१२ फेब्रुवारी २०१२ ला चार्ल्स डार्विनची २०३ वी जयंती होती. केवळ २६ वर्षांचे वय असलेला चार्ल्स, ब्रिटिश नौदलाच्या ‘एचएमएस बीगल’ या बोटीवरून, ५ वर्षांच्या काळासाठी, १८३५ साली, जगप्रवासाला निघाला. या काळात, आर्किडपासून व्हेलपर्यंतच्या प्रजातींचा त्याने अभ्यास केला, स्वत:च्या अचाट बुध्दीमत्तेचा वापर करून आणि खूप मेहनत घेऊन नोंदी केल्या. पुढील २०-२५ वर्षे मनन करून, १८५९ साली ‘ओरिजिन ऑफ स्पेसीज’ हा ग्रंथ, त्याच्या वयाच्या ५० व्या वर्षी लिहीला. या पुस्तकात त्याने, ‘नैसर्गिक निवड’ या तत्वावर आधारलेला उत्क्रांतीवादाचा सिध्दांत मांडला. हा सिध्दांत, त्याच्या आयुष्यभराची निरीक्षणे आणि निसर्गातून गोळा केलेले प्रत्यक्ष पुरावे यावर आधारलेला आहे. विज्ञानप्रगतीचा तो एक महत्वाचा टप्पा आहे.
डार्विनच्या या पुस्तकात, पृथ्वीवर आधीच अस्तित्वात असलेल्या सजीवांच्या प्रजातीत, पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी कशी उत्क्रांती झाली आणि प्रबळ प्रजाती कशा निर्माण झाल्या याचे विवेचन आहे. पण पृथ्वीवर, मुळातच सजीव कसे निर्माण झाले या विषयी उल्लेख किंवा चर्चा नाही.
सजीवांच्या वास्तव्याचा प्रदेश, हवामान, अन्नाचा साठा, स्थलांतर वगैरे नैसर्गिक घटक बदलले की, त्या बदललेल्या परिस्थितीत, जगण्यासाठी, जुळवून घेणारे बदल त्या त्या प्रजातीत घडून सबळ प्रजाती निर्माण होतात. ते बदल पुढच्या पिढ्यातही संक्रमित होतात. हे बदल इतके सावकाश असतात की, ते अनेक पिढ्यांनंतर, शेकडो वर्षांच्या काळानंतर जाणवतात. बदलत्या परिस्थितीशी टक्कर देऊ शकतील, जगण्यासाठी संघर्ष करू शकतील अशा सबळ, सामर्थ्यवान प्रजातीच टिकतात आणि विस्तारित होतात, तर दुबळ्या प्रजाती नामशेष होतात. लैंगिक दृष्ट्या अधिक सक्षम असलेल्या सजीवांची वंशवृध्दी जोमाने होते. डार्विनने हा सिध्दांत आणि उपसिध्दांत मांडल्यानंतर काही दशकातच त्याचे खरेपण आणि महत्व शास्त्रीय जगतात जाणवू लागले.
डार्विनने प्राण्यांच्या अनेक प्रजातींचा अभ्यास केला आणि त्यांच्या उत्क्रांतीबद्दलचे निष्कर्ष जाहीर केले पण मानवी उत्क्रांतीबद्दल मात्र त्याने मौन पाळले कारण त्याची पत्नी कट्टर धार्मिक वृत्तीची होती आणि त्या काळात, बायबलविरुध्द मतप्रदर्शन करणे अपराधस्वरूपाचे मानले जाई. परंतू त्याचा मित्र, थॉमस हेन्री हक्सले याने १८६३ साली, मानवाच्या, निसर्गातील अस्तित्वाबद्दल विचार मांडले आणि माकडांच्या काही प्रजातीत उत्क्रांती होऊन मानवाची निर्मिती झाली असे विश्वासपूर्वक जाहीर केले. स्वतः डार्विनने त्याबाबतीत भाष्य करण्याचे टाळले. त्यानंतर ८ वर्षांनी म्हणजे १८७१ साली, म्हणजे वयाच्या ६२ व्या वर्षी, डार्विनने ‘मानवाचे अवतरण’ म्हणजे ‘डिसेंट ऑफ मॅन’ हे क्रातीकारी पुस्तक लिहीले आणि जगभर खळबळ उडवून दिली. विशेषतः ख्रिस्ती धर्मियांना त्याचा सिद्धांत अजिबात रुचला नाही. हे पुस्तक लिहील्यानंतर डार्विनला बर्याच आक्षेपांना आणि टिकेला तोंड द्यावे लागले. माकडाचे शरीर आणि डार्विनचा चेहरा अशी व्यंगचित्रे प्रसिध्द झाली. चिंपांझीच्या हाताचा पंजा आणि मानवाच्या हाताचा पंजा यात किती साम्य आहे हे सोबतच्या चित्रावरून स्पष्ट होते.
