नवीन लेखन...

‘अनुभूती’ कुटुंब न्यायालयीन खटल्यांची

“अनुभूती” कुटुंब न्यायालयीन खटल्यांची

लेखिका – बागेश्री परीख.
पुस्तक परिचय- वासंती गोखले 

विलेपार्ले येथील  लोकमान्य सेवा संघाच्या दिलासा शाखेच्या अध्यक्ष “ बागेश्री परीख,  आम्हाला कोर्टातील, कुटुंब न्यायालयीन   खटल्यांची माहिती, न्यायालयीन केसेस,अधून-मधून गोष्टीरूपाने सांगत असत . प्रत्येक केस ऐकताना आमची उत्सुकता शिगेला पोहोचत असे.  प्रत्येक सदस्य काळजीपूर्वक ऐकत असे, कारण केस सांगून झाल्यावर तुम्ही न्यायाधीश असतात तर काय निकाल दिला असता ?, असा प्रत्येकाला प्रश्न विचारून सर्वांची मते  घेत असत व ती ऐकल्यानंतर निकाल सांगत असत. सर्वांच्या विचारशक्तीला चालना देण्याचं काम त्या करीत असत. असं करता करता त्यांच्या न्यायालयीन खटल्या संबंधातील आमची गोडी वाढतच गेली आणि जेव्हा त्यांच्या निवडक कथा येऊन “अनुभूती” कुटुंब न्यायालयीन  खटल्यांचे – पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा, ते पुस्तक वाचण्याची  उत्सुकता अधिकच वाढली .  डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्यासारख्या प्रथितयश मानसोपचार तज्ज्ञाच्या उपस्थितीने या सोहोळ्याला यथायोग्य न्याय मिळाला.

लेखिका बागेश्री ताई , या कुटुंब न्यायालयाच्या निवृत् न्यायाधीश आहेत . तसेच  गेली चाळीस वर्षे मॅरेज  कौन्सिलिंग नंतर न्यायदान आणि त्यानंतर ज्येष्ठांचे कौन्सिलिंग करीत असताना त्यांना जे अनुभव आले ते केसेस  आणि कथांद्वारे त्यांनी लिहिले आहेत. योग्य वेळी समुपदेशन झाले तर कुटुंबे आणि संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतात  हे अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी दाखवले आहे ते सुद्धा एका स्त्री न्यायाधीशाचे नजरेतून! हे करतानाच एखाद्या मनोवैज्ञानिका प्रमाणे त्यांनी निरनिराळ्या मनोविकाराचे विश्लेषण केले आहे.

पंधरा कथा असलेले आणि केवळ ८८ पानांचे हे पुस्तक, मराठी कायदेविषयक साहित्यातील एक अमूल्य ठेवा बनून राहिले आहे. मुखपृष्ठ रुपेश सावंत यांनी अत्यंत योग्य रीतीने ,कौशल्याने चितारले आहे तर कथांची ‘व्यंगचित्रणे’  श्री अनिश दाते यांनी अत्यंत परिणामकारक, मनाला भावतील अशा तऱ्हेने साकारली आहेत. प्रकाशक श्री योगेन परीख, असून प्रस्तावना मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर श्रीमती स्नेहलता देशमुख यांनी  लिहिली आहे.  त्या लिहितात, “मोडकळीला आलेले घर जसे डागडुजी करून वाचवतात , तसेच काहीसे मोडकळीला आलेले संसार त्यांनी वाचविले”.  याचे कारण म्हणजे त्यांचे कायदेविषयक ज्ञान , त्यांचे गोड शब्द आणि समजूतदारपणे वस्तु स्थिती समजून घेण्याची त्यांची  हातोटी.

