पावसाळी ढगांतील पाण्याचे थेंब हे विद्युतभारित असतात. किंबहुना, धूळ किंवा हवेतील तत्सम पदार्थांवरील विद्युतभार पावसाळी ढगांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतो. तसंच ढगातील पाण्याच्या थेंबांच्या आकारावरही या विद्युतभाराचा परिणाम होत असल्यानं, या विद्युतभारावर पावसाची तीव्रता अवलंबून असते. हवामानाचा अभ्यास करणारे संशोधक या विद्युतभाराचा आणि पावसाचा संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न पूर्वीपासून करीत आहेत. अलीकडेच केल्या गेलेल्या एका संशोधनासाठी, इंग्लंडमधील बर्कशायर येथील रीडिंग विद्यापीठातील संशोधकांनी वेगळाच मार्ग अवलंबला. या संशोधकांनी आधार घेतला, तो शीतयुद्धाच्या काळातील अणुचाचण्यांचा.
शीतयुद्धाच्या काळात मोठ्या प्रमाणात अण्वस्त्रांच्या चाचण्या केल्या गेल्या. अशा चाचण्यांच्या मुख्य जागा म्हणजे अमेरिकेतलं नेवाडा किंवा त्याकाळच्या रशियातलं कझाकस्तान. जेव्हा अणुस्फोट घडवला जातो, तेव्हा त्यातून मोठ्या प्रमाणावर किरणोत्सर्ग निर्माण होऊन विद्युतभारित कणांची निर्मिती होते. हे विद्युतभारित कण वातावरणात पसरून दूरपर्यंत पोचतात. धूळीप्रमाणेच हे कणसुद्धा, पावसाच्या थेंबांच्या आकारावर परिणाम घडवून असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. रीडिंग विद्यापीठातील संशोधकांनी या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी १९६२-६४ हा काळ निवडला. स्कॉटलंडच्या उत्तरेकडील, शेटलँड या दूरच्या बेटावरील लेरविक येथील हवामानाच्या नोंदींचा त्यांनी अभ्यास केला. प्रदूषणात निर्माण होणारी धूळ व इतर पदार्थ हे ढगाच्या निर्मितीला हातभार लावतात. शेटलँड हे बेट मानवी दळणवळमापासून दूर असल्यामुळे, इथल्या पावसाच्या निर्मितीचा मानवी प्रदूषणाशी संबंध नव्हता. याच काळात लंडन जवळच्या क्यू येथील वेधशाळेतल्या, वातावरणातील विद्युतभाराच्या नोंदीही त्यांनी तपासल्या. लंडनजवळची ही जागा काय किंवा शेटलँड बेट काय, ही दोन्ही ठिकाणं अणुस्फोटाच्या जागांपासून खूप दूर असल्यानं अणुस्फोटामुळे निर्माण झालेला विद्युतभार हा या दोन्ही ठिकाणी सारखाच असणं, अपेक्षित होतं.
या संशोधकांनी अणुस्फोटामुळे निर्माण झालेला वातावरणातील विद्युतभार आणि शेटलँड बेटावरील पावसाच्या प्रमाणाची सांगड घातली. या सांगडीद्वारे त्यांना त्यांतील अन्योन्यसंबध स्पष्टपणे दिसून आला. अणुस्फोटामुळे जेव्हा वातावरणातील विद्युतभाराचं परिणाम वाढलं होतं, तेव्हा शेटलँड बेटावरील ढगांचं आच्छादन अधिक दाट झालं होतं. इतकंच नव्ह तर, त्यावेळी तिथल्या पावसाचं प्रमाणसुद्धा सरासरीपेक्षा चोवीस टक्क्यांनी वाढलं होतं. म्हणजे वातावरणातील वाढलेला विद्युतभार पावसाचं प्रमाण निश्चितपणे वाढवत होता. इतकंच नव्हे तर, अणुस्फोटामुळे दूरवरच्या ठिकाणच्या हवामानातसुद्धा बदल होऊ शकतो हे या संशोधनावरून दिसून आलं.
रीडींग विद्यापीठातील संशोधकांचं हे संशोधन भविष्यात अत्यंत उपयुक्त ठरू शकतं. कारण, विद्युतभार निर्माण करणाऱ्या एखाद्या साधनाद्वारे जर ढगांतील विद्युतभार वाढवला, तर त्याची कृत्रिम पाऊस पाडण्यासही मदत होऊ शकेल.
— डॉ. राजीव चिटणीस.
छायाचित्र सौजन्य: Federal Government of the United States
Leave a Reply