नवीन लेखन...

अंतर्मुख शिवरंजनी

क्षितिजावर संध्याकाळची रंगांची उधळण चालू असताना, अचानक एखादा प्रचंड ढग येउन, त्या रंगांची नक्षी पुसून, फिकट राखाडी रंग दिसावा आणि मनात कुठल्यातरी आर्त, हळव्या आठवणींच्या सुट्या आठवणी याव्यात, त्याप्रमाणे शिवरंजनी रागाचे स्वरूप मला वाटते. खरतर याचा पाच स्वरांचा कारभार. भूप रागातील शुध्द गंधार, कोमल केला की लगेच शिवरंजनी राग मिळतो. गमतीचा भाग म्हणजे याही रागात, “मध्यम” आणि “निषाद” स्वर वर्ज्य आहेत, म्हणजे रागाचे स्वरूप “औडव-औडव” असे आहे.
गमतीचा भाग म्हणजे हा राग मैफिलीत फारसा गायला जात नाही परंतु अनेक वादकांनी मात्र या रागाची अनंत रूपे दर्शवलेली आहेत, पण हे तर रागदारी संगीताचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. थोडे तांत्रिक भागात शिरायचे झाल्यास, या रागातील, “रिषभ”,”गंधार”, “धैवत” हे स्वर द्विश्रुतिक आहेत आणि या चलनातुनच या रागाची खरी ओळख होते. वास्तविक, “श्रुती” विषय फार किचकट आणि थोडा दुर्बोध आहे परंतु भारतीय संगीतात त्यांचे महत्व अपरिमित आहे.
आपल्याला बरेचवेळा असे आढळते, अनेक रागांतील स्वर सारखेच आहेत पण तरीही ते राग, स्वत:ची ओळख स्वतंत्रपणे राखून असतात आणि हे असे घडते, यामागे, स्वरांतर्गत असणारी श्रुतीव्यवस्था कारणीभूत असते.
पूर्वीच्या ग्रंथात या रागाचे वर्णन करताना, “शिवरंजनी” या शब्दाची फोड केलेली आढळते. “शिव” + “रंजनी” – वेगळ्या शब्दात मांडायचे झाल्यास, रुद्र शिवाला प्रसन्न करणारा राग म्हणजे “शिवरंजनी” असे केले आहे. एका दृष्टीने हे वर्णन चपखल बसणारे आहे परंतु कुठलाही राग, असा एकाच साच्यात बसवणे, अवघड व्हावे, अशा रचना ऐकायला मिळतात आणि आपले रागसंगीत किती श्रीमंत आहे, याची प्रचीती देतात.
कवी अनिलांची एक अतिशय सुंदर कविता आहे. मुक्तछंदात आहे.
“सारेच दीप कसे मंदावले आता
ज्योती विझू विझू झाल्या
की झड घालून प्राण द्यावा पतंगाने
असें कुठेच तेज नाही!!
थिजले कसें आवाज सारे?
खडबडून करील पडसाद जागे
अशी कुणाची साद नाही?”
खरेतर या ओळी, या रागाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून सांगता येईल.
या रागात तसे बघितले तर वादकांचे प्राबल्य अधिक दिसते आणि सुगम संगीतात तर हा राग प्रचंड प्रमाणात पसरलेला आहे.
पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची बांसुरी या संदर्भात ऐकणे हा अनन्यसाधारण अनुभव आहे. मुळात या रागाची गंभीर बैठक, स्वभाव अत्यंत “ठाय” लयीतला, यामुळे, या रागातील पंडितजींचे वादन खुलले नाही तर नवल!! पंडितजींची वादन हे नेहमी “गायकी” अंगाने होत असल्याने, आपल्याला वादनात नेहमी लयीचे वेगवेगळे बंध ऐकायला मिळतात तसेच मुळात या वाद्याचा कोमल स्वभाव असल्याने स्वरांत देखुल ऋजुता आढळते आणि ऐकणारा रसिक त्या वादनात कधी गुंगून जातो, हे त्या रसिकाला देळील कळत नाही.
