मी आणि अय्यर जिवश्चकंठश्च मित्र होतो. आता होतो असंच म्हणायला हवं. कारण अय्यर आता हयात नाही. नाही तरी कसं म्हणावं? कदाचित असूही शकेल. असला तरी देखील तो मला आणिमी त्याला या पृथ्वीतलावर भेटू शकणार नाही हे मात्र निश्चित.
अय्यर दाक्षिणात्य आणि मी महाराष्ट्रीयन. आम्ही दोघंही दिल्लीला केंद्रीय गुप्तच विभागाच्या अँडव्हायजरी बोर्डात काम करत होतो. आम्ही दोघेही सडेफटिंग. दोघांचेही फ्लॅेटस एकाच बिल्डिंगमध्ये आणि एकाच माळ्यावर एकमेकांना लागून होते. मी एकटाच माझ्या फ्लॅटमध्ये राहात होतो. अय्यरजवळ त्याचे आईवडिल आणि त्याची बहीण अशी मंडळी होती. अय्यर आणि मी दोघेही अविवाहित. मी एकटाच राहात असल्यामुळे अय्यर मंडळीकडून मधून मधून माझ्याकडे दाक्षिणात्य खाद्यपदार्थ पाठवले जायचे. हे काम बहुधा अय्यरची बहिण सुमेधा हिच्याकडे असायचं. काळी सावळी पण स्मार्ट सुमेधा मला आवडायची. खाद्यपदार्थातील नारळाच्या अती वापरामुळे दाक्षिणात्य मुलींचे केस काळेभोर आणि लांबसडक असतात. आणि चेहर््यावरही एक प्रकारचा तुकतुकीतपणा असतो. सरळ नाक आणि नाकांत चमकी हे दाक्षिणात्यांचं वैशिष्ट्य सुमेधामध्ये होतं. सानुनासिक दीर्घ हेल काढून बोलण्याचं दाक्षिणात्यांच वैशिष्ट्य सुमेधामध्ये देखील होतं. लँग्वेज स्टडी डिपार्टमेंट मध्ये ती फ्रेंच भाषा शिकत होती. बरीच चौकस आणि धीट होती. मराठीत कशाला काय म्हणतात ते ती नेहमी मला कुतुहलानं विचारायची. आणि जेव्हां मी तिला तो शब्द सांगायचो तेव्हा ती “’उय्योय्यो !” असं विस्मयानं म्हणत ओठांचा लाडिक चंबू करायची. एकदा तर तिनं महाराष्ट्रीयन मुली लाजल्यावर काय म्हणतात म्हणून मला विचारलं. मी जेव्हा तिला सांगितलं. त्या ‘इश्श’ म्हणतात आणि खूप लाजतात तेव्हा तिनं तो शब्द उच्चारला आणि मग मात्र ती अगदी महाराष्ट्रीयन मुलीप्रमाणेच खरीखुरी लाजली. महाराष्ट्रीयन काय आणि दाक्षिणात्य काय ! भावभावना चेहऱ्यानं व्यक्त करण्याची पध्दत एकच असते. तिला कांही भाषेचा अडसर नसतो हेच खरं.
मधून मधून माझे आईवडिल माझ्या फ्लॅटवर काही दिवसांकरीता राहायला यायचे. त्यावेळी सुमेधा माझ्या आईला दाक्षिणात्य पदार्थ कसे करायचे ते शिकवायची. आईला देखील सुमेधा आवडू लागली आणि मला? हो मला देखील. ही झाली या कथेची पार्श्वभूमी. पण खरी कथा वेगळीच आहे. ती कथा आहे अय्यरची
केंद्रीय गृहविभागात अनेक वेळा काही गंभीर घटनांबाबत मार्गदर्शनकरीता आम्हा अँडव्हायजरी बोर्डातल्या सदस्यांना आमंत्रित केले जात असे. आमचा सल्ला मार्गदर्शनात्मक स्वरुपाचा असायचा. तो मानला जाणं बंधनकारक नसायचं. त्यादिवशी अचानक गृहविभागाचे प्रमुख अधिकारी खन्ना यांनी अँडव्हायजरी बोर्डातल्या आम्हा सहा सदस्यांना मिटींगकरता तातडीनं बोलावून घेतलं. त्यात अय्यर आणि मी आम्ही दोघेही होतो. अय्यरविषयी एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. तो मितभाषी होता. बोलायचा पण अगदी थोडक्यात. कांही वेळातर त्यांचं बोलणं सांकेतिक स्वरुपाचं वाटायचं. त्याच्या बोलण्याचा अर्थ आपणच गेस करायचा. अर्थ लागलाच नाही तर मात्र त्याला बोलकं करण्याकरिता प्रयत्न करावा लागत असे. त्यामुळे विक्षिप्त स्वभावाचा गृहस्थ म्हणून तो परिचितांमध्ये सुविख्यात होता.
