
सूर्यावर घडणार्या लहान-मोठ्या घटना पृथ्वीवर चुंबकीय वादळांसारखे परिणाम घडून आणतात. या घडामोडींचं स्वरूप विध्वंसात्मकही असू शकतं. या घडामोडींचं विश्लेषण अधिक तपशीलवार करता येण्यासाठी आपल्याकडे सूर्याचं त्रिमितीय चित्र असण्याची आवश्यकता आहे. एखादी सौरज्वाला उफाळली तर त्या सौरज्वालेचा विस्तार केवढा आहे, तिचा उफाळ किती व कोणत्या दिशेने आहे, सौरज्वालेतून किती प्रमाणात, कोणत्या दिशेने पदार्थ बाहेर उत्सर्जित केले गेले आहेत, ही सर्व माहिती अधिक वस्तुनिष्ठ स्वरूपात आपल्याला अशा त्रिमितीय चित्रावरून मिळू शकते. पृथ्वीवरील दुर्बिणींतून, तसंच अंतराळातील सोहोसारख्या यानांकडून सूर्याच्या पृष्ठभागाची छायाचित्रं सतत टिपली जात असतात. मात्र या छायाचित्रांचं स्वरूप हे द्विमितीय असतं. सूर्याचं त्रिमितीय चित्र मिळवायचं तर सूर्यावरील घटनांचं निरीक्षण हे दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून करायला हवं. आणि हेच काम नासानं सोडलेल्या ‘स्टीरिओ’ या जुळ्या यानांद्वारे पार पाडलं जात आहे…!
दिनांक २६ ऑक्टोबर, २००६ रोजी अंतराळात झेपावलेली स्टीरिओ मोहिमेतली ही जुळी यानं एकमेकांच्या विरुद्ध दिशांनी सूर्याला प्रदक्षिणा घालीत आहेत. या प्रदक्षिणांच्या दरम्यान ही याने सूर्याच्या प्रतिमा सतत टिपत आहेत. वेगवेगळ्या स्थानांवरून घेतलेल्या या छायाचित्रांवरून मिळालेली एकत्रित प्रतिमा ही त्रिमितीय स्वरूपाची असते. स्टीरिओ यानांद्वारे मिळालेल्या या अशा त्रिमितीय प्रतिमा दृश्य, तसंच अतिनील प्रकारातल्याही आहेत.
सूर्याची सतत निरीक्षणं करताना अलीकडेच – एक यान सूर्याच्या एका बाजूला, तर दुसरं यान सूर्याच्या दुसर्या बाजूला –अशी स्थिती काही काळासाठी निर्माण झाली होती. अशा वेळी एका यानाला सूर्याची एक बाजू तर दुसर्या यानाला सूर्याची दुसरी बाजू दिसत होती. परिणामी, दोन्ही यानांनी पाठवलेल्या छायाचित्रांद्वारे आपल्याला संपूर्ण सूर्याचं दर्शन घेणं शक्य झालं. अशा पकारची अखंड सूर्याची छायाचित्रं नासाने नुकतीच प्रसिद्ध केली आहेत. हे संपूर्ण सूर्यदर्शन सौरसंशोधनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.
स्टीरिओ मोहिमेतल्या यानांचं सूर्याभोवती भ्रमण चालू असल्यानं, या दोन्ही यानांची स्थानं सतत बदलत आहेत. त्यामुळं या यानांद्वारे संपूर्ण सूर्याचं दर्शन सतत होत राहणं शक्य नाही. मात्र, यानंतरही संपूर्ण सूर्यदर्शन होण्यासाठी नासानं वेगळीच सोय केली आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात अंतराळात झेपावलेली नासाची ‘सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरी’ ही सौरशाळा स्टीरिओ यानांच्या मदतीला आली आहे. सूर्याचा जो भाग यापुढे स्टीरिओ यानं टिपू शकणार नाहीत, तो भाग ही सौरवेधशाळा टिपणार आहे. सोलर डायनॅमिक्स ऑब्झर्व्हेटरीच्या या सहभागामुळे यापुढेही आठ वर्षं अखंड सूर्याचं दर्शन सतत होत राहणार आहे.