ही रचना थोडी काळजीपूर्वक ऐकली तर सहज समजून घेता येईल, पंडितजींनी इथे “कोमल गंधार” च्या जोडीने “शुद्ध गंधार” देखील वापरलेला आहे पण, त्याचा वापर इतका अल्प आणि बेमालूमपणे लयीत मिसळलेला आहे की, प्रथमत: या प्रयोगाची नेमकी जाणीव होत देखील नाही आणि हे या कलाकाराचे वैशिष्ट्य.
बाबूजी उर्फ सुधीर फडके म्हणजे मराठी संगीतातील सन्मान्यजनक नाव. स्पष्ट तरीही अत्यंत भावपूर्ण उच्चार, कवितेतील आशय नेमका जाणून घेऊन, आशयाची अभिवृद्धी सुरांच्या माध्यमातून तितक्याच समर्थपणे मांडणारे रचनाकार, म्हणून अपरिमित ख्याती मिळवणारे. खरतर चित्रपट गीतांत भावपूर्ण चालींना जन्म देऊन, त्यांनी आपले नाव अजरामर केले आहे. इथे आपण, अशाच एका अप्रतिम गाण्याचा आस्वाद घेणार आहोत. “जगाच्या पाठीवर” या नितांतसुंदर चित्रपटातील – “एक धागा सुखाचा” हे गाणे, शिवरंजनी रागाची आठवण करून देते.
माडगूळकरांच्या चित्रदर्शी शैलीचा, स्वरांच्या माध्यमातून, इथे जो काही आविष्कार केला आहे, त्यातून, “अंतर्मुख” भावावस्था नेमकेपणी जाणून घेता येते.
“या वस्त्राचे विणतो कोण? एक सारखी नसती दोन;
कुणा न दिसले त्रिखंडात या, हात विणकऱ्याचे.”
अशी प्रश्नार्थक सुरवात करून, तरीही असामान्य गेयतापूर्ण आणि प्रासादिक रचना करणारे माडगुळकर आणि त्याला चिरंजीवित्व देणारे बाबूजी!! या गाण्याचा आणखी विशेष विशेषत्वाने सांगायला लागेल. गाण्याचे चित्रीकरण आणि शब्दकळा यात, धागा विणणे आणि पूर्वीच्या काळी विणकर ज्या मशीनवर धागा विणायचे, त्याचा एक ताल होता आणि त्या तालाचे मूर्तिमंत स्वरूप, सुधीर फडक्यांनी, या गाण्याची रचना करताना योजिलेला आहे. बाब छोटीशी आहे पण फार महत्वाची आहे.
हिंदी चित्रपट संगीतात, गूढ गाण्यांना तशी भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे. अगदी “महल” या चित्रपटापासून सुरु झालेली अशा प्रकारची गाणी, रसिकांच्या मनात ठाण मांडून बसलेली आहेत. याच परंपरेतील एक गाणे इथे ऐकुया. “कही दीप जले कही दिल” हे लताबाईंच्या आवाजात प्रसिद्ध पावलेले गाणे, शिवरंजनी रागाची ओळख करून देतात. खरतर गाण्याची सुरवात वेगळ्या सुरांतून होते, गूढ वातावरण तयार होते परंतु गाण्याचा सुरवातीचा दीर्घ आलाप आणि शाब्दिक चाल यात सत्कृतदर्शनी फरक वाटला नसला नसला तरी तो फरक आहे आणि या शब्दांच्या सुरावटीत हा राग लपलेला आहे.
“कहीं दीप जले कहीं दिल
जरा देख ले आ कर परवाने
तेरी कौनसी है मंजिल”
अर्थात, अखेर हे चित्रपटातील गाणे आहे आणि इथे गाण्याची पार्श्वभूमी महत्वाची. या दृष्टीकोनातून, पुढील आलाप आणि चाल, इथे हा राग आढळत नाही. संगीतकार हेमंतकुमार यांची खुबी अशी की कालस्तरावरील लय तशीच कायम ठेऊन, स्वरिक लय किंचित बदलेली आहे आणि गाण्याचा परिणाम साधलेला आहे.