खन्ना साहेबांनी मिटींगला सुरुवात केली. मित्र हो ऽऽ! पाल्हाळात वेळ न घालवता मी सरळ मुद्यालाच हात घालतो. मित्रहो ऽऽ! गुप्तचर यंत्रणेकडून तातडीचा आणि महत्वाचा संदेश आला आहे. त्यानुसार यूनोमध्ये लवकरच एक ठराव पारित होणार असल्याची एक खात्रीलायक बातमी झिरपत झिरपत आमच्यापर्यंत आली आहे.
त्या बातमीनुसार लवकरच सर्वच देशांमधली फाशीची किंवा मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्याबाबत ठराव पारित केला जाणार आहे.
त्यावर उतावीळ अय्यर लगेच म्हणाला, “पण सरऽऽ! या गोष्टीचा आपल्या देशाशी काय संबंध? ”
“वेल ऽऽ ! मी आता तिकडेच वळतोय. मित्र होऽऽ ! असं बघा आपल्या देशात विध्वंसक कार्य करताना चार परकीय अतिरेक्यांना लष्कारानं मोठं साहस दाखवून पकडलं. त्या मोहिमेत लष्कराचे दोन जवान शहीद झाले. तिघं जखमी झाले. आपण त्या अतिरेक्यांवर रीतसर खटला दाखल केला. सगळ्या पुराव्यांची छाननी झाली. आणि सुप्रीम कोर्टानं त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यांनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखला केला आहे. त्या संबंधी महामहिम राष्ट्रपतींचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. आधीच या सगळ्या प्रक्रियेत वीस वर्षे निघून गेली आहेत. दरम्यान यूनोनं मृत्यूदंडावर बंदी आणली तर भारताला यूनो सदस्यत्व आणि एक महत्वाचं नैतिक अधिष्ठान असलेलं राष्ट्र म्हणून पालन करावंच शिवाय भारतात ७ यूनोचं कायम सदस्यत्व मिळण्याकरिता जे प्रयत्न सुरु ठेवले आहेत त्यांत बाधा निर्माण होऊ नये म्हणून युनोच्या त्या संभाव्य ठरावाचं पालन करावंच लागेल. ते चार परकीय अतिरेकी ज्या देशांचे नागरिक आहेत. त्या देशाचं देखील आपल्या नागरिकांबाबत भारत कोणती भूमिका घेतो याकडे बारकाईने लक्ष असणार आहेच. आपण यूनोचा तो संभाव्य ठराव धुडकावून फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली तर मानवतावाद्यांना बोंब मारायला आयतंच फावणार आहे. अतिरेक्यांच्या या प्रकरणात लवकरच उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीबाबतचं गांभीर्य आम्हा सहाही जणांच्या लक्षात आलं.
तेवढ्यात खन्नांचा भ्रमणध्वनी खणखणला. ते म्हणाले, “त्यांना आंत पाठवून द्या.” चपराशाने दार उघडून एका गृहस्थाला आत सोडले. त्यानं एक सीलबंद लखोटा खन्ना यांच्याजवळ दिला. आणि त्यांची एका रजिस्टरमध्ये पोच घेऊन तो निघून गेला. चपराशानं सायलेंसर असलेलं ते दार बंद केल्यावर खन्ना आम्हाला उद्देशून म्हणाले, ‘ मित्र होऽऽ ही डाक खूपच महत्वाची असली पाहिजे लेट मी अटेंड इस्ट फर्स्ट असं म्हणत खन्नांनी लखोट्याच्या सिलांची काळजीपूर्वक तपासणी केली आणि कैची ब्लेड यांचा उपयोग करुन लखोटा उघडला. ते हॉलच्या एका बाजुला गेले. आणि त्या पत्रातील मजकुर काळजीपूर्वक वाचु लागले. त्यांच्या चेहऱ्यावर घामाचं थारोळं जमा झालं. चेहर्यावर गंभीर भाव दिसत होता. त्यांनी आणखी दोन तीन वेळा तरी त्या कागदातला मजकुर वाचला. आणि तो कागद सिक्रेट डॉक्युमेंटस असा मजकुर लिहिलेल्या आलमारीतील एका फाईलमध्ये काळजीपूर्वक ठेऊन दिला. आणि नंतर ते आमच्याकडे वळले.
