आमच्या गावी अंतु नाना होता. नेहरू शर्ट, पांढरी विजार, डोक्यावर पांढरी टोपी.
अंतू नानाला राजकारणाचा खूपच नाद होता. रात्रंदिवस राजकारणाची चर्चा. भाकरीचं गाठोडं घेऊन रोज तालुक्याला. कधी एसटीने. कधी वडापने. कधी कुणाच्या तरी गाडीवर बसून. रोज तालुक्याला जाऊन अंतू नाना काय करत होता हे कुणालाच माहीत नव्हतं.
कुठलीही निवडणूक आली की अंतू नाना आठ-आठ दिवस घराकडे यायचा नाही. त्याला कोणताही पुढारी वावगा नसे. दिवसभर त्यांच्या मागे फिरणे असा उद्योग असे. जिल्ह्याच्या ठिकाणी कुठे मंत्र्याची सभा असेल तर अंतू नाना एकटाच जायचा. जवळ पैसे नसतील तर चालत. थोडे पैसे असतील तर एसटीने.
एकदा कोल्हापूरला इंदिरा गांधीची सभा होती. त्या सभेला अंतु नाना पण गेला होता म्हणे. गर्दीमध्ये वाट काढत काढत तो इंदिरा गांधीना भेटला. इंदिरा गांधींनी त्याला नमस्कार केला. फोटोग्राफरने फोटो काढला. तो फोटो त्याने घरात लावला. बस्स्. त्यानंतर अंतू नाना इंदिरा गांधीचा फॅनच झाला.
अंतू नाना भेटेल त्याला सांगायचा, इंदिरा गांधी मला भेटायला कोल्हापूरला आलेल्या होत्या. त्या माझी वाट पाहत होत्या. बरे झाले मला एसटी सापडली. मी लवकर गेलो. नाहीतर त्यांचा खुप वेळ वाया गेला असता…
आभाळात विमान दिसलं की तो म्हणायचा, इंदिरा गांधी मला भेटायला आलेल्या आहेत. माझ्या व्यापातून आज भेट नाही झाली तर मला दिल्लीला जावे लागेल. वर्तमानपत्रात कुठे सभा झालेली बातमी आली तर तो सांगायचा या सभेला मला पण बोलवलेले होते. परंतु मतदारसंघात भरपूर काम असल्यामुळे मी जाऊ शकलो नाही. असे बरेच दिवस चालले होते.
गावातल्या चौकात संध्याकाळी अंतू नाना रोज बसलेला असे. इंदिरा गांधी बद्दल तास तास बोलत असे. लोक गंमत म्हणून ऐकून घेत.
नंतर नंतर अंतू नाना दिसेनासा झाला. तो गावातच फारसा येत नसे. चौक रीकामा पडलेला असे.
एके दिवशी सकाळी अकरा वाजता त्याच्या घरासमोर कालवा उठला. आम्हीपण बघायला गेलो. तर अंतूनाना त्याच्या घराच्या कौलावर चढलेला. हातात फुकणी होती. आभाळाकडे फुकणी करून तो म्हणायचा, इंदिरा गांधीला मारायला आलेले आहेत. मी हेलिकॅप्टरच उडवणार आहे. माझ्या बंदुकीत गोळ्या ठासून भरलेल्या आहेत. आता त्यांना कळेल अंतू नाना काय चीज आहे..
आम्ही गंमत म्हणून त्याच्याकडे बघत राहायचो. खूप करमणूक व्हायची.
पुढे कित्येक दिवसांनी आम्हाला समजलं. राजकारणाच्या नादाने अंतू नानाच्या डोक्यावर परिणाम झालेला होता. त्याला कृपामयी मिरज ला ऍडमिट केले होते. त्यातच तो गेला..
आता कधी गावाकडे गेलो की मी शेताला जातो. शेताकडे जाताना अंतू नानाचे घर लागते. त्या घराच्या कौलाकडे बघितलं की अंतू नाना आठवत राहतो…..
— अॅड. कृष्णा पाटील. (तात्या )
“राष्ट्राधार” विटा रोड, तासगाव.
जिल्हा- सांगली.
मोबा. 9372241368.
Leave a Reply