गाणे केरवा तालात आहे पण, मात्रांचे वजन इतके वेगळ्या प्रमाणात ठेवलेले आहे की प्रथमत: हा केरवा ताल वाटतच नाही. खरतर गाण्यात रूढार्थाने ताल वाद्य नाही. बेस गिटारचा वापर केलेला आहे आणि याचा परिणाम गाण्यातील गूढत्व वाढण्याकडे होतो आणि हेच या गाण्याचे खरे यश.
संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडगोळीने बरीच अप्रतिम गाणी आहेत. अगदी मोजके सांगायचे झाल्यास, या जोडीने जी गाणी दिली आहेत, त्या गाण्याचा “मुखडा” नेहमी ऐकण्यासारखा असतो. किंबहुना, संगीतक्षेत्रात एक पक्का समज आहे, गाण्याचा मुखडा सुंदर बनविणे, म्हणजे गाण्याचे खरे यश असते आणि हे जर खरे मानले तर या जोडीची गाणी यशस्वी मानता येतील. प्रस्तुत गाणे असेच अत्यंत श्रवणीय गाणे आहे आणि गाण्यचा “मुखडा” तर खास आहे.
“भोर भये, नित सुरज उगे
सांझ पडे ढल जाये
ऐसे ही मेरी आंस बंधे और
बंध बंधकर मिट जाये
खबर मोरी ना लिनी रे
बहुत दिन बीते, बीते रे”.
“बहुत दिन बीते” हेच ते गाणे आहे. गाण्याच्या सुरवातीला व्हायोलीनचा अत्यंत “ठाय” लयीत तुकडा आहे आणि हे व्हायोलिनचे सूर(च) शिवरंजनी राग दर्शवतात. या गाण्याची “गायकी” हा तर खास अभ्यासाचा विषय ठरावा. शब्दोच्चार कसे असावेत आणि ते करताना, सुरावटीतून, त्याच शब्दांचा अर्थ अधिक खोलवर दाखवून द्यावा, ही खासियत असते आणि प्रत्येकाला ती जमत नाही. अतिशय धीमा केरवा ताल आहे पण, खरी गंमत आहे ती, गाण्यातील असंख्य हरकती आणि तानांची. प्रसंगी रागाला बाजूला सारून, त्याच लयीत वेगळे सूर वापरणे, हा व्यामिश्र सांगीतिक प्रकार आहे. लताबाईंच्या आवाजातील “तारता” पल्ला किती विस्तृत आहे, या गाणे ऐकताना समजून घेता येते.
वास्तविक किशोर कुमारने संगीताचे कधी पद्धतशीर शिक्षण घेतलेले नव्हते पण तरीही भारतीय संगीतातील हा एक अद्भुत चमत्कार मानला जातो. या गायकाच्या गळ्याची “रेंज” केवळ अतुलनीय अशीच होती. अतिशय मोकळा आवाज, अत्यंत सुरेल तसेच लवचिक आवाज, ही त्याची काही खास वैशिष्ट्ये सांगता येतील. अर्थात, या बाबींचा चुकीचा संदेश आपल्याकडे पसरला. किशोर कुमारने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले नाही म्हणून आपल्याला देखील त्याची गरज नाही, असला अत्यंत खुळचट समज पसरला!! याच मोकळ्या आवाजाचा, संगीतकार राहुल देव बर्मनने, या गाण्यात अतिशय सुरेख वापर करून घेतलेला आहे. रूढार्थाने, हे गाणे रागदारी संगीतावार आधारित आहे, असे अजिबात म्हणता येणार नाही परंतु गाण्याची रचना, त्यातील हरकती, आलाप इत्यादी अलंकार इतक्या खुबीने वापरले आहेत की आपण, मनोमन संगीतकाराला दाद देतो.
“मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा,
बात पुरानी है, एक कहानी है,
अब सोंचू तुम्हे याद नही है,
वो सावन के झुले,
रुत आये रुत जाये दे के झूठा एक दिलासा,
फिर भी मेरा मन प्यासा”.