स्टीरिओ पकल्पातील ज्येष्ठ संशोधिका मधुलिका गुहाठाकुर्ता हिन या संपूर्ण सूर्यदर्शनाबद्दल आनंद व्यक्त करताना म्हटलं आहे की, ‘‘मानवजातीच्या इतिहासात प्रथमच सूर्याच्या दोन्ही बाजूंचं दर्शन एकाच वेळी घडतं आहे…….यामुळं सौरभौतिकशास्त्राच्या क्षेत्रात क्रांती झाली आहे…’’ मधुलिका गुहाठाकुर्ता हिनं व्यक्त केलेला हा आनंद अत्यंत सार्थच आहे. कारण, सूर्यावर घडणार्या घडामोडींचं योग्य असं प्रारूप उभं करायंचं, तर सूर्यावर घडणार्या सर्व घडामोडी एकाच वेळी टिपल्या जायला हव्यात. असं प्रारूप जर निर्माण करता आलं, तर पृथ्वीवर परिणाम घडवून आणणार्या सौरघटनांची आगाऊ सूचनाही आपल्याला मिळू शकेल.
डिस्कव्हरी निवृत्त…
डिस्कव्हरी हे नासाचं स्पेसशटल आता निवृत्त झालं आहे. पुनःपुनः वापरता येणार्या या अंतराळयानानं दिनांक २४ फेब्रुवारी रोजी, साडेतीनशे किलोमीटर उंचीवरून पृथ्वीला प्रदक्षिणा घालणार्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देण्यासाठी अंतराळात झेप घेतली. अंतराळ स्थानकाला दिलेल्या या भेटीत, डिस्कव्हरी यानानं त्याच्यावर सोपवलेली कामगिरी यशस्विरीत्या पार पाडली आणि हे यान तेरा दिवसांच्या मोहिमेनंतर दिनांक ९ मार्च रोजी पृथ्वीवर कायमचं परतलं. डिस्कव्हरी स्पेसशटलचा हा अखेरचा अंतराळ-प्रवास होता. अनेक महत्त्वाच्या जबाबदार्या यशस्वीपणे पेलून निवृत्त झालेलं डिस्कव्हरी हे अंतराळयान आता वॉशिंग्टन येथील स्मिथ्सोनिअन वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात येईल.
आपल्या २६ वर्षांच्या कार्यकाळात डिस्कव्हरी स्पेसशटलनं एकूण ३९ अंतराळमोहिमांत भाग घेतला. या मोहिमांदरम्यान या यानानं अंतराळात व्यतीत केलेला एकूण काळ ३६५ दिवसांचा भरतो. या वर्षभराच्या काळात या अंतराळयानानं पृथ्वीला एकूण ५,८३० प्रदक्षिणा घातल्या. डिस्कव्हरी स्पेसशटलच्या वापराइतका दीर्घ वापर दुसर्या कोणत्याही स्पेसशटलचा झालेला नाही. हबल अंतराळ दुर्बीण, तसंच युलिसिस शोधकासारखे अनेक कृत्रिम उपग्रह हे या डिस्कव्हरी स्पेसशटलद्वारेच अंतराळात पाठवले गेले आहेत.
डिस्कव्हरी यानाच्या निवृत्तीबरोबरच नासाचा स्पेसशटल कार्यक्रमही आता अगदी अखेरच्या टप्प्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार आता फक्त दोनच उड्डाणं बाकी राहिली आहेत. ‘एंडिव्हर’ आणि ‘अटलांटिस’ या स्पेसशटलची ही उड्डाणं या वर्षीच्या अनुक्रमे १९ एप्रिल आणि २८ जून रोजी प्रत्यक्षात येणं अपेक्षित आहे.
सातवा प्रवासी…
डिस्कव्हरी हे स्पेसशटल आपल्या शेवटच्या अंतराळ मोहिमेत पाच पुरुष आणि एक महिला अशा एकूण सहा अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीवर परतलं आहे. उड्डाणाच्या वेळी या सहा अंतराळवीरांच्या सोबतीला आणखी एक अंतराळवीरही होता. मात्र, हा अंतराळवीर पृथ्वीवर परतला नसून तो आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर कायमचं वास्तव्य करणार आहे. पृथ्वीवर न परतलेला हा अंतराळवीर मानवी अंतराळवीर नसून तो एक यंत्रमानव आहे. रोबोनॉट-२ या नावे ओळखला जाणारा हा यंत्रमानव, अंतराळप्रवास करणारा पहिला यंत्रमानव ठरला आहे.
