ट्रिंग-ट्रिंग फोनची घंटी जोरजोरात घणघणली, मी उठून उभा राहतो तो पर्यंत बंद झाली. बहुतेक रॉंग नंबर असावा असा विचार करत परत झोपलो. पाच-दहा मिनिटातच मोबाईल वाजला, पाहिला तर सुधीरचा फोन. घाई-घाईत घेतला, काय रे काय झाले?
काही नाही, मला माहित आहे अगदी अवेळी फोन केलाय मित्रा, sorry पण फारच बेचैन झाल्यासारखे झाले आहे, येऊ शकशील का? ड्रायव्हरला पाठवतो. सुधीर म्हणाला.
अरे sorry काय? येतोच. माझा तर पेशाच असा आहे. निघतो लगेच. माझ्या ड्रायव्हरला फोन करतो तो येईल. तुझ्या ड्रायव्हरला सध्या तुझ्याजवळच राहू दे. काळजी करु नकोस मी पोचतोच. मी म्हणालो.
फोन ठेवला, पहाटेचे चार वाजले होते. ड्रायव्हरला फोन केला. मीनलला उठवले आणि सांगितले, सुधीरचा फोन होता त्याची तब्येत बिघडली आहे. राजू आला कि निघतोच. तिला आता माझ्या या life-stile ची सवय झाली होती परंतु सुधीरला काय झाले असेल ह्या विचाराने ती जरा काळजीत पडली होती तितक्यात राजू आला त्याने माझी visit-bag गाडीत ठेवली आणि आम्ही निघालो. नाही म्हंटले तरी २५-३० मिनिटांचा रस्ता होता. गाडीत बसल्यावर परत सुधीरला फोन केला. आवाजावरून त्याला बरे नसल्याचे जाणवले.
सुधीर हा माझा बालमित्र. आम्ही एकाच मोहल्ल्यात राहत होतो, एकाच वर्गात शिकत होतो. तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा, मला दोन बहिणी आणि एक भाऊ. त्याच्या घरी आजी-आजोबा होते. त्यामुळे खेळायला आमच्याकडे आणि अभ्यासाला त्याच्याकडे हा आमचा नित्यक्रम होता. आमच्या शाळेत देखील सुधीर-सचिन ची जोडी एकदम फेमस होती. बारावी नंतर मी मेडिकलला गेलो आणि तो इन्जिनिअरिंगला. त्यामुळे आम्ही थोडे दुरावलो. हळूहळू मी माझ्या कॉलेजच्या मित्रात आणि तो त्याच्या कॉलेजच्या मित्रात मग्न झालो. दोघांचे विषयही वेगळे त्यामुळे पुढील दोन-तीन वर्षात तर फारच दुरावलो. नंतर तो M. S. करायला अमेरिकेला गेला. आणि मी Post-graduation साठी बंगलोरला. त्यामुळे तर अगदीच एकमेकांपासून लांब झालो. बऱ्याच वर्षानंतर त्याच्या लग्नात भेटलो होतो. नंतर कित्येक वर्ष एकमेकाला भेटलो सुद्धा नव्हतो.
काका-काकी म्हणजे त्याचे आई-बाबा मात्र नियमित भेटत होते. ते त्याच्याकडे जाऊन आले कि त्याची खुशाली कळायची. तो मात्र फारच कमी येत असे, कारण त्याला M.S. झाल्यानंतर लगेचच नौकरी लागली होती. आणि तो खूप हुशार असल्यामुळे लवकरच कंपनीत खूप वरच्या पोस्टवर निघून गेला होता. त्यामुळे कायमच busy असायचा. कितीतरी वर्षे काका-काकी त्याच्याकडे जात-येत असत. परंतु हळूहळू दोघेही थकले होते. त्यांच्या तब्येती देखील वयोमानाप्रमाणे कमकुवत होत गेल्या आणि त्यांचे त्याच्याकडे येणे-जाणे कमी झाले. मीही डॉक्टर झालो, इथेच गावात practice सुरु केली त्यामुळे माझ्याकडची काका-काकींची ये-जा वाढत गेली. काकी खूपच लवकर थकल्या होत्या. त्या फक्त माझ्याकडूनच औषध घेत असत त्यामुळे त्यांच्या तब्येतीच्या कारणाने परत एकदा माझा आणि सुधीरचा फोनवर contact सुरु झाला होता. तो त्या दोघांची खूप काळजी करायचा. तो त्यांना कायम तिकडे बोलवत असे परंतु ह्या दोघांनाहि इतका प्रवास करणे आता शक्य राहिले नव्हते. त्यामुळे त्यांनी घरात कायमसाठी कामाला दोन माणसे ठेवली आणि इथेच राहणे पसंत केले होते. काकी तर बघता-बघता इतक्या थकल्या कि नंतर नंतर त्यांना माझ्या दवाखान्यात सुद्धा येणे शक्य होत नव्हते. मग मीच त्यांच्या घरी जात असे.