या सिद्धांतानुसार, आत्म्याचे अमरत्व, मानवाचे इतर प्राण्यापासूनचे वेगळेपण, परमात्मा, आत्मा, ईश्वर वगैरे धार्मिक संकल्पनांना वेगळा अर्थ प्राप्त करून दिला. ईश्वराने मानवाची निर्मिती केली नाही, तो सजीव सृष्टीचाच एक घटक आहे हे सिद्ध केले. या सिद्धांतामुळे आनुवंशिकशास्त्र, जनुकशास्त्र, जनुकीय अभियांत्रिकी वगैरे शास्त्र शाखा निर्माण झाल्या. ‘ डार्विनचा उत्क्रांतिवाद, केवळ जीवशास्त्रापुरता मर्यादित नसून धार्मिक मूल्ये, धर्म विचार मानवी मूल्ये, नैतिक मूल्ये इत्यादी अनेक विषयांवर दूरगामी परिणाम करणारा ठरला.
हिंदूधर्मग्रंथातील सजीवांची उत्क्रांती ::१८ व्या शतकाचे अखेरीस डार्विनने, पृथ्वीवरील सजीवांच्या उत्क्रांतीचा सिध्दांत मांडला. पण त्याच्याही आधी हजारो वर्षांपूर्वी, भारतातल्या रुशीमुनींनी, हिंदूधर्मग्रंथात, विष्णूच्या दशावताराच्या स्वरूपात, हाच सिध्दांत मांडला आहे. ३.५ अब्ज वर्षांपूर्वीच्या सागरी सजीवांपासून आजच्या मानवापर्यंतची सजीवांची उत्क्रांतीच सांगितलेली आहे.
मानवानंतरची उत्क्रांत प्रजाती म्हणजे कल्की ही पुढची पायरीही दहावा अवतार म्हणून सांगितली आहे. ७० लाख वर्षापूर्वी कपिपासून मानव उत्क्रांत झाला. आणखी ७० लाख वर्षांच्या उत्क्रांतीनंतर जो प्राणी निर्माण होईल…तो कल्की. या दहाही अवतारात, श्रीविष्णू, आनुवंशिक तत्वाच्या स्वरूपात सामावलेला आहे.
हिंदूधर्मात आणखीही एक संकल्पना आहे. ती म्हणजे, ८४ लाख योनीतून, आत्म्याने जन्म घेतल्यानंतर तो मानवाच्या शरीरात जन्म घेतो. ही संकल्पना देखील, पृथ्वीवरील सजीवांची उत्क्रांतीच दर्शविते. ३.५ अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवर निर्माण झालेल्या आनुवंशिक तत्वात उत्क्रांती होतहोत, सजीवांच्या लाखो प्रजाती निर्माण झाल्या आणि शेवटी मानवाची प्रजाती निर्माण झाली हेच सुचविते. या सर्व प्रवासात आनुवंशिक तत्व सामावलेले आहे. याचा अर्थ असा की, आत्मा ही संकल्पना, आनुवंशिक तत्वालाच लागू पडते. सजीवांचा आत्मा म्हणजेच त्यात सामावलेले आनुवंशिक तत्व. या संकल्पना, विज्ञानीय भाषेत न सांगता अध्यात्मिक भाषेत सांगितल्यामुळे, त्यांच्यातील विज्ञान, अध्यात्माच्या महासागरात जे बुडाले आहे ते अजून बाहेर आले नाही.
पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती :: अध्यात्मिक आणि विज्ञानीय संकल्पना.पृथ्वीवर सजीवांचे अस्तित्व आहे हे वास्तव आहे. त्याअर्थी हे सजीव कधीतरी, कसेतरी निर्माण झाले असलेच पाहिजेत. याला दोन पर्याय आहेत. एक म्हणजे ते कुणीतरी निर्माण केले असले पाहिजेत किंवा ते, योग्य परिस्थिती जुळून आल्यामुळे स्वयंभूरित्या निर्माण झाले असले पाहिजेत.
पृथ्वीवरील सजीवसृष्टी, सर्वज्ञानी, सर्वकाली, सर्वव्यापी आणि सर्वशक्तीमान अशा ईश्वराने निर्माण केली असे सर्व धर्मातील अध्यात्म सांगते. या गृहीतकाला, जगभरच्या विचारवंतांनी आक्षेप घेतला नाही की आव्हान दिले नाही. हजारो वर्षे हे गृहीतक स्वीकारले, इतकेच नव्हे तर, सर्व धर्मांच्या अनुयायांनी, आपापल्या अध्यात्मिक तत्वज्ञानाचा विकास करून धर्मग्रंथ लिहिले.
जगभरचे मानवसमूह, आपली जीवनशैली सुधारण्यासाठी, निसर्गसंपत्ती आणि निसर्गातले विज्ञानतंत्रज्ञान वापरीत होते. परंतू खर्या अर्थाने, पंधराव्या-सोळाव्या शतकात, पाश्चिमात्य देशात, विज्ञानयुग सुरू झाले. पृथ्वी सपाट नसून, चेंडूसारखी भरीव गोल असून, ती आणि बुध, शुक्र, मंगळ, गुरू आणि शनि हे ग्रह सूर्याभोवती फिरतात, हा धर्मसंस्थेच्या अध्यात्माला मोठा धक्का दिला. गॅलिलिओसारख्या शास्त्रज्ञाला त्याचे परिणाम भोगावे लागले. धर्मसंस्थेला दुसरा मोठा धक्का डार्विनने दिला.
विज्ञानाचे असे अनुमान आहे की, योग्य परिस्थिती आणि घटक जुळून आल्यामुळे ही सजीवसृष्टी स्वयंभूरित्या अस्तित्वात आली. मिथेन, अमोनिया आणि बरीचशी कार्बनी आणि नायट्रोजनी संयुगे अवकाशातून पृथ्वीवर आली. पुढे त्याचे रुपांतर अमायनो आम्ले आणि प्रथिने यांच्यात होऊन, पुनरुत्पादन करू शकतील असे रेणू निर्माण होऊन एकपेशीय सजीव निर्माण झाले असे शास्त्रज्ञ सांगतात. पृथ्वीवर सजीव कसे निर्माण झाले याबद्दल खूप माहिती पुस्तकांतून आणि संगणकीय महाजालावर मिळते ती अवश्य वाचावी. सजीवांच्या आनुवंशिक तत्वात उत्क्रांती होते असे डार्विनने सिद्ध केले असले तरी पृथ्वीवर सजीव कसे निर्माण झाले हे अजून कुणालाही निर्विवादपणे सांगता आले नाही.
३.५ अब्ज पृथ्वीवर्षात एकपेशीय सजीवांपासून आजच्या प्रगत मानवापर्यंत सजीवांची कशी उत्क्रांती झाली हे खरोखर गूढ आहे. मानवी शरीरातील अवयव आणि प्रक्रिया इतक्या गुंतागुंतीच्या तरीपण इतक्या परिपूर्ण आहेत की त्या, अती प्रगत अशा रसायनशास्त्रज्ञ, वास्तवशास्त्रज्ञ, सर्व अभियांत्रिकी शाखांतील अभियंते या सर्वांनी मिळून घडविल्या आहेत असे वाटते. वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्यांचे शोध बघा…त्यांनी लावलेले शोध निसर्गाने कोट्यवधी वर्षांपूर्वीच लावून त्यांचा परिपूर्णावस्थेत सजीवांच्या शरीरात यशस्वीरित्या वापरही केला आहे. नोबेल विजेत्यांची बुध्दीमत्ताही वाखाणण्यासारखी आहे पण तीही निसर्गाचीच निर्मिती आहे हे विसरून चालणार नाही.
