आयुष्यात भेटलेली काही माणसे, अनुभवलेले काही प्रसंग आपल्याला बरेच काही देऊन जातात. त्यातल्या काही माणसांची आणि अनुभवांची एक झलक.
१ एक मुलगा संशोधन निबंध लिहित होता. तो मानसशास्त्राचा विद्यार्थी होता. त्याने आपल्या आजीला विचारले “तुझ्या मते यश म्हणजे काय?”
आजी म्हणाली “आपल्या आयुष्याकडे वळून बघताना आपण त्यातले प्रसंग आठवून स्मितहास्य करु शकलो तर म्हणता येईल की आपले आयुष्य यशस्वी झाले आहे. ”
२ ऑफिसमधल्या एका अधिकाऱ्याने आपल्या यशस्वी उद्योजक बॉसला विचारले “यशस्वी होण्यासाठी तीन महत्वाच्या सूचना द्या.” बॉस हसला आणि म्हणाला “जे कोणीच वाचले नसेल ते वाचा. ज्याचा कोणीच विचार केला नसेल त्याचा विचार करा आणि जे कोणीच केले नसेल ते करण्याचे धाडस करा.”
३ एक माणूस सलग तीन दिवस फायर स्टेशनवर ड्युटी करुन घरी परतत असतो. रस्त्यात तो वाण्याच्या दुकानात काही तरी घेण्यासाठी थांबतो. तेवढ्यात त्याच्या पाठोपाठ एक बाई दुकानात येते आणि त्याला घट्ट मिठी मारुन मुसमुसू लागते. तो आश्चर्याने वळून बघतो. ती म्हणते “तुम्हाला आठवत नसेल पण ९/११ च्या दिवशी तुम्हीच मला वर्ल्ड ट्रेड सेंटरमधून सुखरुप बाहेर काढलेत.”
४ एका माणसाचा जीवलग कुत्रा त्याच्या समोर रस्त्यावरच्या गाडीखाली जातो. त्या माणसाला कळते की हा आता जगणार नाही. तो त्याला घेऊन छातीशी कवटाळून रडू लागतो. मरण्यापूर्वी कुश त्या माणसाचे अश्रू चाटतो आणि शेवटचा श्वास घेतो.
५ आज सगळेच विपरित घडत होते. मी उठलो तेव्हाच मला आजारी वाटत होते. तरीही मी कामावर गेलो. दुर्देवाने तीन वाजता मला कामावरुन काढून टाकले. घरी येताना गाडीचे टायर पंक्चर झाले. घरी जाऊन दुसरे लावावे म्हटले तर ते ही पंक्चर होते.
एवढ्यात एक अनोळखी माणूस बी. एम. डब्ल्यू मधून जाता जाता माझ्यापाशी थांबला. त्याच्या गाडीतून मला टायरचे पंक्चर काढायला घेऊन गेला. रस्त्यात माझ्याशी गप्पा मारल्या आणि त्याने मला नवीन नोकरीही दिली. उद्यापासून मला रुजू व्हायचे आहे.
६ तिची आई मृत्यु शय्येवर होती. तिचे तीन भाऊ आणि दोन बहिणी आईच्या उशापायथ्याशी होत्या. तिचे वडीलही तिथेच घुटमळत होते. आईला फारशी शुध्द नव्हती. मरणापूर्वी ती एकच वाक्य बोलली जे आमच्या हृदयात गोंदवले गेले. “तुम्हा सगळ्यांना असे माझ्या अवतीभवती पाहून माझे मन भरुन आले आहे. तुमच्या प्रेमाने मी भारली गेली आहे. आपण आयुष्यभर जास्तीवेळा असे एकत्र राहिलो असतो तर जास्त मजा आली असती.”
७ त्याचे वडील आजारी होते. ते मरण्यापूर्वी काही क्षण तो त्यांच्याजवळ बसला. त्यांनी आपल्यासाठी काय काय केले हे आठवून त्याचे मन भरुन आले. त्याने वडीलांच्या कपाळाचे चुंबन घेतले. काही क्षणातच वडील त्याला सोडून गेले. त्या क्षणी त्याला आठविले की त्याने आयुष्यात प्रथमच आपल्या वडीलांचे चुंबन घेतले होते.
८ तिच्या आठ वर्षाच्या छकुलीने गोड आवाजात तिला विचारले “आपण पाण्याचे पुनरुज्जीवन का करत नाही? ” तिने विचारले “ते का करायचे असते? ” छकुली म्हणाली “मला पृथ्वीला वाचवायचे आहे.”
आई म्हणाली “पृथ्वीला का बरे वाचवायचे आहे?” छकुली निरागसपणे म्हणाली “कारण माझ्या सर्व गोष्टी इथेच तर आहेत.”
९ सत्तावीस वर्षाची एक तरुण आई आपल्या दोन वर्षाच्या मुलीच्या कला पाहून पोट धरधरुन हसत होती. त्या आईला कॅन्सर झाला होता. ती फार काळ जगणार नव्हती. तिच्याकडे पाहून मनात आले, करण्यासाठी नाही, उत्सवासारखे साजरे आयुष्य तक्रार करण्यासाठी आहे.
१० एक लहान मुलगा व्हिलचेअरवर बसून चालला होता. त्याला रस्त्यात दुसरा मुलगा कुबड्या घेऊन चालताना दिसला. त्या मुलाला कुबड्यांबरोबर आपले दप्तर आणि बरीचशी पुस्तके सांभाळणे कठीण जात होते. व्हिलचेअरमधल्या मुलाने त्याचा भार घेतला. त्याला शाळेपर्यंत पोहोचविले. त्याला सोडून जाताना व्हिलचेअरवरचा मुलगा म्हणाला “तू लवकर बरा होशील अशी मी प्रार्थना करतो.”
११ त्या दिवशी ती फारच हताश झाली होती. तिला कॅन्सर असल्याचा रिपोर्ट हातात आला होता. कशीबशी स्वतःला सावरत ती घरी आली. तिने आपली मेल उघडली. तिच्या एका शाळेतल्या मैत्रिणीची मेल आली होती. ती तिला दहा वर्षात भेटली नव्हती. मैत्रिणीने लिहिले होते “तुझाच विचार आज करते आहे. तुला माझी गरज वाटली तर मी एका फोन कॉलच्या अंतरावर आहे. ”
१२ एक माणूस केनियाला फिरायला गेला होता. तो आपल्या मित्रांबरोबर सॅन्डविच खात होता. तेथे त्याला झिंबाबवेहून आलेला एक शरणार्थी भेटला. शरणार्थी म्हणाला “मी गेल्या तीन दिवसापासून काहीच खाल्लेले नाही.” तो दिसतही तसाच होता. मरगळलेला, मरायला टेकलेला. फिरायला गेलेल्या माणसाने आपला सॅन्डविच त्या माणसाला देऊ केला. तो माणूस म्हणाला “आपण दोघे हा सॅन्डविच वाटून खाऊ.”
जगातली सर्व सत्ये आपल्याला अनुभवातून मिळतात, प्रबोधनातून नाही. जगातल्या वेगवेगळ्या देशातली ही माणसे आहेत आणि त्यांचे हृदय हेलावून टाकणारे अनुभव आहेत. कधीतरी एकांतात शांत बसून या भावनांचा आणि प्रसंगांचा विचार करा. तुम्हाला जीवन म्हणजे काय नक्कीच कळेल.
— नीला सत्यनारायण
अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.
Leave a Reply