बरेच वर्षानंतर, प्रथम जेंव्हा मी त्यांच्या घरी काकींना बघायला गेलो, तेंव्हा सगळ्या जुन्या आठवणी एखाद्या सिनेमाची रीळ फिरावी तशा माझ्या नजरेसमोरून पळाल्या होत्या. सतत पळापळ करत असणाऱ्या काकी बिछान्यात केविलवाण्या दिसत होत्या. कायम स्वतःच्या कामात मग्न असणारे काका, काकींच्या सेवेत हजर होते. सतत त्या दोघांच्या मागे फिरणारा सुधीर कुठेही दिसत नव्हता. प्रत्येक खोलीत असणाऱ्या त्याच्या फोटोने मात्र त्याचे अस्तित्व टिकून होते. काकींच्या बेडरूम मधल्या एका फ्रेम मध्ये सुधीर, संगीता वाहिनी आणि दोन्ही नातवंडांचे वेगळे वेगळे फोटो व्यवस्थित फ्रेम करून लावले होते. मला घरी आलेला बघून त्या अतिशय खुष झाल्या होत्या. कदाचित सुधीर आल्यावर त्यांना जसा आनंद होत असावा तसाच आनंद मला पाहिल्यावर झाला होता. ह्या नंतर मात्र माझे आणि सुधीरचे नियमित फोनवर बोलणे होत असे. आईबाबांच्या प्रकृतीची तो सारखी चौकशी करीत असे. त्यांना औषधपाणी व्यवस्थित मिळावे म्हणून भरपूर पैसे पाठवत असे, शक्य होईल तेंव्हा दोन-चार दिवस येऊन जात असे. ह्यामुळे आमच्या मैत्रीचा पुनर्जन्म झाला होता.
एके दिवशी काकी अचानक हे जग सोडून गेल्या. आणि सुधीर इथे येईपर्यंत काकांना सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी माझ्यावर आणि मीनलवर येऊन पडली. तशी ह्या छोट्याश्या गावात काका-काकींनी लोकांना वेळोवेळी भरपूर मदत केली होती त्यामुळे संपूर्ण गावच काकांची काळजी घेत होते.
त्या नंतर सुधीरने तुम्हीतरी माझ्याबरोबर चला असा काकांजवळ हट्ट धरला. नाईलाजाने, इथली कामे आटोपून वर्षभरात तुझ्याकडेच राहायला येतो असे आश्वासन काकांनी त्याला दिले होते. आणि खरोखरीच त्यांनी आपली तिकडे जाण्याची तयारी केली होती. परंतु काकी गेल्यानंतर काका अगदी खचून गेले होते. सुधीरने येऊन इथे महिनाभर राहावे अशी शेवटी शेवटी काकींची फार इच्छा होती ती पूर्ण न झाल्यामुळे काकांना खूप वाईट वाटत असे. पण कामधंदा सोडून मी इतका राहू शकत नाही अशी तो त्यांची फोनवर समजूत काढत असे. ह्या प्रसंगाची आठवण होऊन काका अगदी बचैन होऊन बोलत असत. परंतु तरीही स्वतःला सावरून त्यांनी त्याच्याकडे जायचे नक्की केले होते. बरेचसे सामान बांधूनही ठेवले होते. काही सामान आणि कपडे गावातील गरजू लोकांना वाटून टाकले होते.
Leave a Reply