“मित्र हो ऽऽ ! सॉरी आपल्या कार्यक्रमात मोठाच व्यत्य आला. ओऽऽ ! गॉड !
असं काहीतरी होणार असं वाटतच होतं. पण ते इतक्यातच घडेल असं नव्हतं वाटलं. मित्र हो ऽऽ ! थिंक ऑफ दि डेव्हिल, अँड ही ईज हिअर.”
खन्नांच्या बोलण्याचा आम्हाला काहीच अर्थबोध होत नव्हता. उतावळ्या अय्यरला रहावलं नाही.
“सर ! प्लीज जरा स्पष्ट बोला ना ! आम्हाला कांहीच कळत नाही.”
“सॉरी ऽऽ ! काय झालं ते सांगतो. मी मघाशी वाचलं. त्या पत्रात दोन बातम्या आहेत. पहिली बातमी आहे. “महामहिम राष्ट्रपतींजीनी त्या चार खतरनाक अतिरेक्यांचा दयेचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आणि दुसरी बातमी आहे ती यूनोची. यूनोनं तातडीच्या प्रभावानं जगातली फाशीची शिक्षा रद्द केली आहे. आणि भारतानं युनोच्या या ठरावाला तात्काळ प्रभावानं शतप्रतिशत मान्यता दिली आहे. बरं ज्यांनी वीस वर्षाचा कालवधी तुरुंगात घालवला आहे. त्यांना यापुढे तुरुंगात डांबून ठेवता येणार नाही. असा निर्णय सुप्रीम कोर्टाने नुकताच घेतला आहे. त्यामुळे, या अतिरेक्यांना लगेच सोडून द्यावं लागणार आहे. मित्र होऽऽ ‘! तुम्हाला याबाबत कांही मार्ग सुचवता येतो कां? म्हशीला काठीचा तडाखा तर बसायला हवा. पण काठी तुटता कामा नये, असा असावा तो मार्ग.”
आम्ही सगळे गडबडून गेलो. अशा धोरणात्मक बाबीवर आम्ही सल्ला तरी काय देणार होतो? आम्ही गप्प बसलो. पण अय्यर ताडकन उठून उभा राहिला आणि म्हणाला, “सर 55 तुम्हाला पटणार नाही. पण आपण त्या अतिरेक्यांना जिवंत सोडून द्यायला हवं.” आता मात्र खन्ना प्रचंड संतापले आणि टेबलावर मूठ आदळत ओरडत म्हणाले, “व्हॉटस धिसं नान्सेंस. व्हॉटस धिस स्टुपिडिटी !”
“सर ! मी जे काय म्हणालो ते पुरेशा गांभीर्यानं आणि पूर्ण जबाबदारीनं. सर ! त्या चारही अतिरेक्यांना जिवंत सोडण्याची जबाबदारी तम्ही माझ्यावर सोपवा.”
आम्ही सगळे अवाक झालो. मी अय्यरचा शर्ट ओढून त्याला खाली बसवण्याचा प्रयत्न करु लागलो. खन्ना देखील आता इरेला पेटले. आणि म्हणाले,
“मिस्टर अय्यर, विल यू बी काईंड इनफ टू एक्स्प्लेन यूअर स्टँड? ”
“सर्टनली सर ! आणि त्यानंतर जे अय्यर जे कांही बोलला त्यामुळे आम्ही नव्हे तर खन्नादेखील चक्रावून गेले. आम्ही सगळे स्तब्ध झालो. अय्यर म्हणाला, सर ! एव्हरीबडी कंटिन्यूज इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट ऑर ऑफ युनिफॉर्म मोशन अनलेस अँण्ड अनटील इट इज अँक्टेड अपॉन बाय सम इंग्प्रेस्ड फोर्स”
थोड्याच वेळात खन्ना भानावर आले आणि म्हणाले “मिस्टर अय्यर ! माझा देखील विज्ञानाचा अभ्यास आहे. अँड इफ आय अम नॉट राँग, तुम्ही आत्ताच जे काय सांगितलं तो आहे न्युटनचा गतीविषयक दुसरा नियम.