सजीवांच्या उत्क्रांतीचा कार्यकारणभाव ::सजीवांतील प्रजनन यंत्रणा, निसर्गाने कशी निर्माण केली असावी? प्रजननासाठी लागणारे आनुवंशिक तत्व आणि ते जनक पिढ्यांकडून अपत्य पिढ्यात संक्रमित होण्यासाठी लागणार्या आज्ञावल्या कशा निर्माण केल्या असाव्यात हे खरोखर मानवी मेंदूच्या मर्यादेपलीकडले आहे असे वाटते.
नरमादीच्या मिलनातून, मादीच्या गर्भाशयात अपत्यगर्भ निर्माण होतो. शुक्राणू आणि बीजांड यात असलेले आनुवंशिक तत्व आणि आनुवंशिक आज्ञवल्याच त्या त्या प्रजातीच्या गर्भाचे शरीर धारण करतात. प्रजातीच्या प्राण्यात उत्क्रांत बदल होतात म्हणजे या आनुवंशिक तत्वात आणि आज्ञावल्यात सकारात्मक बदल उत्क्रांत होतात. डार्विनच्या काळात, डीएनए, आरएनए, गुणसूत्रे, जनुके वगैरे आनुवंशिक तत्वाचे घटक आणि सांकेतिक स्वरूपातील आनुवंशिक आज्ञावल्या यासंबंधीचे संशोधन झाले नव्हते.
विश्वातील बहुमोल ठेवा. ::३.५ अब्ज पृथ्वीवर्षांपूर्वी या वसुंधरेवर सजीवांचे आगमन झाले ही अख्ख्यायिका विश्वातील अनन्यसाधारण घटना आहे. तेव्हाच सजीवांचे आनुवंशिक तत्व आणि आज्ञावल्या निर्माण झाल्या. त्यांच्यात उत्क्रांती होतहोत, सजीवाच्या लाखो प्रजाती निर्माण झाल्या आणि शेवटी मानवाचे, सुमारे ७० लाख वर्षांपूर्वी, अवतरण झाले. उत्क्रांती थांबली नाही, सुरूच आहे. पुढील ७० लाख वर्षांनी, मानवापासून कोणता प्राणी उत्क्रांत होईल, कल्पना करवत नाही. सजीवांचे आनुवंशिक तत्व आणि आनुवंशिक आज्ञावल्या, पृथ्वीवर, सजीव जोपर्यत जगू शकतात तोपर्यंत राहणार आहेत. नंतर त्याचे काय होईल कसे सांगणार?
— गजानन वामनाचार्य
चार्ल्स डार्विन चा सिद्धांत हा मानव निर्मितीचे अंतिम सत्य नाही. डार्विन चा सिद्धांत हे वर्तमानावर अभ्यासलेले डार्विन चे विचार आहेत,ते किती घ्यावेत किती घेऊ नयेत हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. डार्विन ना त्यावेळीही िवराेध झालेला आहे. अब्जावधीं वर्षांपुर्वी ब्रह्मांडाची/सृष्टी ची निर्मिती कशी झाली,त्यात जीव मानव कसे तयार झाले, हे आजचा मानव काय सांगणार? केवळ अंदाज वर्तविले गेले आहेत, ते 100% सत्य आहेत असे कसे म्हणता येईल? सर्व कांही परमेश्वरालाच माहीत. मात्र हे खरे आहे की, माकडापासून उत्क्रांती हाेऊन मानव तयार झाला असता तर माकड अस्तित्वातच नसते. म्हणजेच मानव हा वेगळाच आहे.