 “मेरे नैना सावन भादो” हे ते गाणे आहे. खरेतर. हे गाणे शिवरंजनी रागावर आधारित आहे का? असा माझ्या देखील मनात संशय आहे कारण, सुरवातीचे स्वर आणि नंतरची चाल, याचा सत्कृतदर्शनी काहीही नाते लावता येत नाही पण, अखेर संगीतकार राहुल देव बर्मनची हीच तर खासियत आहे. आणखी एक गंमत. गाण्याचा ताल केरवा आहे पण, हा संगीतकार, कुठलाच भारतीय ताल, पारंपारिक पद्धतीने वापरत नसून, तालाच्या बाबतीत, या संगीतकाराने इतके प्रयोग केले आहेत की तो सगळा खास अभ्यासाचा विषय आहे.
या गाण्यातील गिटार वाद्याच्या झंकारातून, तालाची जाणीव होते. पुढे गाण्यात तबल्याच्या मात्रा आहेत पण त्या सरळ, स्पष्टपणे ऐकायला येत नाहीत. असे असून देखील संगीतकाराने गाणे अतिशय वेधक, श्रवणीय आणि तसेच गायला देखील काहीसे अवघड केले आहे.
असेच एक अप्रतिम सुश्राव्य गाणे शंकर/जयकिशन या संगीतकार जोडीने “सूरज” या चित्रपटात दिले आहे.
“बहारो फुल बरसाओ, मेरा महेबूब आया है ,
हवाओं रागिनी गाओ, मेरा महेबूब आया है”
सर्वसाधारणपणे “शिवरंजनी” रागात कारुण्यभाव अधिक आढळतो, किंबहुना रागाच्गा स्थायीभाव वाटतो आणि या समजाला छेद देणारी ही रचना. प्रणय भावनेचा सुंदर, राजस असा आविष्कार या गनुअत आढळतो. खरेतर गाण्यातील जे interlude संगीताचे तुकडे आहेत, त्यात या रागाची खूण मिळते. परंतु जरी चाल वेगळ्या वळणावर फिरत असली तरी वाद्यमेळाशी तादात्म्य पावण्याची किमया, ही संगीतकार जोडी करते. हिंदी चित्रपट संगीतातील “ऑर्केस्ट्रा” ही संकल्पना व्यापक अर्थाने वाढवली असेल तर ती याच जोडगोळीने. त्याच बरोबरीने,चोत्रापाताच्या प्रसंगानुरूप प्रसंगी चालीला मुरड घालायला देखील यांनी कधी मागे पुढे बघितले नाही. परिणामी चित्रपट गीते अधिक श्रीमंत झाली आणि काळानुरूप नेहमी सुसंगत राहिली.
मराठी भावगीतात मानाचे स्थान मिळवणाऱ्या काही थोड्या गाण्यांत, या गाण्याचा अवश्यमेव समावेश होतो. तसे बघितले तर गाण्याची चाल गायकी अंगाची आहे आणि त्यावर नाट्यगीताच्या संस्कृतीचा प्रभाव आहे पण तरीही “भावगीत” म्हणून नि:संशय असामान्य आहे.
“सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी,
आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरी”.
ग.दि.माडगूळकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून अप्रतिम शब्दचित्र रेखाटले आहे. अत्यंत मुग्ध, संयत प्रणयाविष्कार आणि गेयतापूर्ण कविता. त्याला तशीच सुंदर चाल लावली आहे सुधीर फडक्यांनी आणि माणिक वर्मांनी गायनातून त्या चालीचे सोने केले आहे. अतिशय लडिवाळ आणि आर्जवी चाल आहे, अगदी मराठी संस्कृतीत मुरलेली चाल आहे आणि थोडे नीट ऐकले तर, गाण्याच्या काही हरकती शिवरंजनी राग दर्शवतात अन्यथा चाल स्वतंत्र आहे. माणिकबाईंनी आपल्या आवाजात ताना किंवा हरकती घेताना, पंजाबी ढंग मिसळल्याने, चालीला वेगळीच खुमारी लाभते. एखादे गाणे जेंव्हा वर्षानुवर्षे चिरंजीव रहाते, तेंव्हा त्यामागे असे काही “पदर” असतात जे ऐकताना फारसे जाणवत नाहीत पण एकूणच रचनेचा “घाट’ अधिक बांधीव करतात.
— अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..