त्यानुसार गतिमान अवस्थेतली वस्तू जोपर्यंत बाह्य बल वापरलं जात नाही तोपर्यंत ती अविरत आणि अखंड गतीमान अवस्थेतच राहते. ठीक आहे मित्र हो ऽऽ ! आज आपण इथेच थांबू. ”
मिटींग संपली आणि आम्ही बाहेर पडलो. तेवढ्यात अय्यरचा भ्रमणध्वनी खणखणला. अय्यर बोलू लागला. “यस सर ! लगेच येतो.” जाता जाता अय्यर म्हणाला, “खन्नानं मला लगेच परत बोलावलं आहे. खन्नाला माझ्या वरवर विसंगत वाटणाऱ्या बोलण्यात काहीतरी अर्थ दडलेला असावा असा साक्षात्कार झाला असावा.
त्यानंतर काही दिवसानंतरची गोष्ट थुंबा स्पेस सेंटरवर आम्ही सहाजण उभे होतो. अय्यर होता आमचा प्रमुख. आमच्यासोबत ते चार खतरनाक अतिरेकी देखील होते. आम्हा सगळ्यांच्याच अंगावर स्पेस सुट होता. अतिरेक्यांनी गडबड करु नये म्हणून त्या सगळ्यांना गुंगीचं इंजेक्शन दिलेलं होतं.
स्पेस सेंटरवरील एका अंतराळ यानात आम्ही प्रवेश केला. आणि थोड्याच वेळात ते अंतराळयान अंतराळात झेपावले.
अंतराळात भूकक्षेवर ते स्थिर झाल्यावर अय्यरने त्याला गृहखात्याने दिलेले आदेशपत्र वाचून दाखवले. त्या खतरनाक अतिरेक्यांना ऑक्सिजन सिलिंडरसह अंतराळात एका मागोमाग एक असे सोडून देण्याच्या (रिलीझ) मोहिमेचा ‘अय्यर’ हा प्रमुख होता. आणि आम्ही पाच जणांनी त्याला त्या कामांत मदत करावयाची होती. त्यानुसार आम्ही त्या गुंगीत असलेल्या चार अतिरेक्यांना स्पेस क्राफ्टच्या तळाशी असलेल्या बेबी एक्झिट डोअरपाशी आणले आणि अय्यर त्यांना एकामागोमाग एक असे अंतराळात त्या एक्झिट डोअरमधून सोडून देऊ लागला. असं करता करता चवथ्या अतिरेक्याची पाळी आली. त्याचवेळी त्याची गुंगी उतरली. तो सावध झाला आणि एक्झिट डोअरमधून बाहेर ढकलला जात असतांन त्याने काय होत आहे ते कळण्याच्या आत अय्यरला बाहेर खेचून घेतले.
अंतराळात घर्षण शून्य असते. हवा नसते. त्यामुळेच अंतराळातील कोणतीही वस्तू तिला सुरुवातीला जी गती मिळते त्याच गतीने न्यूटनच्या दुसर्या नियमानुसार अव्याहतपणे गतिमान अवस्थेतच राहते.
त्यामुळेच अंतराळात जे चौघे अतिरेकी आणि अय्यर ही पाच मंडळी अंतराळात चिरकालपर्यंत फिरत राहणार होते. त्यांच्या पाठीला बांधलेल्या ऑक्सिजन सिलिंडरमधील ऑक्सिजन संपेपर्यंत ते जिवंत राहणार होते.
याचाच अर्थ भारताने यूनोकडून आलेल्या सूचनेनुसार चारही अतिरेकी जिवंत सोडून दिले होते. त्यांना फाशी दिली नव्हती. हे सगळं योग्य असलं तरी अय्यर मात्र हकनाक त्या घटनेत बळी पडला होता. त्यानंतर काही दिवसांनी माझा सुमेधाशी विवाह करण्याचे ठरले. त्याप्रसंगी खन्ना आवर्जन उपस्थित होते.
सुमेधाचा आणि माझा विवाह अंतराळातील अय्यरच्या साक्षीनं व्हावा म्हणून तो वरुन उघड्या असलेल्या मांडवात करण्यात आला. वरमाला घालतांना त्या माळा दोन्ही हातात अंतराळाच्या दिशेने उंचावत अंतराळातील अय्यरला दाखवत आम्ही एकमेकांच्या गळ्यात घातल्या. त्यावेळी माझ्या सहकाऱ्यांनी आम्हा दोघांच्या डोक्यावर वरुन पुष्पवृष्टी केली. त्याप्रसंगी ते अंतराळातील अय्यरचे प्रतिनिधी बनले होते. आमच्या दृष्टीने आजही अय्यर अंतराळातील अशवत्थाम्याच्या रुपाने जिवंत आहे.
भालचंद्र देशपांडे, नागपूर यांचा उत्तम कथा, (वर्ष – जुलै २०१८) मधील लेख
संकलन : शेखर आगासकर
Leave a Reply