प्रथम सुरुवातीस लेखिकेचा परिचय आहे व त्यानंतर लेखिकेने आपले मनोगत व्यक्त केले आहे त्यांचे स्वतंत्र असे हे पुस्तक असून, पुस्तकात चित्रित केलेल्या  सर्व घटना त्यांच्यासमोर घडलेल्या आहेत. त्याच  बरोबर  त्यांचे हे   पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या, ज्या व्यक्तींनी पुढाकार घेऊन त्यांना सहाय्य केले आहे त्या सर्वांचे  ‘ऋणनिर्देश  ‘ या पुस्तकाच्या सुरवातीसच त्यांनी केले आहेत . त्यांचे मनापासून आभार मानले आहेत . प्रसिद्ध मानस शास्त्रज्ञ श्री आनंद नाडकर्णी व मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते रविवारी  २८ नोव्हेंबर २०२१  रोजी ‘अनुभूती” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा “ लोकमान्य सेवा संघ . विलेपार्ले “ येथे मोठ्या दिमाखात पार पडला .

कथांची नावे आहेत, घरटे सावरताना’, ‘ अशीही पोटगी, ‘अगतिक, ‘द्वंदव पालकत्वाचे’, ‘संशयाचे भूत, ‘ताबा कुणाचा’? उत्तरायण, प्राक्तन,. अशा प्रकारची असून, नावा बरोबरच उत्सुकता वाढवतात. अत्यंत योग्य, समर्पक नाव हे कथेचे वैशिष्ट्य आहे. सर्व कथा मनाला स्पर्शून जातात. प्रत्येक कथा अत्यंत मोजक्या शब्दात, उगाचच न्यायालयीन क्लिष्टतेचा स्पर्श न होऊ देता .  पण त्याचबरोबर आवश्यक तेथे विवाह संबंधीच्या कायद्यांचे ज्ञान एकेका वाक्यात त्यांनी दिले आहे. अशा केसेस तरुणपणीच उद्भवत नाहीत तर, उतारवयात सुद्धा येऊ शकतात हे ‘उत्तरायण,’   या कथेतून समजते . या सर्व कथा कौटुंबिक न्यायालयीन केसेस असल्या आणि  तरी मानसोपचार आणि मनोविश्लेषण यांच्या पायावरच त्या उभ्या आहेत आणि म्हणूनच या विषयातील कौशल्यपूर्ण हाताळणी ही एक परीक्षाच  होती  .

प्रत्येक कथा आपल्याला विचार करावयास प्रवृत्त करते, कारण अशा काही घटना घडत असतील याचा खोलात जाऊन विचार केलेला नसतो. इतका सखोल विचार करून त्यावर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न कसा केला जातो हे बागेश्रीताईंच्या मांडणीतून आपल्या लक्षात येते. त्यामुळे प्रत्येक कथेनंतर, ‘अरे बापरे’ असं सुद्धा होऊ शकत  “असे विचार येऊन मती गुंग होऊन जाते. मला सर्वात भावलेली कथा म्हणजे ‘अशीही पोटगी,’!ही होय. कारण माझ्या ओळखीत अशा प्रकारचे उदाहरण ऐकले होते. त्यामुळे माझ्या हृदयावर ते चांगलेच थडकले. !

“ अशीही पोटगी,” ही  अशीच एक मनाला चटका लावून जाणारी केस आहे. सुरेश आणि साधना या जोडप्याची ही कथा आहे. दोघेही साधारण तिशीतील आणि  दोघेही नोकरी करणारे. सुरेश जेमतेम  दहावी शिकलेला आणि साधना ‘नर्स’. लग्न होऊन ३ वर्षे झाली होती . साधना ‘पर जातीची’ असल्यामुळे सुरेशच्या आई वडिलांना त्यांचे लग्न पसंत नव्हते. सून घरात आल्यावर आई- वडिलांनी साधनाला प्रचंड त्रास दिला, अगदी जीवन नको होईस्तोवर . सुखाचा एक किरण सुद्धा दिसत नव्हता . हा जाच इतका वाढला  की सुरेश आणि साधनाने जीव देऊन जीवन एकदाचे संपवण्याचे ठरविले. मनाची तयारी करून दोघेही इमारतीच्या चौथ्या मजल्याच्यावर चढून गेले आणि गच्चीवरून खाली उडी मारण्यासाठी सज्ज झाले. सुरेशने आत्महत्या करण्यासाठी उडी घेतली आणि तो खाली पडला. मृत्युमुखी पडला नाही, पण दोन्ही पाय मोडले. त्याने  वर नजर करून पहिले तर साधनाने उडी मारलीच नाही! साधना भीतीने मागे सरकली आणि माहेरी निघून गेली. . साधनानेच कबूल केले  की, अपराधी भावनेमुळेच, सुरेशला तोंड दाखवायची तिला लाज वाटत होती आणि म्हणूनच वर्षभरात ती त्याला भेटली नाही.

