्या. अल्ला सर्व ठीक करेल, तर गुरूद्वारातील प्रार्थना तात्यांना सुखरूप परत येऊ देतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तात्यांच्या पोटात एक बॉम्बचा तुकडा गेला होता. ऑपरेशनने तो काढला. युद्धानंतर आर्मीत घोषणा झाली की, १ रुपया देऊन सैनिकांनी पकडलेल्या वस्तूंपैकी नेता येतील तेवढ्या वस्तू घरी घेऊन जाव्यात. त्यातील एक मोठी पेटी व न फुटलेला एक बॉम्ब मी अजूनही आठवण म्हणून माझ्या तळेगाव येथील घरी ठेवला आहे.
पठाणकोटची एक आठवण माझ्या मनात कायम आहे. आर्मीत मेस असायची. लंगरमध्ये मी जायचो. तेव्हा भाजी आलेली नसायची. मी बेसकॅम्पमध्ये जायचो व तिथून तीन तीन लीटर दूध व भरपूर भाज्या घेऊन यायचो.
आताच्या जगात वावरताना ते बालपणीचे दिवस आठवतात. ते दिवस अनोळखी होते. परंतु त्यांनी माझ्या बालमनावर कोरलेले संस्कार चिरतरूण आहेत. एकात्मतेची भावना कायम आहे. जातीभेद अजूनही मनाला शिवत नाहीत. ते दिवसच तसे होते. आता म्हणूनच ते अनोळखी झालेत.
— सतिश भावसार
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मधून)
Leave a Reply