रोबोनॉट-२ हा यंत्रमानव जनरल मोटर्स आणि नासा यांच्या सहकार्यानं तयार झाला आहे. या यंत्रमानवाचं वजन सुमारे दीडशे किलोग्रॅम इतकं आहे. हा यंत्रमानव अॅल्युमिनिअम आणि कार्बन फायबर या पदार्थांपासून बनवला गेला आहे. रोबोनॉट-२ हा आपल्या हाताची बोटं माणसाच्या बोटांप्रमाणेच सहजपणे विविध कामांसाठी वापरू शकतो, त्याचबरोबर नऊ-दहा किलोग्रॅम वजनही तो सहजपणे उचलू शकतो. माणसाप्रमाणेच तो डाव्या-उजव्या बाजूस, तसंच वर-खालीसुद्धा पाहू शकतो. गंमत म्हणजे हा अंतराळवीर डोक्यानं नव्हे तर, पोटानं विचार करतो. कारण, दिलेल्या आज्ञांची
कार्यवाही करणारी मुख्य यंत्रणा ही त्याच्या डोक्यात नव्हे, तर पोटात बसवली आहे. अगदी माणसासारख्या हालचाली करू शकणार्या या यंत्रमानवाला हात आहेत; परंतु पाय नाहीत. चाकांच्या साहाय्यानं इकडेतिकडे फिरणार्या या यंत्रमानवाला कालांतराने पायही बसवण्यात येणार आहेत. या यंत्रमानवाच्या निर्मितीमागील पकल्पाला एकूण २५ लाख डॉलर्स (सुमारे अकरा कोटी रुपये) इतका खर्च आला आहे. सुरुवातीला हा यंत्रमानव आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अंतराळवीरांना फक्त मर्यादित स्वरूपाची मदत करेल. भविष्यात मात्र या यंत्रमानवाकडून अंतराळ स्थानकाबाहेरील गुंतागुंतीची आणि धोकादायक कामंही करून घेतली जाणार आहेत.
रोबोनॉट-२ सारख्या अशाच एखाद्या यंत्रमानवाला जवळच्या एखाद्या लघुग्रहावर पाठवण्याचा नासाचा विचार आहे. कालांतरानं असा यंत्रमानव मंगळावरही पाठवला जाईल. याशिवाय जिथं मानवी अंतराळवीरांना जायचं आहे, तिथं पूर्वतयारीसाठी या यंत्रमानवाला अगोदरच पाठवता येईल. या यंत्रमानवानं केलेल्या पूर्वतयारीमुळं आणि त्याच्याकडून मिळणार्या मदतीमुळं अंतराळवीरांचा तिथला मुक्काम सुसह्य होईल हे नक्की!
‘अति’शीत तारा….
एखाद्या तार्याचं तापमान कमीतकमी किती असू शकतं? लाल रंगाच्या तार्यांचं तापमान साधारणपणे साडेतीन हजार अंश सेल्सियसपेक्षा कमी असतं. ‘तपकिरी खुजे तारे’ या नावानं ओळखल्या जाणार्या तार्यांचं तापमान एक हजार अंश सेल्सियसपेक्षा कमी असतं. आतापर्यंतचा माहीती असलेला सर्वांत थंड, तपकिरी खुजा तारा हा सुमारे १०० अंश सेल्सियस तापमान असलेला तारा होता. परंतु, आता नुकताच शफरी या दक्षिणेकडील तारकासमूहात एक अतिथंड असा तारा आढळला आहे. या तार्याचं तापमान आहे फक्त ३० अंश सेल्सियस – म्हणजे ज्या तापमानात आपल्याला सहजपणे वावरता येईल, इतकं!
या अतिशीत तार्याचा शोध पेनसिल्वानिया विद्यापीठातील केविन लुहमान आणि त्याच्या सहकार्यांनी लावला आहे. अवरक्त किरणांचा वेध घेणार्या स्पिट्झर अंतराळ दुर्बिणीद्वारे शोधला गेलेला हा तारा आपल्यापासून ६३ पकाशवर्षं अंतरावर वसलेला आहे. हा तारा आपल्या गुरू ग्रहाच्या सुमारे सातपट वजनदार आहे. सूर्याच्या तुलनेत मात्र हे वस्तुमान एक टक्क्याहूनही कमी भरतं. इतकं कमी वस्तुमान असल्यामुळं या तार्याच्या गाभ्यात अणुकेंद्रकीय क्रिया सुरू होऊ शकल्या नाहीत. म्हणूनच या तार्याला सर्वसाधारण तार्याचं आयुष्य लाभू शकलेलं नाही. दुसर्या शब्दांत सांगायचं तर, या दुर्दैवी तार्याच्या वाट्याला जन्मतःच मृत्यू आला आहे.
— डॉ. राजीव चिटणीस
कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद
सी-४/४२, चित्तरंजन नगर, राजावाडी, विद्याविहार (पूर्व), मुंबई ४०० ०७७.
इ-मेल : rajeev.chitnis@gmail.com
Leave a Reply