साधनाने सुरेश वर घटस्फोटाची फिर्याद दाखल केली होती.  कोर्टामध्ये सुरेश मोडक्या पायाने, काठी टेकत टेकत येत असे . सुरेशने हाय खाल्ली. त्याला साधनाचे निघून जाणे जिव्हारी लागले. साधनाने त्याची साधी विचापूसही केली नाही. तो पंगू झाला आणि त्याचा जॉब – नोकरी गेली.  सुरेश मात्र “साधनाने मला पोटगी द्यायलाच पाहिजे” यावर अडून बसला “मला साधनाला घटस्फोट  द्यावयाचा नाही आणि हवा असेल तर तिने आयुष्यभर जगण्यासाठी ‘पोटगी’ द्यावी अशी मागणी  करीत असे  .अखेरीस समुपदेशकांच्या अथक प्रयत्यांमुळे ‘साधनाने’ आपल्या जवळची होती नव्हती अशी सारी रक्कम ‘सुरेशला’ दिली .त्याला अपंगांसाठी असलेला टेलिफोन  ‘बूथ’ मिळाला.  दोघेही ‘घटस्फोटास’ तयार झाले..ही विचित्र वाटणारी केससुद्धा ‘डिप्रेशन’ या सदराखालीच मोडते.  राग, मानसिक ताण-तणाव , नैराश्य, आशाभंग आणि अपराधीपणा या सर्वांचाच एकत्रित मानसिक उद्रेक या कथेत आपल्या समोर उलगडवून दाखविण्यात बागेश्रीताईंनी मोठेच कौशल्य दाखविले आहे

“गोष्ट एका लग्नाची” सांगताना त्या लिहितात मध्यमवयीन किंवा वरिष्ठ नागरिकांच्या केसेस ठराविक साच्याच्या  नसतात. प्रत्येक केसेसमध्ये वेगळेपणा दिसून येतो. तरुणाईच्या आणि मध्यवयीन केसेस मध्ये, क्रूरता, विवाहबाह्य संबंध अशा काही गोष्टी, लपून केलेले विवाह, कुटुंबियांचा हस्तक्षेप, बरे न होणारे शारीरिक व मानसिक विकार स्वाभाविक दोष, अशी अनेक कारणे दिसून येतात. तर वरिष्ठांच्या बाबतीत, रजोनिवृत्तीनंतर, नवऱ्याला मी आवडतच नाही या कारणास्तव   स्त्रिया डिप्रेशनमध्ये जातात. तर पुरुष, “मला ‘ही’ जेवणात विषच घालते,  माझी सर्व काही संपत्ती हडप करावयाची आहे”,  असे विषय, कोर्ट केसेस फाईल करण्यास प्रवृत्त करतात. अशा विविध वयाच्या , जातीतल्या लोकांच्या केसेस कथेच्या स्वरूपात लेखिकेने  सहज शब्दात मांडल्या आहेत. त्या नक्कीच वाचनीय व चिंतनीय आहेत. आपण याची अनुभूती घ्याल याची मला खात्री आहे..

