टॉम स्मिथ नावाचा एक माणूस मरणशय्येवर होता. त्याने आपल्या मुलांना बोलावून घेतले. तो म्हणाला “मुलांनो, माझ्या सारखे जगलात तर तुम्हाला आयुष्यभर मनाची शांतता लाभेल.”
त्याची मुलगी सारा त्याला कटुतेने म्हणाली “डॅडी, तुम्ही मरत आहात ते बघून आम्हाला वाईट वाटते आहे. परंतु जन्मभर तुमच्या चांगल्या वागण्याचा परिणाम असा झाला आहे की तुमच्या बँकेतल्या खात्यात एक पै सुध्दा शिल्लक नाही. इतरांचे वडील, ज्यांना तुम्ही भ्रष्टाचारी, चोर म्हणालात त्या लोकांनी मात्र आपल्या मुलांसाठी इमले माड्या उठविल्या आहेत. त्यांच्या मुलांसाठी त्यांनी भरपूर आर्थिक सोय करुन ठेवली आहे. तुम्ही आम्हाला काय दिलेत? आपले रहाते घर सुध्दा भाड्याचे आहे. मला वाटत नाही मी तुमचे अनुकरण करावे. मला वाटेल तसेच मी जगणार आहे. ”
काही वेळानंतर टॉम स्मिथचे प्राणोत्क्रमण झाले. त्यानंतर काही वर्षांनी सारा एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये मुलाखतीसाठी जाते. कंपनीचे चेअरमन स्वतः मुलाखती घेत असतात. ते तिला विचारतात “स्मिथ म्हणजे कोणाची मुलगी तू?” सारा थोडी नाराजीने म्हणते “मी टॉम स्मिथची मुलगी. माझे वडील आता हयात नाहीत.”
चेअरमन उद्गारतात “ओ हो, तू टॉम स्मिथची मुलगी होय?” नंतर मुलाखत घेणाऱ्या इतरांकडे वळून ते म्हणतात “हिच्या वडीलांनी मला इन्स्टिट्यूट ऑफ अॅडमिनिस्ट्रेटर्समध्ये नोकरीसाठी शिफारस दिली होती. त्या बळावर आज मी या कंपनीचा चेअरमन झालो. या भल्या गृहस्थाने माझ्याकडून एक पैसाही घेतला नाही. बाकीचे लोक बरोबर आपली किंमत वसूल करतात. त्याने माझ्यामध्ये योग्यता बघितली आणि मला आयुष्यात पुढे जाण्याची संधी दिली.”
साराकडे बघत ते म्हणाले “मुली, मला तुला काहीच प्रश्न विचारायचे नाहीत. तू तुझ्या बाबांची मुलगी असल्यामुळे मी तुझी निवड केलेली आहे. उद्यापासून तू कामाला ये. तुझ्या हातात उद्याच नेमणुकीचे पत्र देण्यात येईल.”
सारा स्मिथ आपल्या सक्षमतेमुळे लवकरच कंपनीची मॅनेजर झाली. तिला दोन गाड्या, एक मोठा बंगला, ज्यामध्ये तिचे ऑफिस होते आणि वर्षाला एक लाख डॉलर्स एवढा पगार मिळायला लागला. याशिवाय इतर खर्च, सवलतीही तिला मिळाल्या.
दोन वर्षातच कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी सुयोग्य उमेदवाराची निवड सुरु झाली. सारा स्मिथला ते पद मिळाले. त्याचे कारण तिचा प्रामाणिकपणा, शिस्त आणि कामातली कार्यक्षमता हेच होते.
हे पद मिळाल्यानंतर तिची मुलाखत घेण्यात आली. मुलाखतकाराने तिला विचारले “तुमच्या यशाचे रहस्य काय आहे? ” साराचे डोळे भरुन आले. ती म्हणाली “माझ्या वडीलांमुळे मी आजवर येथे येऊन पोहोचले. मी त्यांचेच अनुकरण करत राहिले. मला माहित आहे की ते श्रीमंत नव्हते. परंतु त्यांच्या जवळ श्रीमंती होती ती त्यांच्या प्रामाणिकपणाची, शिस्तीची आणि कार्यक्षमतेची.”
मुलाखतकाराने पुढे विचारले “तुमचे डोळे भरुन येण्याचे कारण काय? वडीलांची आठवण काढून रडायला तुम्ही लहान तर नाही आहात. ” सारा उत्तरली “माझे वडील मरायला टेकले होते तेव्हा मी त्यांचा अपमान केला. त्यांना उणे दुणे बोलले. त्यांच्याजवळ काही शिल्लक नव्हती म्हणून मी त्यांना कठोर शब्द बोलले. परंतु माझ्याच नकळत मी त्यांचेच अनुकरण करत राहिले. ”
मुलाखतकाराने विचारले “थोडक्यात म्हणजे तुम्हाला टॉम स्मिथ सारखे व्हायचे आहे तर? ” सारा म्हणाली “मोठे व्हायला वेळ लागतो. तुम्हाला सातत्याने त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. यश मिळाल्यावरही आपण श्रीमंत होऊ याची खात्री नसते. मात्र आपण एक उत्तम आणि सक्षम माणूस होऊ शकतो याची आपल्याला खात्री देता येते. आपल्या मुलांसाठी आपण हाच वारसा मागे ठेवला पाहिजे. आज मी यशाच्या शिखरावर आहे. परंतु आता मला जाणवते की माझ्या वडीलांचा आदर्शच सर्वांनी समोर ठेवला पाहिजे. म्हणूनच मी माझ्या घराच्या दर्शनी भागात माझ्या वडीलांचा मोठा फोटो लावला आहे.”
खरेच, आपणही असाच वारसा आपल्या आई वडीलांकडून घ्यावा. अखेर माणसाची ओळख त्याच्या व्यक्तिमत्वाने होते, त्याच्या बँक बॅलन्सने नाही. हल्ली अनेक मुलांना असे वाटते की ज्यांच्या आई वडीलांजवळ भक्कम साधन संपत्ती असते तेच खरे चांगले आई वडील असतात. श्रीमंत असणे आणि चांगले असणे या दोन्हीमध्ये फरक आहे. तो आपण समजून घ्यायला हवा. श्रीमंत होणे आपल्या हातात नाही. आपण फक्त प्रयत्न करु शकतो. पण एक चांगला माणूस होणे निश्चितच आपल्या हातात असते. साराचा वारसा आपण सगळ्यांनी घेतला तर आपला देश चारित्र्यवान व्हायला वेळ लागणार नाही.
— नीला सत्यनारायण
अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.
Leave a Reply