आता आपण कौटुंबिक समस्यांमधील ‘मनोविकाराचे’ स्थान प्रकट करणाऱ्या एका कथेचा आढावा घेऊ. ‘संशयाचे भूत’.  वैवाहिक जीवनात पती-पत्नी यांच्यात एकमेकांच्या चारित्र्याविषयी घेतला गेलेला संशय एक अतिशय गंभीर आणि अनेक केसेसमध्ये आढळणारी समस्या आहे. ‘परस्पर विश्वास’ वैवाहिक जीवनाचा पाया आहे. आपल्या हक्काच्या व्यक्तीवर दुसऱ्या कोणाची तरी नजर आहे किंवा आपली हक्काची व्यक्ती दुसऱ्या कोणाबद्दल अभिलाषा बाळगून आहे  या समजुतीतून निर्माण होणारी एक ‘मनो विकृती’ आहे आणि या विकृतीला ‘PARANOID” असे म्हटले जाते. एक अशा प्रकारची केस स्टडी कथेच्या स्वरूपात, बागेश्री ताई नी  लिहिली आहे. यशवंतला ‘सुशीलाच्या ‘ चारित्र्याविषयी संशय निर्माण झाला. नऊ वर्षाच्या संसारा नंतरसुद्धा घटस्फोटाची याचिका ‘सुशीलाकडून ‘कोर्टासमोर सादर केली गेली. आपले शेजारी आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध बाळगून आहेत असा संशय यशवंता च्या मनात बळावला .सुशीला सुरेख  आणि कुठूनही चारचौघांमध्ये उठून दिसणारी होती. यशवंताला संशयाच्या भुताने पछाडले होते. तिच्या हालचालींवर यशवंत कडक नजर ठेवून होता.  सुशीला ची सर्व पत्रे तपासल्याशिवाय ती पुढे पाठवत नसे. सुशीला चित्रकार   होती आणि ती विकून पैसे मिळवीत, आपला उदरनिर्वाह करत  होती . नवऱ्याच्या जाचाला कंटाळून तिने घर सोडले आणि एका ‘स्त्रियांच्या आश्रमात’ आश्रय घेतला. यशवंताने  संस्थेच्या’ चालकांना धमक्या द्यायला सुरुवात केली . त्याचा मानसिक विकार आणखीनच बळावला.सुशीलाने  त्याची धास्ती घेतली.  संस्थेच्या संचालकांनी तिच्या आई-वडिलांना बोलावून घेतले. कथा ऐकून तिची आई- वडील चांगलेच हादरले. यशवंताने सुशीलाला केलेल्या  मारहाणीला आणि तिच्या मानहानीला काही सीमाच नव्हती. सुशीलाला त्याने कोर्टात खेचले आणि आपल्या ‘चारित्र्यहीन’ बायकोवर खोटेनाटे आरोप पत्र सादर केले.  डोक्यावर पदर घेऊन सुशिला कोर्टात यशवंताच्या प्रश्नांना मान खाली घालून उत्तर देत असे.  सुशीलाची शारीरिक व मानसिक अवस्था पाहून कोर्टाने तिला घटस्फोट मंजूर केला ‘पॅरानॉईड’ अवस्थेतील नवऱ्याच्या जाचामुळे , घटस्फोट’ देण्याव्यतिरिक्त कोणताच पर्याय राहिला नव्हता .

स्त्री वर्गावर होणारे शारीरिक आणि मानसिक अत्याचार हे किती अस्वस्थ करणारे आहेत हे बागेश्री परीख यांच्या पुस्तकातून अतिशय स्पष्ट होते.  अश्या दोन कथांची संक्षिप्त उदाहरणे ही अशा केसेस मधील जटिलता,  मानसिक गहनता आणि गुंता-गुंत दाखविण्यासाठी दिली आहेत. अवघ्या ८८ पृष्ठांच्या या पुस्तकातून  बागेश्री परीख यांनी एका स्त्री न्यायाधीशाच्या नजरेतून अशा कथा टिपून , शब्दरूप देऊन एक मोठी सामाजिक सेवा केली आहे. या विषयावरील मराठीतले हे अजोड असे पुस्तक आहे.

पुस्तकाच्या अखेरीस, शारदा लिमये,{ निवृत्त मुख्याध्यापिका, पार्ले टिळक विद्यालय }यांनी बागेश्री ताईंच्या पुस्तकावर अतिशय अनुरूप अशी टिपणी केली आहे. ती अतिशय वाचनीय आहे.

— वासंती गोखले

लेखकाचे नाव :
VASANTI ANIL GOKHALE
लेखकाचा ई-मेल :
vasantigokhale@gmail.com

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..